चित्रपटातील गमती जमती !
पूरे पचास हजार ! ‘ दिल्लीचा मोहन माखिजानी याला क्रिकेटची अतिशय आवड होती. तो चांगलं क्रिकेट खेळत असे. त्याला भारतीय संघातर्फे कसोटी क्रिकेट खेळण्याची इच्छा होती. 1960 / 70 च्या दशकापर्यंत मुंबई सोडलं तर अन्यत्र क्रिकेट एव्हढे भरभराटीला आलं नव्हतं. साहजिकच त्यात करियर करायचं असल्यास खेळाडूला मुंबईला येणं भाग असे. त्यामुळे क्रिकेटर म्हणून करीअर करायला मोहन माखिजानी हा मुंबईला आला.
लवकरच त्याच्या लक्षात आलं की येथे क्रिकेटमध्ये जबरदस्त स्पर्धा आहे. त्यात आपला निभाव लागणार नाही. त्याला अभिनयाची आवड होतीच; आणि तो दिल्लीत नाटकांत भूमिकाही करत असे. म्हणून रोज दोन्ही वेळेला जेवायला मिळावं म्हणून त्यानं व्यावसायिक हिंदी / इंग्लिश नाटकांत भूमिका करणं सुरू केलं. तेथून तो चित्रपट सृष्टीत गेला; आणि तेथेच स्थिरावला.
त्याचं पडद्यावरचं नाव ‘म्याकमोहन ! ‘
त्याची ‘ शोले ‘ चित्रपटातील ‘ सांभा ‘ ची भूमिका मोठी होती. पण प्रथम संकलनात आणि नंतर परिनिरीक्षण मंडळाने काटछाट केल्यामुळे त्याच्या भूमिकेचा बराचसा भाग कापला गेला. एका महाकाय दगडी शिलेवर बंदूक घेऊन बसून फक्त सभोवती पहात राहणे; इतकीच ती भूमिका उरली.
त्याने दिग्दर्शक रमेश सिप्पीकडे जोरदार शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. रमेश सिप्पींनी त्याची समजूत घातली; आणि ते शेवटी म्हणाले की, जर हा चित्रपट चालला तर प्रेक्षक कधीच सांभाला विसरू शकणार नाहीत. म्याकमोहनला याचा इतका राग आला की, तो ‘ शोले ‘ चित्रपटाच्या प्रीमिअरला तर गेला नाहीच; पण नंतरही कधी त्याने तो चित्रपट पाहिलाच नाही.
पण तो नंतर रस्त्यावरून जाऊ लागला की, लोक रस्त्यात थांबून त्याला ‘ सांभा ‘ म्हणून हाका मारू लागले. याचे आश्चर्य वाटून तो एके दिवशी ‘ मिनर्व्हा ‘ मध्ये सहकुटुंब ‘ शोले ‘ चित्रपट पहावयास गेला. मध्यांतरात तो दिसताच लोक ‘ सांभा, सांभा ‘ अशा हाका मारून त्याला घेराव घालू लागले. अखेरीस त्याला कसेबसे बाहेर काढले; आणि तो घरी गेला.
रमेश सिप्पींचे शब्द खरे ठरले !
खरी गम्मत म्हणजे अख्ख्या चित्रपटात या पात्राला केवळ तीनच शब्द बोलावयाचे आहेत. तरीही तो अत्यंत लोकप्रिय झाला.
ते तीन शब्द म्हणजेच ‘ पूरे पचास हजार ! ‘
‘ फूल तुम्हे भेजा है … ‘
1960 च्या दशकात कल्याणजी आणि आनंदजी हे तसे लोकप्रिय संगीत दिग्दर्शक होते. त्यांची अनेक गाणी लोकांच्या ओठी असत. शिवाय, त्यांचे वर्षाला 7 -– 8 चित्रपट सहज प्रदर्शित होत असल्यामुळे त्यांची नवनवीन गाणी रसिकांच्या ओठी सदैव असत.
एक तरुणी या द्वयीची गाणी ऐकून झपाटून गेली !
तिने या जोडीपैकी आनंदजी यांना एक प्रेमपत्र पाठवलं. या पत्रामध्ये त्या तरुणीनं हृदयाचं चित्र काढून त्यावर एका गुलाबाचं फूल चिकटवलं होतं. इतकंच नव्हे; तर आनंदजींच्या नावावर तिच्या गुलाबी ओठांची लिपस्टिकची मोहर उमटवली होती ! ते प्रेमपत्र बघून सरळमार्गी विवाहित आनंदजी खूष झाले; पण गडबडलेही !
त्यांची कुचंबणा झाली !
गम्मत म्हणजे ते प्रेमपत्र त्यांना कोणालाच दाखवता येईना !
त्यांच्या पत्नीला, असं प्रेमपत्र आल्याचं कळलं तर, त्या घरात हंगामा करतील अशी भीती आनंदजी यांना वाटू लागली !
त्यामुळे त्यांनी ते प्रेमपत्र लपवून ठेवलं !
मात्र, एके दिवशी त्यांना राहवेना !
इंदिवरला शपथ घालून त्यांनी ते पत्र त्याला वाचायला दिलं !
याच काळात ‘ सरस्वतीचंद्र ‘ ( 1968 ) या चित्रपटाच्या गाण्यांचं काम चाललेलं होतं.
हे सहज, गम्मत म्हणून अस्सल आणि ‘ प्रेक्षणीय ‘ प्रेमपत्र बघून कवि हृदयाच्या इंदिवरची काव्य प्रतिभा जागी झाली नसती तरच नवल !
कोणालाही, अगदी स्वत:लाही, कळण्याच्या आताच त्याच्या तोंडून –-
‘ फूल तुम्हे भेजा है खत मे फूल नही मेरा दिल है… ‘
ही ओळ उत्स्फूर्तपणे बाहेर पडली !
ही ओळ तेथे असलेल्या सर्वांनाच आवडली !
कल्याणजींनी त्याला ताबडतोब तिथल्या तिथं चालही लावली. ती ही सर्वांना पसंत पडली !
मग कल्याणजी, आनंदजी आणि इंदीवर बसले ठिय्या देऊन !
काही वेळातच हे गीत चालीसकट जन्माला आलं !
त्याच सपाट्यात या गाण्याचं ध्वनिमुद्रणही, या जोडीची गायक – गायिकांची आवडती लता आणि मुकेशच्या आवजात ध्वनिमुद्रितही करून टाकलं !
कल्याणजी आणि आनंदजी जोडीपैकी कल्याणजी हे अतिशय विनोदी होते; आणि ते सतत, येता जाता विनोद करत असत !
आनंदजीला आलेल्या या अनोख्या प्रेमपत्राची बातमी यथावकाश फुटलीच !
मग विनोदी कल्याणजीनं आनंदजी या धाकट्या भावाची येता जाता कशी फिरकी ‘ खेचली ‘ असेल, याची आपण कल्पना करू शकतो !
नंतर काही दिवस सर्वचज
ण त्या पत्रावरून आनंदजींची येता जाता फिरकी ‘ खेचत ‘ असत !
‘ दे दो मेरा पाच रुपय्या बारह आना … ‘
1940 च्या दशकापासून आर. सी. तलवार नावाचे एक चित्रपट निर्माते होते. 1950 च्या दशकात त्यांनी किशोरकुमारला घेऊन ‘ रुखसाना ‘, ‘ मेमसाब ‘ आणि ‘ इल्झाम ‘ या चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले होते.
दुर्दैवानं हे तीनही चित्रपट ‘ बॉक्स ऑफिस ‘ वर आपटले !
त्यामुळे ते किशोरकुमारचं जवळ जवळ पाच हजार रुपये देणं लागत होते.
त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली असल्यामुळे ते किशोरकुमारचं देणं देऊ शकत नव्हते.
किशोरकुमारनं त्यांच्याकडे पैशाचा तगादा लावला होता. तलवार हे ही ‘ देऊ, देऊ , असं आश्वासन देत दिवस ढकलत राहिले.
