Saturday, July 5, 2025
Homeसाहित्यओठावरचं गाणं..…

ओठावरचं गाणं..…

नमस्कार,मंडळी.🙏
ओठावरचं गाणं” या सदरात सर्व रसिकांचं स्वागत ! मराठी गाण्यांमध्ये अगदी थोडी पण ओठांवर खेळत रहातील अशी काही गाणी लिहिणा-या कवींमधे अनंत काणेकर यांचा समावेश होतो.

आजचं गाणं लागल्यावरही ऐकणारा खुषीत येऊन ताल धरत हे गाणं गायला लागला नाही तरच नवल म्हणावं लागेल. गाण्याचे शब्द बघा काय सांगतात –

आला खुशीत समिंदर, त्याला नाही धीर
होडीला देई ना ग ठरु,
सजणे, होडीला बघतोय धरु !

दोघेही होडीतून समुद्रात फिरायला निघाले आहेत. छानसा गार वारा सुटलाय, कपाळावर आलेली केसांची बट सावरताना तिची उडणारी धांदल पाहून त्याला ही मजाच वाटतेय आणि म्हणूनच तो तिला सांगतोय कि बघ किती प्रसन्न सकाळ आहे. मी तुला आणि समुद्र ह्या होडीला मिठीत घ्यायला आसूसलाय, म्हणून तर होडी सारखी वरखाली होतेय. तुझ्यासारखीच ही होडी देखील त्याच्या मिठीतून सुटायला बघतेय, त्यामुळे आपली पण गडबड उडतेय हे खरं असलं तरी मला मात्र हा क्षण खूपच आवडलाय.

हिरवं हिरवं पाचुवाणी जळ,
सफेत फेसाची वर खळबळ,
माशावाणी काळजाची तळमळ,
माझी होडी समिंदर, ओढी खालीवर,
पाण्यावर देई ना ग ठरू,
सजणे, होडीला बघतोय धरू

होडीबरोबर लपाछपीचा खेळ खेळणा-या या लाटा विरत गेल्या कि हिरव्या रंगाची झाक असलेलं पाणी तळाशी पाचू असल्यासारखं दिसतं न दिसतं तोच पुन्हा लाटा धावत येतात, होडीभोवती लाटांचा पांढरा शुभ्र फेस तयार होतो. लाटांच्या धक्क्यामुळे होडी काही स्थिर रहात नाहीए आणि हा खेळ बघायला देखील खूपच मजा येते आहे.

तांबडं फुटे आभाळांतरी,
रक्तवानी चमक पाण्यावरी;
तुझ्या गालावर तसं काहीतरी !
झाला खुला समिंदर, नाजूक होडीवर
लाटांचा धिंगा सुरु
सजणे, होडीला बघतोय धरू !

सकाळच्या या कोवळ्या किरणांमुळे आभाळाला आलेला तांबूस रंग सकाळच्या या किरणांमधून थेट पाण्यात उतरतोय आणि तुझ्या गालांवर जसा रंग चढतो तसाच काहीसा रंग लाटांमधून उसळणाऱ्या या पाण्यावरही चमकतोय. तशातच आपल्या होडीला पकडून ठेवण्यासाठी लाटांचा धिंगाणा सुरूच आहे. समुद्राची ही खुषी, इतका सुंदर नजारा डोळ्यात साठवून ठेवावा असंच वाटतंय.

सूर्यनारायण हंसतो वरी
सोनं पिकलं दाहीदिशांतरी
आणि माझ्याही नवख्या उरी
आला हसत समिंदर, डुलत फेसावर
होडीशी गोष्टी करु
सजणे, होडीला बघतोय धरु

आकाशातून समुद्राच्या पाण्यावर येणाऱ्या सोनेरी किरणांमुळे, पाण्यावर दिशादिशांतून जणू काही सोनं अवतरल्याचा भास होतोय तर हे दृष्य पाहून माझ्या मनातही खुषीचं, आनंदाचं सोनं मला दिसतं आहे. समुद्र देखील लाटांवर स्वार होऊन आपल्यासारखाच होडीशी गुजगोष्टी करतो आहे आणि तिला मिठीत घ्यायला बघतोय.

गोऱ्या भाळी तुझ्या लाल चिरी,
हिरव्या साडीला लालभडक धारी,
उरी कसली ग गोड शिरशिरी
खुशी झाला समिंदर, त्याच्या उरावर
चाले होडी भुरुभुरू
सजणे, वाऱ्यावर जणुं पांखरूं !

आत्तापर्यंत मी हे निसर्ग सौंदर्य पहातोय पण तू ही आज अधिकच सुंदर दिसते आहेस. तुझ्या गो-या कपाळावरची कुंकवाची बारीक कोर, हिरव्या साडीला असलेली लालभडक किनार यामुळे तुझं सौंदर्य आणखीनच खुलून दिसतंय. तुझ्याही ह्रदयात असं काहीतरी होतंय ज्याचं प्रतिबिंब तुझ्या चेहऱ्यावर उमटतंय. या सगळ्या खुषीच्या वातावरणात वा-यासोबत उडणा-या फुलपाखराप्रमाणे समुद्राच्या लाटांवर आपली होडी वेगाने धावते आहे.

अनंत काणेकरांनी लिहिलेल्या या कोळीगीताला केशवराव भोळे यांनी दिलेलं संगीत इतकं अप्रतिम आहे कि ज्योत्स्ना भोळे यांच्या आवाजात हे चिरतरूण गाणं आजही ऐकत रहावसं वाटतं.

विकास मधुसूदन भावे

– लेखन : विकास मधुसूदन भावे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

23 COMMENTS

  1. आला खुशित समींदर – हे गाणं लहानपणापासून आम्ही ऐकत आलो आहोत. काव्याचं रसग्रहण छान लिहिलंय तुम्ही ! अशारीतीनं अर्थ उलगडून दाखवला की ऐकणाराला गाणं ऐकायला आणखी मजा येते. निसर्गाचं वर्णन सविस्तरपणे लिहिलं आहेत.
    उपक्रम चांगला आहे, चालू ठेवा.

  2. काव्याचं रसग्रहण छान लिहिलंय. निसर्गरम्य वातावरणाचं दर्शन झालं.
    असा अर्थ उलगडून दाखवला की ऐकणाराला गाणं ऐकायला आणखी मजा येते. काव्य, चाल चांगली आहे. ज्योत्स्नाबाईंनी गायल्या छान.चांगला उपक्रम आहे, चालू ठेवा.

  3. काव्याचं रसग्रहण छान लिहिलंय. असा अर्थ उलगडला की ऐकणाराला गाणं ऐकायला आणखी मजा येते.
    गाण्याला चाल सुयोग्य आहे. ज्योत्स्नाबाईंनी गायल्येही छान.
    उपक्रम चांगला आहे, चालू ठेवा.

  4. विकास भावे यांनी अतिशय जुने गाणे आमच्यासमोर ठेवले आहे.माझी आजेसासू हे गाणे म्हणायची.त्यावेळचे अतिशय लोकप्रिय गीत आहे ते.आता संपूर्ण अर्थ सगितल्यावर कळले की एवढे लोकप्रिय का झाले ते.
    धन्यवाद विकासजी!

  5. अनंत काणेकरांच्या या अप्रतिम गिताचे तेवढेच नितांतसुंदर असे रसग्रहण वाचताना खूप छान वाटले.निसर्गाचे अतिशय सुरेख वर्णन कवीने केले व त्याचे सगळेच पदर विकासदादा आपण उलगडून दाखवले.
    खूप शुभेच्छा व अभिनंदन!

  6. किती सुंदर वर्णन. समुद्राचे पाणी, लाटा अगदी डोळ्यासमोर उभे केले. छानच.

  7. उत्तम रसग्रहण.
    गाणे तसे चांगलेच माहितीचे,तरी यापुढे गाणे ऐकताना तुमचे हे रसग्रहण नक्कीच आठवेल.

  8. गाणं परिचित. अनंत काणेकर या गाण्याचे कवि आहेत हे अनेकांना माहिती नाही. रसग्रहण वाचतांना कवीने केलेले निसर्गाचे वर्णन व त्याची दोन प्रेमीकांच्या भावनांशी केलेली तुलना उत्तम रीतीने मांडली आहे. अभिनंदन भावेजी.

  9. अनमोल ठेवा, परत एकदा रसिकांना रसाळपणे उलगडला जात आहे, धन्यवाद कविवर्य व

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments