Saturday, April 13, 2024
Homeसाहित्यअवती भवती : 33

अवती भवती : 33

आणखी मनोरंजक व्युत्पत्ती

‘अठरा विश्वे दारिद्र्य ‘ मधील अठरा विश्वे कोणती, असा प्रश्न एकदा उत्पन्न झाला. मग त्यांचा शोध घेतल्यावर ती अठरा विश्वे नसून अठरा विसे म्हणजे 18 x 20 ( म्हणजे 360 ) असे आहे असे कळले. याचा अर्थ 360 दिवस म्हणजे बाराही महिने गरिबी आहे. पूर्वी कुठलीही गोष्ट विसाच्या पटीत मोजली जायची. ती विसाच्या पटीतच का याचेही कोडे उलगडले. कारण माणसाच्या हाता पायाची एकंदर बोटे वीस. म्हणून मोजताना 20 चे माप सोयिस्कर असे.

‘ साटंलोटं ‘ या शब्दाबद्दलही तिला कुतूहल होते. काही वर्षांनी त्याचे मूळ कळले. मारवाडी लोकांत मुलग्याचे लग्न ठरवताना वरपक्ष वधूपक्षाकडून अवास्तव मागण्या करतो. वधुपक्षाला शक्य असले तरी त्या पुरवण्याची इच्छा नसे. मग त्यावर उतारा म्हणून वधुपक्षाकडील मुलग्याचे लग्न वर पक्षातील मुलीशी ठरवण्याचा देकार देत. मग वधुपक्ष वरपक्षाकडून तितक्याच किंवा जास्त मागण्या मागत असे. हे टाळण्यासाठी मूळचा वरपक्ष आपल्या अवास्तव मागण्या मागे घेत असे. मग दोन्ही लग्न व्यवस्थित पार पाडली जात. एका सख्ख्या भावा बहिणीच्या जोडीशी दुसऱ्या सख्ख्या भावा बहिणीचे लग्न लावण्याच्या या पद्धतीला ‘ साटंलोटं ‘ म्हटले जाते.

अर्थात, प्रत्यक्षात आपण हा शब्द खूप वेगळ्या अर्थाने वापरतो. तरीही, नंतर कधी हा शब्द वापरण्याची वेळ आली की, ती या पद्धतीची आठवण करून देत असे.

संस्कृत मध्ये ‘ शालक ‘ या शब्दाचा अर्थ ‘ बायकोचा भाऊ ‘ असा आहे. ‘ रायगडाला जेव्हा जाग येते ‘ या नाटकाच्या पुस्तकात प्रा. वसंत कानेटकरांनी शेवटी विस्तृत पार्श्वभूमी दिली आहे. त्यात हंबीरराव मोहितेबद्दल लिहिताना कानेटकरांनी ‘ तो शिवाजी महाराजांचा विश्वासू शालक होता ‘, असे वर्णन केले आहे. मी या वेळी प्रथम शालक हा शब्द वापरलेला पाहिला. तेव्हा आईनेच त्याचा मला अर्थ सांगितला.

आपल्याकडे ‘ मेहुणा ‘ हा शब्द बायकोचा भाऊ आणि बहिणीचा नवरा अशा दोन्ही अर्थी वापरला जातो. पण त्यामुळे कधी कधी ऐकणाऱ्याला अर्थबोध होत नाही; मग त्याचा अर्थ उलगडून सांगावा लागतो. खरं तर शालक आणि मेहुणे असे दोन वेगळे शब्द असताना अशी शब्दांची कंजुषी का केला जाते ते कळत नाही; असे आई आणि मी चर्चेत म्हणत असू.

नंतर मी इंग्लिश शिकल्यावर या दोन्ही नात्यांसाठी ‘ Brother – in – Law ‘ असा एकच शब्द प्रयोग आंग्ल भाषेत असल्याचे मला कळले. मग बहुधा तेच कारण असावे असे मला आणि आईला वाटू लागले.

मात्र, मी तेव्हापासून, म्हणजे 1963 पासून, बायकोचा भाऊ या साठी कटाक्षाने शालक हा शब्द वापरतो. पण अद्यापपर्यंत बहुसंख्य लोकांना याचा अर्थ ठाऊक नाही, असेच मला आढळून आले आहे. मात्र, क्रिकेट खेळाचे मराठीत धावते समालोचन करणाऱ्या बाळ पंडितांनी एकदा 1970 च्या दशकात सुनील गावस्कर आणि विश्वनाथ हे दोन फलंदाज एकत्र फलंदाजी करत असताना ‘ मैदानावर या दोघा मेहुणे शालकांची जोडी खेळत आहे ‘, असे उद्गार काढले होते. विश्वनाथने गावस्करच्या कविता नावाच्या बहिणीशी लग्न केले आहे.

महाडजवळ पोलादपूर म्हणून आमच्या लहानपणी ‘ पेटा ‘ होता. आता त्याचे तालुक्यात रुपान्तर झाले आहे. त्याचे नाव कसे आले याचा प्रश्न तिला पडला होता. कारण तिला पोलाद ( Steel ) ठाऊक होते. तेथे लोखंड खाणीत मिळत होते अथवा पोलाद तयार होत होते का, याचा शोध मी घेतला. तर तसे काही नव्हते.

त्यावेळेस मला शाळेत सुप्रसिद्ध इतिहास संशोधक शां. वि. आवळसकर हे शिक्षक होते. ते एकदा अशीच माहिती सांगत असताना तेथे अफजलखानाचा मुस्लीम सरदार पोलादजंग याची छावणी बरेच वर्षे होती; त्यामुळे पोलादपूर असे नाव पडले, असे त्यांच्या बोलण्यात आले. ते मी तिला सांगितले.

1960 पर्यंत जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांची नावे अनुक्रमे पूर्व खानदेश आणि पश्चिम खानदेश अशी होती. खानदेश हे नाव मूळचे ‘ कान्हदेश ‘ या शब्दाचा अपभ्रंश आहे, हे ती सांगे. कान्ह म्हणजे गवळी. हा गवळ्यांचा / गोपालांचा प्रदेश असे ती सांगे. मात्र, मूळचे जळगावचे ज्येष्ठ लेखक आणि अभ्यासक दिवाकर गंधे यांनी मला तेथे औरंगजेबाच्या अहमदाबादच्या एका खानाची छावणी होती, म्हणूनही खानदेश असे म्हणतात; असे सांगितले. हीच गोष्ट मला माझा सांगलीचा इतिहासाचा प्राध्यापक मित्र चंद्रहास खाडिलकर यानेही सांगितली.

मी नासिकला स्थायिक झाल्यावर तेथल्या ‘ देवळाली ‘ गावाच्या नावाची व्युत्पत्ती आम्हाला कळली. मुंबईहून आगगाडीने येताना नासिक दिसू लागले की, तेथली देवळे दिसायची. त्यामुळे ‘ देवळे आली ‘ असे लोक म्हणू लागले; आणि त्याचेच रुपांतर यथावकाश ‘ देवळाली ‘ मध्ये झाले !

शूर्पणखेचे कान आणि ‘ नासिका ‘ लक्ष्मणाने तलवारीने छाटून टाकले ते नासिकलाच; म्हणून गावाचं नाव नासिक झालं.

माझे श्वशुर गोविंद मुकादम हे रत्नागिरीजवळच्या ‘ फणसावळे ‘ गावाचे. या नावाची निश्चित व्युत्पत्ती मला ठाऊक नाही. पण ते नाव ‘ फणस ‘ आणि ‘ आवळे ‘ यांच्यावरून आले असावे; असा माझा अंदाज आहे. आईला ही व्युत्पत्ती मनोरंजक वाटली !

गुजरातेत ‘ दोहद ‘ म्हणून एक गाव आहे. हे गाव म्हणजे औरंगजेबाचे जन्म स्थान. मात्र, या गावाचे मूळ नाव ‘ दोहद्द ‘ आहे. कारण हे गाव गुजरात आणि राजस्थान या दोन राज्यांच्या हद्दींवर वसलेले आहे. नन्तर व्यवहारातले याचे रूप झाले ‘ दोहद ‘. आईला हे ठाऊक असल्यामुळे ती खूप वेळा बोलण्यात याचा उल्लेख करायची.

आता त्याचं नाव दाहोद झालं आहे.

मध्य प्रदेशातील इंदूरला लागून असलेल्या ‘ महू ‘ गावाचे नाव ‘ Military Hostel Of Warriors – MHOW — म्हो वरून आले. कारण तो भाग युद्धातल्या सैनिकांसाठी वसवलेला होता, असे मला नंतर काही वर्षांनी समजले. या म्हो चे प्राकृत रूप महू झाले. हे ही मी तिला सांगितले.

कर्नाटकात विजयनगरच्या साम्राज्यात ‘ अनागोंदी ‘ या नावाचे एक टीचभर संस्थान होते ! तेथला कारभार कमालीचा बेशिस्त, भोंगळ आणि ढिला होता. त्यावरून अनागोंदी शब्दाचा अर्थ रूढ झाला.

रशियाजवळ ‘ कजाकिस्तान ‘ म्हणून एक देश आहे. तेथले लोक खूप भांडखोर आहेत. म्हणून भांडखोर लोकांना कजाक – कजाग म्हटले जाऊ लागले. हे तिला कळले तेव्हा तिला गम्मत वाटली.

खुद्द महाड गावाच्या नावाच्या दोन व्युत्पत्ती सांगितल्या जायच्या. त्या तिला ठाऊक होत्या. एका होती महा हाट ( हाट म्हणजे बाजार ). त्याचे महाहाड ( कारण ट चा ड होतो. ) करत ‘ महाड ‘ झाले. दुसरी व्युत्पत्ती ‘ महा आड ‘ ( आड म्हणजे विहीर ). त्याचे ‘ महाड ‘ झाले.

रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी ‘ पाचाड ‘ म्हणून गाव आहे. त्याची ही व्युत्पत्ती ‘ पाच वड ‘ पासून पाचाड अशी झाल्याचे ती ऐकून होती. पुण्यात ‘ एरंडवणा ‘ म्हणून जो भाग आहे, त्याचे मूळ नाव ‘ एरंडवन ‘ आहे हे जेव्हा तिला कळले, तेव्हा हे आपल्या या पूर्वीच कसे लक्षात आले नाही; याचे तिला आश्चर्य वाटले !

तिचा हा छंद तिच्या निधनापर्यंत टिकून होता. तिच्या शेवटच्या दिवसांतही रुग्णालयात मी असलो कि आमच्या गप्पांत व्युत्पत्ती हटकून येत असत.

आम्ही 2 बहिणी 4 भाऊ. पण मी सोडलो, तर बाकी कोणालाच या विषयात गोडी कशी उत्पन्न झाली नाही; याचं मला अजून आश्चर्य वाटतं !

जाता जाता . …

महाविद्यालयात मला आंग्ल भाषेचा अभ्यास करताना सुप्रसिद्ध लेखक आणि माझे प्राध्यापक प्राचार्य रा. भि. जोशी यांनी इंग्लिश भाषेमध्ये ही विसाच्याच पटीत पूर्वी मोजत असत; असे सांगितले. वीस वस्तुंच्या एका समूहाला ‘ स्कोर ‘ ( Score ) असे म्हणतात. यावरूनच किती मोजमाप झाले अशा अर्थी ‘ स्कोर किती झाला ‘ असे लोक विचारू लागले. हे मी तिला सांगितल्यावर तिला आश्चर्य वाटले.

हिंदी भाषेत मेहुण्याला ‘ साला ‘ म्हणतात. हा साला शब्द शालक या शब्दावरून आला, हे ती बऱ्याच वेळा सांगायची.

जळगाव – भुसावळकडे मात्र ‘ शालक ‘ हा शब्द सर्रास वापरला जातो. मेहुणे ( बहिणीचे यजमान ) याला महाराष्ट्रात विविध विभागांत ‘ दाजी ‘, ‘ पाहुणे ‘, ‘ भावोजी ‘ अशा विविध नावांनी संबोधितात.

1960 साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यावर ‘ पूर्व खानदेश ‘ ऐवजी जळगाव, ‘ पश्चिम खानदेश ‘ ऐवजी धुळे, ‘ दक्षिण सातारा ‘ ऐवजी सांगली आणि ‘ उत्तर सातारा ‘ ऐवजी सातारा अशी नामाभिधाने शासनाने केली.

रायगडच्या पायथ्याशी पाच वड असलेल्या गावाचं नाव ‘ पाचाड ‘ झालं; आणि नासिकजवळ पाच वड असलेल्या भागाचं नाव ‘ पंचवटी ‘ झालं !

प्रकाश चांदे.

— लेखन : प्रकाश चान्दे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments