Saturday, July 27, 2024
Homeलेखअनुकरणीय मरियम मिर्झा

अनुकरणीय मरियम मिर्झा

कोरोना काळात गल्ली-मोहल्ल्यातील मुलांसाठी स्वतः च्या पुस्तकांपासून छत्रपती संभाजीनगर येथील बायजीपुरा गल्ली येथे भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या नावाने एका मुलीने बालवाचनालय सुरू केले. एकीकडे दिवसेंदिवस मुलं वाचनापासून लांब जात असताना मुलांना पुन्हा पुस्तकांच्या जगात नेण्यासाठी ‘पैसा वाचवा, पुस्तक वाचा’ असे म्हणत ग्रंथालयाचे साकडे घालणारी ही १४ वर्षीय मुलगी आहे मरियम मिर्झा.

मरियम सध्या छत्रपती संभाजीनगर येथील इकरा उर्दू गर्ल्स हायस्कूलमध्ये शिकत आहे. मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी तिने मोहल्ला बालवाचनालय अभियानाची सुरवात केली. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड कशी निर्माण करता येईल ? यासाठी तिचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. पुस्तकांची आवड निर्माण व्हावी यासाठी काही वेळा विद्यार्थ्यांना मोफत गल्ले वाटप केले जातात, ज्यामध्ये मुले पैसे गोळा करतात आणि या पैशातून त्यांच्या आवडीची पुस्तके खरेदी करतात. तर, कधी ‘घर घर किताब, हर घर में किताब’ या मोहिमेअंतर्गत परिसरात अभ्यासासाठी पुस्तके देखील वाटली जातात.

शहरातील विविध गल्ली मोहल्ला व झोपडपट्टीतील गरीब व कामगारांच्या मुलांसाठी ‘रीड अॅण्ड लीड फाउंडेशन’च्या सहकार्याने व ‘फेडरेशन ऑफ ऑल मायनॉरिटी एज्युकेशनल ऑर्गनायझेशन’च्या मार्गदर्शनाने तिने दीड वर्षात ३० बालवाचनालये सुरू केली आहेत.

मरियमचे वडील मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी यांचे पुस्तकांचे दुकान आहे. त्यामुळे लहानपणापासूनच ती पुस्तकांच्या सहवासात आहे. मरियम पाचवीत असताना तिने एका ग्रंथालयाला भेट दिली. त्यावेळेस मित्र शेरखान पठाण याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ग्रंथालय सुरु करण्याची कल्पना तिच्या बालमनात आली आणि तिने तिच्या वडिलांकडे हट्ट सुरू केला. तिचे वडील लगेच तयार झाले. त्यावेळेस तिच्याकडे फक्त १५० पुस्तके होती. तिच्या वडिलांनी तिला अजून १५० पुस्तके दिली आणि अशा ३०० पुस्तकापासून सुरू झाले ‘बालग्रंथालय’.

मरियम चे वडील मिर्झा कयुम

ग्रंथालय सुरू करताना मरियमला अनेक अडचणी आल्या. नवीन पुस्तके खरेदी करायला पैसे नव्हते. ग्रंथालय सुरू करायला जागाही नव्हती. शिवाय, जागा भाड्याने घ्यायची कुवतही नव्हती. मात्र, या सर्व प्रश्नांवर मरियमने मात करत जागा व पुस्तकेही मिळवली. तिच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी तिला जागा आणि पुस्तकेही दिली. घरातील रिकाम्या खोल्या, ओटा, इतकंच काय तिच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे तिला ग्रंथालयासाठी मशिदीत देखील जागा मिळाली.

आता मरियमच्या तीस ग्रंथालयात मिळून दोन हजार पेक्षाही जास्त पुस्तके आहेत. तिची शाळा सुटली की ती ग्रंथालयाला भेट देते व दिवसभराचा आढावा घेते. बालग्रंथालय चालवायला तिचे वडील तिला मदत करतात.
आताची पिढी वाचत नाही हे मरियमच्या वडीलांना मान्य नाही. ते म्हणतात, ‘‘बरेच पालक बाजारात जाऊन मुलांसाठी पुस्तके खरेदी करत नाहीत. पालक म्हणून आपण त्यांच्या हातात कधी पुस्तक देणार नसाल तर मुलं वाचत नाही हा त्यांच्यावर आरोपही लावायला नको. शहरांमध्ये अनेक ग्रंथालये आहेत पण ते फक्त तरुण आणि प्रौढांसाठी. आपल्याकडे बालग्रंथालय ही संकल्पना या आधी साकारण्यात आली नाही. बऱ्याच ग्रंथालयात तर मुलांना प्रवेशही नसतो.’’

मरियमच्या मैत्रिणींनासुद्धा तिचे कौतुक वाटते. त्यांना शाळेतल्या ग्रंथालयांऐवजी मरियमच्या ग्रंथालयातील पुस्तके जास्त आवडतात. तिच्या मैत्रिणी म्हणतात, ‘‘इथे आम्हाला नावनोंदणी करणे किंवा ओळखपत्र दाखवणे बंधनकारक नाही. पूर्ण शाळेला तिच्यावर गर्व आहे.’’

शहरातील या ग्रंथालय चळवळीची माहिती आता अनेकांना होत आहे. अनेक दात्यांनी तिला स्वतः हून मदतही केली आहे. ही चळवळ फक्त छत्रपती संभाजीनगर किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता तिचा विस्तार देशभर व्हावा, असे मरियमला वाटते.

मरियमचा छोटासा प्रयत्न तिचे मोठे विचार दर्शवितात. समाजासाठी काहीतरी करायला खूप पैसे हवे, असे काही नसते. काहीतरी करायची जिद्द असेल तर आपोआप रस्ते खुले होत जातात.

मरियम च्या ग्रंथालयाचे वैशिष्ट्य म्हणजे या ग्रंथालयाला कधीही कुलूप लावले जात नाही. मुलं येतात, पुस्तकं घेतात आणि वाचून झाली की प्रामाणिकपणे जागेवर परत आणून ठेवतात. पुस्तकं चोरीला गेली तरी तिला वाईट वाटत नाही कारण ज्ञानाची भूक असणारेच पुस्तकांची चोरी करतात, असं ती म्हणते.

आज हजारो मुलांना या बालग्रंथालयाचा फायदा होत आहे. मुलं म्हणतात, ‘‘इथे आम्हाला शाळेच्या पुस्तकांव्यतिरिक्त महापुरुषांच्या जीवनकथा, विज्ञानाच्या गोष्टी, थोरांच्या गोष्टी, कॉमिक्स वाचायला मिळतात. त्यामुळे वाचायची आवड निर्माण होते व सवयही लागते. आतापर्यंत दोन हजारपेक्षा जास्त मुलांना या ग्रंथालयाचा फायदा झाला आहे.

मरियम च्या या अभिनव उपक्रमाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. तिला नुकतेच ‘अमेरिकन फेडरेशन ऑफ मुस्लिम्स ऑफ इंडियन ओरिजिन (एएफएमआय) यूएसए आणि कॅनडा’ यांच्या वतीने ‘विशेष सामाजिक पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. दिल्ली नगर निगम सेंटरच्या दीनानाथ सभागृहामध्ये आयोजित ३३ व्या आंतरराष्ट्रीय वार्षिक समारोहात दिल्लीचे माजी राज्यपाल लेफ्टनंट जनरल नजीब जंग यांच्या हस्ते तिला पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर आता पर्यंत जर्मनी,अमेरिका, कॅनडा, संयुक्त अरब अमीरात, सऊदी अरेबिया, जापान च्या लोकांनी तिच्या ग्रंथालयांना भेट दिली आहेत.

अशी ही अनुकरणीय मरियम, म्हणजे ठिक ठिकाणी अशी ग्रंथालये सुरू करण्यासाठी इतरांना नक्कीच प्रेरणा देणारी आहे. तिच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments