आजच्या काळात आपल्या जिवंत आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारे महाभाग आपण पाहतो त्या पार्श्वभूमीवर, स्वतःला अक्षरओळख नसतानाही, ज्या आईवडिलांनी खेडेगावातील हलाखीच्या परिस्थितीतही आपल्या लेकरांना अक्षरओळख तर करून दिलीच परंतु उच्च शिक्षणापर्यंत पोहचण्यासाठी सर्वतोपरी मदत आणि प्रोत्साहन दिले, त्यांची आठवण ठेवणाऱ्या अंबादास केदार, रामदास केदार या साहित्यिक बंधू सोबत आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांचे सर्व स्तरावरून विशेष कौतुक होत आहे !
हा अनुकरणीय पुरस्कार उपक्रम लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील आदर्शगाव देऊळवाडी येथे प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही कै. विठ्ठलराव केदार प्रतिष्ठान, देऊळवाडी तर्फे आयोजित करण्यात आला होता.
या राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराचे वितरण रविवारी करण्यात आले. अध्यक्षस्थानी लातूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. गोविंद केंद्रे, जळकोटचे माजी सभापती रामराव राठोड, उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, मसाप केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य डॉ. भास्कर बडे, डॉ. जयद्रथ जाधव, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ तथा बालभारतीचे सदस्य ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य विलास सिंदगीकर, धनंजय गुडसूरकर, एकता फाउंडेशनचे संचालक अनंत कराड, नायब तहसीलदार संतोष गुट्टे, सरपंच शुभम केंद्रे आदींची उपस्थिती होती.

यावेळी प्रौढ व सहित्यात कथा, कविता व कादंबरी या गटात बा. बा. कोटंबे परभणी, विवेक उगलमुगले नाशिक, परशुराम नागरगोजे अहमदनगर, देवीदास तारु नांदेड, प्रतिभा सराफ मुंबई यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.
“मी साहित्यिक नसलो तरी साहित्यिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. केदार बंधू हे साहित्यातील हीरे आहेत.” असे मत रामचंद्र तिरूके यांनी व्यक्त केले तर माजी आमदार गोविंद केंद्रे म्हणाले, “ओघळणाऱ्या घामाकडे आणि भेगाळलेल्या टाचेकडे पाहिलं की लेखन करावे वाटते पण ते आम्हा राजकीय लोकांना जमत नाही.” डॉ. भास्कर बडे यांनी “आता साहित्यिकांनी जपून लेखन केले पाहिजे.”, असा मौल्यवान सल्ला दिला. माजी सभापती रामराव राठोड म्हणाले, “केदार बंधूनी आईवडिलांची सेवा तर केलीच पण त्यांच्या स्मरणार्थ असे पुरस्काराचे नियोजन करून ज्ञानाचा खजिना वाटणे, हा प्रेरणा देणारा उपक्रम आहे.”
सर्व पुरस्कार्थींच्या वतीने पुरस्काराला उत्तर देताना मुंबई येथील लेखिका प्रतिभा सराफ म्हणाल्या, “अशा छोट्या आदर्श गावात राहून केंदार बंधूनी शब्दांचा मळा फुलविला. वडिलांचे नाव विठ्ठल. विठ्ठलाच्या नावे मला हा पुरस्कार मिळाला मी धन्य समजते.”

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंबादास केदार यांनी केले तसेच सूत्रसंचालन एम. जे. वाघमारे यांनी केले. सर्व उपस्थितांचे आभार रसूल पठाण यांनी मानले.

कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानचे सचिव देविदास केदार, रामदास केदार, लक्ष्मण बेंबडे, डाँ.म.ई.तंगावार, डाँ.सुरेश शिंदे, डॉ. संभाजी पाटील, अनिता यलमटे, अश्विनी निवर्गी, सुनंदा सरदार आदींनी पुढाकार घेतला होता. कार्यक्रमास देऊळवाडीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
आयोजक केदार परिवाराची प्रशंसा व शुभेच्छा.
सर्व पुरस्कार प्राप्त प्रतिभावंतांचे मनापासून अभिनंदन 🙏
अनुकरणीय पुरस्कार या लेखंतर्गत संबंधित प्रतिष्ठानचे details मिळतील का please. जमेल तशी मदत करता येईल. त्या एरियात गेल्यास भेट देता येईल.
– डॉ मीना श्रीवास्तव,ठाणे.
अतिशय उत्तम, आदर्श आणि अनुकरणीय पुरस्कार सोहळ्याचे खूप सुंदर समालोचन केले आहेत. पुरस्कार दाते केदार बंधू, पुरस्कारप्राप्त साहित्यिक आणि ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवणारी न्यूजस्टोरी टीम ह्यांचे सर्वांचेच हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा 🙏💐