Thursday, September 19, 2024
HomeUncategorizedपुण्यतिथी विशेष- शम्मी कपूर...तुमसा नही देखा!

पुण्यतिथी विशेष- शम्मी कपूर…तुमसा नही देखा!

दहीहंडीच्या निमित्ताने ब्लफमास्टर या जुन्या चित्रपटातील गोविंदा आला रे..आला… जरा मटकी संभाल ब्रिजबाला, हे शम्मी कपूर यांच्यावर चित्रित झालेले गीत नुकतेच पहावयास मिळाले. अतिशय सुरेख, मन प्रसन्न करणारे, दिलखुलास असे हे गीत. यात शम्मी कपूर यांनी केलेली मौजमस्ती म्हणजे बहारच.१४ ऑगस्ट हा त्यांचा स्मृतिदिन.. त्यानिमित्त त्यांना ही भावपूर्ण शब्द सुमनांजली..

आलम आरा या पहिल्या बोलपटातील आणि त्यापूर्वीच्या बऱ्याच मूकपटातील अभिनेते असलेले पृथ्वीराज कपूर व रामसरनी देवी यांचे चिरंजीव म्हणजे शम्मी कपूर. जन्म २१ आँक्टोंबर १९३१. घरातच अभिनयाचे बाळकडू. वडील आणि मोठे बंधू म्हणजे राजकपूर दोघेही अभिनेते त्यामुळे असे म्हणता येईल की शम्मीजी जन्मले त्याच वेळेस हे ठरले असावे की त्यांनी अभिनय क्षेत्रातच यायचे आणि अभिनेते व्हायचे . कारण तो काळही तसाच होता. विधी लिखितानुसार शम्मीजी चित्रपटात आले. १९५३ ला बसंत पिक्चर्स अँस्पी इराणी दिग्दर्शित गुल सनोबर या चित्रपटाद्वारे त्यांचा सिने क्षेत्रात प्रवेश झाला. शामा, आगा, हबीब, रजनी हे त्यांचे सह कलाकार होते.

Shammi Kapoor anniversary Bollywood

याच वर्षी शशिकला, चांद उस्मानी सोबत जीवन ज्योती हा चित्रपट देखील आला. त्याकाळी त्यांना बरेच चित्रपट मिळाले. यात प्रामुख्याने लैला-मजनू, रेल का डिब्बा, ठोकर, शमा, परवाना, तांगावाली, हम सब चोर है, सिपह सालार, मिर्झा साहेबा, मिस कोकाकोला, मेहबूबा अशा चित्रपटाचा समावेश होता. पण हे चित्रपट फारसे चालले नाहीत.

मिस कोकाकोलाची अभिनेत्री गीता बाली यांच्याशी त्यांचे सुत जमले आणि ते विवाहबद्ध झाले.

भैया मेरे राखी के बंधन को निभाना : हिंदी चित्रपटातील काही लोकप्रिय गाणी Click here to read this article

मा.भगवान दादांचा शम्या

मी सिने पत्रकारिता करत असताना मा.भगवान म्हणजेच भगवान दादा पालव यांची मुलाखत घेण्यासाठी माझा मित्र , त्यावेळेसचा लोकमतचा फोटोग्राफर, सुप्रसिद्ध कॅमेरामन सुरेश देशमाने यांना घेऊन भगवान दादांच्या घरी दादरला गेलो. दादा आजारी असल्याने पलंगावर झोपून होते. त्यामुळे त्यांनी मुलाखत देण्यास व फोटो काढण्यास नकार दिला. मुलाखत नको तर नको आपण नुसतेच गप्पा मारू, असे म्हणून मी त्यांना बोलते केले. कदाचित माझी मराठवाडी भाषा त्यांना आवडली असावी . म्हणून दादांनी त्यास होकार दिला आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या. गप्पाच्या ओघात दादांनी बरेच किस्से सांगितले.त्यातील हा एक ..ते म्हणाले, अरे तो शम्या या खिडकीच्या खाली उभारून शिट्टी वाजवायचा. कारण गीता येथे बसलेली असायची. एक दिवस मी ह्या खिडकीतून त्याला पाहिले आणि ओरडलो. मी खाली उतरेपर्यंत तो पळून गेला. काही क्षण मला रेफरन्स लागला नाही .पण लगेच लक्षात आले की शम्या म्हणजे शम्मी कपूरजी, गीता म्हणजे गीता बाली. भगवान दादांची हा किस्सा सांगण्याची स्टाईल खूपच मजेदार होती. त्यांनी ऊठून हा किस्सा साभिनय सांगितला. असो..

Shammi Kapoor anniversary
Shammi Kapoor and Geeta Bali

शम्मी कपूर स्टाईल

राज कपूर, दिलीप कुमार आणि देव आनंद या त्रिदेवांचा तो काळ होता. आपल्या हळुवार, प्रेमळ, गुलछबू, अदाकारीने या तिघांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले होते. या तिघांची मोठी मक्तेदारी सिनेसृष्टीत होती. अर्थात ती त्यांच्या उत्तम अभिनयास मिळालेली प्रेक्षकांची पसंती होती यात शंका नाही. या त्रिकूटाची चौकट मोडून शम्मीजींना आपले अस्तित्व दाखविणे सुरुवातीचे चार-पाच वर्ष कठीण गेले. त्यानंतर १९५७ ला नासिर हुसेन दिग्दर्शित ‘तुमसा नही देखा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सिनेसृष्टीला एक यशस्वी नायक मिळाला. शम्मी कपूर यांनी आपली आगळीवेगळी स्टाईल निर्माण केली. लोकांना ती आवडली आणि पुढील दहा- बारा वर्ष शम्मी कपूर यांचे चित्रपट लोकांनी पसंत केले.

शेक्सपिअर अमर का आहे ? Click here to read this article

या काळात मुजरिम, उजाला, दिल देके देखो, जंगली, कश्मीर की कली, राजकुमार, प्रिन्स, अँन इव्हिनिंग इन पॅरिस, ब्रह्मचारी, दिल तेरा दिवाना हे चित्रपट प्रदर्शित झाले. यातील गाणीदेखील प्रचंड लोकप्रिय ठरली. याच दरम्यान राजेश खन्ना युग सुरू झाले आणि शम्मी कपूर काहीसे मागे पडले. आपली हिरोची भूमिका बाजूला ठेवून शम्मीजींनी चरित्र भूमिका करण्याकडे आपला मोर्चा वळविला आणि त्यातही स्वतःचे मोठे प्रस्थ निर्माण केले. विधाता, प्रेम रोग, परवरीश,बेताब, अजुबा देशप्रेमी, अरमान, जमीर, हेराफेरी, हिरो अशा वेगवेगळ्या चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. हिरोचे अथवा हिरोईनचे वडील, काका अशा त्या भूमिका होत्या.

Shammi Kapoor anniversary

आपली विशिष्ट अदाकारी, अभिनयाची वेगळी झलक शम्मी कपूर यांनी निर्माण केली. प्रेक्षकांनी ती शम्मी कपूर यांची स्टाइल म्हणून स्वीकारली. पाश्चिमात्य पद्धतीची वाटणारी त्यांचे अदाकारी लोकांना आवडली. ५० व ६० च्या दशकात शम्मी कपूर यांची ही अदा तुफान गाजली. शर्ट, पॅन्ट, कोट, जॅकेट, हॅट अशा देखण्या पोषाखात शम्मीजी आपणास दिसले. युवा असतानाही आणि त्यानंतर ही उत्तरार्धात चरित्र अभिनेते म्हणून भूमिका करताना देखील त्यांनी ही आपली स्टाईल तशीच ठेवली. प्रेम रोग या चित्रपटातील खानदानी बडे राजा ठाकूर ही भूमिका साकारावी तर फक्त शम्मीजींनीच.. विधाता मधील मित्र एक पेग झाल्यानंतर दिलीप कुमार यांना विचारतो, यार.. तू अमीर कैसे बना ? लाजवाब अभिनय. अशा बऱ्याच लक्षवेधी भूमिका त्यांनी केल्या.

पुरस्कार – 

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात शम्मी कपूरजी माहीर होते. इंटरनेटच्या महा मायाजालात त्यांनी स्वतःला बरीच वर्ष गुंफून ठेवले. अत्याधुनिक तंत्रज्ञानातील त्यांची आवड आणि ते करीत असलेल्या उपयोग पाहता त्यांना त्याकाळी सायबर सिटी या आभासी महानगराचे महापौर म्हणून देखील गौरविण्यात आले. इंटरनेट यूजर कम्युनिटी ऑफ इंडियाचे (IUCI) ते मुख्य आधारस्तंभ होते.

जयंती विशेष : सोंगाड्याची दादागिरी…वाजवू का? Click here to read this

जवळपास 200 पेक्षा अधिक चित्रपटात त्यांनी काम केले. त्यात आपले बंधू राज कपूर यांच्या समवेत एका मराठी चित्रपटातील गाण्यात देखील त्यांची अदाकारी आहे. ‘ब्रह्मचारी’  या चित्रपटासाठी त्यांना १९६८मध्ये फिल्मफेअर हा मानाचा पुरस्कार मिळाला होता. तर सहाय्यक अभिनेता म्हणून १९८२ ला विधाता चित्रपटासाठी त्यांनी तो पुरस्कार पटकाविला.

Shammi Kapoor anniversary

आपली प्रदीर्घ अशी अभिनयाची कारकीर्द गाजवून शम्मी कपूरजींनी १४ ऑगस्ट २०११रोजी आपली इहलोकीची यात्रा संपविली. बऱ्याच नट मंडळींनी शम्मी कपूरजींची स्टाईल सुरुवातीचा काही काळ उचलली होती. त्यांना ती जमली नाही. कारण शम्मीजींची ती खासच अदाकारी होती. असा शम्मी कपूर पुन्हा होणे नाही ….

शम्मी कपूर यांची काही सुपरहिट गाणी – 

१)तुमने पुकारा और हम चले आये- राजकुमार

२)बदन पे सितारे लपेटे हुए- प्रिन्स

३)सात सहेलिया खडी खडी -विधाता

४) याहू याहू चाहे कोई मुझे जंगली कहे -जंगली

५)आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर -ब्रह्मचारी

६)बार बार देखो हजार बार देखो – चायना टाऊन

७)यू तो हमने लाख हसी देखे है -तुमसा नही देखा

Shammi Kapoor anniversary

८)अजी ऐसा मौका फिर कहाँ- अँन इव्हिनिंग इन पॅरिस( युरोप टूर मध्ये हमखासपणे पॅरिस शहराची रात्रीची सफर पर्यटकांसाठी होते. त्यावेळी या गाण्याची आणि शम्मी कपूर यांच्या अदाकारी ची नक्कीच आठवण होते.

९) तुमने किसी की जान को जाते हुए -राजकुमार

१०) दुनिया वालो से दुर.. जलने वालो से दूर . – उजाला

 

डॉ. राजू पाटोदकर, मुंबई

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

श्रीकांत चव्हाण on आनंदी जीवनाची गुरुकिल्ली
सुधीर थोरवे on दूरदर्शनची पासष्टी
अंकुश खंडेराव जाधव on देवेंद्र भुजबळ यांची फेर निवड
लता छापेकर on माझी जडणघडण : १६
Ravindra तोरणे on 🌺मोदक🌺