Friday, December 6, 2024
Homeपर्यटनअंदमान सफर - ७

अंदमान सफर – ७

ऐतिहासिक लक्ष्मणपूर किनारा

बंगालच्या उपसागरात वसलेले अंदमान आणि निकोबार हे ५७२ बेटांचे द्वीपसमूह आहे. यातील ३८ बेटे सोडली तर कित्येक बेटांवर आजपर्यंत माणसांचा वावर झालेला नाही. याशिवाय काही ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी आहे. या अस्पर्शीत नैसर्गिक सौंदर्य, वैविध्यपूर्ण सागरी जीवन आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा अनुभवण्यासाठी निसर्गप्रेमी, साहसी पर्यटक शांत उष्णकटिबंधीय अशा भागांमध्ये स्वर्ग शोधण्याचा प्रयत्न करतात.

‘लक्ष्मणपूर किनारा-एक’ हा अंदमानच्या लपलेल्या रत्नांपैकी एक आहे आणि आराम करण्यासाठीचे मस्त ठिकाण आहे. अंदमानमधील या सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांपैकी मूळ निळा किनारा, मऊ पांढरी वाळू आणि स्फटिकासारखे स्वच्छ पाणी हे शहराच्या गजबजलेल्या जीवनातून विश्रांती घेण्यासाठी एक उत्तम स्थळ आहे.

लक्ष्मणपूर किनाऱ्याची पौराणिक उत्पत्ती जाणून घेऊ या. रामायणातील हिंदू पौराणिक कथेत, शूर प्रभू रामाचा प्रिय भाऊ लक्ष्मण हा दुष्ट राक्षस राजा रावणाच्या विरुद्धच्या लढाईत प्राणघातक संकटात अडकलेला होता. लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी, भगवान रामाने आपल्या प्रिय वानर देवता, हनुमान यांना तातडीच्या मोहिमेवर पाठवले. हनुमानाचे ध्येय त्यांना जीवन पुनर्संचयित करणारी औषधी वनस्पती शोधणे हे होते, ज्याला मराठीत ‘संजीवनी बुटी’ म्हणून ओळखले जाते. विशेष म्हणजे ही कथा ‘लक्ष्मणपूर किनाऱ्याला ‘ हनुमानाच्या या समुद्रकिनाऱ्यावरील महान प्रवासाच्या वीर साहसाशी जोडणारी आहे, असे मानले जाते. ज्याला आपण लक्ष्मणपूर किनारा म्हणतो तो हा समुद्रकिनारा आहे जिथे हनुमानाने चमत्कारिक संजीवनी ही औषधी वनस्पती शोधून काढली आणि लक्ष्मणचा जीव धोक्यापासून वाचवला. यामुळे हे केवळ एक सुंदर ठिकाणच नाही तर शौर्य आणि भक्तीच्या कथेमुळे त्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे.

जेव्हा इंग्रजांचे भारतावर राज्य होते, तेव्हा अंदमान बेटांवर दंडात्मक वसाहत होती आणि लक्ष्मणपूर किनाऱ्याच्या नील बेटही त्याला अपवाद नव्हते! आजही आपल्याला या बेटावर ब्रिटीशकालीन वस्तीचे अवशेष आढळतात, ज्यामुळे आपल्याला भयावह भूतकाळाची झलक मिळते.
इंग्रजांनी, बेटाला राहण्यायोग्य बनवण्याच्या त्यांच्या प्रयत्नात, अंदमान बेटांवर वनस्पतींच्या विविध प्रजाती आणल्या. यापैकी काही वनस्पती आजही लक्ष्मणपूर किनाऱ्याच्या आसपास आढळतात.

नील जेट्टीपासून गाडीने केवळ पाच मिनिटात आपण इथे पोहोचतो. रमतगमत चालत आलो तर अर्ध्या तासाच्या आत इथे पोहोचता येते. तोही पर्याय खूप चांगला आहे. लक्ष्मणपूर किनाऱ्यापासून पासून गाड्यांचे पार्किंग तसे थोडेसे दूर दिलेले आहे हे एका दृष्टीने खूप चांगले आहे कारण आपण चालत चालत जेव्हा या समुद्र किनाऱ्यापर्यंत पोहोचतो तेव्हा अतिशय उंच अशा हिरव्या गर्द झाडांमधून आपण चालत राहतो. त्या झाडांकडे मान उंच करून पाहताना मी सहजच माझ्या सहयोग्यांना म्हटले,
“ये झाड कुछ खाते- पिते घर के नजर आ रहे है !”
सगळे मनापासून हसले आणि त्यांनी या वाक्याला दुजोराही दिला. अत्यंत धष्टपुष्ट आणि खूप उंच तशीच सशक्त झाडे या रस्त्यावर पाहायला मिळाली. तिथेच बराच वेळ आम्ही रेंगाळलो.

