Wednesday, February 5, 2025
Homeलेखनिर्भयाला बोलता आले असते तर!

निर्भयाला बोलता आले असते तर!

या देशात निर्भया असे नामकरण होणाऱ्या दुर्दैवी महिला-मुलींच्या यादीत काल माझेही नाव समाविष्ट झाले. निर्भया!किती छान नाव आहे ना ? भय नसलेली, धीट हाच अर्थ आहे ना तुमच्या शब्दकोषात ? खरेच आम्ही धीट होतो म्हणूनच तर आम्ही या दिव्याला सामोरे गेलो ना ! संकटाचा सामना केल्यामुळे आम्ही भयमुक्त झालो आहोत ना ? काय पण नाव दिले आहे… निर्भया ! अरे, त्यापेक्षा अबला हे नाव दिले असते तर शोभले असते. कारण आपल्या देशात महिला ह्या शोभेच्या बाहुल्याच आहेत ना ? शिवाय अबला म्हणून कायम स्त्रियांवर अत्याचार होतात ना ? एकानंतर एक निर्भया अत्याचाराला बळी पडत आहेत परंतु प्रकार थांबतात का? आमची विटंबना थांबते का?

Click here to read श्रमिक महिलांपुढील समस्या : घर चालवायचे कसे?

आता नेहमीप्रमाणे विरोधक बेंबीच्या देठापासून ओरडताना, सरकार पक्ष कठोरातील कठोर शिक्षा करण्याचे आश्वासन देताना आमच्या आणि आमच्या कुटुंबीयांना झालेल्या जखमांवर मीठ चोळल्या जाईल. समाजातील एक-दोन टक्के लोक एकत्र येतील, निषेध मोर्चे काढतील. खरेतर यातून या लोकांना काय साध्य करायचे असते कळत नाही .कारण हा प्रकार म्हणजे ‘साप गेल्यावर कातडीला बडविण्यासारखे‘ आहे. यामुळे होतंय का तर अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना पुन्हा पुन्हा त्याच त्याच प्रसंगाच्या आठवणींना सामोरे जावे लागते. मोर्चात दिलेल्या घोषणा, केलेली भाषणे त्या नराधमांच्या कानावरही पडत नसतील. परंतु माझ्यासारख्या दुर्दैवी निर्भयाचे छायाचित्र समोर ठेवून केलेल्या निषेधार्ह घोषणांनी आमच्या कानठाळ्या बसतात. पुन्हा ते काय करताय तर कँडल मार्च

Pic for representation

शेकडो पेटत्या मेणबत्त्या घेऊन निर्भयाच्या छायाचित्रासमोर लावतात. त्यामुळे आपण एक चांगले कृत्य केले, मृत किंवा दवाखान्यात शेवटच्या घटका मोजत असलेल्या निर्भयाप्रती आपण कर्तव्य पार पाडले हे समाधान आणि त्याहीपुढे जाऊन तशा फुशारक्या मारायला अनेक जण मोकळे होतात. पण कधी स्वतःच्या शरीराभोवती तेवढ्या मेणबत्त्या पेटवून त्या जवळ काही क्षण बसा मग त्या उष्णतेमुळे कसे चटके बसतात याचा अनुभव घ्या. आम्हा निर्भयाला असंख्य वेदना होत असतात, असहनीय दाह होतो शरीराचा त्या मेणबत्त्यांच्या उष्णतेने ! जखमी शरीराजवळ असा उष्णतेचा दाह त्या जखमांना सोलून काढतो. अगोदर हैवानांनी केलेल्या जखमा आणि त्यावर हा उष्णतेचा फवारा… विचार करा काय अवस्था होत असेल आमच्या शरीराची !

आम्ही निर्भया तर जीवानिशी जातो पण आमच्या कुटुंबीयांना असंख्य प्रश्नांना तोंड द्यावे लागते. त्याच त्याच प्रश्नांची उत्तरे देतांना जणू आम्हावर झालेल्या यातना त्यांना पुन्हा पुन्हा भोगाव्या लागतात. एरव्ही निवडणुकीच्या काळातच डोकावणारे पांढरे बगळे, वाहिन्यांची कावकाव, सामाजिक संघटनांची कोल्हेकुई हे सारे धुमाकूळ घालतात. प्रत्येकाचे नसलेली सहानुभूती दाखविणारे तेच तेच प्रश्न आणि आमच्या नातलगांची तीच उत्तरे याचा वैताग येतो म्हणण्यापेक्षा तेच अपमानास्पद प्रसंग वारंवार जिवंत होतात.

Click here to read तमाशा बोर्डावरची महाराणी: मंगला बनसोडे करवडीकर

दोन चार दिवस झाले की, तुम्ही सारे ती घटना, ती अवहेलना, ती वासनांधता, तो जुलूम, तो अत्याचार सारे काही विसरून जाता. इकडे आमच्या कुटुंबीयांच्या गळ्याखाली घास उतरत नसताना ते वासनांध, ते अतिरेकी मात्र कुठेतरी दडून बसतात, पंच पक्वानावर ताव मारतात. पकडले गेले तरी त्यांना व्हीआयपी व्यवस्था मिळते. त्यातच त्यांचे राजकीय धागेदोरे जुळालेले असतील तर त्यांची उत्तम बडदास्त ठेवल्या जाते. देशातील महागडे वकील त्यांची बाजू मांडून त्यांना निर्दोष सोडवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. कायद्याच्या चौकटीत तो गुन्हा सिद्ध होऊ नये म्हणून जीवाचे रान करताना पीडित महिला कशी होती, तिचे चारित्र्य कसे डागाळलेले होते अशी मनघडंत कहाणी रचून पीडितेला आणि तिच्या कुटुंबीयांना अपमानाचे कडू आणि असत्य घोट पाजतात.

Pic for representation

अशा विकृत वासनेला बळी पडलेल्या आणि जिवंत राहिलेल्या निर्भयापैकी किती निर्भयांचे संसार समाजाने उभारले आहेत ? किती लोकांनी स्वयंस्फूर्तीने अशा दुर्दैवी मुलींशी विवाह केला आहे ? मोर्चा काढणे, घसा ताणून निषेध करणे, निर्भयांच्या फोटोला हार घालणे, श्रद्धांजली वाहणे या पलिकडे कुणी काय काय केले याचा शोध घेणे गरजेचे आहे. आरोपी पकडले जाईपर्यंत निष्पाप, अभागी तरुणीचा अंतिम संस्कार रोखण्यासाठी कुटुंबाला प्रवृत्त करणे याशिवाय कुणी काय केले हेही पाहणे मनोरंजक ठरेल. अंतिम संस्कार थांबवणे, त्यासाठी मृतात्म्याला ताटकळत ठेवणे हा त्या मृत शरीराचा अपमानच आहे. मृत्यू पश्चात तिच्या वाट्याला पुन्हा अशा प्रकारची विटंबनाच येणार असेल तर तिच्यावर अत्याचार करणारे आणि मरणोपांत तिची अशी हेटाळणी करणारे सारे एकाच माळेचे मणी !

Click here to read अमेरिकेतील शास्त्रीय संगीताची शिक्षिका:डॉ.अंजली नांदेडकर

माझ्या कुटुंबीयांना सरकार देईल लाखो रुपये…काय फायदा त्याचा? हा प्रकार म्हणजे माझ्यावर झालेल्या अत्याचाराची, माझ्या मृत जीवाची तर किंमत नाही ना?

एकच सांगते, मी जे काही भोगलंय ते इतर निष्पाप मुलींच्या नशिबी येऊ नये, यानंतर तरी कुणा अबलेला ‘निर्भया’ हे नाव मिळू नये म्हणून मेणबत्त्या ओवाळण्यापेक्षा, घसा खरडून भाषण बाजी करण्याऐवजी, राजकारणाच्या पलीकडे जाऊन गुन्हेगारांना दिसताक्षणी पकडून त्याचा ‘तो’ अवयव टाका कापून, नाही तरी आपल्याकडे मॉब लिचिंगचे प्रकार सर्रासपणे घडतच असतात . अशा लैंगिक अपराध्यांना या मॉब लिचिंग प्रकरणात ठेचून ठेचून यमसदनी पाठवा जेणेकरून असे गुन्हे करण्याची पुन्हा कधी कुणाची हिम्मत होणार नाही.

 


Written by नागेश सू. शेवाळकर, पुणे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी