कोरोना साथीच्या भयंकर परिस्थितीमुळे यंदा अनेक शैक्षणिक संस्थाना परीक्षा घेताना अडचणी आल्या. ठरलेल्या दिवशी परीक्षा अचानक रद्द तरी कराव्या लागल्या किंवा पुढे ढकलाव्या लागल्या. या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या जवळपास दोन लाख विद्यार्थ्यांच्या (१ लाख ९० हजार ३३९ ) परीक्षा दिनांक ५ ऑक्टोबरपासून कोणतीही अडचण न येता सुरळीत सुरु झाल्या. आता त्या ३० ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहेत.
सर्व्हर फेल होणे, पेपर वेळेवर न मिळणे, मुलांची कमी उपस्थिती असणे असे चित्र अनेकदा पुढे आलेले असताना मुक्त विद्यापीठाने यावर काय उपाय केला हे शोधले असता रोचक माहिती पुढे आली. याबद्दल विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘सद्यस्थितीत पारंपारिक परीक्षा घेणे कठीण होणार हे ताडून आम्ही आधीच नियोजन करून प्रत्येक विषयाची क्वश्चन-बँक तयार केली. विविध शिक्षणक्रमांसाठी ३ ते ४ पट प्रश्न तयार करून योग्य फॉरमॅटमध्ये बसविले. विद्यापीठ दूरस्थ पद्धतीने अनेक गोष्टी करत असल्याने यावेळी संपूर्ण परीक्षा ऑनलाईन घ्यावयाचा निर्णय घेतला. त्यामुळे सोशल डिस्टन्सीगचा प्रश्न आला नाही.
एकाच वेळी सर्व विद्याथी लॉग-इन झाले तर सर्व्हरवरील लोड वाढून तो फेल होतो . म्हणून पेपरची वेळ सरळ ५ तासाची ठेवली. म्हणजे सकाळी ८ ते दुपारी १ आणि दुपारी ३ ते ८ अशा वेळेत विद्यार्थ्यांनी कोणत्याही सलग एका तासात परीक्षा द्यावी असे स्वातंत्र्य दिल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीची वेळ घेता आली व सर्वरवरील लोडही विभागला गेला. शिवाय क्वस्चन बँक पद्धतीमुळे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना (समान भाराचे) मात्र वेगवेगळे प्रश्न गेल्याने पेपरफुटीचाही प्रश्न आला नाही. याशिवाय वेळापत्रक बनविताना एका स्लॉटमध्ये सारखी विद्यार्थी संख्या राहील याचीही काळजी घेतली.

विद्यापीठाकडील अॅमॅझोनचा ‘क्लाउड सर्व्हर’ स्केलेबल असल्याने लोड जास्त झाल्यास तो नवीन सर्व्हरवर वितरीत होतो. विद्यार्थ्यांना अॅमॅझोन, गुगल, ३-सेव्हर्स आणि अॅझ्यूअर यापैकी कोणतीही व्यवस्था वापरण्याची मुभा आणि अँड्रोइड फोन, टॅबलेट, लपॅटॉप, कम्प्युटर, विंडो, अॅपल अशा *सर्व सिस्टीमवर चालणारे ब्राउझर दिल्याने त्यांना अडचणी आल्या नाहीत.
मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी महाराष्ट्रातील दुर्गम भागातही आहेत. घरात नेटवर्क मिळत नाही म्हणून काहीजण फोन घेऊन घराबाहेर गेले, कुणी गच्चीवर तर कुणी चक्क डोंगरावर जावूनही नेटवर्क मिळवले.
पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात ७७% तर दुसऱ्या सत्रात ८७% विद्यार्थी परीक्षेस बसले. या परीक्षा दिनांक ३० ऑक्टोबरपर्यंत सुरु राहतील. पूर्वनियोजन आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्यामुळे हे शक्य झाल्याचेही त्यांनी सांगितले.