Wednesday, February 5, 2025
Homeलेखदेशोदेशीची मराठी मंडळे , तेथील माणसे आणि मी

देशोदेशीची मराठी मंडळे , तेथील माणसे आणि मी

देश विदेशात एकपात्री प्रयोग करणाऱ्या कलाकार मेघना साने यांचे अविस्मरणीय जीवनानुभव…..

महाराष्ट्र मंडळ, लंडन –

`लंडन महाराष्ट्र मंडळा’ला भेट द्यायचीच हे ठरवूनच मी फोनाफोनी सुरू केली होती. महाराष्ट्र मंडळाच्या त्या ऑफीसमध्ये बुधवारी भेटीगाठी होऊ शकतात हे कळल्यावर मी तशी अपॉईंटमेंट घेतली. मी मिल्टन किन्सला मुलीकडे आले होते.  तेथून `हॅरो’ स्टेशन. मग बसने `डॉलिस हिल लेन’ असा दीड तासांचा प्रवास. पुन्हा तो खर्चिक होता. तरी जिद्दीने तीन वर्षे लागोपाठ मी या मंडळाला तीन वेळा भेट दिली आणि तिसऱ्या भेटीत कार्यक्रम ठरला. महाराष्ट्र मंडळाच्या त्या मखमली हॉलमध्ये आपला कार्यक्रम इंग्लंडमधील रहिवाशांनी पहावा, तेथील मराठी माणसे आपल्याला पाहायला मिळावीत ही इच्छा मी कितीतरी वर्षे मनाशी धरून होते.

2013 ला ‘कोवळी उन्हे’ हा माझा कथाकथनाचा आणि 2014 ला आमचा (माझा व हेमंत साने यांचा ) गाण्यांचा ‘नाते सुरांचे मायबोलीचे’ असे दोन कार्यक्रम त्या मंडळात ठेवले गेले. मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात शेवटी स्वलिखित ओव्या सादर केल्या.त्याला वेगवेगळ्या रागांत हेमंत साने यांनी चाली दिल्या होत्या. त्याही सगळ्यांनी तल्लीन होऊन ऐकल्या. कार्यक्रम झाल्यावर आमच्या हातावर काही बिदागी ठेवण्यात आली. ती मंडळाकडून नसून एका श्रोत्याकडून आहे असे सांगण्यात आले. नाव सांगितले नाही. परंतु अखेर आमची भेट त्या व्यक्तीशी झालीच . एवढे पैसे कोण ? कशासाठी देत आहे ? याची उत्सुकता होतीच. ती एक सत्तरीची महिला होती. पारंपरिक मराठी वेषात होती. ती म्हणाली, ‘गेले कित्येक दिवस मी माझं जीवन संपवण्याच्या विचारात होते. मी रेडिओ ऐकला, टीव्ही पाहिला. पिकनिकला जाऊन पाहिलं. पण कशातही मन रमत नव्हते. आज तुम्हा दोघांच्या दर्शनाने आणि स्वराने जे चैतन्यमय वातावरण निर्माण झाले त्यात माझे नैराश्य कुठेच पळून गेले. आता मी आत्महत्येचा विचार सोडून देणार आहे. जीवन सुंदर आहे, ते जगायला हवं अशा विचाराकडे वळले आहे.” आम्हा दोघांच्या आयुष्यातील तो कृतार्थ क्षण होता.

लंडनच्या महाराष्ट्र मंडळात

ऑस्ट्रेलियातील महाराष्ट्र मंडळे –

‘MASI ‘मासी’ म्हणजे महाराष्ट्र सिडनी असोसिएशन, सिडनी इनकॉर्पोरेटेड या संस्थेने मराठी कार्यक्रमासाठी गप्पागोष्टीकार जयंत ओक यांना आमंत्रित केले होते. त्यावेळी आमचा ‘ गप्पागोष्टी ‘ हा कार्यक्रम फॉर्मात होता. मी त्यांच्या सोबत पाच वर्षे काम करत होते. दोघे मिळून विविध परफॉर्मन्सेस करून दोन तास लोकांना हसवायचो. त्यामुळे जयंत ओक यांनी आम्हा दोन्ही कलाकारांचे तिकीट व राहण्याची सोय वगैरे मागितली. व्हिसा मिळणे अवघड होते. पण दूरदर्शनवरील कार्यक्रमाच्या टेप्स दाखवून आम्ही कलाकार असल्याची खात्री एम्बसीला एकदाची पटवली .

सिडनी मराठी मासीचे काम संपले की आम्ही मेलबर्नला महाराष्ट्र मंडळात जाणार होतो. दोन्हीकडची मराठी मंडळी अतिशय मनमिळावू व कौतुक करणारी होती. गप्पागोष्टी कार्यक्रमात आम्ही नवरा-बायकोचा एक विनोदी सीन करायचो. मंडळाचे अध्यक्ष कुमठेकर यांची पत्नी मला विचारू लागली, ” साडी जरीची नेसणार का ? दागिने कोणते घालणार ? ” वगैरे…

परदेशात जाताना जबाबदारी नको म्हणून मी दागिने आणलेच नव्हते. मिसेस कुमठेकरांनी मला स्वत:चे सोन्याचे दागिने घालायला दिले. ‘हे छान दिसतायत. हेच घाला कार्यक्रमात’ असा दागिन्यांचा चॉईस करून दिला.

दुसऱ्या दिवशी कार्यक्रमात मी ते दागिने घातलेच होते. ते शोभूनही दिसत होते. आम्ही पारंपरिक भारतीय वेशात होतो. तर समोरचा ऑडियन्स शर्ट पॅन्ट कोट घालून बसलेला. मात्र कार्यक्रम तुफान रंगला.

कार्यक्रमानंतर एक लेले नावाच्या अतिशय सुंदर स्त्रीने जेवणाचे आमंत्रण दिले. “तुम्ही दोघे आमच्याकडे राहा व सकाळीच जा. दमला असाल.” मी अस्वस्थ झाले. कुमठेकर बाईंचे दागिने तर परत द्यायला हवेत ना ? त्यांना गर्दीत शोधून काढले. त्या म्हणाल्या “खुशाल जा लेले बाईंकडे. दागिने उद्या द्या की, काय घाई आहे ? ”

मुंबईतून आलेल्या माझ्यासारख्या कलाकार बाईला हे सगळे फारच वेगळे होते. अजिबात ओळख नसलेल्या लेले बाईंनी माझी सेवा केली. कार्यक्रमाच्या व थंडीच्या एकूण दगदगीने मला ताप आला होता. त्यांनी औषधपाणी केले. आरामाची मला खरच गरज होती. ऑस्ट्रेलियात भेटलेल्या या स्त्रिया मला पुन्हा कधीच भेटणार नव्हत्या. पण कायम लक्षात राहिल्या.

सिंगापूर-

“ऑस्ट्रेलियातून परत येताना सिंगापूरचा दौरा करता येईल ” असे जयंत ओक म्हणाले. पण सिंगापूरला राहायचे कुठे हा प्रश्नच होता. तेथील महाराष्ट्र मंडळाला दोन तीन मेल करूनही कार्यक्रम काही ठरत नव्हता. त्यांचा `इन हाऊस’ ऑर्केस्ट्रा ठरला होता. मंडळातील मंडळींनी गाण्याचा कार्यक्रम बसवला होता. तो त्या महिन्यात होणार होता.

आमचे फॅमिली फ्रेंड थत्ते यांचा एक मित्र सिंगापूरला रहात होता. त्यांचा नंबर मिळवला व टाईम गॅप वगैरे बघून बूथवरून त्यांना फोन केला. तो जमाना व्हॉट्सऍप कॉलचा नव्हता. इंटरनॅशनल फोन मला बाहेर जाऊन करावा लागायचा. डॉ. काळे यांनी फोन उचलला आणि माझे नाव गाव सांगितल्यावर म्हणाले, “अरेच्चा. मेघना साने ? तुम्ही ज्या सोसायटीत राहाता आणि मुलांची शिबीरे घेता ते मला माहितच आहे. तुम्ही ऑस्ट्रेलियातून येताना सिंगापूर पाहायला येताय का ? जरुर या. मी दोघांचीही सोय करेन. पण तुम्हाला आमच्या मंडळाचा कार्यक्रम पहावा लागेल. 3 ऑगस्टला मराठी वाद्यवृंदात माझ्या पत्नीचं गाणं आहे. त्या कार्यक्रमाच्या सीटस् ठेवतो.”

माझा विश्वासच बसेना ! सिंगापूरमधील डॉ. काळे मला ओळखत होते ?

ठरल्याप्रमाणे डॉ. काळे आपल्या हॉस्पिटलच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून एअरपोर्टवर आम्हाला घ्यायला आले होते. त्यांनी दोन दिवसांची ट्रेन व बसची तिकीटे म्हणजे पास घेऊन ठेवले होते. “खुशाल फिरा दोन दिवस व तिसऱ्या दिवशी कार्यक्रमासाठी थांबा. ” अशी प्रेमळ ऑर्डर दिली. प्रत्यक्ष कलाकारच्या घरून आमंत्रण मिळाल्यावर कार्यक्रमाला जाणारच आम्ही, अगदी मानाने.

कॉलेजच्या एका प्रचंड ऑडीटोरियममध्ये हा गाण्याचा कार्यक्रम होता. 500 लोकांच्या उपस्थितीने सभागृह फुलून गेले होते. आम्ही गेल्यावर प्रथम मंडळाच्या अध्यक्षांना भेटलो. भारतातील कलाकार अनायसे पाहुणे मिळाले म्हणून त्यांनी आम्हाला पहिल्या रांगेत बसवले व कार्यक्रम सुरू झाला. डॉ. काळे परिवारही भेटला. मध्यंतरात स्टेजवरून पुकारा झाला.मला व जयंत ओक यांना व्यासपीठावर बोलवण्यात आले. आमच्या हस्ते कलाकारांचा सत्कार झाला. गाणी सुंदरच झाली होती. वातावरणही अगदी गडकरी रंगायतनसारखे वाटत होते. लोक तिकीट काढून बसले होते. आमची दोघांची भाषणेही झाली. त्या दिवशीची श्रीमंती मी विसरू शकत नाही.

सिंगापूर महाराष्ट्र मंडळातून सन्मान घेऊन आम्ही आपापल्या घरी आलो. डॉ. काळे यांच्या कृपेने सिंगापूर पहायला मिळाले. अशी माणसं भेटणं हे भाग्यच!

इस्त्रायलची मराठी माणसं!

इस्त्रायल देशात 30,000 मराठी माणसं राहतात याची कल्पनाही नसेल इथल्या मराठी माणसांना.या देशाचा सगळा व्यवहार हिब्रू भाषेत होतों. तरी तेथून `मायबोली’ हे मराठी त्रै मासिक प्रकाशित होतं. या त्रैमासिकातर्फे दरवर्षी एक कार्यक्रम आयोजित केला जातो. या ‘मायबोली’ संमेलनात 2011 साली मला एकपात्री कलाकार म्हणून कार्यक्रम सादर करण्याचा योग आला. तेथील मंडळाचे सेक्रेटरी भारतात आलेले असताना ते विवेक मेहेत्रे यांना भेटले. विवेक मेहेत्रे यांचा एकपात्री कार्यक्रम तेथे आदल्या वर्षी झालेला होता. आता त्यांना दुसरा कलाकार भारतातून आणायचा होता. मेहेत्रे सर त्यांना रविंद्र नाट्य मंदिरच्या माझ्या ‘कोवळी उन्हे ‘ कार्यक्रमाला घेऊन आले. तेथ इस्राएलचे चेरीकर यांनी ‘कोवळी उन्हे’ हा कथाकथनाचा कार्यक्रम पाहिला आणि खात्री करून घेतली की इस्त्रायलच्या मराठी लोकांनाही हा कळेल. त्यात देवाधर्माचे असे काही नव्हतं. साहित्यही सोप्या शब्दातले होते.  तेथे हे मराठी लोकांचे संमेलन 1 मे , म्हणजे महाराष्ट्र दिनाला असतं.

इस्राएल मध्ये गेल्यावर मराठी बोलणाऱ्या ज्यू भगिनी मला भेटायला आल्या. त्यांच्या शब्दाशब्दांतून भारताबद्दलचं प्रेम ओथंबत होतं . सर्वांनी आपापल्या परीने मला भेटी आणल्या होत्या. कुणी शाल, कुणी बदाम तर कुणी एखादी फ्रेम. प्रत्येकीने माहेरवाशीण असावी, तसे माझे लाड केले. सर्व ज्यू स्त्रिया मराठीत बोलत होत्या. 2010 नंतर 2011 ला पुन्हा आम्हाला ( मी आणि हेमंत साने यांना ) इस्त्रायलला कार्यक्रमासाठी बोलवण्यात आलं . कार्यक्रमाच्या सुरवातीला मायबोलीचे अध्यक्ष नोहा मस्सील यांनी खड्या आवाजात महाराष्ट्र गीत गायले. ते त्यांना पाठ होते. आम्ही आश्चर्यात बुडालो.

आम्ही ही त्यांना सरप्राईज द्यायचं ठरवले. मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात हेमंत साने यांनी गुजराती, बंगाली, तामीळ गाण्यांचे नमुने पेश केले. कोणीतरी विचारले, ” हिब्रू गाणं नाही येत का ?” आम्ही तयारीतच होतो. ताल धरला आणि हिब्रू गाणे म्हणू लागलो. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. सरप्राईझ तर पुढे आमच्यासाठीच होते. आमच्या कार्यक्रमातील हिंदी गाण्यांमध्ये `तू गंगा की मौज, मैं जमुना का धारा’ या गाण्याला वन्समोअर मिळाला. फक्त ‘रामले’ गावा मध्ये नाही तर `एलात’ मध्ये आणि नमस्कार हॉटेलमध्येही. किती प्रेम हे भारतावर! भारताचे राष्ट्रगीत गाऊन त्या ज्यू मराठी बांधवानी कार्यक्रमाची समाप्ती केली तेव्हा आमच्या  डोळयांत आनंदाश्रू दाटून आले.असे आमचे देशोदेशीतील मराठी मंडळातील कार्यक्रम, तेथे भेटलेली आपली माणसं अविस्मरणीय अनुभव देऊन गेलीत.

– मेघना साने.

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. परदेशातील सर्वच कार्यक्रम मेघना साने आणि हेमंत यांनी झक्कास केले असतीलच. माझ्या गप्पागोष्टी कार्यक्रमासाठी त्या माझ्या सोबत सिडनी आणि मेलाबोर्न ला आल्या होत्या. त्या वेळी आमचे वैचारिक सुसंवाद छानच होता त्यामुळे त्या तीन आठवड्याच्या प्रवासात भरपूर पहाता आले. थंडी मायनस तीन temparature पुरेपूर अनुभवले. तिथून singapore ला आगमन छान व्यवस्था यांनी भारावून गेलो. . स्टेज वर प्रमुख पाहुणा म्हणून आमच्या हस्ते सर्वांचे सत्कार केले.आम्ही जिथे रहायचो तेथील रेल्वे स्टेशन चे नावच धोबीघाट असे होते. सर्वार्थाने संपूर्ण तीन आठवड्याचा मी आणि मेघना साने हा दौरा कार्यक्रम गाजविला. चला आजही आमच्या जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला….

  2. मेघना साने यांचा एकपात्री प्रवास अनुभव छान आहे. माहिती शब्दांकन मस्त. मेघना जी आणि मी विश्व मराठी नाट्य संमेलन (न्यू जर्सी) स्वतंत्र कार्यक्रम सादर केला आहे. शुभेच्छासह.

    दिलीप खन्ना
    एकपात्री विनोदी कलाकार
    १५ वर्षे सतत अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात कार्यक्रम सादर केला आहे.
    +91 9653204296 WhatsApp

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी