नेताजी सुभाषचंद्र बोस बेट आणि माणसाळलेली हरणं
अंदमानातील एक बेट म्हणजे रॉस बेट (Ross Island) हे आता अधिकृतपणे नेताजी सुभाषचंद्र बोस बेट म्हणून ओळखले जाते. हे दक्षिण अंदमान प्रशासकीय जिल्हा, अंदमान आणि निकोबार बेटांमधील बेट आहे. हे बेट मध्य श्री विजयापुरम (पोर्ट ब्लेअर) पासून ३ किमी पूर्वेस वसलेले आहे. राजीव गांधी स्पोर्ट्स क्लब कॉम्प्लेक्स पासून आपण बोटीने येऊ शकतो. ०.३१२ चौरस किलोमीटर इतके छोटेसे क्षेत्रफळ असलेले हे बेट!
‘रॉस’ बेटाचे नाव सागरी सर्वेक्षक डॅनियल रॉस यांच्या नावावर ठेवण्यात आले. मात्र डिसेंबर २०१८ मध्ये, भारतीय स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना श्रद्धांजली म्हणून त्याचे नाव बदलून ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ बेट असे करण्यात आले.
मार्च १९४२ ते ऑक्टोबर १९४५ पर्यंत हे बेट जपानी लोकांच्या ताब्यात होते तेव्हा गव्हर्नमेंट हाऊस जपानी ॲडमिरलचे निवासस्थान बनले होते. याच काळात इंग्रजांविरुद्धच्या लढ्यात जपानी लोकांची मदत घेणारे सुभाषचंद्र बोस डिसेंबर १९४३ मध्ये एक दिवस बेटावर राहिले होते. नेताजींनी सरकारी घरावर राष्ट्रीय तिरंगाही फडकावला होता. जपानी लोकांनी देखील बेटावर आपली छाप सोडली, जी बंकरच्या रूपात बेटावर कोणत्याही आक्रमणापासून रक्षण करण्यासाठी वॉच पॉइंट म्हणून वापरली जाते.
हे बेट पोर्ट ब्लेअरच्या प्रवेशद्वारावर आहे म्हणून त्याचे वेगळे वैशिष्ट्य आहे. शासकीयदृष्ट्या, नेताजी सुभाषचंद्र बोस बेट हे श्री विजयापुरम तालुक्याचा एक भाग आहे. या बेटाच्या उत्तरेकडील टोकापर्यंत जाण्यासाठी पायऱ्यांवरून खाली उतरून जावे लागते जिथे नवीन काँक्रीटचा 10 मीटर उंच वर्तुळाकार दीपगृह टॉवर 1977 मध्ये उभारण्यात आला आहे, किनाऱ्यापासून सुमारे 50 मीटर अंतरावर असलेल्या खडकावर बांधण्यात आला होता. समुद्राची भरतीओहोटी दरम्यान टॉवरपर्यंत पाणी पोहोचू शकते, असे स्थानिकांनी सांगितले. या दीपगृहातच प्रकाशाच्या ऑपरेशनसाठी बॅटरी चार्ज करण्यासाठी भारतात प्रथमच फोटो व्होल्टेइक पॅनेल बनवण्यात आले होते.
सुभाषचंद्र बोस बेटावर घनदाट जंगले आहेत. इथे दिवसभर माणसांची वस्ती असते परंतु रात्री हे बेट रिकामे केले जाते असे स्थानिकांनी सांगितले. ठिपकेदार आणि शिंगांची हरणं तसेच मोर या बेटावर मोठ्या प्रमाणात आढळतात. हे बेट पाम आणि नारळाच्या झाडांनी आच्छादलेले असल्यामुळे खूपच आकर्षक दिसते.
या बेटावर भारतातील काही जुन्या ब्रिटीश आणि जपानी वास्तू आहेत. ब्रिटीशांनी अंदमानवर कब्जा केल्यानंतर त्यांच्या विलासी जीवनाची साक्ष देणाऱ्या या भव्य वास्तू आहेत. स्थापत्यकलेचे अप्रतिम सुंदर अवशेष आहेत. परंतु त्सुनामीसह अनेक पूरग्रस्त परिस्थितीत लाटांनी उध्वस्त झालेले अवशेष पाहून गलबलून येते.
