काना मात्रा वेलांटीतून बोलतात अक्षरे जेव्हा
उकार रुकार रफरातून डोलतात अक्षरे जेव्हा
सूक्ष्मात अनुभवावे आरोह अवरोह काना मात्रेचे
तान मिंड मुरकीत हलकेच मुरकतात अक्षरे जेव्हा
ऐकत राहावे मुग्ध आपण कानात आणुनी प्राण
नुक्ता बिंदू ओंsकारातून हुंकारतात अक्षरे तेव्हा
वेलांटीची शिट्टी ऐकावी जशी दूर बोगद्यातून
कानात कधी रानात शीळ घालतात अक्षरे जेव्हा
घडतात बिघडतात सुघड सुबोध दुर्घट दुर्बोध
आपल्यातून आपली अंकुरतात अक्षरे जेव्हा

— रचना : सुधीर शालीनी ब्रह्मे.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800