आम्ही किनाऱ्यावर पोहोचलो तेव्हा दुपारचे साडेतीन वाजले होते. उन्हे उतरत होती त्यामुळे वातावरण प्रसन्न होते. काही पडलेली झाडे तर काही मोठाली दगडे किनाऱ्यावर बसण्यासाठी निमंत्रण देत होती. तसे मोठ्या प्रमाणात इथे बसण्यासाठी लाकडी बाकेसुद्धा बनवलेली आहेत. पण इथे आम्हाला काहीही जलक्रीडा उपक्रम दिसले नाही तसेच कोणी पोहोतानाही दिसले नाहीत याचा अर्थ कदाचित या दोन्ही गोष्टी इथे होत नसाव्यात.

दरम्यान संध्याकाळ होत आली होती.ओहोटीला सुरुवात झाली होती. त्यामुळे किनाऱ्याच्या ओल्या वाळूवरून आम्ही अनवाणी पायाने चालत खूप दूरवर गेलो. इथे असंख्य प्रकारचे शंख- शिंपले तसेच समुद्रातून वाहत आलेल्या विविध आकाराच्या समुद्रातील वस्तू दिसल्या. त्या रंगीबेरंगी वस्तू गोळा करण्याचा आनंद या समुद्रकिनारी आपल्याला अनुभवता येईल !

वाळूची घरे बनवणे वाळूमध्ये हातपाय खूपसून थंडाव्याचा अनुभव घेणे असले लहान मुलांसारखे उद्योग आम्ही तिथे केले. चहा, लिंबू सरबत, भेळ, कुल्फी इत्यादी पदार्थ मध्ये विकायला येत होते त्याचाही आस्वाद घेतला. इथे आम्हाला अननस वाटावी अशी काही फळ दिसली तसेच बऱ्याच पक्षांचा किलबिलाट ऐकू येत होता.

या किनाऱ्यावर आमच्यासोबत पर्यटक मा. देवेंद्र भुजबळ सर होते. सर महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयात संचालक पदावर असताना त्यांनी लिहिलेले ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता’ हे पुस्तक आम्हाला भेट म्हणून दिले होते. त्यांनी याच किनाऱ्यावर बसून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अभ्यासपूर्ण पद्धतीने आठवणी जागवल्या. या आठवणी आपण पुढील व्हिडिओतून नक्की ऐका !

शहीद द्वीप बेटावर ‘सीतापूर’ या किनाऱ्यावरून आपण सूर्योदय पाहू शकतो तर लक्ष्मणपूर बेटावरून सूर्यास्त. लक्ष्मणपूर या बेटावरून मोठ्या प्रमाणात सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटक जमू लागले होते. मजा- मस्ती- गप्पागोष्टी नंतर आम्ही सूर्यास्त पाहण्यात हरवून गेलो. अगदी हलक्या पिवळ्या रंगापासून गडद केशरी रंगापर्यंतचे सगळे रंग आलटून पालटून समोरच्या क्षितिजावर पसरत होते कधीकधी ढगांआड लपून लपत होते. त्याचे प्रतिबिंब समुद्राच्या पाण्यात टिपण्यामध्ये आम्ही मग्न झालो. साधारण साडेपाच वाजता पूर्ण सूर्यास्त झाला आणि आम्हाला तेथून परतावे लागले.

या किनाऱ्याच्या बाहेर आल्यावर आम्हाला ‘लक्ष्मणपूर नाईट मार्केट’ दिसले. छोट्या छोट्या दुकानांमध्ये लावलेले कंदील एवढाच तिथे उजेड होता. त्या उजेडात पर्यटक शंख शिंपल्यांच्या दागिने खरेदी करत होते. अतिशय मोठ्या प्रमाणात जिलेबी, वडे, भजी असे खाद्यपदार्थ जसे तळले जात होते तसेच मासे आणि काही नॉनव्हेज पदार्थही तिथे तयार जात होते. संपूर्ण वातावरणात या पदार्थांचा वास मिसळलेला होता. पर्यटक आपल्या आवडीच्या जिनसांवर ताव मारत होते. आम्ही मात्र तिथे नारळ पाणी प्यायलो आणि मनभावन बेटावरचा निसर्गरम्य प्रवास अनुभवत स्वप्नवत सुंदर ‘कोरल गार्डन’ या आमच्या रिसॉर्टकडे परतलो.
क्रमशः

— लेखन : प्रतिभा सराफ. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on अशी होती माझी आई !
राजेंद्र वाणी दहिसर मुंबई on “प्रतिभा”ला वय नसतं !
नलिनी कापरे on आरशात पाहू जरा …
सौ.मृदुलाराजे on आरशात पाहू जरा …
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : २६
सौ.मृदुलाराजे on वाचक लिहितात…
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
शारदा शेरकर on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !