भारतीय संस्कृतीत कलेला मानाचे स्थान आहे, कला ही मानवी संस्कृतीला मिळालेली देणगी आहे, चित्र-शिल्प या दृश्य कला, नृत्य-नाटय या भावकला तर गायन-वादन या श्राव्य कला एकमेकींशी संबंधित आहेत. आपण आपल्या भावभावना व अनुभव वेगवेगळ्या रूपाने विविध माध्यमातून व्यक्त करतो, मल्लिकार्जुन सिंदगी सरांनी चित्रकार या नात्याने आपल्या अंगभूत कलेने रेखाटलेले होरायझन हे चित्रप्रदर्शन अनेक मानवी भावनांचा समुच्चय असल्याचे अनुभवयाला येते. निसर्ग हा माणसाचा गुरू आहे, त्याच्याशी कसे जोडून घ्यायचे हे या प्रदर्शनात अनुभवता येते. कला ही जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारी व पूर्णत्वाकडे नेणारी क्रिया आहे या हेतूने शिक्षणाचा पाया म्हणून कलाशिक्षणाकडे पाहिले पाहिजे.
मुंबईतील डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठ मुलांना कलानिर्मितीसाठी मुक्ताविष्काराची तसेच नवनवीन विशेषतः आर्टिफिशल इंटेलिजन्स, डाटा सायन्स फॉर डायव्हर्सिटी आदी अभ्यासक्रमाचे शिक्षण देते. मानव्याचे कंगोरे असलेले सर जे.जे. डिम्ड टु बी डिनोव्हो युनिव्हर्सिटी द्वारे आर्ट, आर्किटेक्ट आणि डिझाइन अशा टप्प्यात शिक्षण सुरू होत आहे. या विद्यापीठातील पांच कोर्सेस विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर घेऊन जाणार आहेत. यापुढे रुचिसंपन्न रसिक व सौंदर्यदृष्टी असलेले प्रतिभावान विद्यार्थी या शिक्षणातून यापुढे तयार होणार असून स्वतंत्र प्रतिभेचा आविष्कार हाच समाज आणि राष्ट्र घडवणारी शक्ती निर्माण करणार आहे. असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.राजनीश कामत यांनी केले.
मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत मल्लिकार्जुन सिंदगी यांच्या होरायझन प्रदर्शनाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे आणि प्रयोगशील चित्रकार संशोधक रंगचिकित्सक डॉ गजानन शेपाळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
डॉ शेपाळ आपल्या भाषणात म्हणाले की, चित्रकार श्री. मल्लिकार्जून सिंदगी हे अनेक वर्षांपासून मला परिचित आहेत. ते कलाकृती वा चित्र निर्मिती करतांना फारसा विचार न करता प्रथम उपलब्ध पृष्ठभागावर उपलब्ध माध्यमाद्वारे सहजपणे छेडछाड करतात आणि मग खऱ्या अर्थाने त्यांची कलाकृती निर्माण होण्यास सुरुवात होते.
कलाकारांना आपली कला साकारण्यासाठी कोणत्या न कोणत्या प्रकाराचा आकार हवा असतो, तो मूर्त असो कि अमूर्त स्वरूपाचा. चित्रकार मल्लिकार्जून सिंदगी यांनी साध्या ते कॅनव्हासपर्यंत कलाकृती साकारण्यासाठी अनेक प्रकाराचे पृष्ठभाग छोट्या मोठ्या , कमी अधिक प्रमाणात वापरले आहेत किंबहुना ते हाताळलेले आहेत. कलाध्यापक संघाच्या स्थापनेत आणि संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी या क्षेत्रासाठी दिलेले योगदान विसरता न येणारे ठरणार आहे. वयाची पंच्याहत्तरी गाठतांना छंद आणि अविरत कलासाधना जोपासत आहेत. मल्लिकार्जुन सिंदगी यांनी आपला कलाप्रवास आलेल्या अडचणी, मानापमान, आयुष्यातील आनंदाचे क्षण आपल्या मनोगतात व्यक्त केले.
रवींद्र मालुसरे मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, संगणकाची इंजिने कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे कलाकृती तयार करतात. तथापि, त्यापैकी सर्व किंवा बहुतेक आता प्रायोगिक आहेत आणि ते नजीकच्या भविष्यात कसे बाहेर येईल हे आशादायक दिसते आहे. जरी हे तंत्रज्ञान अद्याप त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे, तरीही शक्यता अनंत आहेत. तरुणांनी याचा अवलंब करून आपल्यातला कलाकार बाहेर काढला पाहिजे, कलाशिक्षक मुकुंद वेताळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन केले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800