तरुण वयात वाचलेले स्वातंत्र्यवीर सावरकरांचे “माझी जन्मठेप” हे अत्यंत जाज्वल्य आत्मकथन वाचल्यापासून, त्यांनी ज्या जेल मध्ये नरक यातना भोगल्या, ते अंदमान येथील सेल्युलर जेल पाहण्याची मला उत्कट इच्छा होती. पण पूर्वी पैसे नसल्याने आणि नोकरीत वेळ न मिळाल्याने ही इच्छा काही पुरी होऊ शकली नाही आणि अचानक काही काळापूर्वी ही इच्छा पूर्ण झाली.
सेल्युलर जेल पहात असताना, तिथे मांडून ठेवलेली काल्पनिक शिल्पे पहात असताना, सावरकरांनी कशा हाल अपेष्टा सहन केल्या असतील, याची केवळ कल्पना करूनच अंगावर शहारे येत होते. मन सुन्न होत होते. मनात सारखा विचार येत होता, की सावरकरांसारख्या असंख्य वीरांनी आपल्या आयुष्याची होळी करून मिळविलेल्या स्वातंत्र्याला आपण खरा न्याय देत आहोत का ? आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे आर्थिक, सामाजिक न्याय, समता, बंधुत्व आपण प्रस्थापित करू शकलो आहोत का ? देशात न्याय, समता, बंधुत्व पूर्णपणे निर्माण होण्यासाठी अजून किती काळ जावू द्यावा लागणार आहे ? असो.
अंदमानच्या सेल्युलर जेल ला भेट दिल्यानंतर अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील विविध बेटांना भेटी देणे, हा माझ्यासाठी तरी उपचाराचाच भाग होता. कारण जवळपास गेली ४० वर्षे मुंबई, कोकण, गोवा, केरळ आणि काही विदेशातील सागर किनाऱ्याना भेटी दिल्यामुळे, तिथे तिथे उपलब्ध असलेल्या सागरी जलक्रिडांचा मनसोक्त आनंद घेतला असल्याने, या पेक्षा वेगळे काही तिथे नसणार याचा मला अंदाज होताच. नाही म्हणायला काही जीर्ण अवस्थेतील ऐतिहासीक वास्तू पहायला मिळाल्या.

अर्थात अंदमान ला केलेल्या निव्वळ पर्यटनापेक्षा ही सहल आनंददायी, अविस्मरणीय ठरली ती जेष्ठ संगीतकार पंडित शंकरराव वैरागकर यांच्या अचानक रंगणाऱ्या मैफिलीमुळे, त्यांना साथ देणाऱ्या त्यांची गायिका मुलगी विजयालक्ष्मी हिच्यामुळे, साध्या साध्या गोष्टी सांगताना, मोठ्या मोठ्या आठवणी सांगणारे निवृत्त दूरदर्शन निर्माते राम खाकाळ यांच्यामुळे, आई आणि मुलगी असे न वागता मैत्रिणी मैत्रिणी म्हणून वागणाऱ्या चंद्रिका ठक्कर आणि त्यांची मुलगी स्नेहा आणि अर्थातच आमच्या टिमलीडर बनलेल्या प्रख्यात कवयित्री, लेखिका प्रतिभा सराफ यांच्या अखंड, आनंदी राहण्याचा आणि इतरांना आनंदी ठेवण्याचा सततचा प्रयत्न यामुळे. गमतीत आम्ही त्यांचे नाव “चुलबुल प्रतिभा” असेच ठेवले होते.

पण प्रतिभा मॅडम यांचे आभार मानण्याचे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे, त्यांनी अंदमानचा आनंद स्वतः पुरताच न ठेवता न्यूज स्टोरी टुडे पोर्टल वर “अंदमानची सफर” ही अतिशय सुंदर, सचित्र लेखमाला लिहिली म्हणून. विशेष म्हणजे या लेखमालेत, त्या त्यांच्या यू ट्यूब ची लिंक समाविष्ट करीत राहिल्यामुळे तर ही लेख माला केवळ वाचूनच आनंद देणारी न ठरता, प्रत्यक्ष स्थळ दर्शन ठरविणारी झाली. या साठी आम्ही ज्या ज्या जागी काही पहात बसायचो, तेव्हढ्या वेळात त्या, त्या त्या स्थळांचे, परिसराचे, गाईड काय सांगतात याचे अतिशय चपळाईने चित्रीकरण करीत असत. या चित्रीकरणाचे नंतर संकलन करणे, त्याला संगीत, निवेदनाची जोड देणे, हे किती क्लिष्ट काम आहे याची मी दूरदर्शन मध्ये काम केलेले असल्याने मला चांगलीच जाणीव आहे.
तर अंदमान ची प्रत्यक्ष भेट, त्या नंतर प्रसिद्ध होत गेलेली “अंदमान सफर” ही लेख माला यामुळे “अंदमान सफर”ची सफर खरोखरीच अविस्मरणीय ठरली. पुन्हा एकदा सर्व सावरकर प्रेमी सह पर्यटकांचे मनःपूर्वक आभार.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
सुंदर लेख…आम्ही अंदमान अगदी मनसोक्त अनुभवले आहे..मिस्टर तिथेच पोस्टिंग असल्याने