महाराष्ट्रात आदर्श गृहनिर्माण घोटाळ्याचे वादळ उभे राहिले आणि त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले. राज्यात नेतृत्व बदल झाला. केंद्रात त्यावेळी राज्यमंत्री असलेले जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात आले. ते बहुतांश काळ केंद्रात असल्यामुळे माझा त्यांच्याशी कधी फारसा संबध आला नव्हता. ते जेंव्हा आले त्यावेळी असे बोलले जायचे कि इतकी वर्षे दिल्लीत असल्याने त्यांना मराठी चांगली येत नाही. महाराष्ट्राचा चांगला परिचय नाही वगैरे …
त्यांचा शपथविधी पार पडला आणि लगेच विधीमंडळाचे नागपूर अधिवेशन होते. प्रथेप्रमाणे मंत्रालयाचा लवाजमा नागपूरकडे रवाना झाला. त्यापूर्वी अनेक पत्रकारांवर जीवघेणे हल्ले झाल्याने ‘पत्रकार संरक्षण कायदा’ हा विषय ऐरणीवर आलेला होता. नागपुरात पत्रकार आंदोलन करणार होते. त्यावेळी आमच्या खात्याचे महासंचालकही नवे होते.
Click here to read जयंती विशेष- आदरणीय आबा
थेट अधिवेशनच सुरु असल्याने मुख्यमंत्री महोदयांना या विषयाची तातडीने माहिती हवी होती. आमच्या महासंचालकांबरोबर मी सह्याद्री अतिथी गृहावर गेले. आकाशी रंगाचा कुडता घातलेले चव्हाणसाहेब शांतपणे फाईली बघत होते. आम्ही आत गेलो व आमची ओळख करून दिली. ते म्हणाले, ‘हं सांगा मला हा काय विषय आहे ते.’ मी बोलायला सुरुवात केली. मंत्रालयीन प्रथेप्रमाणे आम्ही उभे राहूनच बोलत होतो. माझी चारपाच वाक्ये झाली असतील. ती मधेच थांबवत सर म्हणाले. ‘ अहो तुम्ही दोघे उभे का ? बसा बसा ! ’
मुख्यमंत्र्यासमोर बसण्याची पद्धत आणि सवयही नसल्याने मी उभीच होते. माझी हतबलता ओळखून ते पुन्हा म्हणाले, ‘श्रद्धा, तुम्ही बसून घ्या. आणि मग मला विषय समजून सांगा.’ मग मी तो विषय आणि त्याची पार्श्वभूमी समजावून सांगितली. ते अतिशय शांतपणे ऐकत होते. त्यांनी नंतर काही प्रश्नही विचारले. मग ते म्हणाले ‘तुम्ही विषय फार चांगला समजून सांगितला आहे. पण हा विषय माझ्यासाठी नवा आहे. अधिवेशनात हा विषय येईल. तेंव्हा तुम्ही जे सांगितले त्याची एक नोट तयार करून द्याल का ? तुमचा टाईपिस्ट नसेल तर हरकत नाही. हातांनी लिहून दिले तरी चालेल.’ मी म्हटले, ‘सर अर्ध्या तासात नोट टाइप करून देते. मी स्वत: टाइप करते.’ ‘अरे वा , द्या पाठवून !’ मी ‘हो’ म्हणाले आणि उठले. त्यांनी निघताना आम्हाला धन्यवाद दिले. यापूर्वी मी ७ मुख्यमंत्र्यांबरोबर काम केले होते. पण एवढ्या जेष्ठ नेत्याकडून आणि खुद्द मुख्यमंत्र्याकडून एवढे सौजन्य कधीही अनुभवले नव्हते.
तेंव्हा आधारकार्ड हा विषय नवा होता. मला आधारकार्डाबद्दलच्या एका परिषदेसाठी गोव्याला जायचे होते. महाराष्ट्रात आधारकार्ड योजनेच्या प्रसिद्धीचे काम चांगले झाल्यामुळे मला विशेष निमंत्रित म्हणून बोलावले होते. पण माझे वरिष्ठ अधिकारी मला परिषदेसाठी जायला परवानगी देत नव्हते. मी मा.मुख्यमंत्रीसाहेबांकडे गेले. माझ्याबरोबर आमदार यशोमती ठाकूरही होत्या. बहुधा त्यांनी मुख्यमंत्र्यांना आधीच माझा विषय सांगितला असावा. आम्ही गेल्याबरोबर ते म्हणाले, “हा श्रद्धा बोला.” मग मी माझी कैफियत मांडली. त्यावर ते म्हणाले, “आधारकार्ड योजनेच्या प्रसिद्धीसाठी तुम्ही विशेष काय काय केलेत ते मला सांगा.’ मी आमच्या कामाचा सविस्तर तोंडी अहवालच त्यांना सादर केला. त्यावर ते म्हणाले, ‘अरे वा ! छान काम केलेत तुम्ही. आता तुम्ही जाऊ शकता.’ मला वाटले ते मला दालनातून जायला सांगताहेत. मी मनात खट्टू झाले. ते कदाचित माझ्या चेहऱ्यावर दिसले असावे. यावर माझ्याकडे बघून ते हसत म्हणाले. ‘तुम्ही गोव्याला जाऊ शकता.’ मी उतावीळपणे म्हणाले, ‘ सर, म्हणजे माझ्या वरिष्ठांना आपण सूचना द्याल ना ? ’ त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘असे सांगितले तर त्यांना अवमानित झाल्यासारखे वाटेल. पण त्यांना निरोप जाईल. तुम्ही काळजी करू नका.’ आपल्या खालच्या अधिका-यांना आदेश देतानाही ते दुखावणार नाहीत याची खबरदारी घेणारे मुख्यमंत्री विरळाच !
पत्रकार श्री. जे. डे. यांची हत्या झाली त्यावेळी वातावरण खूप तापले होते. पत्रकारांची आंदोलने होत होती, मोर्चे निघत होते. एक दिवस पत्रकारांचा मोर्चा मंत्रालयावर येऊन धडकला. बाहेर धुवांधार पाउस पडत होता. भर पावसात उभे राहून पत्रकार घोषणा देत होते. मुख्यमंत्र्याकडे नेमकी कुठली तरी महत्वाची बैठक चालू होती. एका कागदावर संदेश लिहून मी त्यांच्या हातात दिला. त्यांनी तो लगेच मजकूर वाचला व मला आतल्या दालनात जाण्याची खुण केली. पाठोपाठ तेही आले. त्यांच्याबरोबर चार पाच सचिव दर्जाचे अधिकारीही होते. थोडी चर्चा झाली आणि ते मला म्हणाले, ‘तुम्ही माझ्या वतीने खाली जा व पत्रकारांच्या शिष्टमंडळाला वर घेऊन या.’ मी मुख्यमंत्र्यांचा हा निरोप घेऊन मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गेले व पत्रकारांच्या मुख्य नेत्यांना निरोप दिला. पण पत्रकार संतप्त होते. ते ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. ते म्हणाले, ‘ मुख्यमंत्र्यांना इथे यायला सांगा, आम्ही वर येणार नाही.’ मी तो निरोप घेऊन पुन्हा ६व्या मजल्यावर गेले. नकळत माझी भूमिका पत्रकार आणि सरकार यांच्यातील मध्यस्थाची होऊ लागली होती. मुख्यमंत्री कार्यालयातील सचिवांचे असे म्हणणे होते की मुख्यमंत्र्यांनी खाली उतरू नये. पत्रकारांनी वर यायला हवे. त्यावरही बरीच चर्चा झाली. शेवटी मुख्यमंत्री म्हणाले, ‘ श्रद्धा, तुमचे काय म्हणणे आहे ?’ मी म्हटले, ‘ सर, वातावरण खूप तापले आहे. एका पत्रकाराची दिवसाढवळ्या हत्या झाली आहे. आपण खाली जाऊन निवेदन स्वीकारल्याने तणाव थोडा तरी कमी होण्यास मदत होईल. आपण त्यांच्या भावना समजावून घेत आहात असा संदेश जाईल. माझ्या या वक्तव्यावर प्रधान सचिव अतिशय नाराज झालेले दिसले. मात्र मुख्यमंत्र्याना माझे म्हणणे पटल्यासारखे वाटत असल्याने सचिव म्हणाले, ‘आपण खाली जाऊ, आणि गाडीतून बाहेर जाताना गेटवर थांबून २ मिनिटे बोलून वर्षावर निघून जाऊ. म्हणजे मुख्यमंत्र्यांचा मानही राहील आणि पत्रकारांची मागणीही मान्य केल्यासारखे होईल.’ मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे पाहिले. मी नकारार्थी मान हलविली. ते शांतपणे उठले आणि सर्वांना उद्देशून म्हणाले, ‘चला आपण पत्रकारांना भेटून येऊ.’ माझी अडचण लक्षात घेऊन ते मला म्हणाले, ‘ तुम्हीही माझ्याबरोबर लिफ्टमध्ये या.’ आम्ही खाली गेलो. पत्रकारांचे निवेदन स्वीकारले. त्यांच्याशी चर्चा केली व परत ६व्या मजल्यावर आलो. मी सरकारची प्रतिमा सांभाळण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नाला कुणीतरी साथ दिली याचा मला आनंद वाटला. खरे तर मुख्यमंत्र्याभोवती सनदी अधिका-यांचे एक अभेद्य कवच असते. ते भेदणे इतर अधिका-यांना अवघड असते. परंतु चव्हाणसाहेब मात्र त्या त्या विभागातील अधिका-यांशी बोलून त्यांचे मत जाणून घेत आणि मगच निर्णय घेत असत.
मंत्रालयाला अचानक आग लागली आणि सगळीकडे हाहाकार झाला. खूप अफवा पसरत होत्या. चुकीच्या बातम्या पसरत होत्या. आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली की , आमच्या दूरदर्शनच्या कार्यक्रमात त्यांनी यावे आणि जनतेला नक्की काय घडले ते सांगावे. आठ वाजताच लाइव्ह कार्यक्रम होता. ते धावतपळत ८ ला फक्त ५ मिनिटे कमी असताना स्टुडीओत पोहोचले. मला बघून म्हणाले, ‘ उशीर झाला का ? ’ म्हटले नाही सर ४ मिनिटे आपल्या हातात आहेत. त्यांचे जाकीट मागच्या गाडीत होते. ते जाकीटासाठी थोडे अस्वथ दिसल्याने मी त्यांना धीर करून सुचवले, ‘सर आजचा प्रसंग पाहता जाकीट किंवा ब्लेझर नाही तेच बरे आहे.’ मी इतकेच बोलून गप्प बसले. मुख्यमंत्र्यांनी सरळ स्टुडीओत प्रवेश करून कार्यक्रम सुरु केला. त्यांनी माझे ऐकून स्मित केले आणि पांढ-या कुडत्यावर कार्यक्रम चित्रित करण्यात आला. खरे तर त्यांना माझी सूचना काहीशी अगोचरपणाची वाटून खटकू शकली असती पण अजिबातच इगो नसलेल्या त्या अत्यंत जेष्ठ आणि डीग्निफाईड नेत्याने उलट माझे नंतर आभारच मानले!
सातआठ मुख्यमंत्री आणि शंभरसव्वाशे मंत्र्यांबरोबर मी काम केले असेल पण मा. चव्हाणसाहेबांसारखा आदबशीर, सज्जन, अधिका-यांना मान देणारा दुसरा उमदा राजकीय नेता मी तरी बघितला नाही!
-श्रद्धा बेलसरे-खारकर.
Good