“कॉर्बीन कोव्ह”
श्री विजयपुरमच्या (जुने नाव पोट ब्लेअर) दक्षिणेला आठ किलोमीटर अंतरावर असलेले ‘कॉर्बीन कोव्ह’ हे अंदमान आणि निकोबार बेटांमधील नयनरम्य समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. हिरव्यागार नारळाच्या झाडांनी संपूर्णतः व्यापलेला चंद्रकोरीच्या आकाराचा हा किनारा आहे. स्वच्छ निळे पाणी, सोनेरी झाक असलेली मऊशार वाळू, दूरवर दिसणाऱ्या हिरव्या टेकड्यांमधून किनाऱ्यावर वाहणारा मंद वाऱ्याने कॉर्बीन कोव्ह किनाऱ्याला एक सुंदर विश्रांतीस्थळ बनवलेले आहे. तसेच हे निसर्गरम्य ठिकाण छायाचित्रणासाठी योग्य आहे, त्याचा आम्ही पुरेपूर फायदा उठवला.
समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छतेमुळे आणि आधुनिक सुविधांच्या उपलब्धतेमुळे या किनाऱ्याची लोकप्रियता वाढली आहे. शिवाय हा किनारा चोवीस तास उघडा असतो. त्यामुळे आपण दिवसाच्या कोणत्याही वेळेस इथे येऊ शकता फक्त रात्री येणे थोडेसे धोकादायक आहे. शहराच्या अगदी जवळच असल्यामुळे स्थानिक आणि पर्यटक या दोघांसाठीही हे सोयीचे ठिकाण आहे.
या किनाऱ्यावर आम्ही मनसोक्त विहार केला. आसपास छान पोहणारे काही पर्यटकही आम्हाला दिसले. सूर्यस्नान घेण्यासाठीही हे उत्तम स्थान आहे.
स्कूबा डायव्हिंग, सी वॉकिंग, स्नॉर्कलिंग, सर्फिंग, बोटिंग, जेट स्की राइड, बनाना राईड, सोफा राइड यासारखे जलक्रीडा, उपक्रम या इथे उपलब्ध असल्याच्या पाट्या आम्ही किनाऱ्यावर वाचल्या.
येथून, पर्यटक ‘स्नेक आयलंड’ला देखील भेट द्यायला जाऊ शकतात असे कुठेतरी वाचले होते. मोठ्या प्रमाणात प्राणघातक साप असल्याने आमच्यापैकी कोणीच तशी हिंमत केली नाही. या किनाऱ्यावर जाताना जपानी बंकर्ससारखे ऐतिहासिक अवशेष पाहायला मिळतात.
अल्पोपहार घेण्यासाठी अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स इथे आहेत. भेळ आणि कुल्फी विक्रेते यांच्याकडून भेळ आणि कुल्फी घेऊन आम्ही समुद्रकिनाऱ्याची मजा अनुभवली.
आमच्या सोबत सुप्रसिद्ध संगीतकार- गायक पंडित शंकरराव वैरागकर होते. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेले आणि ‘सन्यस्तखड्ग’ या नाटकासाठी मा. दिनानाथ मंगेशकर यांनी गायलेले ‘शत जन्म शोधिताना…’ हे अत्यंत लोकप्रिय गीत सादर केले. त्या वातावरणात, ते गीत ऐकताना आम्ही सर्वच भान हरपून बसलो !
याच किनाऱ्यावर बसून आम्ही अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणी जागविल्या. त्यांना मनोमन मानवंदना दिली. या किनाऱ्याच्या प्रवेशद्वारापाशी एक मोठा फलक दिसला ज्यावर अंदमान- निकोबार येथील एकवीस द्वीप समूहांना परमवीर चक्र प्रदान केले गेलेल्या शूरवीर सैनिकांची नावे दिल्या गेली, त्यांची छायाचित्रे आणि माहिती वाचायला मिळाली. २३ जानेवारी २०२३ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त (पराक्रम दिवस) भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांनी हे महत्त्वाचे कार्य केल्याचा त्यावर उल्लेख आहे.
श्री विजयपुरमला भेट दिल्यावर या ‘कॉर्बीन कोव्ह’ किनाऱ्यावर जरूर फेरफटका मारा. शक्य असल्यास इकडच्या शांत किनाऱ्यावरून सूर्यास्त अनुभवा !
असा हा सुंदर नजारा आपण पुढील 👇 लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
क्रमशः
— लेखन : प्रतिभा सराफ. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
मनापासून धन्यवाद अलकाताई♥️
🤝🤝