Saturday, November 9, 2024
Homeसाहित्यशेक्सपिअर अमर का आहे ?

शेक्सपिअर अमर का आहे ?

Shakespeare ने एकूण ३८ नाटके, ‘सॉनेट’ (Sonnets) या प्रकारातील १६८ कविता आणि २ खंड काव्ये लिहिली.

पुण्यात शिफ्ट होताना टाकून न देता आलेली पुस्तके चाळत होतो. त्यात शेक्सपियरचे ‘किंग लियर’ दिसले. सहज वाचता वाचता लक्षात आले, ही पुस्तके कितीही जुनी झाली तरी आपण टाकून देवूच शकणार नाही ! एखाद्या अभिजात लेखकाचा समाज मनावरचा प्रभाव किती शाश्वत असतो, त्याचे एक सर्वमान्य उदाहरण म्हणजे विल्यम शेक्सपियर (William Shakespeare) ! आज ४०० वर्षांनंतरही ह्या कवी, नाटककार आणि लेखकाचे  साहित्य आपल्याला किती गुंतवून ठेवते !

शेक्सपियरने एकूण ३८ नाटके, ‘सॉनेट’ (Sonets) या प्रकारातील १६८ कविता आणि २ खंड काव्ये लिहिली. जशा शोकांतिका तशाच सुखांतिकाही लिहिल्या. शेक्सपियरचे एक वाक्य नेहमी उद्धृत केले जाते, “नावात काय आहे?” पण शेक्सपियर या नावाच्या जादूने जगभरच्या इंग्रजी येणा-या शेकडो पिढ्यांवर कायमची मोहिनी टाकली. नाही का? त्याच्या नाटकात राजे रजवाड्यांपासून अगदी विदुषक, चोर, सैनिक, सरदार,  सामान्य नागरिक, एवढेच काय चेटकिणी, खुनी, भुते खेते इथपर्यंत सगळ्या प्रकारची पात्रे येऊन जातात.

‘नैराश्य येता मनी, करा सद्विचारांची पेरणी – Click here to read this

युगानुयुगे माणसाला गुंतवून ठेवणा-या प्रेम, मत्सर, महत्वाकांक्षा, मैत्री, लोभ, संताप, राजकारण, मानवी स्वभावातील कुटिलता,  विश्वासघात, फसवणूक अशा विषयावर अत्यंत मर्मभेदी भाष्य केल्याने त्याच्या साहित्याचे समकालीनत्व कधी संपतच नाही. खरे पाहिले तर ज्या काळात ही नाटके लिहिली गेली त्यावेळच्या परिस्थितीशी आजच्या परिस्थितीचे थोडेसुद्धा साम्य नाही. त्याची  बहुतेक कथासूत्रे, नाटकातील पात्रे, राजेशाहीशी संबधित आहेत. याउलट फ्रेंच राज्य क्रांतीमुळे आता जवळ जवळ सगळ्या जगाचा सामाजिक, राजकीय आशय आणि व्यवहार पूर्णत: बदलला आहे. वैज्ञानिक संशोधनामुळे लोकांचे भावविश्वही बदलून गेले आहे. तरीही शेक्सपियर कालबाह्य न होण्याचे कारण काय ?

William Shakespeare Poet Author
William Shakespeare

हा नाटककार आपल्या प्रत्येक पात्राच्या अंतरंगात खोल बुडी मारून त्याच्या सगळ्या अंतरंगाचे ऑप्टीक फायबर तंत्रज्ञानाने आतून चित्रण करून ते कागदावर उतरवितो. तो जेंव्हा एखादे कथासूत्र पुढे नेतो तेंव्हा केवळ एखाद्या पात्राचे हुबेहूब वर्णन केलेले नसते तर त्याच्याहून अगदी भिन्न, कित्येकदा त्याच्या नेमकी विरोधी स्वभाव वैशिष्ठ्ये असलेल्या इतर पात्रांचा आणि त्याचा परस्परांशी व्यवहार कसा होईल याचाही अचूक अंदाज बांधलेला असतो. त्यामुळे ख-या माणसांनी परस्परांशी केलेला स्वाभाविक व्यवहार म्हणजे त्याची नाटके आहेत असे जाणवून जाते. अत्यंत वेगवेगळ्या आर्थिक ,  सांस्कृतिक, मानसिक, शैक्षणिक स्तरातून आलेल्या पात्रांच्या जगण्याचे जे एक तर्कशास्त्र असते ते या नाटककाराने बिनचूक मांडलेले दिसते. परंतु केवळ यामुळे त्याचे साहित्य इतके दीर्घायू झाले का ? पण ही कौशल्ये असल्याशिवाय तर कुणीही चांगला साहित्यिक होऊच शकत नाही. मग शेक्सपियरच्या अमरत्वाचे वेगळे गुपित काय ? ते आहे त्याच्या एका अद्वितीय क्षमतेत!

तो सर्वच पात्रांना  वैशिष्ठ्यपूर्ण आणि तरीही सामान्य करून टाकू शकतो. ‘किंग लियर’ या नाटकाचे अनेक भाषांत अनुवाद झाले. त्याची कालानुरूप रुपांतरेही झाली. कविवर्य कुसुमाग्रजांनी ‘नटसम्राट’ हे नाटक ‘किंग लियर’ वरच बेतले होते. ‘किंग लियर’ मध्ये शेक्सपियर जेंव्हा राजाचे वर्णन करतो त्याच्या तोंडी राजेशाही ऐट आणि डौल असलेली भाषा वापरतानाच त्याने राजाच्या मनोव्यापारांचे असे चित्रण केलेले असते की मुंबईतील एखाद्या वयोवृध्द चाळक-यालाही त्यात स्वत:चा चेहरा दिसतो आणि तो राजा त्याला आपलासा वाटू लागतो. कारण जशी राज्याची वाटणी केल्यावर लियरच्या राजकन्या त्याला घराबाहेर काढतात. तसेच या चाळकरी बापाच्या मुलाने त्याला ‘१० बाय १०’च्या खोलीतून बाहेर काढलेले असते.

किंग लियरची कथा मुलांकडून आईवडिलांच्या होणा-या अवहेलनेची कथा आहे. तारुण्याकडून होणारी वार्धक्याची हेटाळणी ही एक सार्वत्रिक आणि शाश्वत कथा आहे. शेक्सपियरचे हे वाक्य पहा, ‘कृतघ्न अपत्य असणे म्हणजे कसे जहरी सापाच्या दांतांचा स्पर्श अनुभवणे असते नाही ?’

William Shakespeare quotes

शेक्सपियरने जगाला दिलेली रंगभूमीची उपमा खूप गाजली. तो स्वत: एक अभिनेता होता हे एक कारण ती देण्यामागे असू शकेल.  किंग लियरमध्ये तो विचारतो, ‘जेंव्हा मूल जन्माला येते तेंव्हा ते का रडते माहित आहे का ? आपण आता या मूर्खांच्या प्रचंड रंगभूमीवर प्रवेश करीत आहोत हे त्याच्या लक्षात आलेले असते.’ अशी सौम्य विनोदाची झालर लावून तो किती समर्पक उपमा देऊन जातो !

सज्जन माणसे अनेकदा फसविली जातात,  त्यांचा चांगुलपणाच त्यांचा शत्रू ठरतो. या प्रत्येकाला आलेल्या अनुभवाचे वर्णन करताना ‘मॅकबेथ’ या नाटकात तो लिहितो, “मी कुणालाच दुखावले नाही पण मी अशा जगात आहे जिथे कुणाला तरी दुखावणेच कौतुकास्पद मानले जाते आणि कुणाचे चांगले करणे अनेकदा टोकाचा मूर्खपणा !” ही अनुभवाची सार्वकालिकता शेक्सपियरच्या लेखनाची शक्ती आहे.

एखाद्या हृदयरोग तज्ञाने आपल्या पेशंटला द्यावा असाच हा सल्ला शेक्सपियरने आपल्याला ४०० वर्षे आधी देऊन ठेवला आहे! मॅकबेथमध्येच तो जीवनाबद्दल लिहितो- “जीवन काय असते? आपल्याबरोबर सतत चालणारी एक सावली! महानाट्यातले एक सुमार पात्र, जे त्याच्या क्षणिक संवादासाठी अवतरते अडखळत.. आणि निघून जाते विंगेत, कायमच्या विस्मृतीत जाण्यासाठी ! जीवन असते एका वेड्याने सांगितलेली, आक्राळ विक्राळ कोलाहल आणि भयकारी घटनांनी भरलेली एका निरर्थक, पूर्णत: निरर्थक, कथा!”

Shakespeare Quotes
Quote by William Shakespeare

हॅम्लेट ’मध्ये आपल्याला एक नेहमी येणारा अनुभव फक्त एका वाक्यात मांडलेला दिसतो.  “दु:ख कधीच एखाद्या गुप्तहेरासारखे एकटे येत नसते. ते सैन्यासारखे तुकड्याच्या तुकड्यांनी आक्रमण करते.”

पती पत्नीमधील संशय कल्लोळावरील ‘ऑथेल्लो ’ या शोकांतिकेत शेक्सपियर लिहून जातो,  “भावनेवर नियंत्रण नसलेल्या वीरांचे अनेकदा असेच होते, ते संतापाच्या भरात नेमके आपल्या ख-या हितचिंतकांनाच मारून टाकतात.”
‘अ मिडसमर नाईट्स ड्रीम’ या एका धुंद प्रेम नाट्यात एक सुंदर वाक्य आहे. प्रेमात, शृंगारात असताना प्रत्येकाने ते अनुभवलेले असते. “आपण जागे आहोत अशी तुला खात्री आहे का ? मला तर वाटते आपण अजून निद्रेतच आहोत किंवा कदाचित स्वप्नातच असू.”

प्रेमाविषयी नेहमी बोलले जाणारे वाक्य खरे तर शेक्सपियरचे आहे. ‘प्रेमात बुडालेल्या व्यक्ती आंधळ्या होतात.’ असेच हिंदी सिनेमात नेहमी येणारे वाक्य ‘ भित्रा माणूस मरणाआधीच अनेकदा मरत असतो मात्र मरणाचा अनुभव शूरवीराला आयुष्यात एकदाच घ्यावा लागतो.’ हे सुद्धा मुळात शेक्सपियरचेच!

जयंती विशेष : सोंगाड्याची दादागिरी…वाजवू का – Click here to read this

जवळ जवळ प्रत्येक मानवी भावनेवर शेक्सपियरची विधाने अजरामर झालेली आहेत. एके ठिकाणी तो म्हणतो,  ‘जे संधी मिळताच बदलते ते प्रेम नाहीच.’  दुस-या ठिकाणी तो म्हणतो, ‘उदासपणे टाकलेल्या उसास्यांच्या धगीतून निर्माण होणारा धूर म्हणजे प्रेम.’ अव्यक्त राहून गेलेल्या प्रेमाचे यापेक्षा सुंदर वर्णन काय असू शकेल ?  ‘प्रेम कधीच डोळ्यांनी पाहत नसते, त्याचे डोळे हृदयात असतात.’ असे जेंव्हा शेक्सपियर लिहितो तेंव्हा प्रेमासाठी आयुष्य बरबाद करून घेतलेल्या अनेक हृदयांवर एक हळवी फुंकर घातली जातेच ना ? ‘जे प्रेम व्यक्त करीत नाहीत ते प्रेम करीतच नसतात.’ असे एवढ्या मोठ्या साहित्यिकाचे विधान प्रेम व्यक्त करायला लाजणा-या कितीतरी लाजाळूना बळ देऊन गेले असेल! ‘प्रेम म्हणजे नुसते बेधुंद वेडेपण !’ असे जेव्हा तो म्हणतो तेंव्हा  ‘तुमच्यासाठी काही पण’ म्हणणा-या बेफाट प्रेमवीरांना केवढे कृतार्थ वाटत असेल?

Quote by William Shakespeare
Quote by William Shakespeare

शेक्सपियरने असेच काही उपदेश समंजसपणाबद्दलही देऊन ठेवले आहेत. आपल्या शत्रूला धडा शिकविण्यासाठी भट्टी कधीही एवढी तापवू नका की त्यात तुम्हीच जळून खाक व्हाल.आपल्याकडे वापरल्या जाणा-या ‘जयाअंगी मोठेपण तया यातना कठीण’ या म्हणीला समांतर विधान पहा.

Uneasy lies the head that wears crown’ (ज्या शिरावर राजमुकूट असतो ते नेहमीच अस्वस्थ असते) एका ठिकाणी माणसाला  स्वत:च्या सामर्थ्याविषयी येणा-या शंकेविषयी सावध करताना शेक्सपियर किती अलंकारिक भाषेत लिहितो- ‘संशय म्हणजे फितूर झालेला मित्र होय. तो आपल्या सामर्थ्याबद्दल आपल्याच मनात शंका निर्माण करून जीवनातील अनेक संधीपासून आपल्याला वंचित करतो.’

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर : पुण्यतिथी विशेष – Click here to read this

आज आपण पाहतो आपल्या शिक्षण व्यवस्थेत केवळ तंत्रज्ञान आणि विज्ञान या विषयांनाच महत्व दिले जाते. साहित्य, भाषा, समाजशास्त्र,  इतिहास हे विषय जणू काही उपयोगाचेच नाही अशी आजच्या निर्बुद्ध शिक्षणपद्धतीची धारणा आहे. याचाच परिणाम म्हणून  एम.डी. झालेला डॉक्टर हुंडा दिला नाही म्हणून आपल्या एम.बी.बी.एस. पत्नीला जिवंत जाळतो. ‘मोबाईलवर बोलू नकोस’ असे सांगितले म्हणून मुलगी आत्महत्या करते. जातीबाहेर प्रेमविवाह केला म्हणून जन्मदातेच मुलीला ठार करताहेत. ६/७ हजार वर्षांचा इतिहास आणि त्यानंतर मिळालेले स्वातंत्र्य भोगल्यावर एक समाज म्हणून आपण इथे पोहोचलो आहोत ! कारण शरीरातील पेशी न पेशीचा अभ्यास करणारे, एवढेच काय विश्वाच्या निर्मितीचे कोडे उलगडण्याचा प्रयत्न करणारे विज्ञान माणसाच्या मनाची रचना आणि त्यात होणारी प्रचंड उलाढाल याकडे लक्षच द्यायला तयार नाही.

सर्वात सृजनशील आणि सर्वात विध्वंसक शक्ती असलेल्या मनाची मशागत आपण थांबविली आहे. गेल्या ७ हजार वर्षात साधलेली सगळी प्रगती, सांस्कृतिक संचित उद्या नष्ट होणार की काय? अशी भीती जेंव्हा वाढते आहे अशावेळी अजून भौतिक प्रगतीमागे धावण्यापेक्षा जीवनाचा प्रचंड कॅनव्हास रंगवून आपल्यापुढे ठेवणारे, त्याचा अन्वयार्थ लावणारे, मनाची गुंतागुंत उकलून दाखविणारे शेक्सपियरसारख्यांचे  साहित्य वाचायला हवे ! शरीराकडचे लक्ष काढून एकदा मनाच्या आरशात स्वत:चे प्रतिबिंब पहायला हवे!

– श्रीनिवास बेलसरे

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. अप्रतिम लेख.शेक्सपिअरचे समग्र साहित्य मानवी भावभावनांच्या धाग्यांची उकल बेमालूमपणे करते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments