Friday, November 22, 2024
Homeसाहित्यशांताबाईंच्या मनःपटलावरलं चांदणं!..

शांताबाईंच्या मनःपटलावरलं चांदणं!..

सध्या माझं शांता शेळके यांच्या ‘पूर्वसंध्या’ या काव्य संग्रहाचं वाचन सुरु आहे. खरंतर त्याला केवळ ‘वाचन’ असं नाही म्हणता येणार. कारण केवळ वाचनात एक प्रकारचा रुक्षपणाच अधिक असतो. परंतु शांताबाईंसारख्या मनस्वी लेखिका-कवयित्रीच्या साहित्याचं आपण केवळ वाचन करूच शकत नाही. उलट आपल्याही नकळत आपण त्यांच्या साहित्याचा मनस्वी आस्वाद घेऊ लागतो. ही आस्वादाची प्रक्रिया अगदी सहज घडून येते. याचं मुख्य कारण म्हणजे मुळातच शांताबाईंच्या लेखनात असलेली अंगभूत सहजता!..

‘पूर्वसंध्या’तील कवितांचा आस्वाद घेताना मी त्याबरोबरंच शांताबाईंचा ‘धूळपाटी’ हा आत्मचरित्रपर असलेला ललित-लेखसंग्रहदेखील वाचला. त्यात शांताबाईंनी वर्णिलेल्या एका दृश्य प्रसंगाची आणि पूर्व संध्यामधील दोन कवितांची माझ्या मनात सांगड घातली गेली. या दोहोंचा परस्परांशी थेट संबंध असेलंच वा तसा तो आहे, असं माझं मुळीच म्हणणं नाही. पण माझ्या मनात तो संबंध प्रस्थापित झाला. जणु हे माझंच ‘संदर्भ-स्वगत’ आहे, असं म्हणा !..
” मागच्या माडीतली एक विचित्र आठवण मी कधीच विसरणार नाही. या माडीला लागून स्वयंपाक घरावर टाकलेले पत्र्याचे आडवे छप्पर होते. एकदा मागल्या माडीत मी झोपले असताना रात्री अचानक मला जाग आली. चूळ भरण्यासाठी मी पत्र्यावर आले आणि बाहेरचा देखावा बघून चकित, स्तिमित झाले की तिथेच बसून राहिले. ती चांदणी रात्र होती. शांत चांदणे फुलले होते. … त्या शांत नि:स्तब्ध वातावरणात माझे मन असे भारावून गेले की मी तिथेच बसून राहिले. … त्या रात्री मी काय पाहिले, काय अनुभवले, तिथे तशी मी का बसून राहिले होते याचा मला या क्षणापर्यंत उलगडा झालेला नाही. … ”
[ ‘धूळपाटी’ पृ.क्र.- ४७,४८ ]
..

‘धूळपाटी’मधील ‘ आठवणी आजोळच्या ‘ या लेखात शांताबाईंनी खेडचं, तिथल्या त्यांच्या आजोळचं, त्यांच्या वाड्याचं वर्णन केलं आहे. वाड्याच्या माडीचा उल्लेख त्यांनी जिथे-जिथे केला आहे तिथे- आभाळ, रात्रीचं फुललेलं शांत चांदणं, तिथे त्यांनी व्यतीत केलेला त्यांचा एकांत – यांचा संदर्भ हमखास येतो. वर नमूद केलेलं दृश्य हे कुठेतरी त्यांच्या मनाच्या बोधपूर्व स्तरात ( Subconscious mind) कोरलं गेलेलं असणार. त्यांच्या स्तिमित होण्याचा थेट उलगडा जरी त्यांना झालेला नसला तरी ते दृश्य- ती घटना आठवणीच्या रुपात मनात खोलवर रुजली असणारंच. ही आठवणंच मग एखाद्या अवचित प्रसंगी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून व्यक्त होते. त्या घटनादृश्याची अभिव्यक्ती त्या माध्यमातून नकळतपणे रेखाटली जाते. त्यातूनही ‘कविता’ हे तर स्वगताचंच माध्यम ! त्यामुळे आठवणींचा थेट उलगडा जरी झाला नसला तरी त्यांचा कुठला ना कुठला संदर्भ हा या अभिव्यक्तीत हमखास दडलेला असतो-
‘ उमगत नाही कधीच मला
अर्थ त्या शांत समंजस ता-यांचा
आणि त्यांच्या आत्ममग्न गाण्याचाही
मात्र माझ्याप्रमाणेच असते ऐकत-बघत
विस्तारलेले अफाट आभाळ, दिशा दाही ‘
[ कविता- ता-यांचे शांत कळप ]

कवयित्रीचं तिच्या आजोळच्या वाड्यातल्या माडीतून दिसणा-या  चांदण्यांना नि त्या चांदण्यांनी भारलेल्या त्या दृश्याला पाहून स्तिमित होणं, स्तब्ध होणं.. कदाचित त्यावेळी तिच्याही नकळत त्या ता-यांचं नीरव-आत्ममग्न गाणंच ती ऐकत असेल.., त्या स्तब्धतेच्या ग्लानीतच ती नकळतपणे आश्चर्यचकीतही झाली असेल.., वा आत्यंतिक नवलाईचीच ती स्तिमितता-स्तब्धता असेल..
..

‘ लखलखत्या असंख्य चांदण्या अवघ्या आभाळभर
आणि असंख्य प्रतिबिंबांची हृदयस्थ प्रवाहात थरथर
अवघे तारांगण अलगद खाली उतरलेले
आणि प्रत्येक चांदणीत माझेच मन मोहरलेले
..
मी आभाळ, मी चांदणी, मीच अनन्त अवकाश
मी तुफान वादळवारा, मीच हलका निःश्वास
..
अनन्त युगे ओलांडून झालेली मी आरपार
अनुभवलाच नव्हता कधी असा असीम विस्तार ‘
[ कविता- लखलखत्या असंख्य चांदण्या ]

आभाळ, रात्रीचं त्यात फुललेलं शांत चादणं- माडीतून दिसणा-या या निसर्गप्रतिमांशी एकरूप झाल्यावर नि त्यातून होणा-या कुठल्याश्या अनुभूतीनेच कवयित्री त्या समयी स्तिमित झाली असेल.. त्यावेळची तिची स्तब्धता म्हणजे स्वतःच्याच अगोचर अस्तित्वाची तिला झालेली अंतस्थ अनुभूती असेल..
..

अशा प्रकारे वरील दोन्ही कवितांचं अनुभवविश्व जरी भिन्न असलं तरी कवयित्रीच्या मनातला त्यांचा दृश्य संदर्भ हा कदाचित एकच असावा. मनात खोलवर रुजलेल्या या दृश्यरुपी आठवणीचा सुप्त प्रभावच शांताबाईंच्या कवितांमधून, त्यातील काव्यप्रतिमांमधून नि त्यांच्या काव्यभाषेतून सशब्द झाला असावा. वा लेखन समयीच्या त्यांच्या मनःपटलावर तो दृश्यसंदर्भ अवतरलाही असेल. मनाच्या खोल तळ्यातून ते चांदणं अवचित झिरपलंही असेल.. मला मात्र या चांदण्याने फारंच मोहीत केलंय, हे खरं !..

– चारुश्री वझे

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. शांताबाई शेळके, या बहूआयामी लेखीका आणि कवयित्री होत्या . ता-यांचे शांत कळप असो व लखलखत्या असंख्य चांदण्या , त्यातील भावगर्भ वाखाणण्याजोगे असते . टिपूर चांदणी रात्र , असंख्य तारांचे पुंजके ,, रात्रीची निरव शांतता , वाडा , मागील मोकळे वातावरण अशा अनेक प्रतीमांची रेलचेल असते.

    राजाराम जाधव,
    🌹🌹🙏🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments