Thursday, September 19, 2024
Homeयशकथाशिक्षक दिन विशेष: COL आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षिका स्वाती वानखेडे

शिक्षक दिन विशेष: COL आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षिका स्वाती वानखेडे

भारताचे दुसरे ,स्वतः शिक्षक असलेले राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिन,५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने एका पाड्यावर निष्ठेने काम करून आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविलेल्या शिक्षिका स्वाती वानखेडे यांची प्रेरणादायी कथा…..

श्रीकृष्ण जन्माची कहाणी सांगताना , असा प्रसंग वर्णन केला जातो की, ‘नुकत्याच जन्मलेल्या कान्हाला त्याचे वडील वासुदेव, टोपलीत घालून यमुना नदी पार करत असतात. नदीला पूर आलेला असतो. पण जिवाच्या निकराने ते त्याला सांभाळत नेत असतात. अचानक कृष्णाचे पाउल नदीच्या पाण्याला लागते आणि नदीचा पूर ओसरतो. तेथेच रस्ता तयार होतो. श्रीकृष्ण सुखरूप नंदा घरी पोचतो. ‘द्वापार युगातील ही कथा कलियुगात सत्य झाली असती, तर नाशिक जवळील शेरपाडा येथील शाळेच्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना शाळेत जाण्यासाठी हाल सोसत जावे लागले नसते.

To read जयंती विशेष :थोर साहित्यिक, विचारवंत श्रीपाद महादेव माटे Click here

नाशिक जिल्हा परिषदेच्या शेरपाडा शाळेला जाण्यासाठी रस्ताच नव्हता. पाड्याच्या तिन्ही बाजूने नदी होती. त्या नदीतूनच चालत जावे लागे. तेव्हा कुठलीच मदत उपलब्ध नव्हती. सरकारी पूल अदृश्य होता. पण सरकारी कार्यालयातील कागदपत्रात, फाईलमध्ये मात्र पडून आणि दडून होता. प्रत्यक्षात काही तो तयार होत नव्हता. ही कहाणी आहे जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेची, स्वाती वानखेडे यांची. त्यांनी शाळेच्या मुलांना शिकवण्यासाठी तब्बल बारा वर्षे पाण्यातून प्रवास केला आणि त्या शाळेला घडवले. त्या शाळेच्या शिक्षिका स्वाती वानखेडे यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील COL (कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग) पुरस्कार तर मिळालाच, पण महाराष्ट्र सरकारनेही आदर्श शिक्षिका म्हणून त्यांचा गौरव केला.

Teachers day

नाशिक जवळचे शेरपाडा गाव म्हणजे गाव नव्हेच, केवळ पाडा. देवरगाव ते शेरपाडा नदीतून चालत जायचे. या पाड्यावरील शाळेत शिक्षिका म्हणून स्वाती वानखेडे यांची कोकणातून बदली झाली. त्यावेळी त्या एमए होत्या आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी भारलेल्या होत्या . शेरपाड्याच्या जिल्हा परिषद शाळेत पोचल्यावर ‘जणू काही या शाळेच्या विकासासाठी आपली नेमणूक झाली ‘असे वाटल्याचे स्वाती म्हणतात.

जिल्हा परिषदेच्या या शाळेत कोणत्याच सुविधा नव्हत्या. शाळेचा वर्ग आणि अंगण शेणाने सारवावे लागे. कधी गावातील पालक मदत करत. तर कधी विद्यार्थी शेण आणून देत . “जमीन सारवल्यावर किती सुरेख स्वच्छ दिसते” याचे आकलन झाल्यावर स्वातीमॅडमना जमीन सारवण्याचे कष्ट हलके वाटू लागत. शाळेतील मुले गरीब होती. त्यांच्याकडे पाट्या, दप्तरे नव्हती. अस्वच्छ, ओल्या जागेत राहून त्यांना फोड होत. खरूज होई. कधी ताप येई. पालकही शिक्षणाचा गंध नसलेले. गावात स्वच्छतागृहे नव्हती . गावातील मुली तर कधी पाड्याबाहेर गेल्याच नव्हत्या, कारण नदीतून जायचे . पण शेती असल्यामुळे नागरिकांनी या बेटावर वस्ती केली होती. अशा शाळेत बदली स्वीकारल्याबद्दल अनेक लोक त्यांना वेड्यातच काढत होते, पण स्वाती मॅडमनी गावातील लोकांना सुधारण्याचा विडाच उचलला होता. लोकांच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करीत त्यांनी आपले काम करायचे ठरवले.

पूर्वी जिल्हा परिषदेच्या दोन शाळांमध्ये त्यांनी शिक्षिकेची नोकरी केली होती. त्यापैकी दापोली जवळची फणसू गावातील शाळा तर अतिशय सुंदर , निसर्ग सान्निध्यात होती. कौलारू शाळा आणि समोर सावली असलेली झाडे. त्याखाली मुले खेळत. त्या शाळेला सुविधाही होत्या. पण या शाळेला सुंदर बनवण्यासाठी स्वातीमॅडमची धडपड सुरू झाली. एकीकडे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून एम एड करत त्या स्वतःचाही विकास करत होत्या .

Click here to readरणजी पटू, क्रिकेट प्रशिक्षक शेखर गवळी गेले चटका लावून…

“मी शाळेत येताना रस्त्यात भेटतील त्या पालकांना नमस्कार दादा, नमस्कार ताई असे संबोधून एक नाते तयार करू लागले. नम्रतेने सर्वांना आपलेसे करणे महत्त्वाचे होते. मग लोकही आपल्या सुधारणेच्या योजना ऐकून घेत . येताना खारका, खडीसाखर असा खाऊ मुलांना मी वाटत असे. तसेच मुलांना शिकवण्यासाठी भरपूर गाणी जमा केली होती. मी स्वतः देखील लिहिली होती. मुलांजवळ पाट्या नव्हत्या. म्हणून प्रत्येकाला धूळपाटी तयार करून दिली. त्यावर मुले अक्षरे गिरवत. मोठ्या मुलांनी अक्षरे, पाढे, शब्द असे कागदावर आणि प्लायवूड वर रंगवून दिले. ते भिंतीवर लावून सजावट केली. शाळेचे अक्षरशः मंदिर झाले. सर्वांनी त्याला ‘अक्षर मंदिर ‘ नाव दिले.” स्वाती मॅडम शाळेच्या आठवणी सांगण्यात रमून गेल्या होत्या.

गावावर शिक्षणाचे संस्कार करण्यासाठी स्वाती मॅडमनी काही उपक्रम योजले. ३ जानेवारीला दरवर्षी कुमारिकेचे पूजन म्हणून सर्व मुलींना शाळेत बोलावून त्यांचे पूजन केले जाई. तसेच त्यांना शालोपयोगी वस्तू भेट देत. त्यांच्या मैत्रिणी या सुधारणेच्या कामासाठी त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. डॉ. सुषमा दुगल, छाया भंडारी, डॉ. किरण जैन, डॉ. सुरेखा कोठेकर, डॉ. अंजली बर्वे आणि शैला बंड अशा कितीतरी प्रेमळ महिला या शाळेसाठी झटू लागल्या .

दुसरा उपक्रम म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या फोटोसमोर पणती लावणे. गावातील एका मातेला बोलावून तिला सावित्रीबाईंच्या फोटोसमोर पणती लावायला सांगत. त्याच वेळी सावित्रीबाई फुले कोण होत्या , त्यांनी मुलींसाठी शिक्षण कसे सुरु केले , नवऱ्याने कसा पाठिंबा दिला हे सांगत स्त्रियांच्या मनावर ही गोष्ट ठसवत . मुलींना शाळेत पाठवावे यासाठी हा उपक्रम होता. गुढीपाडव्याच्या दिवशी घराघरात पाटी आणि काठी वाटली जात असे. गुढी उभारायची तर पाटीची गुढी उभारायची. गावाने शिक्षणाला महत्त्व दिले पाहिजे. काठी त्यांना नंतर गुरे चारायला उपयोगी पडेलच असा विचार होता. सर्व शिक्षण अभियान आल्यानंतर मात्र शाळेला काही जरुरीच्या गोष्टी जिल्हा परिषदेकडून मिळू लागल्या आणि जीवन सुकर झाले.

८ मार्च ‘जागतिक महिला दिन’ साजरा करताना गावातील सर्व महिलांना बोलावून त्यांचा सत्कार केला जायचा. त्या निमित्ताने त्या शाळा पाहायच्या, मुलांची प्रगती विचारायच्या. स्वाती आणि त्यांच्या दिलदार मैत्रिणी मुलांना, स्त्रियांना खाऊ वाटप करून सर्वांची चैन करायच्या. असे उपक्रम स्वाती मॅडमनी आपल्या कारकीर्दीत दहा ते बारा वर्षे केले.

Click here to readहिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी रामदासांचे योगदान : लेखिकेचं मनोगत

शेरपाडा शाळेत जाण्यासाठी पूल होणे आवश्यक होते .चौथीनंतर मुलांना गावातील शाळेत शिक्षण घ्यायला जावे लागे. पूल बांधण्याचा अर्ज घेऊन स्वाती मॅडमने कितीदा तरी कलेक्टर ऑफिसला खेटे घातले. पण कोणी दाद देत नव्हते. शहरात जी चांगली व्यक्ती भेटेल, तिला स्वाती मॅडम हे गाऱ्हाणे सांगत . पण काहीच होत नव्हते. त्यांना अजूनही टायरवर बसून पाण्यातून जावे लागत होते. त्यांच्या १९९६ ते २००८ पर्यंत कारकिर्दीत पूल झालेला नव्हता. मात्र तरीही जिद्दीने त्यांनी शाळेची प्रगती होईल असे प्रयत्न सुरू ठेवले होते. एकदा शिक्षणाधिकारी डॉ. लक्ष्मण शिवणेकर हे शाळेची पाहणी करण्यासाठी आले होते . त्यांना शाळेत झालेले बदल आवडले आणि स्वाती मॅडमचे शिक्षणाचे धोरण पटले. त्यांनी स्वाती मॅडमची शिफारस यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडे केली.

एक दिवस अचानक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून स्वाती मॅडमना बोलावणे आले. त्यांनी दूरस्थ शिक्षण पद्धतीने तेथून एम एड केले होते .प्रबंधाचा विषय होता ‘दुर्गम आदिवासी भागातील प्राथमिक शिक्षकांच्या समस्या’. डॉ.सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तो पूर्ण केला होता. संचालक डॉ.अनंत जोशी यांनी स्वाती वानखेडे या आपल्या विद्यार्थिनीस शाळेची सर्व टिपणे लिहून काढण्यास सांगितले. शाळेची प्रगती कशा पद्धतीने झालेली आहे, तिने काय काम केले आहे याबद्दल स्वातीने दोन-तीन महिने खपून फाईल तयार केली. नंतर आपल्या पद्धतीने लिहून ती विद्यापीठाने न्यूझीलंडच्या ‘कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग’ (COL) या संस्थेकडे पाठवली. महाराष्ट्रातून या पुरस्कारासाठी स्वातीची एकटीची निवड झाली होती.

Click here to readशांताबाईंच्या मनःपटलावरलं चांदणं!..

‘कॉमनवेल्थ लर्निंग’ यांच्यातर्फे स्वातीमॅडमची २३ देशांमधून निवड होऊन त्यांना ‘लर्निंग एक्सपिरीयन्स अवॉर्ड’ जाहीर झाले. न्यूझीलंड येथील ड्युनिडीन शहरात हा समारंभ आयोजित केला होता. ६ जुलै २००४ रोजी स्वाती वानखेडे यांनी हा पुरस्कार मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. राम ताकवले व तत्कालीन कुलगुरू डॉ. टी बी साबळे यांच्यासह स्वीकारला. “दूरस्थ शिक्षणाचा परिणाम कसा सकारात्मक घडतो ते मुक्त विद्यापीठाने जगाला दाखवून दिले.” स्वातीमॅडम म्हणाल्या.

परदेशातून पुरस्कार मिळाल्यावर नाशिक मधील लोकांची शाळेकडे बघण्याची दृष्टी बदलली . अनेक वृत्तपत्रातून ही बातमी झळकली. वानखेडे मॅडम यांच्या शब्दाला किंमत आली. नाशिकमधील कुसुमाग्रज प्रतिष्ठान सोडले तर आजवर शेरपाडा शाळेतल्या या शिक्षिकेकडे कोणी फारसे लक्ष दिले नव्हते. पण आता सर्व त्यांची दखल घेऊ लागले. एकूण बावीस संस्थांनी त्यांना पुरस्कार जाहीर केले.

बॉश मायको कंपनीच्या अधिकाऱ्यांना स्वातीमॅडमची कहाणी समजली. या कंपनीची एक समाजसेवी संस्था देखील होती. त्यांनी शेरपाडा गावाचा विकास करण्यासाठी काही करण्याची तयारी दाखवली. स्वाती मॅडमने त्यांना सांगून गावात चाळीस स्वच्छतागृहे बांधून घेतली. या संस्थेने हे काम अतिशय जबाबदारीने केले. गावातल्या लोकांना यांचा वापर करण्याची सवय लागायला काही काळ जावा लागला. बॉश कंपनीने गावातील समस्या पाहिल्या आणि स्वाती मॅडमने केलेल्या सुधारणाही पाहिल्या. स्वातीचे शैक्षणिक उपक्रम त्यांना आवडले. कंपनीचा ‘सोशल डे’ साजरा करताना त्यांनी स्वातीमॅडमसाठी २००८ साली एक पुरस्कार जाहीर केला. तो पुरस्कार स्वाती मॅडमना त्यावेळचे नाशिकचे कलेक्टर श्री. एस. चोकलिंगम यांच्याहस्ते स्वीकारायचा होता.

स्वातीमॅडम सांगतात, “समारंभ ताज हॉटेलमध्ये होता. मला शाळेतून थेट तेथे पोचायचे होते. तयार होण्यासाठी वेळच नव्हता. शाळेतून निघताना पाण्यातून जावे लागल्यामुळे मी अर्धी ओली होते. तशाच स्थितीत मी पंचतारांकित ताज हॉटेलमध्ये गेले आणि पुरस्कार स्वीकारला. माझ्या भाषणात कलेक्टर साहेबांना पूल बांधून देण्याची मी विनंती केली. कलेक्टर एस. चोकलिंगम हे संवेदनशील होते. त्यांनी शाळेची एकूण परिस्थिती पाहून आवश्यक वाटल्यास पूल नक्की बांधीन असे आश्वासन दिले. ते त्यांनी पाळले. २००८ मध्ये पूल बांधला गेला. हा आमच्या शाळेचा मोठा विजय होता.”

स्वाती वानखेडे यांची २००८ साली तीरणशेत शाळेत मुख्याध्यापक म्हणून बदली झाली. पुढे त्या २०१६ मधे निवृत्त झाल्या. पण त्यानंतरही त्यांनी आपलं शैक्षणिक कार्य सुरूच ठेवले . रोटरी क्लबच्या मदतीने त्यांनी साक्षरतेचे वर्ग घेतले. तसेच स्वतः ‘सावित्री फाऊंडेशन’ ही संस्था स्थापन केली. त्याद्वारे गरजू मुलींना शिक्षणासाठी मदत मिळते. दानशूर लोक पाठीशी उभे रहातात. विजया राऊत, ज्या प्रथमपासून स्वाती मॅडमच्या या कार्याला पाठिंबा देत आल्या, त्याच या संस्थेत सेक्रेटरी म्हणून उत्तम काम पाहतात. आजवर ४५ मुलींना या संस्थेने दत्तक घेतले आहे आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च करीत आहे. अकरावी व बारावी साठी हा खर्च केला जातो. मुलींना पुढे शिकू द्यावे हा उद्देश !

“आपला अजूनही शेरपाडा शाळेशी संबंध आहे का ?” हा मी शेवटचा प्रश्न विचारला. तेव्हा स्वातीमॅडम म्हणाल्या “हो तर ! ती माझीच मुले आहेत. काही शिकून मोठी झाली. पण अजूनही त्यांच्यासाठी मी लोकांना गाऱ्हाणे मांडून मदत मिळवतेच. परवा १००० मास्क मी शाळेला पाठवले. मी आत्ता पुण्यात आहे, पण कुरियरने दिले पाठवून.”

जगात सकारात्मक विचार करून, तो कठीण परिस्थितीतही अमलात आणणारी माणसे अशी माणसे आहेत म्हणून अनेकांचा उद्धार होत आहे. या आधुनिक सावित्रीच्या धडाडीला मी मनोमन नमस्कार केला.

– मेघना साने, ठाणे
फोन – ९८९२१५१३४४

RELATED ARTICLES

5 COMMENTS

  1. छोट्या पाड्यावरील नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी निष्ठेने आणि तळमळीने काम करणार्‍या स्वाती वानखेडे यांना सलाम !!
    मेघनाताई, तुमच्यामुळे आम्हाला स्वातीताईंच्या कामाविषयी माहिती मिळाली. धन्यवाद !!

  2. इतकं महान कार्य करणाऱ्या ‘स्वाती मॅडम’ ची ओळख मेघना मॅडम सर्वप्रथम तुमच्याकडून झाली . त्याबद्दल तुमची मी मनापासून आभारी आहे.
    १२ वर्ष पुल नसलेल्या नदीतून प्रवास करून आदिवासी पाड्यावर शाळेत जाणारी ही आधुनिक सावित्री, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अडचणींवर मात करत पुढे जाणारी ….. तिला शतशः नमन 🙏

  3. स्वाती वानखेडे यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. थोडीशी गैरसोय झाली तर आकाश पाताळ एक करणा-या आमच्या सारख्या शहरातील नागरिकांचे कान खेचणारा हा लेख आहे एका दुर्लक्षित पाड्यातील दुर्लक्षित शाळेचा विकास होऊ शकतो हे स्वाती ताईंनी दाखवून दिले आहे. त्यांच्या कार्याचा बारकाईने अभ्यास करून मेघना साने यांनी हा विस्तृत लेख लिहिला आहे
    त्यांचे ओघवतया शैलीतील लेखन नेहमीच भावते अनेक शुभेच्छा!

  4. खूपच छान लिहिलय. मुख्य म्हणजे अशा शिक्षकांमुळे शिक्षण संस्थेवर विश्वास ठेवावा वाटतो. मॅडम च्या कार्याची दखल घेतली गेली. अभिनंदन.
    मेघना तुम्ही योग्य शब्दात त्यांच्या कार्याची माहिती दिली. तुमचेही अभिनंदन आणि कौतुक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments