Saturday, July 27, 2024
Homeलेखअंमळनेर संमेलन वृत्तांत

अंमळनेर संमेलन वृत्तांत

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवी कट्ट्याच्या निमित्ताने माझ्या “जगाचा पोशिंदा” ह्या काव्य रचनेची निवड करण्यात आल्याचे या संमेलनाच्या संबंधित प्राधिका-यांकडून निमंत्रण पत्रिका मिळाली, तेंव्हा पासून माझ्या मनात फार मोठी उत्सुकता ताणल्या गेली.

पाहता पाहता अंमळनेरला आयोजित साहित्य संमेलनाला जाण्याचा दिवस उजाडला आणि १ फेब्रुवारी रोजी सकाळी त्या दिशेने निघालो.

खरं म्हणजे संमेलनाच्या आयोजकांनी कवी कट्ट्यासाठी येणाऱ्या नवोदित कवीं कडून पैसे जमा केले, याबाबत मला फारसे काही अनुचित वाटले नाही. कारण, कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करतांना पैशाची गरज भासतेच, हा विचार करून आयोजकांनी निश्चित केलेली रक्कम मी भरली आणि कार्यक्रमाला निश्चिंत मनाने सहभागी झालो.

संध्याकाळी साधारणतः ६.१५ वाजता प्रताप महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात पोहोचेलो. येथील आयोजन मंडळींची लगबग सुरू होती. आमची गाडी बाजूला पार्क करून तेथील स्वागत कक्षात जावून प्रा. भराटे आणि प्रा कुणाल पवार यांच्याबद्दल चौकशी केली असता ते दोघेही इतर तयारी करण्यासाठी गेले असल्याचे कळले. परंतु तेथे उपस्थित
प्रा. येवले यांनी मोठ्या अदबीने विचारणा करून आमच्याकडून आवश्यक फॉर्म भरून तशी रजिस्टरमध्ये नोंद घेऊन आम्हाला राहण्याच्या खोल्या, मुलांचे वसतिगृह “बी ब्लॉक” मध्ये असून रेक्टर कडून चाव्या घेण्यासाठी एक प्रतिनिधी सोबत देऊन आमची पुढची व्यवस्था केली.

प्रा येवलेंना धन्यवाद देवून आम्ही निघालो, रेक्टरकडेही आमची नोंद झाल्यावर खोलीच्या चाब्यासह विद्यार्थी प्रतिनिधीने आम्हाला वाटप झालेल्या खोली क्रमांक ६३ ताब्यात दिली आणि काही मदत लागली तर मी खालीच आहे असे सांगून तो मुलगा निघून गेला. काही वेळाने आम्ही फ्रेश होऊन कॉटवर अंग टाकले न टाकले तोच हा मुलगा आमच्यासाठी गरम गरम चहा घेऊन आला.आता संध्याकाळचे सात वाजून गेले होते. म्हणून आम्ही संमेलनाच्या मुख्य मंडपाकडे व परिसरातील सर्व तयारी पाहण्यासाठी फेरफटका मारताना तेथे चालू असलेल्या अनेक लगबगी पाहत होतो. “बहिणाबाई चौधरी” भव्य मुख्य मंडप आणि बाजूला असलेले दोन मंडप, प्रताप महाविद्यालयाचे भव्य दिव्य रूप आणि मैदान पाहून अंमळनेर सारख्या ग्रामीण भागात एव्हढ्या मल्टीफॅकल्टी संस्थाचे जाळे निर्माण केले आहे, त्याबद्दल प्रताप सेठ यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक दूरदृष्टी पाहून आमच्या मनात अतिशय आनंद झाला.

दुस-या दिवशी म्हणजे २ फेब्रुवारीला सकाळी सकाळी ग्रंथ दिंडीचा दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला. यामध्ये लेझीम पथक, विविध सांस्कृतिक दर्शन मनमोहक नृत्य सादर केलेले होते. विशेष म्हणजे या निमित्ताने “बंजारा समाजाच्या महिला – भगिनीचे डफड्याच्या तालावर अतिशय मनमोहक नृत्याविष्कार पाहून सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

दुपारी मुख्य उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू झाला. या समारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दिपक केसरकर, मंत्री भामरे साहेब, समारंभाचे अध्यक्ष प्रा डॉ. रविंद्र शोभणे, डॉ उषाताई तांबे आणि साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध विषयांवरील वैचारिक परिसंवाद, आभासी न्यायालयातील बाजु व विरूद्ध कायदेशीर सुनावणीचा खटला, प्रस्थापित कवींचे काव्य संमेलन, कवी कट्ट्यावरील कविता वाचन, गझलकारांची मैफिल आणि असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे सर्व रसिक मंत्रमुग्ध होणार नाही का? यापैकी बरेच कार्यक्रम पाहण्याची संधी आम्हाला मिळाली.

या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मला सांगायला विशेष आनंद वाटतो की, आजपर्यंतच्या इतिहासात “बंजारा समाजातील कवी – लेखकांना या मोठ्या व्यासपीठावर – विचारपिठावर काव्य वाचनासाठी संधी मिळाली नव्हती. मात्र, या संमेलनात बंजारा समाजातील ५ कवींना कवी कट्ट्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे आमच्या सारख्या बंजारा समाजातील कवी – लेखकांना ही आनंदाची पर्वणीच नाही काय ?

या निमित्ताने अनेक कवी – लेखकांची ओळख झाली. हेही नसे थोडके. बाकी या संमेलनात काही त्रुटी होत्या जसे पुस्तकांचे दालन मुख्य समारंभापासून थोडे दूर होते, त्यामुळे मोठमोठ्या प्रकाशक संस्थेच्या खरेदी – विक्रीवर बराच फरक पडल्याचे ऐकण्यात येत होते.

एकुणच काय तर या सगळ्या घडामोडींतून आमचे संमेलनातील तीन दिवस कसे गेले कळलेच नाही. अखेर ४ फेब्रुवारीला संध्याकाळी संमेलनाचे सुप वाजले आणि आम्ही तेथील आयोजकांचे आभार मानून तिथल्या आठवणी मनात ठेवून पुढील प्रवासासाठी निघालो.

या संमेलनाविषयी प्राप्त झालेल्या काही प्रतिक्रिया पुढे देत आहे….
१. मग बाकींच्यानीं पैसे भरले त्याचं काय? तुमची सोय झाली यात आनंद आहे सगळ्यांना.. पण अनेकांनी पैसे भरलेत ना. तुम्ही भरले असते तर तुम्ही ही प्रतिक्रिया दिली नसती. अहो कवि कट्यातील बरेच कवि गरीब बेरोजगार आहेत. त्यांच्या कडून ही लूट कशा मुळे.?

२. मी संमेलनातील सगळ्या भेदभावाबद्दल पहिल्या दिवसा पासून माझ्या वात्रटीकेतुन ओरडतोय पण कुणी लक्ष देत नाही.काही कवि तर खूपच नियोजनावर स्तुती सुमने उधळीत आहेत. अहो सरकारी अनुदान आणि देणग्या असताना ही कविकट्यातील कविकडून वसुली कशा मुळे ? पैसा असला की नियोजन कुणालाही करता येते. इतर ठिकाणी अ. भा. साहित्य संमेलनात कुठे ही कविकट्या साठी निवडलेल्या कवि कडून पैसे घेतले नव्हते. मग हा नवीन पायंडा कशासाठी ? आणि जे कवी सुपारी घेऊन कवितेचे कार्यक्रम करतात त्यांनाच पुन्हा निमंत्रित म्हणुन मान! त्यांची सोय फुकट हा भेदभाव का? काल ज्यांनी खूप स्तुती केली त्यांनी याचं ही उत्तर द्यावं.

३. 95 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन उदगीर येथे होते. तेंव्हा कविकट्यावर निमंत्रण असलेल्या कवींना राहणे, जेवण इ. मोफत होते. तशी सोय तेथील संयोजक मंडळींनी छान केली होती. मी पण तेथे होतो. मग इथे असं का…?

४. शासनाकडून काही कोटी रुपये या साहित्य संमेलनासाठी मिळालेले आहेत. तरीही कवी कट्ट्यासाठी कवींना बोलवून त्यांची उपेक्षा करतात. नाश्ता आणि जेवणाच्या लाईनला उभं राहून नंतर तिथे पदार्थ सगळे संपलेले असतात. मुलांच्या / मुलींच्या होस्टेलला कुठेतरी अतिशय वाईट अवस्थेत असलेल्या संडास, बाथरूम तिथे त्यांची सोय. एवढच नाही तर त्यांच्या पत्रावर लिहिलेला आहे चार हजार रुपये भरा राहण्याचे आणि खाण्याची सोय करतो किती वाईट आहे हे. कवी कट्ट्यात येणाऱ्या नवोदित कवींनाही मानधन द्यायला पाहिजे. यांचा सर्व पैसा व्हीआयपीच्या सोयींसाठी संपतो की काय ?

५. मनःपूर्वक धन्यवाद.. कोणत्याच साहित्याला जात नसते.साहित्य संमेलनात जातीचा विषय ही नाही हे मान्य आहे. पण कवि कवि मधे भेदभाव का? एकाने पैसे भरायचे आणि दुसऱ्याने फुकट मजा मारायची मग तो कोणत्याही जातीचा असो. कवि तिथून सगळा सारखा धरायला हवा पैसे भरून कविकट्या ला या ही कुठली पद्धत? मग जे फुकट आलेत त्यांनीच नाचावं तीन दिवस. बाकीच्यांची बेजारी का करता ? याचा कधीतरी नक्कीच उद्रेक होईल.. आणि तुम्ही निमंत्रित केलेले फुकट मजा मारणाऱ्या कविंचा दर्जा ही मला माहित आहे. त्यात आमच्या भागातले काही आहेत.मी त्यामुळेच कविकट्या ला आलो नाही. वा. रे. तुमचा न्याय. संमेलन आणि त्याचे बाजट कुणाच्या घरचे आहे काय? मी पेपर मधून दिलेल्या मुलाखतीत प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तरे द्यावी आयोजकांनी.

६. कवी कट्ट्याची जशी दूर्रदशा कवींची, तशी दूर्रदशा आहे पुस्तक स्टॉलची. प्रकाशकाकडून स्टॉलचे सात हजार रुपये घेतले आहेत. अतिशय गैरसोयीच्या ठिकाणी हे स्टॉल आहेत. कारण सभागृह वेगळ्या ठिकाणी आणि पुस्तकाचे स्टॉल लांब असल्यामुळे इकडे कोणीही फिरकत नाहीत. कालच्यापासून जेमतेम पाचशे रुपयांचेसुद्धा पुस्तकाची विक्री झाली नाही अशी अवस्था आहे….

राजाराम जाधव

— लेखन : राजाराम जाधव. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments