“नीता रांगणेकर नाबर“
आज आपण सगळेच मोबाईल वरही पटापट मराठी लिहीतो, वाचतो. पण २० वर्षांपूर्वी मोबाईल नव्हते. कॅाम्पुटरचाच जास्त वापर होता, तरी तिथेही मराठी मधले लिखाण रूळले नव्हते. नव्यानी जरी मराठी लिपीं लिहीता येत होती तरी त्याचा वापर कामापुरता होत होता.
अशा वेळी, अमेरिकेत जिथे मराठी बोलणे ऐकायला यायचे नाही, मराठी काही वाचायला पुस्तकं मिळायची नाही, तिथे नीता नाबर हिने आणि तिच्या टीमने “अंतराळ” www.antaraal.com (मराठी साहित्यकलेची अवकाशात उधळण) नावाचे ई मासिक दर महिना सुरू केले आणि अमेरिकेतल्या मराठी जनतेला एक मेजवानीच दिली.
नीता रांगणेकर मुळची मुंबईची, माहेरची ! मुंबईच्या VJTI कॅालेजातून ती इंजिनीयर झाली. त्यानंतर तिने NY युनिव्हरसिटीतून कॅम्प्युटर सायन्स मध्ये MS केले.
सध्या ती Englewood, New Jersey इथे रहाते. १० वर्षे तिने IT फिल्ड मध्ये पूर्ण वेळाची नोकरी केली. मुलगी झाल्यानंतर तिने अर्ध्या वेळाची नोकरी धरली. पुढे मुलगा झाल्यावरही २ वर्षे तिने ती केली. परंतु २००३ मध्ये जबाबदाऱ्या वाढल्यावर मात्र घराला प्राधान्य देऊन नोकरी सोडली. घरी असतांना तिने html शिकून काही web programming मध्ये प्रयोग करायला सुरवात केली. ती त्यावेळी मराठीत शुभेच्छापत्र करीत असे.
सुहास आणि अलका पै आणि नीता आणि पती संतोष ह्यांनी प्रयत्नपूर्वक अंतराळ मासिकासाठी वेब साईट सुरू करून २००५ जानेवारी मध्ये अंतराळ हे ई मासिक सुरू केले. त्याची जाहिरात ई पत्र पाठवून केली. त्यात लेख प्रसिध्द करण्यासाठी अनेक नामवंत लेखकांशी संपर्क साधला. अनेक लेखकांनी सुध्दा उत्तम प्रतिसाद दिला. श्रीधर फडके ह्यांनी सुधीर फडके ह्यांच्यावरील लेख परत छापण्याचा परवानगी दिली. जयंत नारळीकर, मंगला नारळीकर, अशोक जैन ह्या सारख्या नामवंत लेखकांनी आपले लेख दिले तसेच अमेरिकेतल्या नामवंत लेखकांनी सुध्दा आपले लेख देऊन अंतराळ चा दर्जा उंचावत ठेवला.
नविन लेखकांना ई मासिकात समाविष्ट करून घेऊन प्रोत्साहन देणे आणि मराठीतल्या नामवंत साहित्यिकाचे लिखाण अमेरिकेतल्या मराठी बांधवांपर्यंत पोहोचविणे हे दोन उद्देश ठेऊन अंतराळाची वाटचाल गेली २० वर्षे चालू आहे.
नीताला लहानपणापासूनच वाचनाची खूप आवड आहे. ती लिहीतेसुध्दा छान. ती संपादनाचे काम उत्तम प्रकारे करते आहे. या मासिकांत मागील सर्व लेखकांचे लेख पहाता येतात, अमेरिकेतील सर्व मंडळांचे पत्ते सापडतात, कोडी, चित्र, मुलांसाठी काही, कविता, लेख, गोष्टी, अशा अनेक गोष्टी वाचायला, पहायला मिळतात. मुखपृष्ठासाठीही अनेक हौशी, नविन चित्रकारांना चित्र काढायला संधी मिळते.
नीताला न्यूयॅार्क महाराष्ट्र मंडळांचे जे “स्नेहदिप” मासिक निघते त्यासाठी ही संपादन करण्यासाठी विचारण्यात आले. ती २०११ ते २०२१ स्नेहदिपची संपादक म्हणून काम करत होती आणि रंगदीप हा महाराष्ट्र मंडळ न्यूयॅार्क आणि मराठी विश्व न्यू जर्सी यांचा एकत्रित (छापील) दिवाळी अंक आहे. तिथेही ती २०११ ते २०२० संपादक होती.
भारतातल्या वर्तमानपत्रांनीही ह्या अंकांच्या दिवाळी अंकांची द्खल घेतली होती. या सर्व मासिकात ती लिहीत होतीच शिवाय BMM च्या वृत्त व स्मरणिकेसाठीही तिने अनेक वेळा लिहीले आहे. या काळात अनेक नामवंत लेखकांशी तिचा संपर्क आला. तिला खूप वाचायला मिळाले, शिकायला मिळाले. त्याचा आनंद आणि समाधान मिळाले असे ती आवर्जून सांगते. त्यांचे अंतराळ ई मासिक निघाले त्याची दखल BMM महाराष्ट्र मंडळानी लगेच घेतली होती. २००७ च्या सियाटलला भरलेल्या संमेलनात त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. २०२२ च्या BMM च्या स्मरणिकेच्या कमिटीत नीता ने काम केले होते.
नीताचे हे वाचन, लिखाण, संपादन असेच समृध्द होऊन आपल्यालाही चांगले चांगले वाचायला मिळू दे, ह्या साठी तिला खूप शुभेच्छा !
क्रमशः
— लेखन : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800