Friday, December 6, 2024
Homeलेखअसामान्य लोकमान्य टिळक

असामान्य लोकमान्य टिळक

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हा जाज्वल्य नारा देणाऱ्या, “भारतीय असंतोषाचे जनक” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकमान्य टिळक यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख.
लोकमान्य टिळक यांना विनम्र अभिवादन.
– संपादक

लोकमान्य टिळकांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. असे एकही क्षेत्र नसेल ज्यावर लोकमान्यांची छाप पडली नाही. ते मुत्सद्दी राजकारणी तर होतेच, परंतु गाढे तत्वज्ञ होते, भगवद गीतेचे भाष्यकार होते, उत्तम गणिती आणि शिक्षणतज्ञ होते. इतिहासकार, कृषीअर्थतज्ञ, मुरलेले कायदे पंडित होते, इतकेच नव्हे तर खगोलशास्त्रज्ञ सुद्धा होते. कामगार नेते, स्वातंत्र्य सेनानी, भारतीय असंतोषाचे जनक अशा अनेकविध भूमिका वठवणारा हा महामानव आज शतकानंतरही स्फुर्तिदाता होतो, हा एक दैवी चमत्कारच !

आपणा सर्वांना लोकमान्यांच्या व्यक्तिमत्वाचे त्याग, विद्वत्ता आणि सचोटी हे गुण माहीतच आहेत, परंतु त्यांच्या जीवनातील प्रकाशित पण तरीही अपरिचित असे काही प्रसंग, किस्से आणि आठवणी आज आपण जाणून घेऊ या.

महारवाड्यात लोकमान्य एकदा लोकमान्य टिळक अमरावती येथे बाबासाहेब खापर्डे यांच्या घरी मुक्कामाला गेले होते. पुण्यात असताना त्यांना सतत भेटायला येणाऱ्या माणसांच्या वर्दळीमुळे क्षणभराचीही उसंत त्यांना मिळत नसे. पण इथं अमरावतीला मात्र कुणी फारसं भेटायला येत नसल्यामुळे निवांत दोन घटका बसणं शक्य होई. एका संध्याकाळी टिळक असेच अंगणात झोपाळ्यावर बसून काही तरी वाचत होते. तेव्हढ्यात एक मध्यमवयीन काळा सावळा तरुण अंगणात आला. टिळकांचं लक्ष नव्हतं. तो तरुण तिथंच खाली अंगणात उकिडवा बसून राहिला. काही वेळानं त्यांचं लक्ष अंगणात बसलेल्या त्या तरुणाकडे गेलं.

टिळकांनी आपल्याला पाहिलं हे ध्यानात येताच तो तरुण काठी टेकून लगबगीनं उठून उभा राहिला आणि म्हणाला
“जोहार मायबाप जोहार, रामराम !”
“अरे, असा बाहेर अंगणात कां थांबलास ? वर ये” टिळक चष्म्याच्या काचा पुशीत त्याला म्हणाले.
“न्हाई न्हाई हिथ खालीच बरा हाये !”
“असं काय करतोस ? ये, वर ये !”
तो संकोचला. टिळकांनी त्याच्या संकोचाचं कारण ओळखलं. “तसं काही नाही रे, आम्ही काही जातपात मानत नाही. आपण सगळे एकच आहोत. ये, वर ये.” टिळकांनी त्याला पुन्हा वर बोलावलं.
तो आला, त्याची भीड चेपली. तो पायऱ्या चढून वर अंगणात आला आणि दाराच्या पाय्तीपाशी थांबला. काठी टेकीत पायऱ्या चढत असताना तो लंगडत चालतोय हे टिळकांच्या नजरेनं हेरलं होतं. त्यांनी विचारलं, “अपंग आहेस ?”
“व्हय जी. लहानपणीच ताप आल्ता. पायावरनं गेला. लय दावादारू केली.”
“अस्स !” टिळक लक्षपूर्वक ऐकत होते.
तो पुढे म्हणाला “म्हाराज, एक इनंती अर्जी घेऊन आल्तो !” तो सांगू की नको अशा संभ्रमात थोडासा घुटमळला.
“बोल ना रे !” टिळक आश्वासक सुरात म्हणाले.
“मायबाप, माझा आजा… माज्या बा चा बा. लय म्हातारा हाये. अन म्हातारा लय थकलाय. हथरुनावरच असतोया. उठून उभं ऱ्हायचीभी ताकद न्हाय ऱ्हायली !” तुमचा लय मोठा भक्त. तुमाला तुरुंगात धाडल्यापासून त्यानं सोमवारचा उपास धरलाया. म्हनतोय टिळक म्हाराजाचं दर्शन करून नंतरच पारणं फेडणार. तुमी हिथ आलाय ते कळाल म्हनून इचाराया आल्तो !”
“काय विचारायला आला आहेस ?”
“उद्या सोमवार हाये, सकाळच्याला मी म्हाताऱ्याला घेऊन शान आलू तर चालल कां ?”
“अरे तुझा आजा म्हातारा, तो अंथरुणावर आहे असं म्हणालास नं, मग ?”
“त्येला पाठीवर मारून शान मी घेऊन येईन की !”
“अरे, तू तर असा अपंग. तुला स्वतःला चालताना त्रास होतो. त्या म्हाताऱ्याला उठून बसता येत नाही. त्यापेक्षा मीच येतो तुझ्या आज्याला भेटायला …. चालेल ना ?” टिळकांनी अगदी सहज विचारलं.
“काय …?“ त्या तरुणाचे डोळे आश्चर्याने विस्फारले.
दुसऱ्या दिवशी सकाळी टिळक चक्क महारवाड्यावर पोचले.
अख्खा महारवाडा टिळकांच्या दर्शनाला लोटला.
टिळक त्या तरुणाला म्हणाले, “ हं, दाखव तुझं घर !”
त्या तरुणाच्या पाठोपाठ ते झोपडीत शिरले. तो त्या तरुणाचा म्हातारा आजा खोकत खोकत भिंतीच्या आधारानं कसाबसा उठून बसला. त्यानं टिळकांच्या चरणांवर डोकं ठेवलं आणि लहान मुलासारखा ढसा ढसा रडला. टिळकांनी त्याला उठवलं आणि त्याच्या शेजारी बसले, म्हणाले “आपण वयोवृद्ध आहात. स्वराज्याच्या कामी आपल्या सारख्या मोठ्या माणसांचे आशीर्वाद हवेत !”
एवढं बोलून टिळकांनी चक्क त्या म्हाताऱ्याच्या पायाला हात लावून नमस्कार केला. केवळ तो म्हाताराच नव्हे, तर उपस्थितांपैकी प्रत्येक जण गलबलला.
त्या म्हाताऱ्याच्या डोळ्यातून तर अश्रूंची संतत धार लागली होती. तोंडातून शब्द फुटत नव्हता. रडत रडतच त्यानं भिंतीच्या दिशेनं बोट दाखवलं. भिंतीवर विठोबाच्या तसबिरीशेजारी टिळकांचा फोटो लावला होता. केसरीच्या जुन्या अंकातला, कापून पुठ्ठयावर चिकटवलेला तो फोटो साक्ष्यात पांडुरंगाच्या शेजारी होता.
टिळक “लोकमान्य” झाले ते अशा अलौकिक गुणांमुळे ! बुद्धिमत्ता तर होतीच. पण त्या बुद्धिमत्तेला कुठंही अहंकाराचा वारा लागलेला नव्हता.

लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी

महात्मा गांधी कस्तुरबांसह दक्षिण आफ्रिकेतून १९१५ साली भारतात परत आहे. तेंव्हा भारतातील जवळ जवळ सर्व प्रमुख शहरात त्यांच्या स्वागत सत्काराचे कार्यक्रम आयोजित केले गेले. मुंबई मध्ये जो स्वागत समारंभ झाला तो Servents of India Society या नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या संस्थेने आयोजित केला होता. गोखले आणि टिळक या दोघांची विचारधारा वेगवेगळी होती. या स्वागत समारंभाला लोकमान्य टिळक याना निमंत्रण नव्हते, तरी टिळक या समारंभाला जातात आणि भाषणही करतात. टिळक काय म्हणतात “मी निमंत्रणा शिवाय या कार्यक्रमात आगंतुका सारखा आलो आहे कारण या गांधी पती पत्नींनी विदेशात – साता समुद्रापार – परकीय भूमीवर आपल्या भारतमातेचा सन्मान वाढवला आहे. यांच्या सन्मानासाठी मला जिथे जाता येईल तिथे मी जाईन, अगदी निमंत्रण नसले तरी, निमंत्रणाची वाट न पाहता जाईन“ पुढे महात्मा गांधींना जेंव्हा पहिल्यांदा कारावासाची शिक्षा होते तेंव्हा गांधीजी म्हणतात “लोकमान्यांसारखीच मलाही तुरुंगवासाची शिक्षा झाली हा मी माझा सन्मानच समजतो.”

लोकमान्य टिळक आणि विनोबा भावे

विनोबा भावे हे मुळचे वाईचे. वाईला ब्राह्मणशाही भागात जे कोटेश्वराचे मंदिर आहे ते भावे कुटुंबाचे आहे. भाव्यांचे पूर्वज वाईत रहात असत. ही सर्व भावे मंडळी वृत्तीने आध्यात्मिक होती. विनोबांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर १९१७ साली ते वेद वांग्मयाच्या अभ्यासासाठी वाईला नारायण शास्त्री मराठे यांच्याकडे असत.
वाईतील वास्तव्यात लोकमान्य टिळकांच्या झालेल्या भेटीचा तपशील विनोबांनी भूदानयज्ञ साप्ताहिकात लिहिला आहे. विनोबा सांगतात“ १९१६-१७ दरम्यान मी नुकताच घर सोडून महाराष्ट्रात भटकत होतो, तेंव्हा लोकमान्य टिळकांना भेटलो. वयाने मी त्यांच्या नातवासारखा होतो व ज्ञानाने ते हिमालय तर मी टेकडी पण नव्हतो. तरीही त्यांनी माझ्याशी इतक्या मोकळ्या मनाने चर्चा केली की, मला त्यांच्याशी बोलताना भय वाटलेच नाही. मी त्यांना सहज विचारले की, “तुम्ही गीता-रहस्यात लिहिले आहे, ज्ञानी मनुष्य कर्म करील तर त्याला मोक्ष मिळेल, व न करील त्यालाही मिळेल. ज्ञानी माणसाने कर्म करावे हे योग्यच, पण ज्ञानी माणसाला असे सांगणारे आम्ही कोण ?” या वर ते उत्तरले “आपण त्याला कोण सांगणार ? तो आपले कां ग्रंथ वाचील ? पण तुम्ही वाचता. तेंव्हा तुम्ही – आम्ही ज्ञानी झालो असे समजून ज्ञानी माणसाने नाटक करु नये, आपल्या देशात लोकांनी ब्रम्हज्ञान इतके सुलभ करून ठेवले आहे तितके ते सुलभ नाही. एव्हढाच त्याचा भावार्थ आहे तो तू घे. गीता-रहस्यात लिहिले तर आहे परंतु मला अजून त्याचा अनुभव नाही !” सारांश, ज्ञानी माणसांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग कसा करावा हे याला आम्ही कोण सांगणार ?”

प्राज्ञ पाठशाळेतील तत्कालीन विद्यार्थी व शिक्षक यांच्यावर टिळकांचा प्रभाव होता. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी त्याला अपवाद नव्हते. विनोबांनी वाई सोडली तरी त्यांची पत्रे तर्कतीर्थांना येत असत. टिळक आणि गांधी यांचेबाबत तुलनात्मक निर्देश करतांना आपल्या एका पत्रात विनोबा लिहितात –
“ टिळकांचे युग आतां संपत आले आहे, असे माझ्या प्रवासांतील अनुभवावरून निश्चित करता येते. सत्याग्रहाचे शास्त्र लोकांच्या बुद्धीवर नवा प्रभाव पाडील असे दिसते, आतां गांधींचे युग सुरु होईल. गांधींच्या मार्गाशिवाय दुसरा कोणताही मार्ग राष्ट्राला पुढे नेऊ शकणार नाही.” ही विनोबांची भविष्यवाणी खरी ठरली.

लोकमान्यांचा पेहराव, त्यांचा कारावास, त्यांची लोकप्रियता, त्यांचा सर्व धर्मांचा गाढा अभ्यास या आणि अश्या अनेक विषयांवर त्यांच्या प्रेरणादायी आणि तितक्याच हृद्य आठवणी आजही एक शतकाचा काळ लोटल्यावर सुद्धा वाचनीय आहेत.

केवळ ६४ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या लोकनेत्याने आपले संपूर्ण जीवन राष्ट्रासाठी समर्पित केले होते. लोकमान्यांच्या शरीराची आणि आरोग्याची अनेक वर्षांच्या कारावासात अपरिमित हानी झाली होती. तरी “स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” अशी घोषणा करून पुनश्च हरिओम करत त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी अक्षरशः झपाटल्यासारखे देशभर झंझावाती दौरे सुरु केले. १९२० सालाच्या पूर्वार्धात तर अतिरेक झाला. प्रकृतीला न सांभाळता काम करण्याचा परिणाम शरीरावार होणारच होता. लोकमान्यांचा गंभीर आजार बळावला. त्यांचे शरीर व्याधींनी अगदी पोखरले होते. “कृतांत कटका मलध्वजधारा दिसो लागली, पुरस्सर गदांसवे झगडता तनू भागली“ व्याधींशी झगडता झगडता लोकमान्यांचे शरीर खरोखरच थकूनभागून गेले होते. त्यांच्या शामल वर्णाचे तेज निघून गेले होते, अखेर १ ऑगस्ट १९२० रोजी त्यांनी देह ठेवला. झंझावात शांत झाला होता आणि सरदारगृहाबाहेर जनसागर उचंबळून आला होता. महात्मा गांधी श्रद्धांजलीत म्हणाले “लोकमान्यांएव्हढे वैभवी मरण मी माझ्या आयुष्यात पाहिलेले नाही.” शेवटी इतकच म्हणावसं वाटतं ..
तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो,
त्वदीय गुण कीर्तन ध्वनि सुरम्य कर्णी पडो,
स्वदेश हित चिंतनावीण दुजी कथा नावडो,
तुम्हा सम आमुची तनुही देशकार्यी पडो.

आशा कुलकर्णी

— लेखन : आशा कुलकर्णी. विलेपार्ले, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. आशा कुलकर्णी ह्यांनी लोकमान्य टिळक ह्यांना अर्पण केलेली आदरांजली अतिशय सुंदर आहे. लोकमान्यांची महती विशद करताना त्यांनी महारवाड्यातील एका प्रसंगाचे अतिशय हृद्य व भावपूर्ण वर्णन करून लोक त्यांना “लोकमान्य” का मानत होते, त्याचे खूप सुंदर, बोलके उदाहरण दिले आहे. लोकमान्य आणि गांधी, लोकमान्य आणि विनोबा अशा महान व्यक्तिमत्त्वांमधले परस्परसंबंध अतिशय उत्तम रीतीने उकलले आहेत, ज्यामुळे दोघांमधील कोणाही एकाची तुलना करताना तरतमभाव निर्माण होणारच नाही, उलट दोन्ही विभूतींविषयी आदरभाव वाढेल. लेखिका आशा कुलकर्णी ह्यांच्या लेखनाचे हे वैशिष्ट्य त्यांच्या ह्या लेखाचे महत्त्व अधिकच वाढवते आहे. त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि लोकमान्य टिळकांना विनम्र अभिवादन 🙏💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on अशी होती माझी आई !
राजेंद्र वाणी दहिसर मुंबई on “प्रतिभा”ला वय नसतं !
नलिनी कापरे on आरशात पाहू जरा …
सौ.मृदुलाराजे on आरशात पाहू जरा …
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : २६
सौ.मृदुलाराजे on वाचक लिहितात…
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
शारदा शेरकर on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !