शांतताप्रिय , बौद्ध धर्माचा पगडा असलेल्या , गेल्या काही वर्षांत पर्यटनासाठी लोकप्रिय झालेल्या थायलंड देशातील जनता सध्या रस्त्यावर उतरली आहे का ? सांगताहेत विदेश अभ्यासक श्री श्रीराम पुरोहित….
“लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी सरकार……” हे अजब सरकारचे वर्णन करणारे; “जगाच्या पाठीवर” या गाजलेल्या मराठी चित्रपटातील ग.दि.माडगुळकर यांचे गीत सर्वश्रुत आहे. या जगात कठोर हृदयाच्या दगडांना मरण नसून; कोमल फुलांच्या नशिबी मात्र जन्मतःच मरण लिहिलेले असते; अशी स्पष्टोक्ती गदिमांनी केली होती. या गीतामधून मांडण्यात आलेली वस्तुस्थिती “जगाच्या पाठीवर” वास्तवातही अस्तित्वात आहे; याची अनुभूती थायलंडमधील नागरिक घेत आहेत.
थायलंडमधील जनतेच्या कष्टाच्या पैशांची आपल्या विलासी जीवनासाठी उधळपट्टी करणाऱ्या लहरी राजाच्या आणि त्याला सोयीस्कररीत्या पाठीशी घालून सत्तेला चिकटून राहिलेल्या पंतप्रधानांच्या विरोधात थायलंडमधील संतप्त जनता रस्त्यावर उतरली आहे. राजेशाहीला प्रामुख्याने युवापिढीकडून विरोध करण्यात येत आहे. या निदर्शानांकडे आंतरराष्ट्रीय समीकरणांच्या अभ्यासकांकडून अत्यंत औत्सुक्याने पहिले जात आहे.
पंतप्रधानांना विरोध –
थायलंडमध्ये यावर्षीच्या मार्च महिन्यापासूनच निदर्शने करण्यात येत आहेत. मार्च महिन्यात विद्यापीठांमध्ये निदर्शने सुरू झाली होती. कोरोनामुळे ती शिथिल झाली होती. तथापि, जुलै महिन्यापासून ती पुन्हा सुरू झाली असून आता ती अधिकच उग्र झाली आहेत. पंतप्रधान प्रयुत चान ओचा यांनी राजीनामा द्यावा अशी या निदर्शकांची मागणी आहे. केवळ राजधानी बँकॉकमध्येच नव्हे; तर देशाच्या विविध भागात ही निदर्शने करण्यात येत आहेत. प्रयुत यांनी आणिबाणी घोषित करून; जमावबंदीही लागू केली. तथापि, त्यानंतरही या आंदोलनाची धार मुळीच कमी झालेली नाही.
महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांना दैवत मानणारी थायलंडमधील शांतताप्रिय जनता अशाप्रकारे संतप्त का झाली आहे; असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे. अर्थात, हे समजण्यासाठी थायलंडमध्ये अस्तित्वात असलेली राज्यव्यवस्था लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. तेथे घटनात्मक राजेशाहीदेखील अस्तित्वात आहे. सध्या थायलंडमध्ये महा वजिरालोंगकोर्न हे राजे आहेत. जनतेच्या पैशांची प्रचंड उधळपट्टी करणाऱ्या राजाच्या सातत्याने सुरू असलेल्या विकृत प्रदर्शनामुळे जनतेला उबग आलेला आहे.
ऐन कोरोनाच्या महासंकटात राजा जर्मनीत वास्तव्याला गेलेला आहे. स्वत:च्या राण्यांखेरीज त्याच्यासमवेत अंगरक्षक म्हणून वीस “सेक्स सोल्जर्स”देखील आहेत. या अडुसष्ट वर्षीय राजाला सौंदर्यवतींचा छंद आहे. या सेक्स सोल्जर्सपैकी एकीशी त्याने नुकताच विवाह केला असून ती त्याची चौथी राणी बनली आहे. विलासी राजाच्या आशीर्वादाने कार्यरत असलेल्या पंतप्रधानाने राजाच्या कृष्णकृत्यांकडे दुर्लक्ष करून नागरिकांची घोर निराशा केल्यामुळेच हा संताप निर्माण झाला आहे.
जनता अडचणीत –
महा वजिरालोंगकोर्न याने जर्मनीमधल्या अलिशान अशा अल्पाईन रिसॉर्टची निवड केली आहे. वास्तविक पाहता; कोरोनामुळे त्या परिसरातील सर्व हॉटेल्स् आणि रिसॉर्ट्स बंद ठेवण्यात आलेली आहेत. तथापि, राजाने जर्मनीत राहण्यासाठी प्रशासनाची विशेष अनुमती घेतली आहे.
देश अडचणीत असताना राजा जर्मनीला गेल्यामुळे थायलंडची जनता संतापली आहे. सोशल मीडियातून राजावर जोरदार टीका होत आहे. वास्तविक पाहता; थायलंडमध्ये राजावर टीका करणाऱ्यांना पंधरा वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिली जाते. तथापि, तरीही राजावर जोरदार टीका होत आहे. थायलंडमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र जनतेकडे दुर्लक्ष करून राजा विलासी जीवन जगत आहे. त्यामुळेच जनतेच्या भावना कमालीच्या संतप्त झालेल्या आहेत.
राजे अडुल्यडेज –
मुळातच; थायलंडमध्ये राजाला प्रथमपासूनच मान आहे. राजेशाहीवरील उधळपट्टी हा प्रकार तेथे अजिबात नवीन नाही. महा वजिरालोंगकोर्न यांचे वडील भूमिबोल अडुल्यडेज हे ९ जून १९४६ ते १३ ऑक्टोबर २०१६ अशी तब्बल सत्तर वर्षे राजेपदावर होते. ते जगात सर्वाधिक काळ राजेपद उपभोगलेले राजे ठरले होते. थायलंडमध्ये घटनात्मक राजेशाहीच्या आधीन असलेली लोकशाही राज्य व्यवस्था अस्तित्वात आहे. थायलंडच्या जनतेने सातत्याने राजकीय अस्थिरता अनुभवलेली आहे. अडुल्यडेज यांच्या कारकिर्दीत तब्बल सदतीस पंतप्रधान झाले. अनेक लष्करी उठावही झाले. अर्थात, तरीही देश अखंड राहिला आणि प्रगतही बनला हीदेखील वस्तुस्थिती आहे.
अडुल्यडेज यांच्यावर अलोट प्रेम करणारी थाई जनता आदरापोटी त्यांना भगवान बुद्धांचा अवतार आणि राष्ट्रपिता मानायची. सन १७८२ पासून थायलंडवर राज्य करणाऱ्या चक्री राजघराण्यातले ते नववे राजे होते. सुमारे पंच्याण्णव टक्के थाई जनता बौद्धधर्मीय आहे. सम्राट अशोकाच्या पुढाकाराने थायलंडमध्ये धम्माचा प्रसार झाला असल्यामुळे; थायलंडच्या भाषिक संस्कृतीवरील संस्कृत आणि पाली भाषेचा प्रभाव अनुभवास येतो. “अडुल्यडेज” हे नावही “अतुल्यतेज” या भारतीय नावाचा अपभ्रंश आहे.
त्यांच्या निधनानंतर शाही अंत्यसंस्कारासाठी एक वर्ष तयारी केली गेली होती. पाच दिवस चाललेल्या या अंत्यसंस्कारामध्ये अडीच लाख लोक सहभागी झाले होते. अंत्यसंस्कारासाठी एकशे पंच्याऐंशी फूट उंचीचे सोन्यासारखे चमकणारे स्मशान बनविण्यात आले होते. त्यांचे पार्थिव शरीर दोनशे बावीस वर्षे जुन्या असलेल्या सोन्याच्या रथातून स्मशानापर्यंत आणण्यात आले होते. त्या अंत्यसंस्काराला पाचशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचा खर्च आला होता. जगभरातला हा सर्वाधिक महागडा अंत्यसंस्कार ठरला होता. या माहितीवरूनही थायलंडमध्ये राजेशाही आणि राजा यांचे स्थान सहजपणे लक्षात येईल. अडुल्यडेज यांच्या कार्यकाळामध्ये अनेकवेळा सैन्य तख्तपलट होऊनही नागरिक राजामागेच ठामपणे उभे होते.
किळसवाणे प्रदर्शन –
अडुल्यडेज यांचा जन्मदिन थायलंडमध्ये पितृदिन म्हणून ओळखला जातो. ते हयात असेपर्यंत त्या देशातील नागरिकांना राजेशाही कधीही जाचक वाटली नव्हती. वास्तविक पाहता; अडुल्यडेज हे त्यावेळी सौदीच्या राजघराण्यापेक्षाही अधिक ऐश्वर्यसंपन्न होते. तथापि, विकृत स्वरूपाचे प्रदर्शन त्यांनी कधीही केले नव्हते. मात्र त्यांच्यानंतर राजेपदावर विराजमान झालेल्या महा वजिरालोंगकोर्न यांनी मात्र विकृतपणाची परिसीमाच गाठली आहे.
खरं तर , महा वजिरालोंगकोर्न हे उच्च विद्याविभूषित आहेत. जगातील सर्वोत्तम विद्यापीठांमधून त्यांचे शिक्षण झालेले आहे. ऑस्ट्रेलिया तसेच युरोपमधील उच्च दर्जाच्या लष्करी विद्यापीठांमधील लष्करी प्रशिक्षणामुळे ते युद्धकलेतही निष्णात आहेत. थायलंडच्या हवाई दल, भूदल आणि नौदल अशा तीनही सेनांचे ते घटनात्मक प्रमुख आहेत. थायलंडची सैन्यदले ही पंतप्रधानापेक्षा राजघराण्याशीच अधिक एकनिष्ठ असतात. तथापि, महा वजिरालोंगकोर्न यांचे वर्तन अत्यंत किळसवाणे ठरले आहे. आपल्या जन्मदिनी आपल्या एका पत्नीकडून नग्नावस्थेत रांगत जन्मदिनाचा केक कापून घेऊन त्यांनी त्याचे चित्रण केले होते. विशेष म्हणजे; नंतर त्यांनी तिची आपल्या आयुष्यातून हकालपट्टी केली आहे.
कठपुतली पंतप्रधान –
सन २०१६ मध्ये राजेपदी आल्यावर सन २०१७ मध्ये महा वजिरालोंगकोर्न यांनी संपूर्ण सरकारी संपत्तीवर ताबा मिळवला आहे. सरकारी महसुलाचा मोठा वाटा त्यांच्या विलासावरच खर्च होतो. त्यांनी स्वत:साठी फक्त महिला शरीर रक्षकांची तुकडी तैनात केली आहे. घटनेनुसार सरकारी महसुलाचा विशिष्ट भाग हा राजासाठीच खर्च केला जातो. त्यामुळेच आर्थिक संकट अनुभवणारी सर्वसामान्य जनता राजाच्या कमालीची संतप्त झाली आहे.
गत दोन वर्षे महा वजिरालोंगकोर्न यांनी अधिकाधिक अधिकार आपल्याच हाती केंद्रित होतील अशी व्यवस्था केली असून; पंतप्रधान प्रयुत चान ओचा हे आता निव्वळ कठपुतली पंतप्रधान बनलेले आहेत. वास्तविक पाहता; प्रयुत हे पूर्वाश्रमीचे लष्करी अधिकारी आहेत. काही वर्षांपूर्वीच त्यांनी राजसत्तेच्या विरोधात बंड छेडले होते. साहजिकच त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. तथापि, त्यांनी जनतेच्या अपेक्षा पूर्णपणे धुळीला मिळवल्या आहेत. राजसत्तेची साधी थट्टा केली; तरीही तो देशद्रोहाचा गुन्हा मानला जाईल असा कठोर आदेश त्यांनी जारी केला आहे. अर्थात, त्यामुळे युवापिढी अधिकच आक्रमक झाली आहे.
पंतप्रधानांना विरोध –
सन १९३२ मध्ये थायलंडमध्ये एका रक्तहीन क्रांतीनंतर घटनात्मक राजेशाही सुरू झाली होती. तथापि, आता हीच राजेशाही समाप्त करण्याची वेळ आली आहे. जनतेचा संताप अनावर झालेला असतानाच; महा वजिरालोंगकोर्न यांनी त्यांचा आवडता कुत्रा फुफू याची एअर मार्शल म्हणून नियुक्ती केली असून त्याला स्वतंत्र आसन दिले आहे. त्याच्यासाठी लाखो डॉलर्सचा खर्च केला जात आहे. माजी लष्करप्रमुख असलेले विद्यमान पंतप्रधान ओचा यांनी सन २०१४ मध्ये तत्कालीन सत्ता उलथवून टाकली होती. तथापि, आता त्यांच्याच विरोधात जनता रस्त्यावर आली आहे.
थायलंडमध्ये २४ जून १९३२ पर्यंत केवळ राजेशाहीच होती. त्याच दिवशी देशात सत्तांतर घडून; २७ जून रोजी हंगामी घटना अंमलात आली होती. राजसत्ता मर्यादित होऊन घटनात्मक सरकारला सत्ता प्राप्त झाली होती. कदाचित नजीकच्या भविष्यात थायलंडमधील राजेशाही कायमची अस्ताला जाईल; असेच संकेत तेथील जनतेच्या आंदोलनातून मिळत आहेत. त्यामुळेच थायलंडमधील आंदोलनाचे फलित काय असेल; हा औत्सुक्याचा विषय ठरला आहे.
– श्रीराम पुरोहित.