Thursday, September 19, 2024
HomeUncategorizedरणजी पटू, क्रिकेट प्रशिक्षक शेखर गवळी गेले चटका लावून...

रणजी पटू, क्रिकेट प्रशिक्षक शेखर गवळी गेले चटका लावून…

गेल्या 9 ते 10 वर्षांपासून शेखर गवळी महाराष्ट्र रणजी संघाचे फिजिओ ट्रेनर होते. त्यांचा केदार जाधव, हृषीकेश कानिटकर, मुनाफ पटेल या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यात आणि शारीरिक फिटनेस ठेवण्यात महत्वाचा वाटा होता.

रणजी पटू, क्रिकेट प्रशिक्षक शेखर गवळी यांचा नुकताच इगतपुरी येथे ट्रेकिंगच्या वेळी सेल्फी काढताना दरीत पडून मृत्यू झाला आणि नाशिकच्या क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली.

रणजी सामने खेळत असताना पुणे क्लब, विजर क्लब , मुंबईतील आरसीएफ, गोव्यातील वास्को इलेव्हन, त्रिपुरा आदी विविध संघांकडून खेळण्याची संधी शेखर गवळीला मिळाली होती. त्याने 2001 मध्ये अखेरचा रणजी सामना सौराष्ट्र विरुद्ध खेळला. एम.कॉम.पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर एमपीएड आणि एम फिल केल्यानंतर शेखर गवळी यांनी महाराष्ट्राच्या अंडर-22 संघाचे फिजिकल ट्रेनर म्हणून काम पाहिले. गेल्या तीन वर्षांपासून रासबिहारी स्कूलला फिजिकल ट्रेनर म्हणून तर भुजबळ नॉलेज सिटीला स्पोर्टस डायरेक्टर म्हणून ते काम पाहत होते .

Shekhar Gawali cricketer

त्यांच्या विषयीच्या आठवणी….

नाशिकच्या रणजीपटूंचा विचार करताना शेखर गवळी हे नाव प्रामुख्याने पुढे रेते. शेखर गवळी यांची क्रिकेटमधील सुरूवात साधारण स्थितीतून झाली. सुरूवातीला त्यांना शालेय स्तरावर क्रिकेटची आवड होती. परंतु संघ फारसा मोठा नव्हता.
डोळ्यासमोर ठेवण्यासारखे कोणीही आदर्श नव्हते. परंतु याच वेळी त्यांनी महाविद्यालयीन स्तरावरील क्रिकेट पाहिले आणि क्रिकेटविषयीची त्यांची आवड अधिकच वाढली. वडीलही एचपीटी कॉलेजमध्ये नोकरीला असल्याने अनेकदा ते तेथील क्रिकेटपटूंचा खेळ पाहण्यातच रममाण होत असत. टेनिस बॉलवर खेळताना आपणही कोणीतरी मोठे क्रिेकेटपटू व्हावे अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. यानंतर सुरूवात झाली ती खऱ्या अर्थाने त्यांच्या क्रिकेटच्या प्रवासाला. क्रिकेट आणि शेखर गवळी हे नाव एकमेकाशी जोडले गेले ते आजतागायत !

एचपीटी कॉलेजमध्ये असतांना शिक्षणाबरोबरच इतर खेळांकडेही शेखर आकर्षित झाला. त्यावेळी महाविद्यालयाकडून टेबल टेनिस , बॉल बॅडमिंटन, बुद्धिबळ,व्हॉलीबॉल आदी खेळामध्ये चांगलीच प्रगती केली. परंतु क्रिकेट आणि शेखर गवळी यांची जणू काही नाळच जोडली गेली होती. अशातच त्यांच्याजवळ राहणारे रतन कुयटे हे शेखरचे आदर्श ठरले . त्यांचा खेळ पाहिल्यानंतर शेखरनेही नाशिक जिल्हा असोसिएशनमध्ये प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली. त्याचवेळी रतन कुयटे यांच्याबरोबरच मकरंद ओक , अविनाश आघारकर यांचे मार्गदर्शनही लाभले. जलदगती गोलंदाज म्हणुन नावलौकिक मिळवत असतांनाच जिल्हास्तरावर जलदगती गोलंदाज अनेक असल्याने संधी मिळणार नाही हे ओळखून घेत जलदगती ऐवजी लेगस्पिन गोलंदाजी टाकण्यास त्यांनी सुरूवात केली.

Shekhar Gawali cricketer
Shekhar Gawali with Indian cricketer Kedar Jadhav

याचवेळी जिल्हास्तरावरील क्रिकेट संघात निवड झाली आणि त्यानंतर जसदनवाला, तनपुरे चषक आदी स्पर्धांमध्ये चमक दाखविली. दरम्यानच्या काळात शेखरला पाठीचे दुखणे उद्भवल्याने डॉक्टरांनी क्रिकेट सोडण्यास सांगितले. परंतु जिद्दीसमोर सर्व काही थिटे असल्याचे दाखवून देत शेखरने आराम आणि सरावाच्या जोरावर पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. त्यानंतर मागे न पाहता पुढे जाणे पसंद केले . 1995 ला महाराष्ट्राच्या रणजी करंडकाच्या संघात शेखर गवळीचा समावेश करण्यात आला. जिल्हास्तरावरून थेट रणजी करंडक खेळणारा शेखर हा त्यावेळी नाशिकचा एकमेव क्रिकेटपटू होता. आजही शेखर गवळी यांचा हा विक्रम कोणीही मोडू शकले नाही. बऱ्याच वर्षापासून शेखर ज्या क्षणाची वाट पहात होता तो क्षण 1997 साली आला आणि अखेर महाराष्ट्राच्या 16 जणांच्या चमूत त्याची निवड झाली. महाराष्ट्राकडून खेळताना गुजरात विरूद्धच्या पहिल्या सामन्यात शेखरने पदार्पण केले .

गेल्या 9 ते 10 वर्षांपासून शेखर गवळी महाराष्ट्र रणजी संघाचे फिजिओ ट्रेनर होते. त्यांचा केदार जाधव, हृषीकेश कानिटकर, मुनाफ पटेल या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यात आणि शारीरिक फिटनेस ठेवण्यात महत्वाचा वाटा होता. महाराष्ट्राच्या रणजी खेळाडूंबरोबरच भारतीर कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, शिखर धवन यांच्याबरोबर शेखरचे मैत्रीचे संबंध होते. याचबरोबर नाशिकला जेव्हा-जेव्हा रणजी सामने होत तेव्हा शेखर गवळी हे नेहमीच महाराष्ट्राच्या संघासमवेत असत. त्यावेळी नाशिककरांची छातीही अभिमानाने फुलून जात असे. मागील सत्रात ज्यावेळी नाशिक महापालिकेच्या निवडणुका लागल्या होत्या त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक एकाच वेळी शेखर गवळी यांच्याकडे फिटनेससाठी नाशिकच्या गोल्फ क्लबवर एकत्र जमत असत. जवळजवळ 70 ते 80 नगरसेवकांना शेखर गवळी यांनी फिटनेससाठी एकत्र आणले होते. 15 ऑगस्ट रोजीच शेखर गवळी यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर गणेश विसर्जनाची सायंकाळ नाशिककरांसाठी काळा दिवस ठरली . शेखर गवळी यांच्या अचानक निधनाची बातमी समजल्याने अवघ्या नाशकात एकच शोककळा पसरली. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या रणजी खेळाडूंना देखील या बातमीने मोठा धक्का बसला.

सदैव सर्वांशीच मैत्री राखणारा, क्रिकेट खेळाशी सदैव जोडलेला आणि नेहमीच मदतीचा हात पुढे करणाऱ्या शेखरच्या जाण्याने नाशिक क्रिकेटमध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी कधीही भरून काढता येणार नाही. पाठोपाठ
दु:खाचे एक-एक धक्के गवळी कुटुंबियांना बसले आहेत.या दु:खातून सावरण्याची ताकद परमेश्‍वराने त्यांना द्यावी, हीच आज ईश्‍वर चरणी प्रार्थना आहे.

 

– नरेंद्र खैरनार, नाशिक.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments