Thursday, September 19, 2024
Homeयशकथाजयंती विशेष- आदरणीय आबा

जयंती विशेष- आदरणीय आबा

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री, लोकप्रिय नेते आर आर पाटील यांची आज,१६ ऑगस्ट रोजी जयंती आहे. त्यानिमित्ताने ही आदरांजली…. एखादं व्यक्तीमत्व असं असतं की, त्यांचं नाव जरी डोळ्यासमोर आलं,कानावर पडलं,तरी आपली मान आदराने झुकते.प्रसार माध्यमात काम करीत असताना विविध क्षेत्रातील , विविध मान्यवर व्यक्तींशी माझा संपर्क आलेला आहे. त्यातील भावलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आर आर पाटील ,अर्थात सर्व सामान्यांचे आबा हे होत. बऱ्याचदा असा अनुभव येतो की, जीवनात यशस्वी झालेल्या ,मोठ्या झालेल्या व्यक्तींना आपल्या भूतकाळाचा विसर पडू लागतो किंवा तो दडविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

परंतु आबा मात्र यास अपवाद होते. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील अंजनी येथे १६ ऑगस्ट १९५७ रोजी जन्मलेल्या आबांचं प्राथमिक शिक्षण गावीच झालं.पुढे अत्यन्त प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ,कमवत व शिकत त्यांनी सांगली येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. कायद्याची पदवी देखील तिथेच संपादन केली. त्यांच्या त्यावेळच्या परिस्थितीचा विचार करता, आबा एक तर सरकारी अधिकारी बनू शकले असते किंवा वकिलीतच रमू शकले असते . परंतु सुरक्षित आणि चाकोरीबद्ध चौकट न स्वीकारता , राजकारणाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना ,अनिश्चित अशा राजकारणात प्रवेश केला आणि त्यात ते पुढे पुढे जात राहिले.

दिवंगत मुख्यमंत्री ,सांगली जिल्ह्यातीलच वसंतदादा पाटील यांनी त्यांच्यातील नेतृत्वगुण ,वक्तृत्व, स्वच्छ चारित्र्य असे विविध गुण ओळखले आणि त्यांना संधी दिली. आबा पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून १९७९ साली सावळज मधून निवडून आले.१९९० पर्यंत ते जिल्हा परिषद सदस्य होते. आबा काँग्रेसचे उमेदवार म्हणून १९९० साली व पुन्हा दुसऱ्यांदा १९९५ साली तासगाव मतदारसंघातुन विधानसभेवर निवडून आले. १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजपा युतीचे सरकार सत्तेवर आले होते. या काळात सर्व संसदीय आयुधं आणि वक्तृत्व या जोरावर त्यांनी सतत विधानसभा दणाणून सोडली.सरकारची कोंडी करण्यात ते यशस्वी ठरत. महाराष्ट्राला त्यांची खरी ओळख तिथूनच झाली. १९९९च्या सुमारास काँग्रेस दुभंगली. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. आबा राष्ट्रवादी काँग्रेसचे जनक शरद पवार यांच्यासोबत गेले.पुढे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारमध्ये आबांना ग्रामस्वच्छता मंत्री म्हणून संधी मिळाली. या संधीचं त्यांनी सोनं केलं आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासावर आपली अमीट छाप पाडली. ग्रामस्वच्छता मंत्री म्हणून त्यांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम योजना, हागणदारी मुक्त गाव योजना आदी क्रांतिकारी योजना सुरू केल्या. केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशासाठी या योजना दिशा दर्शक ठरल्याचं आज आपण पाहतोच आहे.महिला सरपंचांना झेंडा वंदनाचा हक्क त्यांच्याच कारकीर्दीत मिळाला.

आबा पुढे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री झाले. गावागावात सतत होत राहणाऱ्या तंट्यामुळे विकास कामांना कशी खीळ बसते,वातावरण, संबंध कसे कलुषित राहतात हे त्यांनी जवळून पाहिलं होतं. याशिवाय पोलिसांवरचा ताणही कमी व्हावा अशा अनेक उद्देशांनी त्यांनी १५ ऑगस्ट २००७ पासून महाराष्ट्रात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविण्यास प्रारंभ केला. या योजनेचं यश आणि उपयुक्तता पाहून देशातील अनेक राज्य सरकारांनी असे अभियान त्यांच्या राज्यात राबविण्यास सुरूवात केली. युनोने या योजनेची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशंसा केली. विशेष म्हणजे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या आकाशवाणी केंद्रावरून सकाळी प्रसारित होणाऱ्या दिलखुलास कार्यक्रमातून आबांनी या अभियानाची घोषणा केली. त्यावेळी मी मंत्रालयात वृत्त विभागाचा उपसंचालक होतो.

RR Patil Maharashtra

शिवाय दिलखुलास कार्यक्रमाचा टीम लीडर होतो. राज्याच्या उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असलेल्या आबांना आकाशवाणीच्या स्टुडिओत कसं बोलवायचं असा प्रश्न आम्हाला पडला. त्यामुळे त्यांच्या मुलाखतीचं ध्वनीमुद्रण त्यांच्या निवासस्थानी करण्याचं ठरलं. पूर्व चर्चेसाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो असताना, त्यांनी विचारलं, ध्वनीमुद्रण कुठे करणार आहात ? यावर आम्ही म्हटलं, आपल्या निवासस्थानीच करण्यात येईल म्हणून. यावर ते म्हणाले, घरी नको,आपण आकाशवाणीच्या स्टुडिओतच करू या.आपण म्हणाल,त्यावेळी मी हजर होईल.खरोखरच ठरल्यावेळी आबा आमदार निवासासमोरील आकाशवाणी केंद्राच्या स्टुडिओत उपस्थित राहिले. प्रख्यात मुलाखतकार प्रदीप भिडे यांनी प्रस्तावना करून आबांना पहिला प्रश्न विचारला. परंतु लगेच थेट उत्तर न देता आबांनी ते सांगलीला महाविद्यालयात शिकत असताना, सांगली आकाशवाणीने त्यांना भाषणाची नियमित संधी कशी दिली आणि पुढे आकाशवाणीच्या मानधनातुन दैनंदिन खर्च भागविणे कसे सुलभ झाले, ही आठवण अत्यन्त आत्मीयतेने सांगून आकाशवाणीचं ऋण व्यक्त केले. अतिशय तांत्रिक होईल असं वाटणारी ही मुलाखत खरंच दिलखुलास झाली. आबा इतक्या उस्फूर्तपणे बोलले की २ भागात होईल अशी वाटणारी मुलाखत ८ ते ११ ऑगस्ट २००७ अशा ४ भागात प्रसारित झाली. या मुलाखतीला श्रोत्यांचाही उदंड प्रतिसाद मिळाला. आबांच्या निरलस,साध्या सरळ स्वभावाचा दुसरा अनुभव मला आला.

दरवर्षी दसऱ्याच्या सुमारास वृत्त शाखेत सत्यनारायणाची व साधन सामुग्रीची पूजा करण्यात येते.अनेकदा मा. मंत्री,सचिव,इतर अधिकारी, कर्मचारी येत असतात. उपमुख्यमंत्री असताना आबाही एकदा पूजेला आले.पूजा करून प्रसाद घेतल्यावर त्यांनी मला विचारलं, आपण कुठे बसता ? पूजेच्या ठिकाणी लागून असलेल्या १० बाय १० च्या कक्षाकडे मी बोट दाखवले. आबांनी एका क्षणात अत्यंत सहजपणे त्या कक्षात प्रवेश केला आणि माझ्या खुर्चीत ते आसनस्थ झाले. माझे काम,वृत्त शाखेचे कामकाज समजावून घेऊ लागले . राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री पद भूषविणारी व्यक्ती माझ्या कक्षात येते,माझ्या खुर्चीत बसते आणि सहजपणे संवाद साधते यावर माझा विश्वास बसेना ! आजही त्या अविस्मरणीय प्रसंगाची आठवण झाली की, आबांविषयी आदरभाव जागृत होतो. आबांनी आपल्या पदाचा कधीही बाऊ केला नाही.आणि म्हणूनच भूक ,तहान विसरून काम करताना त्यांना भुकेची आठवण झाली तर कुणी कार्यकर्ता असो किंवा भोवतालच्या गर्दीतील कुणी गावकरी असो, आबा त्याच्या जवळची शिदोरी घेत आणि उभ्याउभ्या दोन घास खाऊन आपलं काम पुढे चालू ठेवत.

RR Patil Maharashtra

महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री असलेली व्यक्ती स्वतःच्या मुलांना शिकण्यासाठी देशातीलच नव्हे तर जगातील उत्तमोत्तम शिक्षण संस्थेत पाठवू शकली असती. परंतु आबांनी मात्र त्यांच्या मुलांचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतच सुरू ठेवले. तथाकथित मोठेपणा, भपकेबाजपणा याला बळी न पडता आपण जसे आहोत तसेच राहणे याला फार मोठी नैतिक शक्ती लागते. आबांकडे ती शक्ती होतीच. त्यामुळेच मुंबईत २००८ च्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर जराही विचलित न होता ते आपलं काम करत राहिले.

कुठल्याही प्रकारची कटुता त्यांनी आपल्या वागण्याबोलण्यात येऊ दिली नाही. यथावकाश त्यांचा पुन्हा मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणून समावेश झाला. पुढे माझे सहकारी निरंजन राऊत यांच्या सांगण्यावरून मी आबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तरुण भारत वृत्तपत्रासाठी आबांवर विशेष लेख लिहिला होता. त्यानंतर अनपेक्षितपणे एके दिवशी आबांचं आभार दर्शक पत्र मला मिळालं ! आजही ते पत्र माझ्या संग्रही आहे. असा हा महाराष्ट्राच्या राजकारणातील,समाज जीवनातील, प्रशासनातील तारा दुर्दैवाने १६ फेब्रुवारी २०१५ रोजी निखळला आणि महाराष्ट्राचं, देशाचं अतोनात नुकसान करून गेला. आबांना विनम्र अभिवादन.

– देवेंद्र भुजबळ. 9869484800

Devendra Bhujbal
Devendra Bhujbalhttps://newsstorytoday.com
Contact Me : +919869484800 Mail Me : devendrabhujbal4760@gmail.com
RELATED ARTICLES

6 COMMENTS

  1. सरळ साध व्यक्तिमत्त्व, उपमुख्यमंत्री पदापर्यंत कसं पोहचल, याच समग्र लिखाण सरळ व सोप्या भाषेत आपण माडलत, आदरणीय आबांच्या स्मृतीस अभिवादन 🙏🏻🌸

  2. दिलखुलास” मधली ही मुलाखतीचे एडीटींग मीच केले होते. बुधवार ते शनिवार असे चार भागात प्रसारण होणार होते. प्रसारणाच्या वेळी ही सीडी चालली नाही आणि त्या दिवशीचा कार्यक्रम रद्द झाला. ऊपमुख्यमंत्री कार्यालयातून विचारणा होऊ लागली तशी धावपळ सूरु झाली. मीनल मॕडमनी मला कार्यक्रम रद्द झाल्याचा फोन केला त्यावेळी मी रेल्वे गाडीत प्रवासात होतो. कार्यालयात पोहोचताच सीडी न चालल्यामुळे मला धारेवर धरले गेले. मी, आपण स्वतः आणि मीनल मॕडम दिवसभर आकाशवाणीत ठाण मांडून होतो. खरा प्रॉब्लेम आकाशवाणीच्या मशीनरीचा होता पण ते कबूल करीत नव्हते. पण.. जेव्हा मी ब्रॉडकास्ट सेक्शनमधे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांनी नवीन मशीनरी लॉंच केली होती. ती फॉल्टी होती. तशात स्टँडबाय इमरजन्सी म्हणून डेकस्टॉकवर कॉपी ठेवली जाते. त्या दिवशी तीही ठेवली नव्हती. जून्या सीडी प्लेअरवर ती सीडी तपासली असता चालली. सेंसॉर कमिटीने ऐकून ओके केल्या शिवाय कुठलाही प्रोग्राम ब्रॉडकास्ट केला जात नाही. आणि आदल्या दिवशी ही सीडी या समितीने ऐकली होती. म्हणजे सीडी ओके आहे, हे तीथे मी सिद्ध केले होते. तेव्हा आकाशवाणीच्या लोकांनी मान्य केले. ऊपमुख्यमंत्री हे आमचे स्पेशल व्हिआयपी आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण सलगच झाले पाहीजे असा हट्ट धरला गेला. तशी याची जाहिरातही करण्याचे आकाशवाणीने मान्य केले. मग रविवारची कार्यक्रमाला सुट्टी असूनही आपल्या मागणी प्रमाणे गुरुवार ते रविवार अशी सलग चार भागात हा प्रोग्राम प्रक्षेपित झाला होता.

    आबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन…!

  3. .आदरणीय माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आर. आर. पाटील साहेबांची घेतलेली मुलाखत वाचली. मुलाखत वाचून त्यांच्याविषयीची सखोल माहिती मिळाली. औरंगाबाद येथे देवगिरी महाविद्यालयात त्यांचे जीवनाविषयीचे मनोगत मी स्वतः ऐकले आहे. अत्यंत दिलखुलासपणे त्यांनी आपला जीवनपट विद्यार्थ्यांसमोर सादर केला होता. विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये कसे काम केले पाहिजे, शिक्षण कसे घेतले पाहिजे याबाबतीत त्यांनी दिलखुलासपणे आपल्या भावना प्रगट केल्या होत्या… विनम्र अभिवादन…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments