Friday, November 22, 2024
Homeलेखजयंती विशेष: भूदान चळवळीचे प्रवर्तक:आचार्य विनोबा भावे

जयंती विशेष: भूदान चळवळीचे प्रवर्तक:आचार्य विनोबा भावे

आचार्य विनोबा भावे यांची आज, ११ सप्टेंबर २०२० रोजी १२५ वी जयंती आहे. त्यानिमित्ताने थोडक्यात त्यांचे जीवन, कार्य…

आचार्य विनोबा भावे यांनी भारतात अनोख्या अशा अहिंसक व शांततापूर्ण भूदान चळवळीमुळे फार मोठी सामाजिक व आर्थिक क्रांती घडवून आणली, हे त्यांचे फार मोठे योगदान आहे. विनोबाजींचे पूर्ण नाव विनायक नरहरि भावे असे होते. मात्र आपण संत ज्ञानदेवाला ज्ञानोबा, तुकारामाला तुकोबा म्हणतो, त्या धर्तीवर महात्मा गांधींनी विनायकाचे केले विनोबा. पुढे सर्व जगच त्यांना विनोबा भावे म्हणून ओळखू लागले.

Click here to readजयंती विशेष :थोर साहित्यिक, विचारवंत श्रीपाद महादेव माटे

विनोबाजींचा जन्म तत्कालिन मुंबई राज्यातील कुलाबा जिल्ह्यात ( आताचा रायगड) पेणजवळील गागोदे या गावी दिनांक ११ सप्टेंबर १८९५ रोजी झाला. त्यांचे घराणे प्रतिष्ठित व सुखी होते. त्यांचे आजोबा श्री. शंभुराव हे फार धार्मिक वृत्तीचे होते. मात्र त्या काळातही त्यांनी जातीपातीची, धर्माची, मानव जातीत भेदाभेद करणारी वृत्ती झुगारुन दिलेली होती.

विनोबांवर आपल्या आजोबांचा फार प्रभाव पडलेला दिसून येतो. वडिलांचे व विनोबांचे मात्र कधीच पटले नाही. विनोबांनी चारचौघांसारखे शिकावे व मोठे व्हावे या वडिलांच्या इच्छेशी ते कधीच सहमत होऊ शकले नाहीत. आजोबांप्रमाणे आईचाही विनोबाजींच्या जीवनावर फारच प्रभाव पडलेला होता. आपल्या आईची एकेक वचने त्यांनी आयुष्यभर तत्वं म्हणून जोपासली. उदा. देतो तो देव ,राखतो तो राक्षस, थोडयात गोडी-फारात लबाडी इत्यादि. विनोबाजींनी, त्यांच्या बाळकोबा, शिवाजी या भावडांनीही या तत्वाचं आमरण पालन केल. ही मातृभक्ती व तत्वनिष्ठता सर्वसामान्य माणसाला अचंबित करणारी अशीच आहे. ते व त्यांची भावंडे आजन्म ब्रह्मचारी राहिली होती.

Click here to readहिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी रामदासांचे योगदान : लेखिकेचं मनोगत

वडिल नोकरीनिमित्त पुढे बडोद्याला गेले. त्यामुळे विनोबाजींचे शालेय शिक्षणही बडोदे येथेच झाले. ते अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी होते. प्रत्येक परिक्षेत ते पहिले येत. गणित व संस्कृत हे त्यांचे आवडते विषय. वयाच्या दहाव्या वर्षापासूनच त्यांच्यात राष्ट्रभक्तीचे बीज पेरले गेले. पुढे या बीजाचेच एका महान वटवृक्षात रुपांतर होत गेले. चाकोरीबद्ध शिक्षणाचा निरर्थकपणा हेरुन, ते बडोद्याहून मुंबईला इंटरची परिक्षा द्यायला गेले. पण मुंबईला न जाता त्यांनी काशी गाठली. काशीच्या रहिवासातच महात्मा गांधीजींचे भाषण झाले आणि त्या प्रभावातून ते गांधीजींचे अनुयायी बनले. गांधीजीबरोबर तेही आश्रमवासी बनले.

पूज्य विनोबाजींच्या आचार विचारांचा प्रभाव महात्मा गांधींवरही पडला आणि त्यांना गांधीजींच्या जीवनात आदराचे स्थान प्राप्त झाले. म्हणूनच पुढे पहिला सत्याग्रही म्हणून महात्मा गांधींनी विनोबाजींचीच निवड केली. वर्ध्याचे श्रीमंत, सावकार जमनालाल बजाज यांनी महात्मा गांधींना वर्ध्याला आश्रम सुरु करण्याचे आमंत्रण दिले. पण गांधीजींनी त्यास नकार देताच जमनालालजींनी पूज्य विनोबांना पाठविण्याची विनंती केली. त्यांचा आग्रह मानून विनोबा भावे ८ एप्रिल १९२१ रोजी आपल्या काही शिष्य परिवारासह साबरमतीहून वर्ध्याला दाखल झाले. पुढे हा आश्रम स्थिर स्थावर झाल्यावर गांधीजींच्या आज्ञेनुसार त्यांनी प्रत्यक्ष स्वातंत्र्याच्या सत्याग्रहात भाग घेऊन सत्याग्रहींना मार्गदर्शन केले. सत्याग्रहातील सहभागाबद्दल त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला.

Click here to read जयंती विशेष- आदरणीय आबा

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लवकरच देशाने महात्मा गांधीना गमावले आणि एक मोठी पोकळी निर्माण झाली. यातून मार्ग काढण्यासाठी सर्व रचनात्मक कार्यकर्ते सेवाग्रामला जमले असताना ‘ सर्वोदय समाज ’ आणि ‘सर्व सेवा संघ’ या दोन संस्थाची स्थापना विनोबाजींच्या पुढाकाराने झाली. पुढे सन १९५१ साली त्यांनी काढलेली पदयात्रा, हाती घेतलेली भूदान चळवळ लोकांना एक नवा मूलमंत्र देऊन गेली. जीवनाची इतिकर्तव्यता झाली म्हणून त्यांनी प्रायोपवेशन करून १५ नोव्हेंबर १९८२ रोजी आपला देह ठेवला. भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.

विनोबाजींचे आश्रमातील ऋषितुल्य जीवन, त्यांचे राष्ट्रकार्य, समाजसेवा, त्यांची गिताई आणि इतर साहित्य आजही आपल्याला एका दिव्य दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करीत आहे. त्यांच्या आचार विचारांचा स्वीकार हीच मानवजातीच्या कल्याणाची किल्ली आहे. पूज्य विनोबांना कोटी कोटी प्रणाम.

– देवेंद्र भुजबळ :9869484800.

Devendra Bhujbal
Devendra Bhujbalhttps://newsstorytoday.com
Contact Me : +919869484800 Mail Me : devendrabhujbal4760@gmail.com
RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments