Wednesday, April 23, 2025
Homeपर्यटनअविस्मरणीय १० एप्रिल

अविस्मरणीय १० एप्रिल

आम्हा सर्व सख्यांसाठी १० एप्रिल २०२५ चा दिवस आमचा आनंद द्विगुणित करणारा, अविस्मरणीय असा ठरला. सांगते, ते का म्हणून !

पहिले म्हणजे भिशी निमित्त गणरायांचे दर्शन होणार होते. तर दुसरे म्हणजे आमच्या सहलीची आयोजक नि व्यवस्थापक, आम्हा सर्वांची प्रिय सखी सौ. अलका भुजबळ हिची त्याच दिवशी दूरदर्शनच्या सह्याद्री चॅनलवर “हॅलो सखी” कार्यक्रमात थेट मुलाखत प्रसारित होणार होती. दोन्ही गोष्टींचा ताळमेळ कसा साधला जाईल, या विषयी आम्ही सख्या खरं तर चिंताच करीत होतो. पण अलका वर पूर्ण विश्वास असल्याने सर्व काही ठरल्या प्रमाणे होईल, असेही निश्चित वाटत होते आणि खरंच सर्व काही ठरविल्याप्रमाणे अलकाने सहलीचे नियोजन यशस्वीपणे केले.

सहलीला निघण्यापूर्वी आम्ही दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत, अलकाची मुलाखत ऐकली व पाहिली. सह्याद्रीवर वाहिनीवर “हॅलो सखी” या कार्यक्रमात, बहुआयामी सखी या विषयावर प्रसारित झालेली तिची ही मुलाखत खूपच प्रेरणादायी होती. जाता – जाता खास स्त्रियांना तिने दिलेला मंत्र, “स्वतःचे आरोग्य जपा, आत्मविश्वासाने जगा आणि स्वतःसाठी जगा.” हा तर प्रत्येक महिलेने, मुलीने आचरणात आणला पाहिजे, असाच आहे.

आज आम्ही सर्व जणी एमटीएनएल मधून व्हीआरएस घेतल्यापासून स्वच्छंदी – मनमौजी जीवन जगत आहोत. हे दृश्य फक्त नवी मुंबईत प्रकर्षाने जाणवत आहे. याचे कारण म्हणजे जगण्याचा मंत्र देणारी नि अंमलात आणणारी अलका भुजबळ होय.

वाशीहून दुपारी अडीज वाजता पस्तीस जणीं साठी शिवनेरी बस निघाली. सानपाडा मार्गे प्रत्येक ग्रुप ला ठरलेल्या जागी घेत पनवेल पर्यंत, साऱ्यांना बसमध्ये घेऊन आम्ही ३५ जणी चिरनेर (उरण जवळ) येथे महागणपती चे दर्शनाला निघालो. तसा प्रवास लांबचा नव्हता. चार वाजता आम्ही चिरनेरला येऊन पोहोचलो. मंदिराबाहेरील प्रशस्त मोकळे पटांगण, नि भाविकांना दर्शनानंतर बसण्यासाठी भव्य असा मंडप ! बसण्यासाठी काही स्टीलच्या बाकांची सोय होती, तर जमिनीवर सतरंज्या टाकून बसण्याचीही सोय केली होती.

नंदीच्या पाठीवर हात फिरवत, वंदन करून रांगेत मंदिराच्या गाभाऱ्यात गेलो. लाल शेंदुराने रंगवलेली महागणपतीची मोठी मूर्ती, चमकणारे दिव्य ते नयन, पाहताच क्षणी बाप्पाच्या भक्तीत बुडावे, आम्ही सर्वजणींनी बाप्पाची मनोभावे आरती केली आणि सोबत आणलेला नैवद्य (प्रसाद) बाप्पासमोर ठेवला. पेशवेकालीन महागणपती अतिशय मोहक मूर्ती डोळ्यात साठवून ठेवावी अशी.

उरणचा महागणपती

समोर बसल्यानंतर तेथील पुजारी नितीन पाटील व न्यूज स्टोरी टुडे या वेब पोर्टलचे नियमित लेखक, वाचक श्री अनिल घरत यांची ओळख अलकाने करून दिली. त्यांनी या गणपतीची थोडक्यात माहिती दिली. ब्रिटिशांनी जंगलांवर हल्ला करून, नैसर्गिक संपत्तीची लूट करण्यास सुरुवात केली तेव्हा येथील पूर्वजांनी, त्यांना कसा विरोध केला, त्यावेळी काहीजण आपले प्राण गमावून अमर झाले. त्यांची साक्ष म्हणून ब्रिटिशांनी चालवलेली बंदुकीची गोळी ज्या ठिकाणी चाटून गेली, त्या जागी लाल रंगाची खूण दाखवून त्या संबंधीची माहिती दिली.

श्री अनिल घरत , पुजारी नितीन पाटील

सर्वांचे दर्शन झाल्यावर आम्ही भक्त मंडपात भिशी फोडली. बाप्पा समोर भिशी ज्यांना लागली त्यांना अत्यंत आनंद झाला. जणू भिशी च्या रूपात बाप्पाने त्यांना प्रसाद दिला. तेथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे जिथे आम्ही बसलो असताना एक श्वान, अगदी गणपती समोर आमच्या शेजारी बसून होता. साऱ्यांचे निरीक्षण करत होता. हे जागृत देवस्थान आहे, त्यामुळे त्याची प्रचिती देत आहे असा भास झाला ! बाप्पांची आरती करून प्रसाद घेऊन, आम्ही आता केगाव च्या ‘रिद्धी सिद्धी सिद्धिविनायक गणपती’ला निघालो.

एक-दीड तासाच्या प्रवासानंतर आम्ही सिद्धिविनायक गणपती केगाव येथे पोहोचलो. तेथील रस्ते अरुंद असल्याने आम्हाला बस अगदी मंदिराजवळ नेता नाही आली. त्यामुळे थोडे चालण्यास मोकळीक मिळाली, बरे वाटले. मुख्यद्वारातून आत येताच, पायावर पाणी घेऊन, आम्ही मंदिराकडे वळलो. समोरच प्रशस्त मंदिराचा परिसर, खूप छान दिसत होता. चहुबाजूनी सेवाभावी लोकांसाठी केलेली सोय, एका खोलीतून कीर्तन-भजनाचा आस्वाद घेता आला. पटांगणात वृंदावन नि सभोवती मोकळे पटांगण, खूपच सुंदर ! तिथे आमची बचतगटाच्या सेवानिवृत्त प्राध्यापक सौ. माधुरी कुलकर्णी आणि वर्षा अधिकारी यांची भेट झाली.

त्यांच्या मुखातून, ‘गणपती नवसाचा आहे.’ आणि एकाच दगडात गणपती आणि त्याच्या बाजूला रिद्धी सिद्धी अशी ही एकमेव प्राचीन मूर्ती आहे, त्यांचे अनुभव ऐकले. त्यांच्या सासऱ्यांपासून गणपतीची सेवा केली जात आहे. ती त्यांच्या सुनेकडून पुढे चालू राहिली आहे. त्यांनी बचतगटाची निर्मिती करून, तेथील महिलांना एक उपजीविकेचे साधन उपलब्ध करून दिले आहे. पेशवेकालीन हा सिद्धिविनायक त्यांच्या दोन्ही बाजूस रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती पाहवयास मिळाल्या. दुसरे म्हणजे मंदिर उद्ध्वस्त होऊ नये म्हणून देवळावर कळसाऐवजी मशिदीचा आकार दिला आहे, गणपतीमूर्तीच्या मागे शिलालेख कोरला आहे. या गोष्टी उल्लेखनीय वाटल्या.

केगावचा सिद्धिविनायक

गणपतीचा प्रसाद उकडीचा मोदक ! खूपच अप्रतिम ! पाहुणचारात, बचत गटाच्या सौ वर्षा अधिकारी यांनी सर्वांना कांदेपोहे आणि त्यासोबत छान कैरीचे पन्हं, प्यायला दिले. तिथे जाणवलेली एक गोष्ट म्हणजे, एक वयस्कर स्त्री वांगी व चवळीच्या शेंगा पिशवीत घेऊन विकत होती. खूप जणांनी त्या विकतही घेतल्या. मंदिराच्या दारापर्यंत येऊन ती प्रेमाने घ्या असे सांगत होती, ‘तुम्ही या आमच्या बरोबर खाऊन घ्या’, असं म्हटलं तर म्हणाली ‘नाही, तुम्ही प्या व खा. तुमचा हा पाहुणचार आहे. आम्ही रोजचेच आहोत.” सेवेचा हा अनुभव गवसला. मंदिरातील संध्याकाळची आरती घेऊन सर्वांनी सिद्धिविनायकाचा प्रसाद घेतला व तिथून तेलपोळ्या, मोदक आणि काही जेवाणोपयोगी पदार्थ विकत घेऊन, आम्ही पुढच्या सफरीच्या वाटेवर निघालो.

अंधार झाला होता. रामबागची, उलवे येथे एक सफर बाकी होती. रामबाग उद्यानाची रात्रीची लायटिंग बघण्यासारखी असते, पण तेथे पोहोचेपर्यंत नऊ वाजून गेले होते. उद्यान बंद झाले होते त्यामुळे तिकडे गेलो नाही. पुढे वडाळे तलाव पनवेल येथे तलावाकाठी येऊन जेवण करावे, म्हणून तेथे थांबलो साधारण गर्दी होती. परंतु परिसर जेवण्यासाठी काही योग्य वाटला नाही, त्यामुळे जेवणाची पंगत गाडीतच बसून केली. केगाव येथून बचतगटाच्या वर्षा अधिकारी आणि माधुरी मॅडम ने दिलेले जेवण खूपच सात्विक होते. तिथून निघताना बराच उशीर झाला होता. येतानाचा मार्ग थोडा बदलला गेला. प्रत्येकीला शक्यतो घराजवळ सर्वांना सुखरूप उतरवण्याचे कार्य अलका पार पाडत होती.

सख्यांनो ! एकूण भिशी सोहळा खूप छान सजला. देवाच्या दारात भिशी ज्यांना लाभल्या, त्यांचे हार्दिक अभिनंदन-अभिनंदन-
अभिनंदन !
पण मला जाणवलेली एक सुंदर कल्पना….
“सोळावं वरीस धोक्याचं असतं, तर साठावं वरीस स्वतःच असतं.” तुम्हाला काय वाटतं ? 😄

वर्षा भाबल.

— लेखन : सौ वर्षा भाबल. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. गणपती बाप्पा चे दर्शन व भीशी खूपच छान झाली.तुमचे प्रवास वर्णन वाचुन आम्हाला हि गणपती बाप्पा चे दर्शन घेण्यासाठी जायची ईच्छा झाली आहे.लवकच जाऊ अलका ताईचे मार्गदर्शन घेऊन.

  2. खूप सुरेख प्रवास वर्णन 👌👍

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
सुरेश काचावार, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी on चला, कास पठार पाहू या !
शितल अहेर on काही अ ल क
शितल अहेर on काही कविता