मी औरंगाबादला माहिती खात्यात कार्यरत होते. १९९१ मध्ये माझी अचानक धुळ्याला जिल्हा माहिती अधिकारी म्हणून बदली झाली. पहिल्यांदाच अनोळखी गावात जायचे असल्याने शोधाशोध सुरु झाली तिथे आपल्या परिचयाचे कुणी आहेत का? तिथले अधिकारी कोणकोण आहेत ? वगैरे..! आमच्या खात्याचा संबंध कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाशी येत असतो. त्यामुळे धुळ्याला जिल्हाधिकारी म्हणून श्री अरविंद रेड्डी आहेत हे समजले तेंव्हा थोडे बरे वाटले. त्यांना कामानिमित्त ते औरंगाबादमध्ये मनपा आयुक्त असताना एकदा भेटले होते. तरीही फार काही परिचय नव्हता.
Click here to readअमेरिकेतील शास्त्रीय संगीताची शिक्षिका:डॉ.अंजली नांदेडकर
सावळा वर्ण, मोठे भावस्पर्शी डोळे, करडा रुबाबदार चेहरा असे वर्णन असणा-या रेड्डीसाहेबांचा बघताच धाक वाटायचा. धुळ्यात त्यांचा मोठा रुबाब होता. त्यावेळी माझ्या प्रसिद्धी खात्याच्या दृष्टीने धुळे जिल्ह्याचे दोन महत्वाचे प्रश्न होते. एक सरदार सरोवर आणि दुसरा भास्कर वाघ यांनी जिल्हा परिषदेत केलेला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार ! त्यामुळे दररोज बैठका होत असत. त्यातून रेड्डीसाहेबांचे अनेक पैलू माझ्या लक्षात येऊ लागले. त्यांच्या करड्या प्रशासकीय व्यक्तिमत्वामागचा एक नितळ कुटुंब वत्सल माणूस मला दिसला.
अनेक अधिका-यांना ते कामानिमित्ताने व्यक्तिगत सल्लाही देत असत. जसा साहेबांचा परिचय वाढत गेला तशी त्यांनी मलाही अनेक बाबतीत मदत केली. सल्ला दिल्याचे मला आठवते. त्यावेळी मला कुठल्याही गोष्टीवर फटकन प्रतिक्रिया देण्याची सवय होती. त्यातून माझे अनेक वेळा नुकसान होत असे. एक दिवस सर म्हणाले, “बेलसरे, तुम्हाला कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया द्यायची असेल तर अवश्य देत जा. मी तुमच्या बरोबर आहे. पण जर विषय वादग्रस्त होणार आहे हे आपल्या लक्षात आले तर थोडा संयम पाळा. अशा वेळी प्रतिक्रिया लगेच न देता दुस-या दिवशी देत जा. कोणत्याही गोष्टीचा राग काही २४ तासापेक्षा जास्त टिकत नाही.
Click here to read जयंती विशेष: भूदान चळवळीचे प्रवर्तक:आचार्य विनोबा भावे
साहेबांचे वडील हे स्वत: स्वातंत्र्यसैनिक होते. ते आणि साहेबांच्या आई , ‘अम्मा’ धुळ्याला राहायला आले. संध्याकाळी बाबा नदी काठच्या गणपतीच्या मंदिरात दर्शनाला जात असत. मुळचे साधे शेतकरी असलेल्या बाबांच्या सरळ स्वभावामुळे त्यांच्या समवयस्क लोकांशी त्यांची आपसूकच मैत्री झाली. काही लोक म्हणाले, ‘बाबा, आम्हाला कलेक्टरचा बंगला आतून पाहता येईल का ? बाबांनी ही गोष्ट साहेबांच्या कानावर घातली. त्यांनी केवळ होकारच दिला नाही तर लगेच बाबांच्या त्या २०-२५ मित्रांना थेट जेवायलाच बोलावले. बहुतेक वेळा अशा वरिष्ठ पदावरील लोकांना आपल्या जवळच्या नातेवाईकानी आपल्या सामाजिक स्तरावरील लोकांशीच संबंध ठेवावेत, सामान्य, गरीब लोकांशी बरोबरीच्या नात्याने मैत्री करू नये असेच वाटत असते. कुणी असे केल्यास त्यावर नाराजी ओढवते. पण रेड्डीसाहेबांनी अगदी प्रेमाने त्या सर्व लोकांचे स्वागत केलेले मी पाहिले.
एकदा माझ्या घरात ऐन मध्यरात्री चोर आले. जेंव्हा खिडकीचे ग्रील तोडून चोर आत घुसत होते नेमकी तेंव्हा मला योगायोगाने जाग आली आणि मोठा अनर्थ टळला ! त्यावेळी मी धुळ्यात एकटी राहत होते. त्या घटनेनंतर मनात फार दहशत बसली. पोलिसात तक्रार केल्याने ही गोष्ट साहेबानाही माहित झाली. आश्चर्य म्हणजे त्या दिवसापासून साहेबांच्या आई ‘अम्मा’ स्वत: कितीतरी दिवस रोज मला सोबत म्हणून रात्री माझ्याकडे झोपायला येऊ लागल्या.
Click here to readजयंती विशेष: कर्मवीर भाऊराव पाटील
रेड्डीसाहेब हे अतिशय नेमस्त तरीही फार शिस्तप्रिय गृहस्थ आहेत. ते दररोज पाचला उठून फिरायला जातात. किमान दोन तास टेनिस खेळतात. घरी आल्यावर स्वत:चे कपडे स्वत: धुतात. अगदी रेड्डी मॅडमनाही धुवू देत नाहीत. आता ते ८०व्या वर्षात आहेत तरी रोजची कामे करतात. दोन तीन जिल्ह्यांचे कलेक्टर राहिलेले, कमिशनर पदी राहिलेले साहेब आजही स्कूटरने भाजी आणायला जातात. रेल्वेने मुंबई – पुणे असा प्रवास करतात. आता कोरोनामुळे फिरायला जाता येत नाही, टेनिस नाही, तर त्यांनी लगेच घरच्या घरी चालण्यासाठी ‘ट्रेड मिल’ घेतली व त्यावर रोज दोन तास चालण्याचा व्यायाम सुरु केला.
नोकरीत असताना त्यांनी नेहमीच अनेकांना मदत केली. कुण्या अधिका-याची पत्नी गावाला गेली की साहेब त्याला जेवायला घरी बोलावणार हे ठरलेलेच !.
त्यांचे संवाद कौशल्य फार चांगले आहे. त्यामुळे अवघड आणि गुंतागुंतीचे अनेक प्रश्न त्यांनी लीलया सोडवलेले मी पाहिले आहे. समोरच्या माणसाला त्याचे म्हणणे मांडण्यासाठी ते पुरेसा वेळ देतात. त्याचा प्रश्न समजावून घेतात आणि निर्णय मात्र लगेच देतात. कुणी फोन केला आणि सांगितले, “सर मी पवार बोलतोय ” तर ते म्हणतात, ” बोला पवार ” त्यामुळे बोलणा-याला आपल्याला साहेब चांगले ओळखतात असे वाटून त्याच्या मनावरचा तणाव कमी होतो. त्याला बोलायला हुरूप येतो.
Click here to read शिक्षक दिन विशेष: COL आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षिका स्वाती वानखेडे
नोकरीच्या प्रदीर्घ काळात अनेकदा त्यांच्यावर अन्याय झाला. पण त्यांनी कधीही तक्रार केल्याचे मला माहित नाही. जेथे बदली झाली तिथे ते लगेच हजर होत. ठाण्याला कलेक्टर असताना त्यांच्यावर एक मोठे संकट आले होते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत्या व सलग ५ दिवसांची सुट्टी आली होती. त्यांनी जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी या क्षमतेत निर्णय घेऊन मत पेट्या दिल्या. त्यावेळी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त श्री. टी.एन.शेषन होते. त्यांचा देशभर दरारा होता. स्थानिक स्वराज्य संस्थाना मतपेट्या देण्यापूर्वी रेड्डी साहेबांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना विचारले नाही म्हणून शेषनसाहेब नाराज झाले. त्यांच्याकडून ‘असे का केले ?’ अशी विचारणा आली. त्यावर दिलेला खुलासा टी.एन. शेषन यांनी अमान्य केला. तडकाफडकी रेड्डीसाहेबांची बदली करण्यात आली आणि त्यांच्या सेवापुस्तकात ठपका ठेवला गेला. त्यांचे म्हणणेच ऐकून घेतले गेले नाही. याचे त्यांना फार वाईट वाटले. म्हणून त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात दाद मागीतली. श्री.शेषन यांच्याविरुद्ध न्यायालयात दाद मागणारे ते देशातील एकमेव सनदी अधिकारी असावेत. प्रदीर्घ लढाईनंतर निकाल रेड्डीसाहेबांच्या बाजूने लागला. सेवा पुस्तकातील ठपका काढण्यात आला.
मला रेड्डी साहेबांचे खरे मोठेपण त्यानंतरच्या घटनाक्रमात दिसले. श्री.शेषन यांचे निधन झाले तेंव्हा एका वृत्त वाहिनीने रेड्डीसाहेबांना ही घटना डोक्यात ठेवून प्रतिक्रिया विचारली आणि त्यावेळी काय घडले होते ते सविस्तर सांगण्यास सांगितले. रेड्डी साहेब न्यायालयीन लढाईबद्दल बोलले. परंतु त्याचबरोबर त्यांनी शेषनसाहेबांचे तोंड भरून कौतुक केले व त्यांच्यासारखा निष्कलंक व कर्तबगार अधिकारी निवडणूक आयोगात असायला हवा , असा खंबीर माणूसच काही सुधारणा करू शकतो, त्यांची कठोर अंमलबजावणी करू शकतो हे रेड्डीसाहेबांनी आवर्जून सांगितले. ज्याने आपल्याला आपण निर्दोष असतानाही आपले करियर खराब करू शकणारी शिक्षा केली होती त्यांचे गुण पाहू शकणारा, त्यांचे कौतुक करणारा दुसरा अधिकारी किंवा कर्मचारी मी तरी पाहिला नाही. शासकीय सेवेत अशी माणसे भेटली हे मी माझे भाग्यच समजते.
-श्रद्धा बेलसरे-खारकर