Wednesday, September 11, 2024
Homeलेखअगम्य स्त्री

अगम्य स्त्री

प्रत्येक स्त्री ही वेगळी आहे. प्रत्येकीची गोष्टी वेगळी आहे. प्रत्येकीचा संघर्ष वेगळा आहे. तिचे अस्तित्व कुटूंबाला व समाजाला प्रेरणा, समाधान व आनंद देते.

ज्या कुटुंबात स्त्री नसते ते अपूर्ण असते कारण तिच्यामुळेच घराला घरपण लाभते. ते हसणे, रागावणे, चिडणे, बोलणे, रडणे यामागे देखील तिचे प्रेम, काळजी दिसून येते.

स्त्री स्वतः साठी केव्हा हो जगते ?

स्त्री ही गृहिणी असो अथवा नोकरी करणारी, खूप मोठी उद्योजिका, पोलीस अधिकारी असो अथवा राजकीय क्षेत्रातील नेता असो कोणत्याही क्षेत्रातील ती प्रत्येक जबाबदारी अगदी चोख निभावते.

मात्र…….ती जेव्हा घरी येते, उमऱ्याच्या आत पाऊल ठेवते तेव्हा ती केवळ एक पत्नी असते, आई असते, एक सून असते, एक सर्व साधारण स्त्री असते जी आपल्या कुटुंबाची मनापासून काळजी घेते. तिचे पद प्रतिष्ठा कधीही या कौटूंबिक जबाबदारीच्या आड येत नाही व तसे ती होऊ देतही नाही. कुटुंब हे तिचे प्रथम प्राधान्य असते व त्यासाठी ती वेळेचे उत्तम नियोजन ही करते.

सर्वांपेक्षा लवकर उठणारी ती रात्री सर्वात उशिरा झोपते. तिची कामे कधीच संपत नाही. तिला कधीही सुट्टी नसते. घरातील सर्वांचा नाश्ता, जेवण, जेष्ठांचे औषध उपचार, पती व मुलांचे डब्बे, घरातील स्वछता, पै पाहुणे सर्व सांभाळते. ती दमते, थकते मात्र कधीही थांबत नाही.

प्रत्येक स्त्रीची व्यथा वेगळी असते. ती समजून घेतली पाहिजे. ती सांगत नसली तरी तिची व्यथा जाणवली पाहिजे.

अनेक वेळा गृहिणी पद सांभाळताना तिने आपल्या मुलांसाठी स्वतःच्या करियरचा त्याग केलेला असतो, अनेक स्वप्न मनात घेऊन आलेली ती तिचे स्वप्न कौटुंबिक जबाबदारीमुळे स्वप्नच राहून जातात.

गृहिणीला मनात खंत असते की नोकरी करणारी स्त्री ही खूप नशीबवान असते. तिला असे सतत वाटते की नोकरी करणाऱ्या स्त्रीला समाजात एक आदराचे स्थान असते, ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते, तिचे स्वतंत्र विश्व असते, आर्थिक बाजू भक्कम असल्याने ती कोणावर ही अवलंबून नसते, तिचा शिक्षणाचा तिच्या कलेचा आदर होतो, तिला समाजात मानाचे स्थान असते. ती टापटीप रहाते त्यामुळे तिच्या कडे बघण्याचा दृष्टीकोण चांगला असतो. तिला समाजात सन्मानाची वागणूक दिली जाते व ती आयुष्याचा खरा आनंद घेत असते. तिच्यामध्ये एक अलौकिक आत्मविश्वास असतो जो तिच्या व्यक्तिमत्वाला झळाळी देतो. बाहेरचे जग पाहिल्यामुळे व अनुभवल्यामुळे तिला अनेक गोष्टीचे ज्ञान असते व तंत्रज्ञान विकसित असते ज्यामुळे तिला एक निर्भीड व्यक्तिमत्व लाभते त्यामुळे अनेक गृहिणीना असे वाटते की नोकरी अथवा व्यवसाय करणारी स्त्री अधिक स्वतंत्र, सक्षम, समाधानी व आनंदी असते.

आता……. नोकरी करणाऱ्या स्त्रीची व्यथा जाणून घेऊ. सतत कामाचे व्याप, टेन्शन, टार्गेट्स, ही जीवघेणी स्पर्धा, वेळी अवेळी करावे लागणारे काम त्यामुळे कुटुंब व नोकरी ही तारेवरची कसरत तिला करावी लागते.

अनेक वेळा ठरवूनही ती सणसमारंभाला नटून थटून निवांत मैत्रिणींशी गप्पा गोष्टी नाही करू शकत. त्यांच्या बरोबर ते निवांत क्षण नाही जगू शकत. तिला सतत घड्याळाच्या काट्यावर पळावे लागते. ती स्वतःच्या कुटुंबाला व मुलांना वेळ नाही देऊ शकत. मुलांना जवळ घेऊन गोष्टी सांगत घास नाही भरवू शकत. मांडीवर त्यांचे डोके ठेवून प्रेमाने गाणं म्हणत नाही झोपवू शकत. कारण तिचे लहान मुल पाळणाघरात असते. तिथे त्यांना आईचे प्रेम, ती माया नाही, हे माहीत असून सुद्धा तिला अनेक वेळा आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने काम करावे लागते. आपल्या हाताने एखादा पदार्थ करून घरच्यांना खुश नाही करू शकत. वेळेअभावी तिला इच्छा असूनही हे करता येत नाही ही खंत कायम तिच्या मनात असते.

तिचे जीवन खूप धावपळीचे असल्याने तिला तिच्या कला छंद नाही जोपासता येत. चढ उतार, यश अपयश याची भीती सतत असते. नोकरीच्या जागीही अनेक वेळा वाईट नजरा चुकवाव्या लागतात. ती आजही सुरक्षित नाही. तिला गृहिणी जास्त नशीबवान व सुखी वाटते.

म्हणतात ना स्त्रीच्या मनात काय चालले असेल ते कोणीही ओळखू शकत नाही ते यासाठीच. म्हणूनच आज सर्वांना एकच सांगणे आहे की प्रत्येक स्त्रीचा तिच्या भावनांचा तिच्या विचारांचा आदर करा तिला सन्मानाने वागवा.

प्रत्येक स्त्रीही समाजाचा महत्वपूर्ण घटक आहे कुटुंबाचा कणा आहे. मग ती गृहिणी असो अथवा नोकरी करणारी.

स्त्रीने स्वतः ला कधीही कमजोर समजू नये कारण स्त्रीच ही केवळ एका वेळी अनेक काम अगदी सहज करू शकते. ही परमेश्वराने बहाल केलेली अनमोल देणगी आहे त्याचा स्त्रीने मान राखला पाहिजे व स्वतःला सिद्ध केले पाहिजे मग तिची वाट कितीही काटेरी असेल तरीही ती जिंकू शकते.

आज असे कोणतेही क्षेत्र नाही जेथे तिचे अस्तित्व नाही. आणि हो, हे तिने स्वबळावर, चिकाटीने, जिद्दीने, हिमतीने मिळवले आहे त्याचा तिच्या कुटुंबाला व समाजाला ही अभिमान वाटला पाहिजे. तिची उल्लेखनीय कामगिरी आज अनेक तरुण मुलींसाठी प्रेरणा स्तोत्र आहे.

इतिहासाने देखील स्त्रीला गौरविले आहे. शिक्षणाचा वसा घेणारी ती सावित्री असो, आपल्या बाळाला छातीशी घेऊन मैदानावर लढणारी ती राणी लक्ष्मीबाई असो, निरपेक्ष सेवा करणाऱ्या त्या मदर तेरेसा, अथवा सामाजिक सेवेचा वारसा जपणाऱ्या आपल्या लाडक्या सिंधूताई (माई ) असो, छत्रपती महाराजांच्या जिजाऊ असो, तिचे रूपे अनेक आहेत व असे अनेक उदाहरण देखील आहेत. तिचे अस्तित्व पूर्वी ही होते व आजही आहे व पुढेही राहणार.

स्त्रीला कमी लेखनाचा गैरसमज कधीही करू नका. तिचे कौतुक नाही करता आले तरी चालेल मात्र तिचे खच्चीकरण करण्याची चूक कोणीही करू नये.

प्रत्येक स्त्री आपल्यापरिने आपली जबाबदारी निभावत असते मात्र तिची तुलना कधीही कोणत्याही दुसऱ्या स्त्री बरोबर करू नका.

स्त्रीने देखील कधीही स्वतःला दुबळे अथवा एकटे समजू नये तिच्यात अनन्यसाधारण शक्ती असते तिचा योग्य वापर केला तर ती देखील उंच भरारी घेऊन स्वतःला सिद्ध करू शकते. पुरुषांच्या बरोबरीनेच नव्हे तर त्यांच्याही पुढे जाऊन उल्लेखनीय कामगिरी करू शकते. स्त्रीने आपल्यातील कला गुणांना ओळखून, त्याचा विकास साधल्यास स्त्री आपले व्यक्तिमत्त्व फुलवू शकते.

त्यामुळे स्वतःला ओळखा स्वतःसाठी वेळ द्या आपल्यातील क्षमतांना बळ द्या, मी ही करू शकते तो आत्मविश्वास मनात येऊन द्या मग पहा कसा चमत्कार घडेल व समाजात एक सकारात्मक परिवर्तन घडेल.

रश्मी हेडे

— लेखन : रश्मी हेडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments