Thursday, May 30, 2024
Homeयशकथाअजातशत्रू विलासभाऊ मराठे

अजातशत्रू विलासभाऊ मराठे

राष्ट्रीय विचारांनी प्रभावित होऊन आदरणीय बाळासाहेब मराठे यांनी ७४ वर्षांपूर्वी दैनिक हिंदुस्थान हे मराठी वर्तमानपत्र अमरावती येथे सुरू केले. प्रखर देशभक्तीने प्रेरित होऊन सुरू झालेल्या ह्या दैनिकाला नवनवीन विचारांचे खतपाणी घालून त्यांचे सुपुत्र डॉ.अरुण मराठे यांनी हिंदुस्थानचे हे इवलेसे रोपटे प्राणपणाने जोपासले, वाढविले व अमरावतीकरांनाच नव्हे तर समस्त वाचकप्रेमींसाठी हे दैनिक अनेक दृष्टीने आधारवड ठरले. साहित्यिकांच्या लेखणीला वाव मिळाला. अन्यायाला वाचा फुटू लागली. जाहिरातदारांना आपली जाहिरात करण्यासाठी एक साधन, मिळाले ते ही अल्प मोबदला देऊन ! कारण दैनिक हिंदुस्थानचे उद्दिष्टच आहे की सर्वांचे भले व्हावे.

दै हिंदुस्थानमुळे लोकांना ताज्या घडामोडी कळू लागल्या हिंदुस्थानचा भला मोठा वाचक वर्ग तयार झाला. हिंदुस्थान म्हणजे आपल्या भावना प्रगट करण्याचे खुले व्यासपीठ होय ही भावना सर्व क्षेत्रातील जनमानसात दृढ झाली.

सध्या हिंदूस्थानचे प्रबंध संपादक विलासभाऊ मराठे ह्यांच्या अथक कार्यशैली मुळे हे वृत्तपत्र दिवसेंदिवस वाचकांच्या आवडीचे ठरले आहे. दैनिक हिंदुस्थानचा कारभार विलासभाऊच्या हाती विश्वासाने सोपवितांना त्यांच्या पिताश्रीनी त्यांना निक्षून सांगितले होते की, वृत्तपत्र चालवितांना कोणत्याही राजकीय पक्षाचे दडपण न घेता हे वृत्तपत्र चालवावे. हे वृत्तपत्र एका विशिष्ट पक्षाचे आहे अशी प्रतिमा कधीच होऊ देऊ नये. सगळ्या राजकारणी लोकांशी स्नेहाचे वर्तन असावे. पण त्यांचा दबाव लेखनावर नसावा वा कोणत्याही स्तंभ लेखनावर नसावा.

वडिलांची ही मोलाची शिकवण विलासभाऊनी तंतोतंत शिरोधार्थं मानली आहे, हे आपण कुणीच नाकबूल करणार नाही. सर्व स्तरातील, सर्व क्षेत्रांतील उच्च पदस्थ मंडळींशी तथा ज्येष्ठ पत्रकार, लेखकांशी त्यांची जवळीक असुन लोकप्रिय दैनिक हिंदुस्थान चे ज्येष्ठ स्तंभ लेखक, पत्रकार यांच्या सोबतही त्यांचे स्नेहाचे संबंध आहेत! बहुतेक स्तंभ लेखक दै.हिंदुस्थानचे संस्थापक संपादक स्व.बाळासाहेब मराठे यांच्या निर्भिड पत्रकारितेच्या तालमीत घडलेले आहेत हे येथे उल्लेखनीय आहे.

नियमित स्तंभ लेखन करणारे आदरणीय न. मा. जोशी, श्री मधुकर भावे, श्री माधव पांडे, ऍड नरेंद्र काळे, डॉ अविनाश मोहरील, अभि. वा पां जाधव व सहज सुचलं म्हणून लिहिणाऱ्या सुश्री कल्याणी केळकर, गोफणकार रमेश गोटखडे अशी अनेक मंडळी दैनिक हिंदुस्थानची चाहती आहेत ती केवळ आणि केवळ विलासभाऊंच्या सौहार्द पूर्ण व्यवहारानेच ! वेगवेगळ्या विषयात पारंगत असलेले हे सर्व जण हिंदुस्थानचा लौकिक वाढविण्यासाठी आपले योगदान देतात ते विलासभाऊवरील प्रेमामुळेच !

विलासभाऊ सर्वसामान्यांचे ही चाहते आहेत. दैनिक हिंदुस्थानच्या स्वतंत्र सर्वसामान्य पत्रकारीतेत सहभागी झालेल्या तमाम सदस्यांचे ते पाठीराखे असुन ते नेहमी खंबीरपणे त्यांच्या सोबत उभे असणारे एक मजबूत प्रबंध संपादकीय पत्रकार मित्र आहेत ! माणूस या नात्याने त्यांच्या स्वभावातला हा गोडवा वाखाणण्यासारखा आहे. फक्त मोठया लोकांशीच त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत असे नाही तर अगदी तळागाळातील लोकांना ही त्यांच्या सहृदय वृत्तीचा नेहमीच प्रत्यय येतो.

त्यांच्या एकुलत्या एक मुलाच्या लग्नाच्या वेळचे निमंत्रण कोण विसरेल ? खूप आधी आग्रहाचे निमंत्रण देऊन लग्नाच्या आधी ४ दिवस घाईगडबडीत सुद्धा पुन्हा स्मरणपत्र आग्रहाचे निमंत्रण ! लग्नाच्या स्वागत समारंभासाठी जमलेला विशाल जनसागर त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देणारा ! त्यांच्या प्रेमाखातर आपण गेलेच पाहिजे ही भावना प्रत्येकाच्या मनात ! मागच्या वर्षी फेब्रुवारीत झालेला हा स्वागत सोहळा अनेक वर्षे स्मरणात रहावा असा, त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देणारा ! सर्व क्षेत्रातील; सर्व स्तरातील अमरावतीकर व दूर दूर हुन आलेले सगळेच त्या अनुपम सोहळ्याचे साक्षीदार ! ही भाऊवर असलेल्या प्रेमाची साक्षच नाही काय ?

विलासभाऊंना मिळालेल्या पुरस्कारांची यादी खुप मोठी आहे विदर्भ साहित्य संघ नागपूर शाखा अमरावतीचे ते अध्यक्ष आहेत. त्यांना साहित्याचा विदर्भ रत्न पुरस्कार, प्राप्त झालेला आहे. अखिल भारतीय वृत्तपत्र मालक संघटना नवी दिल्लीचे १९ वर्षांपासून सलग सदस्य पदी अविरोध निवड झालेल्या ह्या गुणी व्यक्तीच्या पुरस्कारांची, मिळालेल्या मानसन्मानाची यादी करणे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. नुकतेच त्यांना १४ एप्रिलला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त एकता रॅली आयोजन समितीतर्फे विश्वरत्न डॉ बाबसाहेब आंबेडकर पत्रकारिता गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हा विशेष मानाचा पुरस्कार आनंदवनचे सर्वेसर्वा डॉ विकास आमटे सरांच्या हस्ते देण्यात आला ही खुप गौरवाची बाब आहे. तसेच २० एप्रिलला परिवर्तन प्रबोधिनी अमरावती तर्फे दिला जाणारा परिवर्तन गौरव पुरस्कारही त्यांना मिळाला आहे त्यांना मिळालेल्या पुरस्काराने त्या पुरस्कारांचाच सन्मान वाढला आहे, असे म्हटले तरी चालेल.

ते रोजच अतिशय व्यस्त असतात कुठे उदघाटन कुठे सदिच्छा भेट तर कधी कुणाचा सत्कार, कुणाचे स्वागत ! कधी अंबा देवी मंदिरात, तर कधी एखाद्या चे स्वागत करतांना ! याशिवाय प्रबंध संपादक म्हणून असलेली जवाबदारी ते तर स्व ईच्छेने स्वीकारलेले परंपरेने चालत आलेले व्रत! ते चोखच झाले पाहिजे म्हणून रात्रंदिवस काम ! त्यांचा रोजचाच दिवस म्हणजे जणू उत्सव दिन ! सतत काहीतरी नवीन काम! अतिशय व्यस्त दिवस रोजच! तरीही माझ्या सारख्या सामान्य व्यक्ती साठीही ते २४ तास उपलब्ध असतात केंव्हाही दिवसा रात्री १२ वाजता व पहाटे ५ वाजताही केंव्हाही ताबडतोब प्रतिसाद मिळणारच ! कोणत्याही वेळी ते ऑनलाइन च दिसणार, कमाल वाटते मला! मला तर नेहमी प्रश्न पडतो की यांची आरामाची वेळ तरी कोणती ? ही त्यांची कामावरची निष्ठाच त्यांच्या यशोशिखराची पायरी आहे.

सतत हसतमुख असणारे अतिशय विनयशील असं हे व्यक्तिमत्व ! त्यांना साथ आहे त्यांच्या सहधर्म चारिणीची! सतत सगळ्यासाठी उपलब्ध असणारे विलासभाऊ सौ वेदश्री वहिनींना किती वेळ देत असतील ? यशस्वी पुरुषाच्या मागे त्याच्या पत्नीची साथ असतेच हे विसरून चालणार नाही. सतत हसतमुख असणाऱ्या वेदश्री वहिनीचे योगदान अतिशय महत्वाचे आहे हे निर्विवाद सत्य ! त्यांच्या यशाचे आणखी महत्वाचे कारण त्यांच्या आईवडिलांचा आशीर्वाद ! व त्यांचे आपल्या मात्यापित्यावर असलेले प्रेम, आदर!त्यांच्या मातोश्री आदरणीय प्रभाताईना जाऊन आता दोन वर्ष उलटली, परंतु असा एकही दिवस, एकही क्षण नाही की ते आईला विसरले असतील !

आई– प्रभाताई… त्यांचे साक्षात दैवत ! रोज त्यांचे विविध फोटो व पुढे आईच्या विरहाने शोकाकुल लेकराची हृदय स्पर्शी आर्त हाक– आई, miss ssssss you ! Love u मी त्यांचे status रोज पहाते व मनात विचार येतो की त्यांना कितीही पुरस्कार मिळाले असले तरी ते एक विशिष्ट काळांपर्यंतच टिकतील. परंतु त्यांचे व त्यांच्या आई चे एकमेकांवर असलेल्या प्रेमातून त्यांना त्यांच्या मातोश्रीच्या अंतःकरणातून मिळालेला आशीर्वाद रुपी पुत्ररत्न पुरस्कार हा एकमेव महत्वाचा व अमूल्य पुरस्कार आहे. आईवर प्रेम कसे असावे हे आजच्या तरुणांनी त्यांच्याकडून शिकावे !

सर्व जेष्ठ व्यक्तींशी ते अतिशय आदरभावाने वागतात असे हे सर्वगुण संपन्न विविध गुणांनी बहरलेले तरीही समाजातील शेवटच्या व्यक्तीचाही आदर करणारे, त्याचा विचार करणारे सगळ्यांच्या भावना जपणारे अतिशय लोभस नम्र व्यक्तिमत्व ! आज २५ एप्रिलला ला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. लग्न वाढदिवसाच्या विलासभाऊ व सौ वेदश्री वहिनींना मनापासून शुभेच्छा देते. माझ्या भावना दोघापर्यंत नक्कीच पोहचतील. विलासभाऊची यशोपताका अशीच उंच उंच फडकत राहून दैनिक हिंदुस्थानची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो ही सदिच्छा.

— लेखन : प्रतिभा पिटके. अमरावती
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. आदरणीय विलास जी आणि सौ. ताईंना विवाहसोहळा वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

  2. प्रतिभाताई आपण आदरणीय विलास मराठे ह्यांच्या कामांची, स्वभावाची, सामाजिक कार्याची यथायोग्य नोंद घेतली आहे.
    आदरणीय श्री देवेंद्र भुजबळ यांनी मला श्री मराठे यांचा संपर्क क्रमांक दिला. आजवर मी दैनिक हिंदुस्थान साठी लेख, पुस्तक परिचय लेख असे जवळपास तीस पेक्षा अधिक लेख पाठवले. सर्व लेख दुसऱ्याच दिवशी प्रकाशित झाले. जानेवारी पासून भारतरत्नाचे मानकरी ही लेखमाला दर गुरुवारी सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments