Thursday, December 26, 2024
Homeपर्यटनअंदमानची सफर : ३

अंदमानची सफर : ३

“चिडिया टापू”

‘चिडिया टापू’ अंदमानमधील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. त्याच्या नावाप्रमाणेच, चिडिया टापू हे वन्यजीव प्रेमींसाठी, विशेषत: पक्षीप्रेमींसाठी नंदनवन आहे. चिडियाटापू बीच हे पक्षी निरीक्षकांचे आवडते ठिकाण का आहे याचा प्रत्यय तिथे गेल्यावरच येतो. ‘अंदमान सुतार’, ‘अंदमान बुलबुल’, ‘अंदमान कोतवाल’ आणि ‘अंदमान टकाचोर’ यासह समुद्रकिनाऱ्याच्या सभोवतालच्या जंगलात विविध देशी-विदेशी पक्ष्यांच्या प्रजातीं पाहायला मिळाल्या.

प्रदूषणमुक्त वातावरण असलेल्या नैसर्गिक आणि पुरेशा मोठ्या वनक्षेत्रात आधुनिक आणि वैज्ञानिक धर्तीवर ‘जैविक उद्यान’ स्थापन करण्याची गरज ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात जाणवली आणि १९८९ मध्ये केंद्रशासित प्रदेशाच्या वन्यजीव सल्लागार मंडळानेही ‘जैविक उद्यान’ तयार करण्याची शिफारस केली. त्यानंतर श्री. विजयपुरम (पोर्ट ब्लेअर) पासून २५ किमी अंतरावर चिडियाटापू नावाच्या ठिकाणी जैविक उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने १९९३ मध्ये यासाठी मान्यता दिली आणि केंद्र सरकारने १९९४ मध्ये चिडियाटापू येथील ४० हेक्टर वनजमीन या जैविक उद्यानाच्या स्थापनेसाठी मान्यता दिली.

या जैविक उद्यानातून फिरताना, मुक्तपणे उडणाऱ्या विविध पक्ष्यांची एक झलक पाहायला मिळाली. पक्ष्यांव्यतिरिक्त जंगली डुकरे, भुंकणारे हरण आणि ठिपके असलेले हरण पाहू शकलो. सरपटणारे प्राणी, खाऱ्या पाण्यातील मगर इत्यादीही येथे पाहायला मिळाले.

जैविक उद्यान हे श्री विजयपुरम पासून सतरा किलोमीटर अंतरावर आहे. एक गर्द झाडीतून वळणावळणाच्या चांगल्या रस्त्याने अर्धा तासात इथे पोहोचता येते, त्यासाठी विविध प्रकारची वाहतूक सुविधा उपलब्ध आहे. चिडियाटापू येथे एक छोटेसे गाव आहे आणि या संपूर्ण परिसरात राखीव वन असल्याने आजूबाजूला इतर कोणतेही विकासात्मक उपक्रम नाहीत, त्यामुळे जैविक उद्यानासाठी प्रदूषणमुक्त वातावरण उपलब्ध करून देणे शक्य झालेले आहे.

जैविक उद्यानापासून अर्धा किलोमीटर अंतरावर ‘मुंडा पहाड बीच’ आहे. हे पक्षी निरीक्षण, उसळणाऱ्या सागरी लाटा सूर्यास्त आणि आकाशातील निसर्गाच्या बदलणाऱ्या विविधछटा यासाठी  प्रसिद्ध आहे.
मुंडा पहाड बीचवरून एक रस्ता जातो जो आपल्याला ‘मुंडा पहाड ट्रेक’ या ठिकाणी घेऊन जातो. या गर्द झाडीच्या निसर्गरम्य रस्त्यातून दीड किलोमीटर चालत आपण मुंडा पहाडावर पोहोचतो, या ठिकाणाला ‘सुसाईड पॉईंट’ असेही म्हटले जाते. कितीही उष्णतामान असो परंतु या रस्त्यावरून जाताना सुखद गारवा जाणवतो. वेगवेगळ्या प्रकारचे किडे- कीटक आणि मुख्यत्वे सरपटणारे प्राणी फिरत असल्यामुळे येथे जाताना आपल्याला काळजी घ्यावी लागते. मुंडा पहाडावर लाईट हाऊस आहे. सागरलहरी, सूर्यास्त, आकाशातील ढगांचे विहंगम दृश्य आपण येथून टिपू शकता ! विविध प्रकारचे देशी-विदेशी पक्षी येथे मनसोक्त भटकंती करतात. आपण त्यांचे फोटो काढण्याचा आनंद येथे घेऊ शकता ! तुम्ही नशीबवान असाल तर हरणांसारखे काही प्राणीसुद्धा या भागात फिरताना दिसू शकतात. फक्त सकाळी दहा ते दुपारी तीन या दरम्यान मुंडा पहाडावर जाण्याची परवानगी आहे, ती वेळ मात्र आपण आठवणीने पाळावी.

तेथून खाली उतरल्यावर सूर्यास्त पाहण्यासाठी मुंडा पहाड बीचवर दोन-तीन तास आरामात घालवू शकता! विविध आकाराचे बेंचेस, लाकडी पूल, पक्षी निरीक्षणासाठी बांधलेले मचान, आकर्षक लाकडी शाकारलेल्या झोपड्या तसेच वॉशरूम येथे आहेत. वादळाने पडलेली झाडेसुद्धा खूपच आकर्षक दिसतात, ज्याच्यासमोर वा ज्याच्यावर चढून पर्यटक फोटो काढताना दिसले. येथे असलेल्या झोपाळ्यावर झुलण्याचा आनंदही आम्ही घेतला. येथील समुद्रात मोठ्या प्रमाणात मगरी असल्यामुळे समुद्राच्या पाण्यात फार पुढे जाऊ देण्याची इथे परवानगी नाही.

या बीचवरून जसे सूर्यास्ताचे दर्शन घेता येते तसे काही खास ‘सनसेट पॉईंट्स’ तयार केलेले आहेत तेथूनही अनेक पर्यटक सूर्यास्त पाहण्याचा आनंद घेताना दिसले. आमच्या गाडीच्या ड्रायव्हरने मात्र आम्हाला अतिशय उत्तम ठिकाणी सूर्यास्त पाहण्यासाठी नेले. ‘फॉरेस्ट रेस्ट हाऊस’च्या समोर वीस पंचवीस पायऱ्या चढून आम्ही उंचावर गेलो जिथे काही लाकडी बेंचेस ठेवलेले होते. ज्या दिवशी आम्ही तिथे गेलो त्या दिवशी फक्त आमचा ग्रुप त्या ठिकाणी होता, त्याचा एक वेगळा आनंद आम्ही उपभोगला. त्या ठिकाणावरून सूर्यास्त पाहणे म्हणजे एक वेगळीच अनुभूती होती. आकाशात तांबडा- केशरी- पिवळा असे हळूहळू रंग बदलत संपूर्ण आकाश काळे होईपर्यंत आम्ही तिथेच बसून होतो. साधारण पाच वाजता तिथे, त्यादिवशी आम्ही सूर्यास्त अनुभवला. यासाठी आम्ही आमच्या गाडीच्या ड्रायव्हरचे खूप खूप आभार मानले. वळणावळणाच्या हिरव्या गर्द झाडीतून प्रवास करत आम्ही विजयपुरमला कधी पोहोचलो कळलेच नाही!
जाता जाता एक महत्त्वाची सूचना करावीशी वाटते ‘चिडिया टापू’ या ठिकाणी जेव्हा आपण जाल तेव्हा पुरेसा वेळ ठेवून जा म्हणजे तेथील ‘जैविक उद्यान’, ‘मुंडा पहाड ट्रेक’ आणि ‘मुंडा पहाड बीच’ या तीनही ठिकाणांचा निवांतपणे आनंद उपभोगू शकाल !

असा हा “चिडिया टापू” आपल्याला पुढील लिंक वर क्लिक करून पाहता येईल.

‘चिडिया टापू’वर ऐकलेला पक्षांचा चिवचिवाट आणि समुद्राच्या पाण्यात खोल उतरलेला असंख्य रंगछटांचा सूर्यास्त याची कायमस्वरूपी आठवण मनावर कोरल्या गेली आहे.
क्रमशः

— लेखन : प्रतिभा सराफ. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !
आनंद प्रभाकर महाजन. on शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित
सौ.मृदुलाराजे on असे होते साने गुरुजी
अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण – २९