Saturday, April 20, 2024
Homeसाहित्यअवती भवती : 32

अवती भवती : 32

शब्दांच्या व्युत्पत्ती

माझी आईचं , लीलावती मोरेश्वर चान्दे ( 1906 – 1977 ) भरपूर म्हणजे त्यावेळच्या मानानं प्राथमिक सहावीपर्यंत शिक्षण झालं होतं. तिला कसा काय; पण शब्दांच्या व्युत्पत्तीचा छंद होता, तो शेवटपर्यंत कायम होता. तिच्यामुळे तो छंद मलाही लागला. मग आम्ही दोघेच असताना कितीतरी वेळा या वर बोलत असू.

तिला संस्कृत ‘ कार्यवाही ‘ शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘ कारवाई ‘ शब्द आला आहे, हे ठाऊक असे. ‘ बेकार ‘ हा शब्द देखील ‘ बेकार्य ‘ चे रूप आहे; हे तिला ठाऊक होते. अरबी भाषेत ‘ बे ‘ म्हणजे नाही, नसणे. जसे बेजबाबदार, बेसूर. तसेच, कार्यभार याचे प्राकृत रूप ‘ कारभार ‘ हे तिला ठाऊक होते. पुढे मी हिंदी शिकू लागल्यावर ‘ कारोबार ‘ हा शब्द माझ्या वाचनात आला. तो कारभार शब्दाचे हिंदी रूप, हे तिच्या आणि माझ्या लक्षात आले. गणती वरून हिंदी भाषेत ‘ गिनती ‘ शब्द आला; हे तिला ठाऊक असे. संस्कृतमधल्या ‘ ग्वाही ’ शब्दावरूनच हिंदीत ‘ गवाही ‘ ( साक्ष ) शब्द आला; आणि गवाह म्हणजे साक्षीदार हे तिला कळले.

माझे लग्न झाल्यावर माझी पत्नी लीना आमच्या अशा गप्पांत भाग घ्यायची. ती संस्कृत घेऊन BA झाली होती. त्यामुळे संस्कृत शब्द प्राकृतात कसे आले, आणि त्यांत कसकसे बदल होत गेले; हे ती समजावून सांगे.

तसेच, संस्कृतमध्ये मूळ शब्दात ‘ स ‘ हे अक्षर असेल तर ते अक्षर मराठीत येताना त्याचे ‘ ह ‘ अक्षर होते. ही वि. आ. बुवांनी मला सांगितलेली माहितीही आम्हाला मनोरंजक वाटली. ‘ एक सत्तर ‘ हे एका ‘ हत्तर ‘ होते; ‘ मास ‘ ( महिना ) ‘ माह ‘ होतो; ‘ सप्ताह ‘ चा ‘ हप्ता ‘ होतो; याची तिला गम्मत वाटायची.

तसेच, निदान कोकणात ‘ ओ ‘ अक्षर ‘ व ‘ होऊन वापरले जाते. ‘ ओवळे ‘ गाव ‘ ववळे ‘—‘ ववले ‘ होते; तर ‘ ओलांडणे ‘ हे ‘ वलांडणे ‘ होते आणि ‘ ओळख ‘ तर ‘ वळख ‘ होते !

‘ लवण ‘ म्हणजे मीठ॰ मीठ नसलेले ते ‘ अलवणी ‘; आणि त्याचा अपभ्रंश ‘ अळणी — आळणी ‘ हे ही आई सांगायची॰ माझा लेखक मित्र ( आता दिवंगत ) मधु पोतदार ‘ अनवाणी ‘ म्हणजे पायात पादत्राण नसणे, याची व्युत्पत्ती ‘ अनवहाणी ‘ — वहाणा नसलेला – आणि त्याचा अपभ्रंश ‘ अनवाणी ‘ अशी सांगायचा. तसेच, तो आजोबा शब्दाची फोड ‘ आई आणि बाबा यांना जोडणारे ‘ अशी करायचा. ती मला आवडत असे. मात्र, याची आणि माझी ओळख आईच्या निधनानंतर जवळ जवळ 20 वर्षांनी झाल्यामुळे या व्युत्पत्त्या मी आईला सांगू शकलो नाही.

आमच्या महाडकडे बोलताना ‘ 1,760 बयादी लावू नकोस ‘ असे बजावण्याची पद्धत असे॰ हा 1,760 आकडा कसा आला, याचा शोध मी, विचार करताना मला लागला॰

आमच्या लहानपणी मोजमाप फूट, यार्ड, फर्लांग, मैल यांत होत असे. 3 फूट म्हणजे 1 यार्ड; 220 यार्ड म्हणजे 1 फर्लांग आणि 8 फर्लांग म्हणजे 1 मैल॰ म्हणून 1 मैलाचे 220 x 8 = 1,760 यार्ड॰ पूर्वी अंतर हे पायी चालावे लागे; म्हणून एक मैल चालणे म्हणजे 1,760 यार्ड चालणे. 1,760 हा तसा फारच मोठा आकडा. म्हणून सतत, भरपूर बयादी लावणे म्हणजे 1760 बयादी लावणे !

आईला तो पटला॰

तसेच, बयादी हा ‘ ब्याद ‘ चे अनेक वचन. ‘ ब्यादी ‘ ची सुटसुटीत फोड॰ पंजाबातील ‘ व्यास ‘ नदीचे मूळ नावही प्रथम ‘ ब्यास ‘ आणि नंतर ‘ बियास ‘ होते. हे मला लेखक गोपाळ गोडसे यांच्या ‘ पंचावन्न कोटींचे बळी ‘ या पुस्तकात आढळून आलं. त्यांची आणि माझी मैत्री होती. त्यांनी मला ते समजावून सांगितले. तिने ते ऐकल्यावर तिलाही मनोरंजक वाटले !

पंजाबी भाषेत ‘ य ‘ चा ‘ ज ‘ होतो. त्यामुळेच, ‘ जोगी ‘ ( योगी ), जमुना ( यमुना ), जसराज ( यशराज ), जुग ( युग ), जुगलबंदी ( युगलबंदी ) अशा शब्दांचे मूळ तिला सहज कळले. ( मात्र, व. पु. काळे यांनी यावरूनच ‘ जाल ना ‘ — ज जहाजातला — गावाचे मूळ नाव ‘ याल ना ‘ असे सिद्ध केले होते, हे तिच्या निधनानंतर मला कळले; म्हणून तिला सांगायचे राहिले. नाहीतर आईने व. पुं. ना चांगलीच दाद दिली असती ! ).

तसेच, ‘ व ’ अक्षराचे बोली भाषेत ‘ ब ‘ अक्षरामध्ये रुपांतर होते; आणि विशेषत: बंगाली लोक व चा उच्चार हटकून ब करतात, हे तिला ठाऊक होते. ‘ बंग ‘ ( मूळ शब्द वंग ), ‘ बजरंग ‘ ( मूळ शब्द वज्रांग ), वंदना चे बंदना, विप्लव चे बिप्लब, वसंत चे बसंत, वनचे बन – जंगल, वंदोपाध्यायचे बंदोपाध्याय, वांद्रा चे बांद्रा अशी काही उदाहरणे आम्ही शोधून काढली.

वनचे बन होते हे कळल्यावर ‘ बनहट्टी ‘ हे आडनाव ‘ वनहत्ती ‘ चे अपभ्रंश आहे, हे आमच्या लक्षात आले. लेखक श्री. ना. बनहट्टी यांचे मूळ आडनाव ‘ वनहत्ती ‘ आहे; हे प्रा. न. र. फाटकांनी प्रा. डॉ. चंद्रकांत वर्तक यांना सांगितल्याचं त्यांनी ( पक्षी : चंद्रकांत वर्तक ) मला सांगितलं होतं. तसा उल्लेख त्यांच्या ‘ वळणावरचे साकव ‘ या अप्रतिम व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकातही आला आहे.

तसेच, ‘ क ‘ अक्षराचे ‘ ग ‘ अक्षरात रुपांतर होते. म्हणून, गावात ‘ करणी, देव देवस्की ‘ करणारा ‘ भगत ‘ असतो. तर हा भगत शब्द हे ‘ भक्त ‘ या शब्दाचेच प्राकृत रूप आहे, आणि ‘ रगत ‘ हे रक्त चे, ‘ प्रगट ‘ हे प्रकटचे, ‘ गोबी ‘ हे कोबीचे प्राकृत रूप आहे आणि रांक ही रांग होते, हे तिला माहित झाले. ‘ पलीस्तर ‘ म्हणजे प्लास्टर हे तिला ठाऊक असे. ‘ पाटलूण ‘ हा शब्द ‘ Pantaloon ‘ या इंग्लिश शब्दाचे मराठी रूप आहे, हे तिने समजून घेतले होते.

काथ्याच्या ‘ बाज ‘ ला ‘ खाट ‘ असेही म्हणतात. हा खाट शब्द इंग्लिश ‘ कॉट ‘ शब्दावरून आला आहे; हे ही तिने मला सांगितले होते. बटाटा हा परदेशातून आपल्याकडे आला आहे हे कळल्यावर तिला आश्चर्य वाटलेच; आणि त्यामुळे आपण त्याला उपासाच्या पदार्थात स्थान दिले आहे; याने ती जास्तच चकित झाली ! सर्वात तिला आश्चर्य वाटले ते ‘ बटाटा ‘ हा शब्द मूळ इंग्लिश शब्द ‘ पोटाटो ‘चेच मराठी रूप आहे हे कळल्यावर. ‘ प ‘ अक्षरचे कधी कधी बोलताना ‘ ब ‘ होते, हे तिला ठाऊक होते.

‘ फरसबी ‘ हा शब्द ‘ फ्रेंच बीन्स ‘ या शब्दाचा अपभ्रंश आहे; हे तिला कळल्यावर ती फरसबीला आवर्जून फ्रेंचबीन्सच म्हणत असे. या फरसबीचे ‘ फरशी ‘ हे अलिकडचं नामाभिधान तिला कितपत रुचले असते; कोणास ठाऊक ? त्यामुळे ‘ फ्लॉवर ‘ या अक्षरश: फुलासारख्या दिसणाऱ्या भाजीला ती ‘ फुलवर ‘ म्हणणे संभवतच नव्हते ! ‘ फराळ ‘ हा शब्द मूळ ‘ फलाहार ‘ या शब्दाचा अपभ्रंश आहे, हे ही ती सांगत असे.

जाता जाता …..

लीनाने एकदा संस्कृत शब्दातील ‘ क्ष ‘ अक्षर मराठीत येताना ‘ ख ‘ होते, हे सांगितले. म्हणून मूळ शब्द ‘ क्षारट ‘ ( ‘ क्षार ‘ असलेले ) चा मराठीत ‘ खारट ‘ होतो, हे सांगितले॰ त्यामुळे लीना सहसा, खारट म्हणत नसे॰ ती आवर्जून ‘ क्षारट ‘ म्हणत असे॰ मग क्ष अक्षर असलेल्या शब्दांची मराठी रूपे कशी झाली हे बघण्याचा आईला छंदच लागला. ‘ क्षीर ( खीर ), ‘ लक्ष्मण ‘ ( लखन ), ‘ अक्षर ‘ ( आखर ), रक्षणे ( राखणे ), भिक्षा ( भीख ) ‘ इक्षु ( हिंदीत ‘ ईख ‘, मराठीत उस ), ‘ शिक्षा ‘ ( हिंदीत ‘ सिख ‘ ), असे काही शब्द आम्ही शोधून काढले.

मात्र साखर हा शब्द ‘ साक्षर ‘ या शब्दाचा अपभ्रंश नव्हे, हे माझे विनोदी निरीक्षण तिला आवडत असे !

गम्मत ……

य चा ज होतो; सिंहचे इंग्लिश रुपांतर ‘ सिन्हा ‘ होते. त्यामुळे 1998 ते 2004 अशी 6 वर्षे अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात एकाच नावाचे दोन मंत्री होते; ते किती लोकांच्या लक्षात आले होते कोणास ठाऊक ?

ते मंत्री म्हणजे जसवंत सिंह आणि यशवंत सिन्हा !

वान्द्राचे बांद्रा होते, मग वरळीचे ‘ बरळी ‘ चे का नाही, ही माझी शंका तिला रास्त वाटे !

प्रकाश चांदे.

— लेखन : प्रकाश चान्दे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Vilas Baburao Sarode,Chh.sambhajinagar, Aurangabad on प्रेरणेचा झरा : अलका भुजबळ
विजय पवार, नासिक on प्रेरणेचा झरा : अलका भुजबळ