२००४ मध्ये, जेव्हा त्सुनामीच्या भयावह लाटांनी शांत अंदमान आणि निकोबार बेटांना उध्वस्त केले, तेव्हा अनुराधा राव या केवळ भाग्यवान म्हणून बचावलेल्यांपैकी एक आहेत. काळाच्या मूक साक्षीदार असणाऱ्या अनुराधा राव यांची या बेटावरील सर्व पक्षी प्राण्यांची मैत्री आहे एका पालकाच्या भूमिकेतून ते त्यांची काळजी घेतात. त्यांच्याशी गप्पा मारतात. त्यांना नावाने हाक मारून ओरडतात. आपण या बेटावर गेल्यावर त्यांच्याशी जरूर गप्पा मारून या.
ब्रिटीश काळात रॉस आयलंड हे सत्तेचे केंद्र होते. नंतर, ते सुसंस्कृत वसाहतीसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांचा समावेश असलेल्या स्वयं-सुसज्ज टाउनशिपमध्ये विकसित केले गेले. डॉ. वॉकर यांनी एकूण २०० कैंद्यांसहित कुविख्यात गुन्हेगारांना इथे ठेवले होते. मूळ रहिवाशांना ब्रिटिशांनी या बेटावर राहण्यास प्रवृत्त केले. १८६३ मध्ये त्यांच्यासाठी अंदमान हाऊस उभारण्यात आले. सेल्युलर जेलच्या बांधकामासह बेटांमधील सर्व ऑपरेशन्स रॉस बेटावर देखरेख करण्यात आली. त्यात चर्च, हॉस्पिटल, सचिवालय, टेनिस कोर्ट, छापखाना, जलतरण तलाव, भव्य बॉलरूम, सरकारी घरे, जल उपचार वनस्पती, आरामदायी बागा, मुख्य आयुक्तांचे निवासस्थान इ. वास्तूंचा समावेश आहे.-
रॉस बेटावर भारतीय कैद्यांनी बांधलेल्या जुन्या इमारतींचे अवशेष आजही पाहायला मिळतात. हे पिंपळाच्या झाडांच्या जाड मुळांनी बनवलेले आहेत जे सर्व पर्यटकांना ऐतिहासिक युगात परत घेऊन जातात. अंदमानमधील बहुतेक पर्यटन स्थळे समुद्रकिनाऱ्यांसाठी लोकप्रिय असताना, रॉस बेट त्याच्या इतिहासासाठीदेखील ओळखले जाते. अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहात कोठेही आढळत नाही असे हे ठिकाण एक अद्वितीय ठिकाण आहे.
इथे ‘लाईट आणि साऊंड शो’सुद्धा होतो, असे कळले पण आम्हाला काही तो पाहायला मिळाला नाही. रॉस बेटावर अनेक झोपड्या आणि लहान शेड बांधले आहेत जेथे आम्ही विश्रांती घेतली आणि उंच झाडे आणि झुडुपांच्या सावलीत काही काळ आरामात घालवला.
‘नॉर्थ बे आयलँड’ येथील जलक्रीडा उपक्रम आणि ‘नेताजी सुभाषचंद्र बोस बेट’ ही दोन्ही ठिकाणं जवळ असल्यामुळे आपण एकाच दिवसांमध्ये पाहू शकतो. त्यातूनही वेळ उरला तर राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या बाहेर एक मोठी सुंदर बाग आहे तिथे काही वेळ आनंदात घालवू शकता!
या बागेच्या आसपासच उपहारगृह आणि स्थानिक विक्रेत्यांची मोठी बाजारपेठ असल्यामुळे आणि शिवाय येथील वस्तू स्वस्त असल्यामुळे आपण मनसोक्त शॉपिंगही करू शकता!
क्रमशः
— लेखन : प्रतिभा सराफ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800