Wednesday, February 5, 2025
Homeयशकथान्यूज स्टोरी टुडे : कार्यक्षमता, कल्पकता, सौजन्य, आपुलकी

न्यूज स्टोरी टुडे : कार्यक्षमता, कल्पकता, सौजन्य, आपुलकी

देवेंद्र भुजबळ यांची आणि माझी ओळख अगदी अलीकडे, एकाददोन वर्षापूर्वी झाली. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व प्रसिद्धी  विभागाचे संचालक या नात्याने ते कार्यक्षम अधिकारी आहेत असे फक्त ऐकून माहिती होते.  पण ओळख नव्हती झाली.

‘मोल्सवर्थ यांचा मराठी-इंग्लिश शब्दकोश” या विषयी चार-पाच वर्षे अभ्यास करून एक पुस्तिका मी लिहिली. त्याची बातमी त्यांच्या वाचनात आली.  याविषयी माझ्या पोर्टल मध्ये एखादा लेख द्या यासाठी त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. तेव्हापासूनची ही ओळख.

कोरोनाच्या भयंकर काळात नागरिकांना दिलासा द्यावा म्हणून, त्यांची पत्रकार कन्या देवश्री हिने “न्यूजकार्यक्षमतेचा, कल्पकतेचा, सौजन्याचा आणि आपुलकीचा न्यूज स्टोरी टुडे” हे वेबपोर्टल सुरू केले. पुढे ते देवेंद्र आणि एम टी एन एल मधून मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेतलेल्या त्यांच्या पत्नी अलकाताई अशा या तिघांनी ते छान चालविले आहे. या तिघांनी  सामाजिक कामात स्वतःला किती गुंतवून घेतले आहे, हे मी स्वतः अनुभवतो आहे.

जनसंपर्क क्षेत्रात आवश्यक असलेले सर्व गुण श्री देवेंद्रजी यांच्यात आहेत हे मी पाहतो आहे. “न्यूज स्टोरी टुडे” या पोर्टलच्या देश-विदेशातील लेखकांनी या तिघांच्या कार्यक्षमतेचा, कल्पकतेचा, सौजन्याचा आणि आपुलकीचा अनुभव घेतला आहे.

वेबपोर्टल आता २ वर्षाचे झाले. ८६ देशातून त्यांना ४ लाख ७६ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. असंख्य ठिकाणाहून त्यांना विविध विषयावरचे लेख मिळत आहेत. यात अनेक लेखक असे आहेत की, त्यांनी पूर्वी थोडे देखील लिखाण केलेले नाही.

वेबपोर्टलच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात एक देखणा  कार्यक्रम झाला.  एकमेकांना यापूर्वी कधीही न पाहिलेले पुण्यातील एकोणीस-वीस  लेखक-लेखिका स्नेहमेळाव्याला उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या आयोजनाची संधी भुजबळ दांपत्याने मला आणि माझी पत्नी शलाका यांना दिली.

या तिघांनी आयुष्यात किती माणसं जोडली आहेत, किती जणांना आपापल्या जीवनाला नवा अर्थ मिळवून दिला आहे याची कल्पना आली. चार साडेचार तास चाललेल्या  स्नेहमेळाव्यात कविता आणि यश कथा ऐकायला मिळाल्या.

रूढ अर्थाने मी या दोघांपेक्षा वयाने मोठा, ज्येष्ठ पत्रकार. माझा अनुभवदेखील त्यांच्यापेक्षा वेगळा. तरी देखील १९६९-७०  ते २०२२ एवढ्या प्रदीर्घ काळात मी करू शकलो  नाही किंवा मी केले नाही एव्हडे  काम श्री भुजबळ यांनी  लीलया कोणताही आविर्भाव, अभिनिवेश न ठेवता केले आहे.

कसं  ते सांगतो. आयुष्यभर मी इंग्रजी वर्तमानपत्र आणि वृत्तसंस्था यासाठी इंग्रजीत लिहिण्याचे काम केले. माझ्या कामाच्या स्वरूपामुळे  मराठी लिहिण्याची वेळ मला आली नाही. गरज भासली नाही. पण निष्णात संपादकाप्रमाणे त्यांनी मला मराठीत लिहितं केलं. बातमीदारी करताना मला आलेले अनुभव दर आठवड्याला शुक्रवारी प्रसिद्धीसाठी त्यांना मी पाठवायला लागलो. आयुष्यभराचे माझे अनुभव दोन तीन लेखात संपतील अशीच माझी कल्पना होती. प्रत्यक्षात ३३ लेख लिहून झाले.

हाताने मराठी लिहितांना कंप पावतो म्हणून मी लिहीतच नव्हतो. गूगल व्हॉइस टाईपिंग  ॲप चा वापर करून मी माझ्या स्मार्ट फोनवर मराठी डिक्टटेट करून लिहू लागलो. सुरुवातीला थोडा अडखळलो, पण आता चांगलाच सरावलो आहे. वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी हे एक व्यवधान लावून घेतले आहे. माझ्या पत्रकारितेशी संबंधित असा एक नवीन व्याप लावून घेतला आहे, तो केवळ आणि फक्त देवेंद्र भुजबळ यांच्या मुळे !

“ऑनलाईन पत्रकारिता” हा शब्द देखील देशात कुणाला माहित नव्हता त्या वेळी या विषयावर पहिली पीएचडी मी वर्ष २००० मध्ये केली, असा माझा गौरव होतो. परंतु स्मार्टफोनचा आणि गूगल व्हॉइस टाईपिंग चा वापर करण्याचं तंत्र मी आत्मसात करू शकलो   केवळ भुजबळ कुटुंबियांच्या पोर्टलच्या धडपडी मुळे. माझ्यासारख्या असंख्य लेखकांना त्यांनी मराठी लिहिण्याची संधी दिल्यामुळे केव्हढे नवे विषय लिहिले गेले ! तीन लेखकांची पुस्तके ही प्रकाशित झाली आहेत. तर इतरांनाही ही आपापली पुस्तके प्रकाशित करण्याचा हुरूप आला आहे.

पहिल्या वर्धापन दिनाच्या चार तास झालेल्या कार्यक्रमात माझ्या मनामध्ये हेच विचार सातत्याने येत होते. माझ्या वयाची ७५ वर्षे पूर्ण झाली हे भुजबळांना कळले असल्यामुळे खूप आपुलकीने, प्रेमाने देखणा जन्मदिन त्यांनी घडवून आणला. गेल्या  ७५ वर्षात मला इतके अवघडल्यासारखे कधीही झाले नव्हते ! पण या दाम्पत्याच्या आणि प्रथमच ओळख झालेल्या उपस्थित एकोणवीस-वीस लेखकांच्या उत्स्फूर्त शुभेच्छांच्या ओझ्यामुळे दबून गेलो. आभार कसे मानावे हे सुचले नाही.

पुण्याच्या विश्वकर्मा  विद्यापीठातील पत्रकारिता विभागाचे माझे दोघे सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थी-लेखक यांना या दाम्पत्याने छान व्यासपीठ दिले आहे, त्यांनी व्यक्त केलेल्या कृतज्ञतेच्या भावना  प्रातिनिधिक ठराव्या.

या वेबपोर्टल ला आणि भुजबळ दाम्पत्याला शुभेच्छा.
याच: शतायुषी भव !

प्रा. डॉ. किरण ठाकूर

– लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर
निवृत्त विभाग प्रमुख, संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग
सावित्रीबाई फुले विद्यापीठ. पुणे. ☎️9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. खूपच सुंदर कथन… खरंच भुजबळ दांपत्याने अतिशय सुरेख काम सुरू केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी