ज्येष्ठ सनदी अधिकारी डाॅ. किरण कुलकर्णी यांची ‘अनामिकाची विचारधून’ ही आगळीवेगळी कादंबरी आहे. मुंबईतील सदामंगल पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या या कादंबरीचे प्रकाशन येत्या 25 फेब्रुवारीला पुण्यात होत आहे.
इराणी सिनेमांप्रमाणे रूपकांचा, प्रतीकांचा सूचक वापर केल्यामुळे ‘अनामिकाची विचारधून’ ही कादंबरी वाचताना आपण रंजकता आणि उत्सुकता यांची जुगलबंदी अनुभवत आपोआप कथानकाच्या वातावरणात शिरतो, रमतो आणि आपल्या स्वतःच्या जगातलाच एक अनपेक्षित साक्षात्कार घेऊन बाहेर पडतो.
कोणत्याही सशक्त लेखकाचं स्वप्न असतं की, त्याच्या कलाकृतीमधील आशय, विषय, शैली आणि कल्पकता हे सर्व पैलू एकमेकांना समर्पक असावेत आणि त्यांनी एकत्रितपणे त्या निर्मितीला एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवावं. या सर्व बाबतीत ही कादंबरी सरस ठरते.
प्रशासनातील गुंतागुंत सर्वांच्याच मनावर, आयुष्यावर आणि विचारपद्धतीवर कशा प्रकारे परिणाम करू शकते हे लेखकानं यशस्वीरीत्या दाखवलं आहे. एखादा विषय अत्यंत जवळून जाणला असला, एखादी कार्यपद्धती आतून-बाहेरून अनुभवली असली की काय सांगावं आणि काय सोडावं हा सहज न सुटणारा पेच निर्माण होऊ शकतो; पण त्याचे नाजूक, कलात्मक संतुलन इथं लीलया साधलेलं दिसतं.
या धाडसी प्रयोगाची तुलना फ्रान्झ काफ्का, ईतालो काल्वीनो, पॉल ऑस्टर आणि जॉन फॉसे यांच्यासारख्या दिग्गज लेखकांच्या अशा प्रकारच्या अन्य प्रयोगांशी करता येईल. काही तरी मोलाचं सांगायला, एवढा मोठा कलासागर पोहून, लेखक आला आहे तर त्याला भेटण्यासाठी, त्याच्या गोष्टीचा नीट आस्वाद घेण्यासाठी वाचकांनीसुद्धा त्या पाण्यात उतरायला हवं. अर्थात चित्त विचलित होऊ न देता, पुरेसा वेळ देऊन रसग्रहण करायला हवं.
या कादंबरीच्या प्रकाशनाच्या निमित्ताने सदमंगल प्रकाशनाच्या प्रमुख प्रज्ञा जांभेकर यांनी डॉ किरण कुळकर्णी यांची मुलाखत आपण पुढील लिंक वर क्लिक करून पाहू शकता. या मुलाखतीत डॉ कुळकर्णी यांनी त्यांचे बालपण, जडण घडण, लेखनामागची प्रेरणा, या कादंबरीची निर्मिती प्रक्रिया अशा विविध बाबी दिलखुलासपणे उलगडून दाखविल्या आहेत.
https://youtu.be/vhSkpuGWL6U?si=HwdRGNU8yeoLgUKf
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800