कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक शाळांनी ऑनलाइन अभासक्रम (Online Education) चालू केला आहे. ह्यामुळे मुलेही घरी सुरक्षित आहेत व त्यांचा अभ्यासही चालू आहे. त्यांचे वार्षिक नुकसान नको हा प्रत्येक शाळेचा प्रामाणिक हेतू आहे. जी सधन कुटुंब आहेत , ज्यांच्या घरी लॅपटॉप (laptop) अथवा मोबाईलची (mobile) सोय आहे , घरं मोठी आहेत त्यांना ह्या आधुनिक शिक्षण पद्धतीचा फायदाच होत आहे.मुलांच्या बुद्धीला चालना मिळाली आहे व त्यांचे वेळापत्रक आता छान बसले आहे. मात्र ही केवळ एकच बाजू झाली.दुसरीकडे पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ज्यांचा घरात आई व वडील दोघेही नोकरी करतात त्यांचे ऑनलाइन काम चालू आहे . काही महत्वाच्या मीटिंग असतात.आता अशा वेळी मुलांना मोबाईल दयायचा कि ऑफिसचे काम करायचे ? सद्या कामाचा ताणही अधिक आहे. नवीन मोबाईल अथवा लॅपटॉप घ्यायचा तर आर्थिक परिस्थिती बिकट आहे . त्यात हा खर्च त्यांना नकोसा आहे.आहे
वेळेचे व पैशांचे गणित बसवायचे कसे हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे आहे.ज्या पालकांना दोन अथवा तीन मुले आहेत त्यांनी काय करावे ? ज्यांची मुले दहावीत आहेत त्यांना तर मोबाईल देणें अतिशय महत्त्वाचे व गरजेचे आहे. कारण शाळा व क्लास दोन्हीही अभ्यास ऑनलाइनच चालू आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा त्यांच्या कडे मोबाईल असतो . मग घरात जर त्यांची लहान भावंडे असतील तर यांनी काय करावे ? ते ह्या अभ्यासापासून वंचित राहत आहे. बरेच वेळा ऑनलाइन तास चालू झाला की रेंजचा प्रॉब्लेम येतो. कधी आवाज स्पष्ट येत नाही . बऱ्याच पालकांना अथवा मुलांना मोबाईलचा योग्य वापर माहीत नसल्याने त्यांचा आवाज दुसऱ्या मुलांना येतो. त्यामुळे खूप गोंधळ होतो.
अशा एक न अनेक अडचणींचा सामना पालकांना व मुलांना करावा लागतो. काही मुलांची घरे लहान आहेत. एकत्रित कुटुंब आहे, आर्थिक परिस्थिती बिकट आहे, त्यांना ह्या आधुनिक अभ्यासक्रमात अनेक अडचणी येत आहेत. बरं, प्रत्येक मुलाची बुद्धिमत्ता ही वेगळी असते. काही मुलांना शिकवलेले लगेच समजते तर काहींना नाही समजत. प्रत्येकाच्या घरात त्याला शिकवायला कोणी असेलच असे ही नाही . ह्या मुलांना फार ताण येतो. मात्र शिक्षकांच्या व पालकांच्या भीतीपोटी ते गप्प राहतात .काही बोलत नाही.अनेक मुलांची पाठ व मान दुखत आहे .डोळ्यांच्या समस्याही वाढल्या आहेत. काही मुलं तर चक्क मोबाईल चालू करून गेम्स खेळतात अथवा विडिओ चालू करून इथे तेथे फिरतात.
Corona warriors : प्रिय कोरोना योध्यानो सलाम तुमच्या धैर्याला ! Click here
मोबाईलचा जास्त वापर करू नये, असे आजपर्यंत आपण पालक म्हणून त्यांना सांगत आलो . मात्र आज आपल्यालाच मोबाईल व्यवस्थित चार्ज करन मुलांना द्यावा लागत आहे. आज परिस्थितीच तशी आहे . ऑनलाइन अभ्यासक्रमशिवाय दुसरा पर्यायही नाही. शिक्षक मनापासून मुलांना शिकवायला झटत आहेत .अतिशय कष्टही घेत आहे. त्यांना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बरं , मोठ्या मुलांचे एक वेळ समजू शकतो . मात्र लहान मुलांना खूप त्रास होत आहे.
गावातील परिस्थिती तर अजूनच वाईट आहे. दोन वेळचे जेवण मुश्कील तर हा मोबाईल अथवा लॅपटॉप कुठून येणार ? मग त्यांच्या मुलांनी काय करावे ? काही मुले अतिशय प्रामाणिक, कष्ठाळू व हळवी असतात. त्यांना ह्या आधुनिक अभ्यासक्रमापासून वंचित राहिल्यामुळे फार मानसिक ताण येतोय. ज्या मुलांपर्यंत ही आधुनिक शिक्षण पद्धती पोहचू शकत नाही त्यांना खूप अडचणी येत आहेत. ह्या सर्व परिस्थितीतून एक मार्ग निघू शकतो. ते म्हणजे हे एक वर्ष असे समजू ,जे मुलांचे भविष्य घडवण्यासाठी लाभले आहे.
हे एक वर्ष मुलांना त्यांचे बालपण जगण्यासाठी प्राप्त झाले आहे .ह्या एक वर्षातील अनुभव त्यांना खूप काही शिकवतील . ही एक सोनेरी संधी आहे त्यांच्या मनापर्यंत पोहचण्याची.त्यांचे अंतरगुण सुधारण्यासाठी. हे एक वर्ष खऱ्या अर्थाने सार्थक बनवू त्यांच्याशी खुप गप्पा मारून जेणे करून त्यांना नवीन शब्द समजतील व त्यांचे संभाषण कौशल्य वाढेल. त्यांच्याकडून लहान गणिते सोडवून घेऊ , ज्यामुळे त्यांच्या व्यावहारिक ज्ञानात भर पडेल.एक वर्ष त्यांना अनेक यशस्वी व अयशस्वी लोकांचे अनुभव सांगू,गोष्टी सांगू ज्यामुळे भविष्यात ते अनेक अडचणींवर धैर्याने मात करतील व कधीही खचून न जाता प्रयत्न करायला शिकतील.त्यांच्या कडून घरातील लहान सहान कामे करून घेऊ. त्यांना कुकर लावायला शिकवू. त्यांना स्वतःपुरता स्वयंपाक करायला शिकवू .जेणेकरून ते स्वावलंबी होतील व कधी भविष्यात एकटे राहायची वेळ आलीच तर उपाशी रहाणार नाही. त्यांच्या मनातील गोष्टी जाणून घेऊ. त्यांना भविष्यात काय करावे वाटते ,त्यांचा कल कशात आहे, त्यांना कोणत्या गोष्टी करताना आनंद मिळतो ते पाहू.त्यांना ह्या पुस्तकांच्या पलीकडचे शिक्षण देऊ. रोज नवीन गोष्टी त्यांच्याकडुन करून घेऊ . जसे झाडी लावणे, घरातील स्वच्छता करणे, वर्तमानपत्र वाचणे, गोष्टीची पुस्तके वाचणे, रोज एखादा सुविचार लिहून त्याचा अर्थ लिहिणे , तो सुविचार समजून घेणे व भविष्यात कधी वेळ आलीच तर तो अमलात आणणे.
ह्या सर्व गोष्टी केल्याने त्यांच्यात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल . त्यांच्यातील आत्मविश्वास वाढेल . तसेच त्यांना आनंदी व उत्साही जीवन जगण्याची रित समजेल.रोज त्यांच्याकडून व्यायाम करून घेऊ. काही योगासने करून घेऊ. जेणेकरून त्यांचे आरोग्य उत्तम राहील व व्यायामाची सवय लागेल. ह्या एक वर्षात पुस्तकांच्या पलिकडचे ज्ञान देऊ . नवीन काहीतरी शिकल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर पाहू . मुलांशी अनेक खेळ खेळू व त्यांना सांगू की हार व जित महत्वाची नाही तर खेळात भाग घेणे महत्वाचे असते. प्रत्येक वेळी जिंकण्यापेक्षा शिकण्यावर भर देऊ. मुले हे अनुकरण प्रिय असतात. मोठे जसे वागतात तसेच तर मुलं करतात . त्यांना सामाजिक बांधिलकी जपायला शिकवू . दुसऱ्यांना मदत करायला शिकवू जेणेकरून ते भविष्यात सामाजिक कार्य करतील. त्यांना माणुसकीचे नाते जपायला शिकवू. फक्त स्वतःपुरते न पाहता आपल्या आजूबाजूला ज्यांना मदतीची गरज आहे ,अशांना आवर्जून मदतीचा हात दिला पाहिजे हे सांगू. त्याची सुरवात स्वतःपासूनच करू. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपली जाईल. हे जग किती सुंदर आहे व रोज अनेक गोष्टी शिकण्या सारख्या आहेत ह्याची जाणीव त्यांना होईल.आज आपण पालक मुलांना समजून घेऊ या.त्यांचे मित्र होऊ ऑनलाइन अभ्यासक्रमाचा फार ताण येणार नाही ह्याची आवर्जून काळजी घेऊ त्यांना मदत करू.
शेक्सपिअर अमर का आहे ? Click here
ह्या आधुनिक शिक्षणाला आपल्या पारंपरिक शिक्षणाची जोड देऊन रोजच्या व्यवहारातील गोष्टी शिकवू या. जेणेकरून ते उद्याचे सुसंस्कृत नागरिक घडतील व देशाचे नाव मोठे करतील. हे एक वर्ष पालकांच्या व मुलांच्या दृष्टीने आयुष्यभर स्मरणात राहील अशा अनेक आठवणी जपू या. असे समजू हे एक वर्ष परमेश्वराने बहाल केलेली पर्वणी आहे. मुलांचे व पालकांचे नाते नव्याने फुलेल ह्यात दुमत नसावे.
– लेखन : रश्मी हेडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ.9869484800.