थोर साहित्यिक, विचारवंत, अस्पृश्यता निवारणात सक्रिय सहभाग असलेले प्रा. श्रीपाद महादेव माटे यांचा जन्म २ सप्टेंबर १८८६ रोजी विदर्भातील शिरपूर येथे झाला होता. अत्यन्त खडतर परिस्थितीत एम.ए.पर्यंत शिक्षण घेतलेल्या श्रीपाद माटे यांना रँगलर परांजपे, वासुदेवराव पटवर्धन, देवधर यांच्यासारखे गुरू अध्यापक म्हणून लाभले होते . लोकमान्य टिळक, संस्कृत पंडित वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता.
सातारा आणि पुण्यातील ‘न्यू इंग्लिश स्कूल’मधून काही काळ अध्यापन केल्यावर माटे यांनी पुण्याच्या एस.पी. कॉलेजात इंग्रजी व मराठी विषयांचे प्राध्यापक म्हणून काम सुरू केले. ‘रोहिणी’ या मासिकाचे माटे पहिले संपादक. यानंतर ‘केसरी प्रबोध ’, ‘महाराष्ट्र सांवत्सरिक’ (तीन खंड ) या ग्रंथांचे संपादन करून माटे यांनी साहित्य क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. त्यांनी संपादित केलेल्या ” विज्ञान बोध” या ग्रंथाची त्यांची २०० पानी प्रस्तावना गाजली. विज्ञान युगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांनी या प्रस्तावनेतून समाजाला दिला.
To read thisहिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी रामदासांचे योगदान : लेखिकेचं मनोगतClick here
उत्तम विद्यार्थि प्रिय शिक्षक , अस्पृश्यांसाठी तळमळीने झटणारे निष्ठावंत समाजसेवक आणि स्वतंत्र प्रज्ञेचे व्यासंगी लेखक म्हणून श्रीपाद महादेव ऊर्फ श्री. म. माटे ओळखले जातात . श्रीपाद माटे यांनी वृत्तपत्रांत बातमी लेखनापासून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. अनेक विषयांवर त्यांनी भरपूर लिखाण केलं. दलित समाजाच्या व्यथा मांडणाऱ्या कथा त्यांनी लिहिल्या, चरित्रं लिहिली आणि इतिहास संशोधनही केलं. व्यासंगी, चिंतनशील वृत्ती, भक्कम वैचारिक बैठक आणि रसाळ, साधीसुधी पण अंतःकरणाला भिडणारी भाषा शैली असणाऱ्या माट्यांच्या साहित्याला मराठी वाङ्मयात महत्त्वाचे स्थान आहे.
माटे त्यांच्या लघुकथांसाठी नावाजले जातात. आपल्या मित्रांच्या आग्रहामुळे त्यांनी या गोष्टी लिहायला घेतल्या. गोष्टी वेल्हाळ माट्यांनी लिखाण करावं या सूचनेवरून माट्यांनी त्यांच्या अनुभवांना शब्दबध्द करायला सुरूवात केली. अस्पृश्यता निवारण हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता . उपेक्षितांच्या जीवनातली सुखदु:खं त्यांनी जवळून पाहिली असल्याने त्याचं प्रतिबिंब त्यांच्या लघुकथांमधून उमटलं. ‘ उपेक्षितांचे अंतरंग ’, ‘अनामिक’, ‘ माणुसकीचा गहिवर ’, ‘ भावनांचे पाझर ’ हे त्यांचे कथा संग्रह प्रसिद्ध असून, पददलित, आदिवासी, कातकरी, रामोशी या उपेक्षित जमातींच्या व्यक्तींचे चित्रण त्यांनी केलं आहे. ही माणसं व त्यांचं जगणं याआधी इतक्या प्रत्ययकारी पद्धतीनं मराठी साहित्यात कधी आलं नव्हतं . त्यामुळे तत्कालीन मान्यवर साहित्यिकांनीच नव्हे तर सामान्य वाचकांनीही मोठा प्रतिसाद दिला. रसपूर्ण, ठसठशीत भाषेत लिहिलेल्या त्यांच्या ‘कृष्णाकाठचा रामवंशी’, ‘तार खोऱ्यातील पिऱ्या’, ‘मांगवाडय़ातील सयाजीबोवा’ या कथा आजच्या पिढीलाही भुरळ पाडणाऱ्या आहेत.
पुण्यातल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नोकरी करत असताना माट्यांचा इंग्रजीचे पट्टीचे शिक्षक म्हणून नावलौकिक झाला. ते ज्या पद्धतीने एखादा विषय खुलवत विद्यार्थ्यांना शिकवत तीच पद्धत पुढे त्यांच्या लिखाणातही उतरली. न्यू इंग्लिश स्कूलनंतर माटे नूतन मराठी विद्यालयात दाखल झाले. माटे हे विद्यार्थिप्रिय शिक्षक होते. ‘माटे मास्तर’ म्हणून ते पुण्यात प्रसिद्ध होते. त्यांच्या झुपकेदार मिशा आणि हातातला सोटादेखील तेवढाच प्रसिद्ध होता. शिक्षकाची नोकरी करताना त्यांना बऱ्याच आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागलं. पण १९३५ साली त्यांची स. प. महाविद्यालयात इंग्रजी व मराठीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली आणि त्यांना बऱ्यापैकी आर्थिक स्वास्थ्य लाभलं. १९४६ पर्यंत त्यांनी इथे अध्यापन केलं. विद्यार्थ्यांना मित्र मानणं, आपुलकीने त्यांच्या समस्या समजून घेणे, तल्लीन होऊन शिकवणे यामुळे इथेही त्यांनी लवकरच विद्यार्थिप्रियता मिळवली.
To read thisशांताबाईंच्या मनःपटलावरलं चांदणं!..Click here
याच काळात सामाजिक कार्य करण्याकडे त्यांचा ओढा वाढला. अस्पृश्यता निर्मूलनाच्या कामात त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. त्याची सुरुवात झाली ती अस्पृश्यांसाठी रात्रीची शाळा सुरू करून. माट्यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात अनेक ठिकाणी या शाळा सुरू झाल्या. या संदर्भात समाजात जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी सभा घेतल्या. शक्य त्या सर्व ठिकाणी त्यांनी या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम केलं. सलग वीस वर्षं या कामात घालवल्यानंतर १९३३ साली त्यांनी आपल्या अनुभवाच्या आधारावर ‘अस्पृश्यांचा प्रश्न’ हे पुस्तक लिहिलं.
माटे स्वतःला सनातनी पण समन्वयवादी सुधारक मानत. चांगल्या परंपरा पाळून नव्या सुधारणांचा स्वीकार करावा आणि अन्य समाजाशी मिळतं जुळतं घेऊन आपलं काम चालवावं ही त्यांची भूमिका होती. त्यामुळेच माटे हे ‘पुरते सुधारक नाही तर कातडी बचाव सुधारक आहेत’ असा आरोप करत प्र. के. अत्र्यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली होती. ज्या अस्पृश्यांसाठी ते काम करत होते त्यांनाही माट्यांची समन्वयवादी भूमिका अपुरी वाटली. दोन्ही बाजूंकडून होणाऱ्या विरोधामुळे पुढे १९३७ साली त्यांनी या कामातून आपलं लक्ष काढून घेतलं. याच दरम्यान त्या काळी गाजलेला ‘अत्रे-माटे’ वाद घडला.
अत्र्यांच्या ‘ब्रँडीची बाटली’ या चित्रपटातील श्रीकृष्णाचं विडंबन करणाऱ्या भागाला माट्यांनी आक्षेप घेतला. अत्रे व माटे यांच्या जाहीर सभांनी पुणे दणाणून गेलं. दोघेही आपल्या तत्त्वासाठी लढत होते . त्यामुळे एकमेकांवर शाब्दिक हल्ले झाले तरी पुढे त्यांच्यातली ही कटुता मिटली. माटे यांनी आयुष्यभर अस्पृश्योद्धाराचे काम केले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, त्यांत काही चरित्रेसुद्धा आहेत. पक्षिकेचा वारा ही त्यांची एकमेव कादंबरी. श्रीपाद महादेव माटे यांचे २५ डिसेंबर १९५७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर , पुणे, ९४२२३०१७३३
खूप छान वर्णन केले आहे.