Saturday, July 27, 2024
Homeसाहित्यअवती भवती : 34

अवती भवती : 34

अफलातून समयसूचकपणा !

शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांच्या हजरजबाबीपणाची एक गोष्ट सांगण्यासारखी आहे॰

1970 साली महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचार्‍यांनी ज्यादा वेतनवाढीसाठी एक सर्वव्यापी संप पुकारला॰ त्यावेळेस वसंतराव नाईक हे मुख्य मंत्री होते॰ हे तसे चांगले आणि खंबीर शासक होते॰ त्यांनी आत्ता वेतनवाढ होणार नाही असे सांगितले॰

त्या वेळेस मी गोवंडीच्या ‘ व्हिक्टरी फ्लास्क कंपनी ‘ त नोकरीला होतो॰ तेथेच या संपाचे एक पुढारी आमदार कॉ॰ जी॰ एल॰ पाटील नोकरी करत होते॰ हे विचाराने अंतर्बाह्य साम्यवादी॰ कामगार चळवळीचा दीर्घ अनुभव असलेले होते॰ माझे आणि त्यांचे चांगले जमत असे॰ रोज जेवताना आमच्या चर्चा होत असत॰

आदल्या दिवशी या संपकर्‍यांच्या सभेत दणदणीत भाषण करून आलेले पाटील दुसर्‍या दिवशी कंपनीत आल्यावर त्यांना संप किती दिवस चालेल आणि शेवटी हे कर्मचारी जिंकतील का, असे विचारल्यावर ते म्हणाले की नाईक या वेळेस भलतेच स्टर्न आहेत॰ आम्हाला काही जिंकण्याची आशा नाही॰

मला धक्काच बसला !

कारण वर्तमानपत्रातून ज्या बातम्या येत होत्या त्यावरून हे कर्मचारी शासनाला झुकवणार असेच दृश्य दिसत होते॰ पाटील म्हणाले, तसेच झाले॰ संप लांबला॰ सर्व सामान्य लोकांना या संपाचा त्रास होऊ लागला॰ अखेरीस आता हा संप मागे घेतला गेला नाही तर शिवसैनिक सचिवालयात जातील ( त्यावेळेस याचे नाव मंत्रालय झाले नव्हते॰ ) आणि कामाला सुरवात करतील असा ठाकर्‍यांनी इशारा दिला॰

त्यावेळेस शासकीय आरे दुधावरच सर्वजण अवलंबून असत॰ ते दूधही शिवसैनिकांनी विकायला शासनाला मदत केली॰

अखेरीस संप बारगळला !

पदरात काहीही न पडता, ( आणि संपकाळातल्या रजेची वेतन कपात मान्य करत ) नामुष्की स्वीकारत सर्व शासकीय कर्मचारी परत कामावर रुजू झाले॰ या नंतर शिवसेनाप्रमुखांनी बान्द्र्याच्या MIG या शासकीय कर्मचार्‍यांच्या वसाहतीत एक सभा घेऊन आपले म्हणणे स्पष्ट केले॰

या सभेत एका मध्यमवयीन स्त्रीने त्यांना तुमच्या शिवसैनिकांनी संप काळात शासकीय कामे केली, हा संप फोडेपणा नाही का; असा प्रश्न विचारला॰

त्यावर ठाकर्‍यांनी उत्तर दिले की, हा संप फोडेपणा जरूर होता; पण कित्येक लहान मुले, आजारी व्यक्ती आणि वृद्ध लोकांचे दूध हेच अन्न असते, त्यामुळे त्यांची आबाळ होऊ नये या माणुसकीच्या दृष्टीकोनातून हा निर्णय मी घेतला असे उत्तर दिले॰

त्यांनी शेवटी त्या माउलीला टोला हाणला॰

हे दूध शिवसैनिक विकत होते तेव्हा लाईनीत उभे राहून तुम्ही आणि तुमचे मित्र, सहकारी, शेजारीच हे दूध विकत घेत होते ना, असा प्रतिप्रश्न केला. आणि अखेरीस ते म्हणाले की हे दूध विकायला मदत करणारे शिवसैनिक संपफोडे आणि तेच दूध विकत घेणारे तुम्ही सर्व मात्र संपफोडे नाहीत हा कुठचा न्याय ?

या मर्मभेदी प्रतिप्रश्नाने ठाकर्‍यांनी ती सभा जिंकली !

पं. जवाहरलाल नेहरू यांचे वडील पं. मोतीलाल नेहरू हे उत्कृष्ट बॅरिस्टर होते. अंगभूत हुशारीच्या जोरावर त्यांची वकिली सुरवातीपासूनच एकदम जोरात चालू लागली. रोज किमान 4 – 5 खटल्यांचे ‘ ब्रीफिंग ‘ त्यांच्याकडे असायचे.

सकाळी त्यांचा साहाय्यक येऊन त्या दिवशी कोणते खटले कोर्टात उभे राहणार आहेत, ते सांगून प्रत्येक खटल्याची सर्व माहिती त्यांना देत असे. मग ते कोर्टात उभे राहून प्रतिपादन करत असत.

एक दिवस काय झाले कोणास ठाऊक; एका खटल्यात मोतीलालजी विरोधी पक्षाची बाजू मांडू लागले ! त्यांचा साहाय्यक गडबडला ! पण त्याने थोडा वेळ वाट पाहिली. मात्र, मोतीलालजींनी एकापाठोपाठ 4 – 5 मुद्दे विरोधी पक्षाला उपयुक्त ठरतील, असे मांडले.

अखेरीस त्यांचा साहाय्यक त्यांच्या कानाशी लागला; आणि काय घोटाळा झाला आहे ते सांगू लागला.

अनुभवी मोतीलालजी अजिबात डगमगले नाहीत.

त्यांनी न्यायाधीशांना हे मुद्दे त्यांनी का मांडलेत ते सांगितलं.

मोतीलालजी म्हणाले न्यायाधीश महोदय, विरोधी पक्षाचे विद्वान वकील त्यांच्या अशिलाच्या समर्थनार्थ हे मुद्दे मांडण्याची शक्यता आहे. मात्र, हे सर्व मुद्दे कसे चुकीचे आहेत, ते मी आंता सांगणार आहे.

असे म्हणून इतका वेळ स्वत: मांडत असलेले मुद्दे कसे चुकीचे आहेत, हे ते सांगू लागले; आणि स्वत:चेच सर्व मुद्दे अगदी तपशीलवार खोडून काढू लागले !

मोतीलालजींना ओळखणारे न्यायाधीश आणि काही चाणाक्ष वकिलांच्या लक्षात काय झाले ते येण्यास वेळ लागला नाही !

त्यांचा साहाय्यक तर ते प्रतिपादन आटोपल्यावर त्यांच्या पायाच पडायचा बाकी राहिला होता !

1971 सालच्या गणेशोत्सवात नामवंत साम्यवादी पुढारी कॉ. श्रीपादअमृत उर्फ एस. ए. डांगे गिरणगावात एका सायंकाळी चाळींच्या समूहात व्याख्यान देत होते. डांगे यांचे भाषण मुद्देसूद. भाषा चटकदार आणि हजरजबाबीपण तर अंगात ओतप्रोत भरलेला. स्वभाव कमालीचा मिश्कील !

त्यांचे भाषण चालू असताना त्या मैदानात काही मुले क्रिकेट खेळत होती, त्यांचा चेंडू डांगे यांच्या व्यासपीठाजवळ आला.

समयसूचक डांगे यांना छान मुद्दा मिळाला !

1962 पासून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असलेला पतौडीचा नबाब मन्सूर अली खान याची नुकतीच गच्छंती झाली होती. त्याच्या जागी अजित वाडेकर हा कर्णधार झाला होता; आणि तो पर्यंत वेस्ट इंडीज आणि इंग्लंड या परदेशांत कधीही विजय न मिळवलेल्या भारताच्या संघाला या दोन्ही देशांत विजय प्राप्त झाला होता.

हे सर्व श्रोत्यांना सांगून डांगे यांनी श्रोत्यांना प्रश्न विचारला; की हे विजय कशामुळे प्राप्त झाले ?

आणि स्वत:च त्याचे खास साम्यवादी उत्तर दिले.

ते म्हणाले गेली 8 वर्षे एक संस्थानचा राजा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होता. तेथे अजित वाडेकर हा सामान्य लोकातून आलेला खेळाडू कर्णधार झाला. खेळातील राजेशाही संपल्यामुळेच आणि सामान्य माणसाच्या हातात सूत्रे गेल्यामुळेच हे दोन्ही अभूतपूर्व विजय प्राप्त झाले !

डांगे यांनी सभा जिंकलीच !

जाता जाता …..

आचार्य रजनीश यांचे मूळ नाव चंद्रमोहन जैन. ते शालेय दिवसांपासून उत्कृष्ट वक्ते होते. साहजिकच, सर्वच वक्तृत्व स्पर्धा तेच जिंकत असत.

एकदा त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांत एका वक्तृत्व स्पर्धेत नेहेमीप्रमाणे ते अंतिम फेरीत दाखल झाले. ज्या दिवशी अंतिम स्पर्धा होती; त्या दिवशी गावातील सर्व लोक चंद्रमोहन जैन याचे वक्तृत्व ऐकायला उत्सुकतेने आले होते.

मात्र, त्या दिवशी त्यांचा प्रतिस्पर्धी विद्यार्थी होता तो स्पर्धेकडे फिरकलाच नाही !

स्वाभाविकच, चंद्रमोहन जैनचे भाषण ऐकायला आलेल्या श्रोत्यांची प्रचंड निराशा झाली. आता जैनला ‘ वॉक ओव्हर ‘ मिळाल्यामुळे ढाल तर त्याला देणे प्राप्तच होते. मात्र, त्या स्पर्धेचे परीक्षक हे ही जैनच्या वक्तृत्वाचे चाहते होते. त्यांनाही याला अशीच ढाल देणे प्रशस्त वाटेना.

मग परीक्षकांपैकी एकाला शक्कल सुचली !

त्यांनी जैनला सांगितलं की एवीतेवी ढाल तर तुला मिळालीच आहे. श्रोत्यांप्रमाणेच आम्हीही तुझ्या वक्तृत्वाचे चाहते आहोत. तर तू आज लागोपाठ तुझे आणि प्रतिस्पर्ध्याचे अशी दोन भाषणे कर.

आम्हाला तुझ्या वक्तृत्वाची डबल मेजवानी मिळेल !

जैन तर ते ऐकून चक्रावूनच गेला !

पण श्रोत्यांना ही सूचना आवडली; आणि त्यांनी जोर धरला !

मग जैन उभा राहिला आणि त्याने एकापाठोपाठ एक अशी दोन्ही भाषणे केली.

अर्थात, प्रथम क्रमांकाची ढाल तर त्यालाच मिळणार होती; आणि ती तशी त्याला परीक्षकांनी दिलीही !

मात्र, त्या दिवशी त्याच्या स्वत:च्या भाषणापेक्षा त्याने आयत्यावेळी प्रतिस्पर्ध्याचे जे भाषण केले त्यात स्वत;च्या भाषणापेक्षा सरस मुद्दे होते; असे परीक्षकांनी जाहीर केले !

त्याला ढाल दिल्याचे परीक्षकांनी जाहीर केले !

गम्मत …..

पतौडीचा नबाब मन्सूर अली खान हा प्रख्यात हिंदी चित्रपट अभिनेत्री शर्मिला टागोर हिचा पती.

वरती वसंतराव नाईक यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख आला आहे.

वसंतराव नाईक हे डिसेंबर 1963 ते फेब्रुवारी 1975 असे सलग सव्वा अकरा वर्षे मुख्यमंत्री होते.

हा विक्रम अद्याप अबाधित आहे !

क्रिकेट संघाचे कर्णधारपद संस्थानिकाकडून एका सामान्य व्यक्तीकडे आल्यामुळे परदेशांत विजय मिळाले असा डांगे यांनी मुद्दा मांडला.

पण हे संस्थानिकाकडून सामान्य माणसाकडे कर्णधारपद विजय मर्चंट या धनाढ्य उद्योगपातीमुळे आले, हे डांग्यानी सफाईने लपवले !

ते कसे आले, ही एक कथाच आहे ! त्याबद्दल नंतर कधीतरी !

प्रकाश चांदे.

— लेखन : प्रकाश चान्दे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८