किशोरकुमार तसा पैशाचा व्यवहाराला ‘ चिक्कू ‘ म्हणावा इतका दक्ष होता. हे तर त्याच्या कष्टाचे पैसे होते. ते त्याला वसूल करण्याचा पूर्ण हक्क होता.
त्या व्यवसायात कसे पैसे येतात हे किशोरकुमारला ठाऊक असल्यामुळे त्यानंही काही दिवस सबुरीनं घेतलं. नंतर मात्र, त्याला वाटू लागलं की, या तलवार महाशयांचा पैसे देण्याचा इरादा दिसत नाही !
मग मात्र, एक दिवस, त्याचं डोकं सणकलं !
एका रात्री लोकांची निजानिज झाल्यावर किशोरकुमार हा तलवार रहात असलेल्या सोसायटीशी गेला; आणि त्याच्या दाराशी उभा राहून जोरजोरानं ‘ ए तलवार, दे दे मेरा पांच हजार रुपय्या ‘ असं ओरडू लागला !
हा प्रकार काही वेळ चालू राहिला !
सर्वत्र नीरव शांतता असताना हे किशोरकुमारचं वाढत जाणाऱ्या आवाजातलं ओरडणं हळू हळू लोकांच्या कानांवर पडू लागलं. सोसायटीतील रहिवासी त्यांच्या त्यांच्या सदनिकेच्या खिडक्या उघडून हा काय प्रकार आहे, म्हणून पाहू लागले.
रहिवाशांनी चवकशी केल्यावर त्यांना खरा प्रकार कळला !
या मुळे आर. सी. तलवार याची बदनामी झाली !
त्याची अब्रूच चव्हाट्यावर आली !
शेवटी चाणाक्ष आर. सी. तलवारनं किशोरकुमारला दुसऱ्या दिवशी सर्व पैसे चुकते करतो असं सर्वांच्या समोर जाहीर आश्वासन दिलं.
किशोरकुमारनं जाता जाता, उद्या पैसे नाही मिळाले तर या ही पेक्षा तमाशा करेन, असा दमच आर. सी. तलवार याला दिला !
… आणि हा दम किशोरकुमार सहज प्रत्यक्षात आणेल, याची खात्री आर. सी. तलवारला होती.
त्यामुळे त्यानं दुसऱ्या दिवशी किशोरकुमारचं सर्व देणं एक रकमी चुकतं केलं !
ही हकीकत त्याच काळात खुद्द किशोरकुमार निर्मित ‘ चलती का नाम गाडी ‘ या चित्रपटाची गीतं लिहित असणाऱ्या गीतकार मजरूह सुलतानपुरी यांना बोलता बोलता कळली.
किशोरकुमारच्या धडपडीच्या काळात त्याचं स्टुडीओतील उपहारगृहाचं 5 रुपये 12 आणे बिल थकलं होतं. त्यामुळे तो त्या उपहारगृहात काही खायला गेला की, त्या उपहारगृहाचा मालक त्याला त्याचे 5 रुपये 12 आणे देण्याबद्दल तगादा करायचा !
हेही त्यानं गीतकार मजरूह सुलतानपुरींना सांगितलं !
त्याबरोबर त्यांनी याच चित्रपटातील ‘ मै सितारोंका तराना मै बहारोंका फसाना… ‘ ‘ या गाण्यात ‘ दे दो मेरा पांच रुपय्या बारह आना … ‘ ही ओळ समाविष्ट केली.
ती ओळ अर्थाच्या दृष्टीनं तर चपखल बसलीच; शिवाय, चालीच्या दृष्टीनंही ‘ मीटर ‘ मध्ये ‘ फिट्ट ‘ बसली !
1958 च्या डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील हे चिरतरुण गाणं आज 64 वर्षांनीही रसिकांना आठवतं !
गम्मत ….
वरती उल्लेख आलेला म्याकमोहन हा अभिनेता 1990 च्या दशकातल्या लोकप्रिय अभिनेत्री रवीना टंडन हिचा मामा !

— लेखन : प्रकाश चान्दे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800