मोहना कारखानीस या पती संजय कारखानीस यांच्या समवेत गेली काही वर्षे सिंगापूर मध्ये वास्तव्य करून आहेत. मूळचा साहित्यिक पिंड त्यांनी तिथेही जपला असून मराठी साहित्य, संस्कृतीची सेवा त्या तिथेही करीत आहेत…
मोहना कारखानीस यांचं पूर्वाश्रमीचं नाव मोहना टिपणीस. त्यांचे वडील एसटी महामंडळात चीफ इंजिनिअर आणि डेपो मॅनेजर होते. त्यामुळे महाराष्ट्रभर ‘विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर’ ह्या म्हणीप्रमाणे वडिलांच्या बदलीच्या ठिकाणी त्या दोन-तीन वर्षे राहत असत. प्रत्येक बदलीच्या गावी चांगल्या आठवणी घेऊन त्या मोठ्या झाल्यात . वडिलांच्या बदल्यांमुळे मुंबईत आजोळी राहून रुपारेल महाविद्यालयात स्टॅटिस्टिक्स हा मुख्य विषय घेऊन त्या पदवीधर झाल्या .त्यानंतर लगेचच ऑपरेशन्स रिसर्च ग्रुप या मोठ्या मार्केट रिसर्च कंपनीत त्यांना नोकरीं लागली. तीन वर्षांनी त्या मार्केट रिसर्च एक्झिक्युटिव्ह झाल्या.
या काळात साहित्याशी फक्त लायब्ररीची पुस्तके वाचणे एव्हढाच त्यांचा संबंध आला. या काळात त्यांना एक छान स्थळ सांगून आले . लग्न झाले. त्या टिपणीसच्या कारखानीस झाल्या.
टर्निंग पॉईंट :
त्यांची काही वर्षे महाविद्यालयीन शिक्षण , नोकरी आणि नंतर विवाह,कुटुंब सांभाळण्यात गेली. त्यांनी कधी मुलगी मुलगा असा भेद केला नाही. आज मुलगी सोनल अमेरिकेततील मिशिगन युनिव्हर्सिटीत पीएचडी करीत आहे. यजमानांची फिरतीची नोकरी आणि त्यांची पर्यटनाची आवड यांची सुरेख सांगड घालून त्यांनी लेखनाला गती दिली. त्यांनी २००८ नंतर दिवाळी अंकात सातत्याने लेखन चालू केले. त्यांच्या बालकथा, कविता आणि विनोदी कथा लोकांना विशेष आवडल्या. अनेक दिवाळी अंकांसाठी त्यांनी लेखन केले. लहान मुलांसाठी चेरीलँड , फुलपाखरू ,धमाल मस्ती ,बालकुमार कोष ही पुस्तके लिहिली. याशिवाय हनु लर्न्स कॉम्पुटर – इंग्रजी बाल नाटिका, जाईचा मांडव – कथा संग्रह , कुमार कोशात बाल कथा आणि कविता प्रकाशित मोहर (कविता संग्रह) ,पैंजण (कथा संग्रह) ,दिवा लावताना (कथा संग्रह) सागरगोटे (कविता संग्रह) अल्बम प्रवासाचा-जपान प्रवास वर्णन ग्लोबल टाइम्स ह्या दैनिकात बाल पुरवणीचे संपादन ,रेडिओच्या अस्मिता वाहिनीवर ‘ऐसी अक्षरे रसिका’ ह्यात ललित बंध सादरीकरण अशी त्यांची साहित्य सेवा आहे.
त्यांनी २००८ नंतर नोकरी सोडली . त्या खासगी क्लासेस घेत होत्या . मुलगी मोठी झाली होती. यजमान ऑफिसच्या कामासाठी जग भर जात . त्यामुळे हातात मोकळा वेळ येत होता. लिहिण्याच्या आवडीने पुन्हा एकदा उसळी मारली. त्यांनी कथा लिहायला सुरुवात केली. दरम्यान त्यांच्या लेखनाला राज्य स्तरीय पारितोषिके मिळाली. दिवाळी अंकातील लेखनालाही पारितोषिके मिळाली. डॉ विजया वाड यांच्या ‘सावित्रीच्या लेकी’त मानाचे स्थान मिळाले. रेडिओवर त्यांनी ‘ऐसी अक्षरे रसिके’ या कार्यक्रमात ललित बंध लेखन आणि सादरीकरण केले. त्या २००८ मध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सदस्य झाल्या. त्यामुळे अनेक थोर साहित्यिकांच्या स्नेहाच्या भेटीगाठी झाल्या .
परदेशातील अनुभव :
मोहना यांनी सिंगापूर मधील साहित्यिक वाटचालीत
महाराष्ट्र मंडळाच्या वार्षिक स्मरणिकेत लेख लिहिले.
ऋतुगंध ह्या द्वै मासिकात सातत्याने कथा, लेख लेखन करीत आहेत. तसेच शब्दगंध ह्या कवींच्या मेळाव्यात सातत्याने कविता लेखन आणि सादरीकरण करीत आहेत.
मराठी भाषेचे प्रेम : आपल्या मातृभाषेवरील प्रेम हे कोणत्याही देशात, कुठेही राहिले तरी तसेच राहते. किंबहुना वाढते.
त्यांची ‘भारत’ मातृभूमी तर सिंगापूर ही कर्तव्य भूमी आहे . सिंगापूर हा साऊथ ईस्ट आशियातील आकाराने चिमुकला पण आर्थिक दृष्ट्या प्रगत आणि श्रीमंत देश आहे. देश विदेशातील मोठ्या कंपन्या इथे आहेत. त्यामुळे विविध देशातील लोक इथे नोकरी , व्यवसाय निमित्त येऊन राहतात. अनेक देशातील संस्कृतींना सिंगापूरच्या संस्कृतीने सामावून घेतले आहे.
भौतिक आणि आर्थिक प्रगती साधताना सिंगापूरच्या वेगवेगळ्या संस्कृतीचेही जतन केले आहे. इथे आल्यावर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या सिंगापूरच्या महाराष्ट्र मंडळाची भेट होणे ही त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट ठरली.
मराठी संस्कृतीचा वसा सांभाळून पुढे नेणाऱ्या अनेक कार्यक्रमात त्यांना भाग घेता आला. तसेच अनेक मोठ्या कलाकार,लेखक,कवी,चित्रकार, नाटककार ,गायक यांच्याशी त्यांच्या गाठीभेटी झाल्या. गुढीपाडव्याला,गणपतीला होणारी शास्त्रशुद्ध पूजा आणि मराठमोळे सांस्कृतिक कार्यक्रम बघताना त्यांना सुखद धक्का बसत होता.
सिंगापूरच्या महाराष्ट्र मंडळाने त्यांना सतत लिहिते ठेवले. ‘ऋतुगंध ‘या द्विमासिकात त्यांनी कथा,कविता,लेख लिहिले आणि लिहीत आहेत. या द्विमासिकात सिंगापूरचे उत्तम लेखक लेखिका आपले साहित्य प्रकाशित करतात. गेली सहा वर्षे प्रत्येक महिन्यात असणाऱ्या शब्दगंध कार्यक्रमात त्या सहभागी होत आहेत. यामध्ये उत्तमोत्तम कवींचा सहभाग असतो. वैचारिक गप्पांची देवाणघेवाण असते. दर महिन्यात एका यजमानाकडे हा कार्यक्रम आयोजित केला जातो. चार विषय दिलेले असतात. त्यावर आपल्या कविता लिहून सादर करायच्या असतात. हे विषय थोडे ‘हटके’असतात. बुद्धीला आणि कल्पकतेला आव्हान देणारे असतात. त्यामुळे त्यांच्याकडून अक्षरशः शेकडो कविता लिहिल्या गेल्या आहेत. भारतातील अनेक ज्येष्ठ साहित्यिक,कलाकार शब्दगंध या कार्यक्रमात त्यांना भेटले. मिळालेल्या शांत निसर्गाच्या सान्निध्यात राहताना त्यांनी अनेक कथा,कविता लिहिल्या. त्यामुळेच त्यांचे ‘जाईचा मांडव ’ आणि ‘पैंजण’ हे कथासंग्रह तर ‘मोहर’आणि ‘सागरगोटे’ हे दोन कवितासंग्रह प्रकाशित करता आले.
जगभर पर्यटन :
मोहना आणि त्यांच्या यजमानांना देश विदेशात फिरायला आवडते. त्यामुळे मॉरिशस,स्वित्झर्लंड,यूरोप,जपान, म्यानमार (ब्रह्मदेश) ,इंडोनेशिया, मलेशिया,थायलंड,व्हिएतनाम, अमेरिका अशा अनेक देशात दोघेही फिरून आली आहेत.
त्या त्या देशाची संस्कृती त्यांनी जवळून बघितली. वेगवेगळ्या भाषांची जडण घडण शेजारी देशांवरील भाषेवर कसा परिणाम करते हे बघता आले. उदाहरणार्थ युरोप खंडात अनेक देश जवळ जवळ स्थित आहेत. जर्मनी,फ्रांस,स्वित्झर्लंड,इटली या देशांच्या सीमा अगदी एकमेकांना लागून आहेत. त्यांच्या भाषेचा,जीवन पद्धतीचा ठसा एकमेकांवर उमटलेला दिसतो .तसेच ते एकमेकांपासून कसे भिन्न आहेत हेही लक्षात येते. त्यांचा इतिहास अभ्यासणे ही त्यांची आवड आहे . याच अभ्यासातून ‘अल्बम प्रवासाचा’ ही प्रवासाविषयक लेखनाची शृंखला लिहिण्याचा विचार त्यांच्या मनात आला. आणि जपानवरील त्यांनी लिहिलेले पुस्तक डिसेंबर २०१९ मध्ये डिम्पलने प्रकाशित केले. याच शृंखलेतून पुढे बाली-इंडोनेशिया,व्हिएतनाम यावर पुस्तके लिहिण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.
अनेक देशात फिरल्यावर एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली ती म्हणजे तिथे गेल्यावर भारतीय माणूस जातीभेद विसरतो. इतर देशात भारतीय माणूस हा फक्त भारतीय असतो. आपल्या देशात देखील जातपात,उच्च नीच ,गरीब श्रीमंत हा भेद लवकरात लवकर नष्ट व्हावा असा आशावाद मोहना व्यक्त करतात. परदेशात राहणे हा मोहना यांचा आवडता अनुभव आहे. त्या अनुभवाचा उपयोग करून मायदेशातील,तसेच परदेशातील मुलांना संस्कृतीचे शिक्षण देणे, संस्कृत,मराठीची गोडी लावणे हे त्यांचे स्वप्न आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.
– देवेंद्र भुजबळ. +91 9869484800
स्मिताजी,आपल्या दिलखुलास प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
मोहनाजींचा जीवन प्रवास प्रेरणादायी आहे भुजबळ सरांनी अतिशय मोजक्या शब्दांत व्यक्त केला आहे
भुजबळ सरांनी नवोदित लेखकांना छान व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. धन्यवाद.
Encouraging and inspirational newsletter
Thank you
देवेंद्रजी नमस्कार,मोहना कारखानीस या आमच्या फॉरेनवाल्या अभ्यासू लेखिका. अत्यंत मृदू ,हसतमुख स्वभावाच्या मोहना यांनी दूरदेशी राहूनही आपले संस्कार, संस्कृती जपली आहे. लिखाण आणि फिरण्याचा छंद त्यांनी जाणीवपूर्वक जपला आहे. यजमान संजयजीदेखील सतत फिरतीवर पण त्यांनीदेखील पत्नीला सतत प्रोत्साहन दिलं आहे. वेळ मिळेल तसं स्वतःदेखील त्यांच्या बरोबर अनेक देशात ते जात असतात. त्यांना प्रेरणा देत असतात.मुलगी देखील गुणी आणि अभ्यासु आणि शांत. हे कुटूंबच विलोभनीय आहे.आपण सुंदर त्यांचं व्यक्तीमत्व शब्दांत उभं केलं आहे. मला आवडले.आपणांस खूप, खूप शुभेच्छा……🌹👍
Thank you
मोहनाजींवरील आर्टिकल वाचून खुप छान वाटले. आपल्याला मिळालेल्या संधीचा सकारात्मक गोष्टींसाठी कसा उपयोग करून घ्यावा याचे मोहनाजी हे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी अधिकाधिक प्रवास करावा अन् वेगवेगळे अनुभव घेऊन शब्दबद्ध करावेत या शुभेच्छा!
अत्यंत प्रेरणादायी माहिती सरजी