Thursday, November 21, 2024
Homeकलातमाशा बोर्डावरची महाराणी: मंगला बनसोडे करवडीकर

तमाशा बोर्डावरची महाराणी: मंगला बनसोडे करवडीकर

आपल्या गीत, संगीत आणि अभिनयानं महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारताच्या रसिक मनाला गेली सहा दशकं भुरळ पाडली अशी माझी माय मंगल बनसोडे हिचा 12 सप्टेंबर हा जन्मदिवस . वयाच्या सातव्या वर्षी पायात एकेक किलोचे  चाळ बांधून तिने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. तशी मंगलताई भोळी भाबडी. तिचा जन्म राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या उदरी जेष्ठ कन्येच्या रूपाने झाला. पाच पिढया तमाशा करणारी मंगल आज वयाच्या ६७ व्या वर्षात पदार्पण करतेय.

Click here to readजयंती विशेष: भूदान चळवळीचे प्रवर्तक:आचार्य विनोबा भावे

मंगलाताई म्हणजे तमाशाच्या बोर्डावरची महाराणीच असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.पाच पिढयाचा तमाशा आज मंगल ताई करतेय याची माझ्यासारख्या सामान्य माणसाला पडलेली भुरळच की, काय ? असं वाटतं. नारायण खुडे नारायणगावकर + भाऊबापू मांगनारायणगावकर + विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर + मंगला विठाबाई नारायणगावकर + नितीन-अनिल मंगला विठाबाई नारायणगावकर करवडीकर इत्यादी.

आईचा वारसा जपत आणि तिचे अनुकरण करत मंगलाताई मोठी झाली. कुठेही मोठेपणाचा आव नाही की, मी पणाचा गर्व नाही. ती सतत तमाशा परंपरेतील लोक कलावंताच्या वाताहतीबद्दल चिंतन करते. आज कोरोनाच्या महामारीमुळे तमाशा कलावंत उपाशी पोटी  झोपतोय, त्याची खाण्या, पिण्याची गैरसोय होतेय,याची जणु तिला भ्रांत पडली. म्हणून तिने माझ्याकडे , लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे, जेष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड , तमाशा सम्राट रघुवीर खेडकर यांच्याकडे खेद ही व्यक्त केला .

Click here to read शांताबाईंच्या मनःपटलावरलं चांदणं!..

आज कोविड१९च्या परिस्थितीत काय  करावं मला सुचत नाही. या विवंचनेत असताना तिने जेष्ठ नेते, राष्ट्रवादी कॉन्ग्रेसचे जन्मदाते लोक कलावंतांचे आश्रयदाते आ.शरद पवार साहेब यांनाच साकडं घातलं. विठाबाईच्या संस्कारात वाढलेली मंगल आज जरी वयाने मोठी  झाली असेल, तरी तिने अनेक दुःख अक्षरशः पोटात घातलेत.  रसिक मायबापाची सेवा करतांना ती कुठेही डगमगत नाही. अगदी 1976 ला नितीनचा जन्म असो की, गोव्यातला कार्यक्रम असो , तो रद्द झाल्यावर तिचा श्रध्दांजलीचा फ्लेक्स कोल्हापुरात दिसला तरी तिने कच खाल्ली नाही. अशीच नितीनच्या जन्माची एक सत्य घटना मुद्दाम इथे नमूद करावीशी वाटते.

विठाबाईच्या सांगण्यावरून वगसम्राट रामचंद्र बनसोडे यांच्याबरोबर विवाह बंधनात अडकल्यानंतर  मंगलने स्वतःचा तमाशाचा फड काढला . रामचंद्ररावांनी स्वतःची जमीन विकुन भाग भांडवल उभं केलं आणि मंगलचा झंझावात सुरु झाला . बनसोडे साहेबांनी अनेक वगनाट्य लिहिली . त्यानी ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक वगाची बांधणी केली. त्यात बापू बिरु वाटेगावकर, विष्णू बाळा,मुंबईची केळीवाली इत्यादी होत.

अशा प्रतिभासंपन्न कलावंताबरोबर संसार थाटल्यानंतर ,  नितीन सारखा चौरंगी चिरा मंगलताईच्या पोटात गर्भरूपी वृद्धिंगत होत होता . नऊ महिने भरून पुरले होते. बोर्डावर रामचंद्ररावांनी लिहिलेला वग “जावळीचा फडकला भगवा झेंडा” हा चालु होता. ही घटना आहे १९७६ मु. कवठेमहांकाळ इथली. स्वतः रामचंद्र बनसोडे बोर्डावर गणुजी शिर्के याची भूमिका करत होते. तर मंगलाताई मोहणाची भूमिका सकारत होती. अशातच स्टेजवरच मंगलताईच्या ओटीपोटात कळ उठली , पण त्या वेदनेकडे तिचं लक्षच नव्हतं . ती तिच्या आवेशात भूमिका निभावत होती. नऊवारीत काष्टयातून ओघळ आला. रक्ताचा लाल बुंद, ते रामचंद्रांनी पाहिलं आणि क्षणभरात त्यांना भोवळ आल्यासारखी झाली. रसिक मायबाप वगात तल्लीन झाला होता. अचानक इला जायला कसं सांगू ? ही विवंचना रामचंद्र बनसोडेना पडली. त्यातही समय सुचकता दाखवून त्यांनी संवाद फेकला , मंगल हे काय होतंय तू राहुटीत जा . पोटाची कळ मारून मंगल राहुटीत आली.

Click here to read शिक्षक दिन विशेष: COL आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षिका स्वाती वानखेडे

आयाबायांनी मंगलला राहुटीच्या पाठीमागे नेलं आणि पुसपास करून पॉट बांधून  मंगल पुन्हा बोर्डावर उभी राहिली. तो खेळ संपला.  त्याच लगबगीत पुढे मुलगा जन्माला आला. त्याचं नाव नितीन बनसोडे. या कलावंतीनिला आणि तिच्या आयुष्याला अशा अनेक घटना हुलकावणी देऊन गेल्या. मुलाचा अपघाती मृत्यू तिने उघड्या डोळ्याने पाहिला. तर तंबू जळण्यापासून ते स्वतःच्या श्रद्धांजलीच्या बॅनर पर्यंत एकेक प्रकार पाहिले .मात्र हार काही मानली नाही . रसिकांच्या रसिकतेपोटीच तिने या अनेक यातना भोगल्या.

एक मात्र खरं आहे की , तिने तमाशा काही आजपर्यंत सोडला नाही. ती आजही या वयात अविरतपणे तमाशाची सेवा करतच आहे. आज दीडशे लोकांचा चमू घेऊन ती महाराष्ट्राचा आठ महिने दौरा करते. पाणी , पाऊस पाहत नाही की वादळ वारा. पण आज मात्र कोरोनाच्या महामारीने ती हतबल झाली आहे . माझा तमाम महाराष्ट्रातील लोककलावन्त आज हातघाईला आलाय. अशातही कोरोनाकाळात सुनाबाळा , नातवंड, मुलं घेऊन गोर गरिबाला जीवन उपयोगी साहित्य या परिवाराने वाटले. ती जितकी मायाळू आहे तितकीच दानशूर आहे मुलं सुद्धा तिच्यावर गेलेत.

मंगलताईचे किस्से खूप आहेत. तिचा एक किस्सा तर फार भयानक आहे.फडकला कलाकार उपाशी पोटी झोपू नये म्हणून तिने तर स्मशातच राहुटी लावली. वेळ आणि काळ सांगूंन येत नाही. लातूर जिल्ह्यात तिचा कार्यक्रम होता. अचानक निसर्गाने घाला घातला . प्रचंड मुसळधार पावसाला सुरुवात झाली. गाड्या चिखलात रुतू नयेत म्हणून तिने तंबु काढायला सांगितला . सर्व सामान गाड्यात भरलं आणि रात्री पुढच्या गावाचं नियोजन केले. साठ किलोमीटरचा प्रवास करून पुढचा मुक्काम ठोकायचा होता. कलावन्त उपाशी पोटी होते. दरमुक्काम दरकोस करत गाड्याचा ताफा निघाला . पाच पाच किलोमीटर वर गाव लागेल तिथं थांबायचं हे तिने निश्चित केलं होतं. कारण १५० कलावन्त उपाशी होते. धर्मशाळा, ग्रामपंचायत, चावडी इथे विनंत्या करूनही  तिला उतरण्याची परमिशन दिली नाही. शेवटी १२कोसावर आल्यानंतर मिनमिनता उजेड दिसला. आणि तिच्या जीवात जीव आला . स्वयंपाकी , कलावन्त खाली उतरले. छोटीशी राहुटी टाकली. जेवण बनवलं , सगळे जेवले. थोडं उजाडल्यावर बघतो तर काय ? ती त्या गावची स्मशानभूमी होती !

सगळं मनात साठवून या माय माउलीने तमाशा काही सोडला नाही. तिला अनेक प्रलोभने आली, आमिषे आली पण तिने आपला तमाशाचा  प्रकृती पिंड सोडला नाही. विठाबाईच्या घराण्याला कुठे गाल बोट लागता कामा नये याची आजही ती काळजी घेते. अगदी पंढरपूरमधून खासदरकीचं तिकीट सुद्धा मिळालं, पण तमाशा माझं जगणं आणि तमाशाच माझी तहान, भूक, आणि आयुष्य हेच तीच ध्येय आहे.पाच पिढयाचा तमाशा करतांना तिचा उर भरून येतो. रामचंद्ररावांच्या पश्चात ती नितीन आणि अनिलच्या जीवावर तमाशाचे खेळ लावते . मात्र मुली मुलांच्या लेकरांना उच्च शिक्षितही बनवते. एक नात मुंबईच्या के.ई. एम. रुग्णालयात एम डी डॉक्टर आहे . नातू इंजिनियरिंग करतोय.पण कलेची कास म्हणून नितीनची धाकटी लेक सायली आता सहाव्या पिढीचा तमाशा साकारण्यात सज्ज आहे. याचं मला कौतुक वाटतं. मंगलाताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझाच धाकटा बंधू

डॉ. गणेश चंदनशिवे
विभागप्रमुख ,लोककला अकादमी
मुंबई विद्यापीठ.

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. तमाशा बोर्डावरची महाराणी मंगला बनसोडे यांची जीवन कहाणी वाचून मन अंतर्मुख बनले आहे. विचार करायला लागले आहे. आपल्या प्रदीर्घ जीवनाचा सामना कशा पद्धतीने करायला पाहिजे याची शिकवणच या कहानी मधून आपणास मिळत मिळते आहे. डॉ.चंदनशिवे सरांनी खूप मंगला बनसोडे यांची कहाणी लिहून मनामध्ये एक वेगळे चित्र निर्माण केले आहे. मंगलाताई बनसोडे यांच्या कार्याला मानाचा मुजरा. आजच्या शुभ दिनी वाढदिवसाच्या सरोदे परिवारा मार्फत मनपूर्वक शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments