Saturday, April 13, 2024
Homeसाहित्यअवती भवती : 37

अवती भवती : 37

लाखो सुनांची आई !

कमलाबाई ओगले यांच्या ‘ रुचिरा ‘ ची मनोरंजक जन्मकथा आहे; खुद्द कमलाबाई ओगले यांनीच ती मला सांगितली आहे॰

त्यांचे हे पुस्तक 1970 च्या सुमारास आले॰ त्यावेळेस खरं तर मंगला बर्वे यांचे ‘ अन्नपूर्णा ‘ जोरात चालले होतेच॰ पण ‘ रुचिरा ‘ हे पुस्तकही तितक्याच झपाट्याने लोकप्रिय होऊ लागले॰

कमलाबाई ओगल्यांचे यजमान कृष्णाजी वामन ओगले हे नोकरी निमित्ताने अनेक गावी हिंडले॰ नेहेमी नवनवीन पदार्थ करून बघणार्‍या कमलाबाई या सर्व ठिकाणी पाक कला स्पर्धांत भाग घेण्यासाठी, अशा स्पर्धांना परीक्षक म्हणून जाण्यासाठी, नवोदितांना मार्ग दर्शन करण्यासाठी सतत नवनवे पदार्थ शिकत राहिल्या॰ असे पदार्थ घरी करतांना सतत चर्चा होत राहिल्या॰ त्यांतूनच पाककलेवर एखादे सुटसुटीत, आधुनिक पद्धतीने लिहिलेले पुस्तक असावे असा विचार आला॰ त्या काळात ‘ गृहिणी मित्र अर्थात हजार पाक क्रिया ‘ हे आणि ‘ अन्नपूर्णा ‘ पुस्तके उपलब्ध होती.

मात्र, दुर्दैवाची गोष्ट अशी की पुस्तकाचे लेखन करता येऊ शकेल इतकेही कमलाबाईंचे शिक्षण झालेले नव्हते॰ मात्र, कमलाबाईंची कन्या उषा नांदुरकर यांनी सर्व पदार्थांच्या कृती, आईचा पाठपुरावा करत लिहून काढल्या॰ कमलाबाईंचे असे पुस्तक प्रसिद्ध व्हावे असे मनापासून वाटणार्‍या ओगल्यांनी स्वअक्षरांत पुस्तकाची मुद्रण प्रत सिद्ध केली॰

या पुस्तकात सर्व मापे वजना ऐवजी वाटी / चहाचा चमचा यांच्या भाषेत देण्याचे गावोगावच्या अनुभावावरुन सुचले॰

हाच या पुस्तकाचा U.S.P. ( Unique Selling Point ) होता॰

मात्र, तरी कुठलाही प्रकाशक या नाव नसलेल्या बाईचे हे पुस्तक स्वीकारावयास तयार होईना॰ काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले॰ पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर 100 % विश्वास असणार्‍या श्री॰ ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे समान स्नेही श्री॰ भिडे यांच्या मार्फत मुकुंदरावांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला॰ मुकुंदरावांनीही हे पुस्तक स्वीकारण्यास प्रथम नकारच दिला होता॰ पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले !

किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेतर्फे पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले॰ मात्र, एकदा पुस्तक स्वीकारल्यानंतर मुकुंदरावांनी सर्व बाबी 100 % व्यावसायिकरित्या केल्या॰

15 रुपये किम्मतीचे हे पुस्तक आगाऊ नोंदणी करणारांना 10 रुपयांत उपलब्ध करून देण्यात आले॰ तशी 10 रुपये ही किम्मतही ग्राहकाला परवडणारी नव्हतीच॰

मग तत्कालिन उच्चमध्यम वर्गीय ग्राहकांचा शोध, ज्यांच्या कडे दूरध्वनी आहे, स्वयंपाकाचा गॅस आहे आणि ज्यांच्याकडे कार आहे त्यांची यादी डिरेक्टरी, गॅस एजन्सीस आणि कार डीलर्स यांच्यामार्फत तयार केली आणि त्यांना सवलतीचे पत्र पाठवले आणि प्रकाशनाला खास निमंत्रण दिले !

लेखक / कवी ग॰ दि॰ माडगूळकर यांच्या हस्ते 1970 च्या मार्चमध्ये वर्ष प्रतिपदेच्या दिवशी प्रकाशन झालेल्या या पुस्तकाने प्रकाशन व्यवसायात तो पर्यन्त न घडलेला विक्रम नोंदवला !

या पुस्तकाची 2,100 प्रतींची आवृत्ती प्रकाशन समारंभातच बोल बोल म्हणता संपली ! त्यावेळेस 4,200 प्रतींची नोंदणी झाली असल्याने दुसरी आवृत्ती काढली॰ पण या दुसर्‍या आणि आणखी पाच महिन्यांनी आलेल्या तिसर्‍या आवृत्तीने पहिल्याच आवृत्तीची वाट चोखाळली; आणि वर्ष प्रतिपदा आणि विजया दशमी या दरम्यानच दहा हजार प्रतींच्या विक्रमी खपाची नोंद केली !

नंतर या पुस्तकाच्या इतक्या वेगाने आवृत्त्या येत गेल्या की पहिल्या तपातच एक लाख प्रतींचा अभूतपूर्व पल्ला या पुस्तकाच्या विक्रीने गाठला॰ इतक्या कमी वेळात तो पर्यन्त कुठल्याही मराठी पुस्तकांच्या खपाने हा आकडा पार केला नव्हता॰

तो पर्यन्त ‘ भक्तीमार्ग प्रदीप ‘, ‘ श्यामची आई ‘, ‘ गीताई ‘ या पुस्तकांना हे भाग्य लाभले होते; पण या साठी बरीच वर्षे जावी लागली होती॰

पुस्तकाच्या प्रकाशनाला 25 वर्षे होत असतानाच ‘ रुचिरा ‘च्या खपाने दोन लाख प्रतींचा टप्पा ही ओलांडला !

या पुस्तकाच्या पहिल्या एकोणीस आवृत्त्या ‘ स्त्री सखी ‘ने, विसावी आणि एकविसावी आवृत्ती ‘ अपूर्व ने, आणि नंतरच्या आवृत्त्या ‘ मेहता ‘ प्रकाशनाने प्रसिद्ध केल्या॰ या पुस्तकाच्या पंचविसाव्या रौप्य महोत्सवी आवृत्तीचे प्रकाशन तत्कालिन केंद्रीय मंत्री सरोजिनी महिषी यांच्या हस्ते समारंभापूर्वक करून प्रकाशक सुनील मेहता यांनी कमलाबाईंचा सत्कारही केला॰

बर्‍याच वेळा लेखकाला प्रकाशकाचा चांगला अनुभव येत नाही॰ मात्र, कमलाबाईंचे भाग्य इतके थोर की तीन – तीन प्रकाशक बदलूनसुद्धा त्यांना कोठल्याही प्रकाशकाने त्रास दिला नाही, हे त्यांनी मला समाधानाने सांगितले॰ सगळ्यांनीच अपेक्षित रक्कम दिली नाही; पण कबूल केलेली रक्कम वेळोवेळी ठरल्याप्रमाणे अदा केली॰ मात्र, क्वचित अनपेक्षितपणे जादा बोनसही मिळाला !

या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाक कृतींचा समावेश केला आहे॰ त्याच प्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले॰ विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे॰ तेथेही आठ आवृत्त्या आणि 25,000 प्रतींचा पसारा झाला॰ या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत॰ ‘ फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला॰ पहिल्या दहा वर्षांत 7 आवृत्त्या आणि 25,000 प्रतींचा उंबरठा याही पुस्तकाने ओलांडलेला आहे॰

आकाशवाणी, दूरदर्शनवर आणि SNDT मध्ये कमलाबाईंनी प्रात्यक्षिके दाखवली; वर्ग घेतले॰ प्राथमिक शिक्षण धड न झालेल्या स्त्रीने पदवीचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनींना पाक कलेचे पाठ दिले !

एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले॰ हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांनाही आपले पुस्तक वाटते॰ चमचा – वाटीचे सहज सोपे माप; सुंदर, अनलंकृत भाषा, आकर्षक छपाई, वेधक मुखपृष्ठ, रंगीत छायाचित्रे, आणि माफक किम्मत; या सार्‍या गोष्टींमुळे सासरी जाणार्‍या नववधूकडे हे पुस्तक हटकून असायचेच॰ शिवाय, संक्रांत, मंगळागौर, वासंतिक, शारदीय हळदी कुंकू समारंभांत, अन्य कुठल्याही प्रसंगाला हे पुस्तक भेट देणे हे सहज आणि अपरिहार्य ठरले॰ दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘ अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती॰

हा सारा तपशील 1995 सालच्या मार्चमध्ये मी माझा पुणेस्थित घनिष्ट मित्र भास्कर निमकर याच्या बरोबर कमलाबाईंना भेटलो, त्यावेळेस त्यांनी मला सांगितला होता॰

त्यावेळेस 84 वर्षांच्या असलेल्या कमलाबाई तृप्त होत्या॰ प्रकृती छान होती॰ स्मरण लख्ख होते॰ हे सर्व तपशील त्यांनी कुठलाही कागद अथवा संदर्भ हातात न घेता मला सांगितले॰

जाता जाता :

पुस्तकाच्या Blurb ला प्रा॰ मं॰ वि॰ राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला आहे; तर सुप्रसिद्ध चित्रकार द॰ ग॰ गोडसे यांनी याला ‘ अंगरख्याच्या बाहीवरचे लेखन ‘ असे म्हटले आहे॰

गम्मत :

‘ रुचिरा ‘ च्या प्रकाशनाच्या वेळेस किर्लोस्करांकडे लेखक / रेडिओ निवेदक दत्ता सराफ नोकरी करत होते. गम्मत अशी की, ते या गोष्टी विसरलेच होते॰ त्यांची आणि माझी भेट नासिकला झाली. या गोष्टींचा मी आमच्या गप्पांत उल्लेख करताच त्यांना त्या आठवल्या !

या पुस्तकातील न उकडलेल्या बटाट्याची खीर हा प्रकार माझ्या पत्नीने – लीनाने – करून बघितला॰ आम्हा दोघांनाही तो आवडला. त्यामुळे नंतर कोणीही पाहुणे प्रथमच आमच्याकडे जेवावयास आल्यावर आम्ही बटाट्याची खीर हटकून करायचो !

गम्मत म्हणजे कोणालाच ती ओळखता येत नसे !

‘ अजून किती दिवस पाहुणे आले की, तुम्ही बटाट्याची खीर करणार आहात ‘, असा प्रश्न आमची कौटुंबिक घनिष्ट मैत्रीण अंजलि कोनकर करायची॰ ‘

‘ हा पदार्थ पहिल्या झटक्यात कोणी ओळखल्यावर आम्ही ही खीर करणे बंद करणार ‘, असे उत्तर आम्ही देत असू !

हे मी कमलाबाईंना सांगितल्यावर कमलाबाईंना खूपच आनंद झाला; हे सांगणे नकोच !

लीनाच्या निधनानंतर माझी मुलगी अदितीसुद्धा हा पदार्थ करत असे॰

प्रकाश चांदे.

— लेखन : प्रकाश चान्दे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments