त्यावेळी राजभवनला राज्यपाल डॉ पी सी अलेक्झांडर यांच्यामुळे एक वेगळेच ग्लॅमर आलेले होते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा सनदी सेवेतील सर्वात जवळचा अधिकारी, ज्याला खलिस्तानी अतिरेक्यांच्या धमक्या असल्याने मुंबई राजभवनाला पोलिसांची एक तुकडीच त्यांच्या रक्षणासाठी ठेवलेली ! शिवाय अभ्यासू वृत्तीचा, दोनदा डॉक्टरेट केलेला संशोधक राज्यपाल ! त्यामुळे राजभवनात येणारे पाहुणेही खूप वेगवेगळ्या क्षेत्रातील असत. पाहुणे खूप महत्वाचे असतील आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी असतील तरच राज्यपालांच्या पत्नी अकमा अलेक्झांडर खाली येत. त्याही सगळ्या शाही शिष्टाचारात आणि सोपस्कारात प्रवीण होत्या. आलेल्या महिला पाहुण्यांशी त्या चटकन जवळीक साधून बोलू लागत. एकमेकाचे बोलणे ओव्हरलॅप न होऊ देता दोघे एका डौलाने संभाषण पुढे नेत असत.
एके दिवशी मात्र पाहुण्यांबरोबर कुणीही महिला व्यक्ती नव्हती, तरीही मॅडम का खाली आल्या असाव्यात असा प्रश्न माझ्या मनात उमटत होता. त्या ‘हिज एकस्लंसीं’च्या शेजारी स्थानापन्न झाल्या होत्या. राज्यपालांच्या परीसहाय्यकाने (ए.डी.सी.) इंग्लडमध्ये जुन्या काळात करत तशी आलेल्या पाहुण्यांच्या नावाची घोषणा केली, “कर्नल डॉ. एडविन आल्ड्रिन ! ” आणि पाहुणे आत आले.
अमेरीकेच्या चांद्र मोहिमेत सामील झालेले एक अंतराळवीर (नील आर्मस्ट्रॉग नव्हे) राज्यपालांच्या भेटीला आले होते. ती सदिच्छा भेट असल्याने त्यात चर्चेचा विशिष्ठ असा विषय ठरलेला नव्हता. मात्र श्री. आल्ड्रिन हे एका चर्चचे पदाधिकारी होते , असे त्यांच्या बोलण्यात आले. चांद्र मोहिमेतील त्यांच्या अनुभवाबद्दल जाणून घ्यायला आम्ही सगळेच उत्सुक होतो. सौ. अकमा अलेक्झांडर यांनी निरागसपणे विचारलेल्या, “ज्या क्षणी तुम्ही चंद्राच्या भूमीवर पाय ठेवला तेंव्हा तुम्हाला काय वाटले असावे बरे ?” या प्रश्नामुळे आपोआपच विषय तिकडे वळला.
यावर डॉ. आल्ड्रिन यांनी “मी मनातल्या मनात परमेश्वराच्या मोठेपणाबद्दल त्याचे आभार मानले.” असे म्हणताच डॉ. अलेक्झांडर त्यांच्या स्वभावाविरुद्ध ताडकन उद्गारले, “म्हणजे तुम्हाला तो माणसाचा मोठेपणा वाटला नाही का ?” एका अंतराळवीराने पर ग्रहावर पाय ठेवताना प्रथम देवाला वंदन करावे ही गोष्ट स्वभावाने विज्ञाननिष्ठ असलेल्या राज्यपालांना काहीशी खटकली असावी असे मला त्यांच्या चेह-यावरून वाटले. डॉ.आल्ड्रिन हे मात्र एक सच्चे देवभक्त असल्याने शांतपणे म्हणाले, “नाही. मला तो माणसाला ‘चंद्रावर जाण्याची क्षमता प्रदान करणा-या देवाचा मोठेपणा वाटला.” दोन ख्रिस्ती व्यक्तींमधील ती सूक्ष्म जुगलबंदी पाहून मला गम्मत वाटली. खरे तर डॉ. अलेक्झांडर हे काही निरीश्वरवादी नव्हते. पुण्याला गेल्यावर ते एखाद्या रविवारी त्यांच्या मारथोमा चर्चला भेट देत तेंव्हा प्रार्थनेत तीनतीन तास शांतपणे उभेही राहत.
आज विचार येतो डॉ. अलेक्झांडर चंद्राच्याही पलीकडे असलेल्या स्वर्गात येशूबरोबर असतील ! आता त्यांना माणसाचा मोठेपणा आणि देवाचा मोठेपणा याबद्दल काय वाटत असेल कोण जाणे ? पण त्या दिवशी त्यांच्यातील बुद्धीवादी माणसाने सश्रद्ध माणसावर मात केल्याचे मी जवळून पहिले होते हे निश्चित.
त्यांची आठवण आली की असाच एक प्रसंग नेहमी आठवतो. तेंव्हा राज्यपालांचा कँँप पुण्यात होता. त्यामुळे राजभवनचे आम्ही काही अधिकारी पुण्यातील राजभवनला उतरलो होतो. एक दिवस रात्री उशिरा मदर तेरेसा गेल्याची बातमी आली. रात्री राज्यपाल महोदय भोजनानंतर झोपायला गेले होते. मदर तेरेसा अकमा अलेक्झांडर यांच्या खूप जवळ होत्या. त्यांची मदरवर निस्सीम श्रद्धा असण्याचे आणखी एक कारण होते. मॅडमच्या एका जवळच्या नातेवाईकाला झालेला कर्करोग मदरने त्यांच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केल्यावर बरा झाला होता. त्या इतक्या भयंकर रोगातून खडखडीत ब-या होऊन पुढे अनेक वर्षे जगल्या असे त्या दिवशीच मला मॅडमकडून कळाले.
आता मदर गेल्याची ही वाईट बातमी इतक्या उशिरा त्यांना देण्यासाठी त्यांच्याकडे कसे जावे असा प्रश्न निर्माण झाला. शेवटी बराच विचार विनिमय होऊन त्यांना झोपेतून उठवू नये आणि ही दुर्वार्ता त्यांना सकाळी सांगावी असे ठरले. त्यांचे सचिव असलेले सनदी अधिकारी श्री सतीश त्रिपाठी यांनी ती जबाबदारी माझ्यावर सोपविली.
राज्यपालांना, आणि विशेषत: मॅडमना, ही दु:खद बातमी कशी सांगावी ही चिंता रात्री मनात होतीच. शिवाय त्याला अजून एक रुखरुखीची किनार होती. आधी एकदा मदर राजभवनला आल्या होत्या तेंव्हा माझी तब्ब्येत किंचित बरी नसल्याने मी त्यांना भेटू शकलो नव्हतो. थोडा त्रास सहन केला असता तर त्या माउलीची अगदी जवळून भेट होऊ शकली असती. त्यांचे आशीर्वादही मिळाले असते. ती संधी आपण गमावली आणि आता तर आयुष्यात पुन्हा कधीही येशूच्या त्या मातृतुल्य शिष्येला आपण कधीच भेटू शकणार नाही याचे फार वाईट वाटत होते.
सकाळी लवकर राज्यपालांच्या खाजगी दालनात गेलो आणि त्यांना ती दु:खद बातमी कशीबशी दिली. त्या क्षणी माझा माझ्या डोळ्यांवर आणि कानावर विश्वास बसेना. नेहमी पहाडासारखा खंबीर असणारा हा माणूस आतून इतका हललेला मी कधीच पाहिला नाही. एखाद्या लहान मुलासारखे डॉ. अलेक्झांडर रडू लागले. बोलताना त्यांचा आवाज जवळचे कुणी गेल्यासारखा कापू लागला. ७८ वर्षे अनेक उन्हाळे पावसाळे पाहताना ताठ राहिलेला तो पहाड त्या दिवशी मी खळखळ पाझरताना पाहिला. मॅडमनाही अश्रू आवरेनात. खरे तर मलाही गहिवरून येत होते. कधीही फारसे खाजगी न बोलणारे राज्यपाल त्या दिवशी सगळे प्रोटोकॉल तोडूनमाझ्याशी बोलले. ‘A great soul, a paragon of a person.’ असे उद्गार त्यांच्या तोंडातून निघाले.
थोडे सावरल्यावर ते म्हणाले, ‘मी दिल्लीला पंतप्रधान कार्यालयात असताना समाजसेवेच्या अनेक प्रकल्पाची कामे घेऊन मदर पंतप्रधान कार्यालयात येत. कित्येकदा दिल्लीच्या उन्हाळ्यात ऐन मध्यान्हीच्या वेळी मदर आलेल्या आठवतात. त्यांचा गोरापान चेहरा अगदी कोमेजून गेलेला असे, घामाच्या धारा वाहत असत. मी त्यांना अनेकदा पाणी देऊ केले. मात्र त्या कधीच पाणी पीत नसत. एक दिवस न राहवून मी त्यांना विचारले, ‘मदर, तुम्ही इथे इतरांसारखी स्वत:ची कामे घेऊन येत नाही. तुमची सगळी कामे गोरगरिबांसाठीचीच असतात. मग तुम्ही आमचा पाहुणचार का घेत नाही. निदान पाणी प्या म्हटले तर त्या पेल्यालाही स्पर्श करीत नाही, असे का ?’ यावर त्यांनी जे उत्तर दिले त्यामुळे मला त्या कळाल्या. मदर म्हणाल्या होत्या, ‘डॉ.अलेक्झांडर, जर मी आज तुमचे पाणी प्याले तर उद्या माझे अनुयायी तुमचा चहाही घेऊ लागतील. पुढे पाहुणचारही घेऊ शकतील. प्रभूच्या सेवेत असलेल्यांना मला असे घडवायचे नाही. संपूर्ण समर्पण हे ध्येय असताना कुणाकडूनही मदतीची अपेक्षा का करावी ? मी जग बदलू शकत नाही पण माझ्या संस्थेत तरी चांगले आदर्श निर्माण करू शकते ना ? तेच पुरेसे आहे.’
आज मदर नाहीत, कोणत्याच क्षेत्रात कोणतेच आदर्श नाहीत, त्यांच्यासाठी खळखळ अश्रू वाहणारा तो कर्तव्यनिष्ठ पहाडही निघून गेला आहे. सगळेच बदलले आहे. तसे सनदी अधिकारी, राज्यपाल, आणि तशा मदर पुन्हा दिसणे अवघड आहे. याची रुखरुख तर असतेच पण अलीकडे वाटते भारताच्या भूभागावरची मानवी पर्वतरांगाची ही उत्तुंग शिखरे इतक्या जवळून आपल्याला पाहायला मिळाली हे भाग्यही नसे थोडके !
Written by श्रीनिवास बेलसरे
धाडसी व्यक्तीमत्व 🙏🙏