Saturday, July 27, 2024
Homeलेखअसामान्य व्यक्तीमत्व : न मा जोशी

असामान्य व्यक्तीमत्व : न मा जोशी

न. मा जोशी, विविध वृत्तपत्रांत नेहमी वाचायला मिळणारे नाव! त्यांच्या लेखन शैलीमुळे सगळ्या वाचकांना परिचित असे हे नाव ! डॉ व्ही एम पेशवे सामाजिक संशोधन संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या जीवन गौरव पुरस्काराचे या वर्षाचे मानकरी ! हा पुरस्कार देऊन ही संस्था धन्य झाली असे न. मां. चे कर्तृत्व! त्यांचे आडनाव जोशी असले तरी त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांना ‘नमा’ ह्याच नावाने ओळखतात. सामान्याचे असामान्यत्व हेच त्याचे कारण. त्यांना मिळालेल्या पुरस्काराची बातमी वाचून त्यांचे हितचिंतक मनोमन सुखावले. त्यांच्यावर श्रद्धा असणाऱ्या, त्यांच्यावर नितांत प्रेम करणाऱ्या, त्यांच्या लिखाणाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या त्यांच्या चाहत्यांना, विद्यार्थ्यांना , आभाळाएवढा आनंद झाला यात शंका नाही. हा आनंददायी सोहळा यवतमाळ जिल्ह्यातील बोरी अरब येथील आर्ट्स & कॉमर्स कॉलेज येथे नुकताच अतिशय थाटात संपन्न झाला. आपल्या सरांचा गौरव होत आहे हे माहीत झाल्यावर त्यांचे अनेक माजी विद्यार्थी -विद्यार्थीनी, त्यांचे चाहते या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झाले. अरुण लोणारकर ह्या त्यांच्या एका विद्यार्थ्याने तर सतत पाच दिवस खर्च करून कॅनव्हास पेंटिंग केलेले सरांचे चित्र स्वतः रेखाटून त्यांना अर्पण करीत आपला नम्र भाव प्रगट केला.

महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात सरांचे अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर काम करीत आहेत, पण सरांना विसरलेले नाहीत. पुरस्काराची बातमी वाचून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला.

‘नमा’ हे व्यक्तिमत्व आहेच तसे! गेल्या पाच दशकापासून त्यांची वाणी व लेखणी दोन्हीही फक्त विद्यार्थ्यांपुरतीच सीमित न राहता अख्ख्या महाराष्ट्रात उद्बोधनाचे कार्य अविरत करीत आहे.प्रसिद्ध लेखक श्री श्रीराम भास्करवार म्हणतात की ‘नमा’ कुठलीही बातमी चटकदार, लक्षवेधक करू शकतात. सरांचे अनेक राजकीय पुढाऱ्यांशी स्नेहाचे संबंध आहेत. त्यांचे संपूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्रात व्यतीत झाले आहे. सर्व क्षेत्रातील सर्व विषयांच्या माहितीचा खजिनाच त्यांच्यापाशी आहे असे म्हटले तरी चालेल, इतका समृद्ध व्यासंग असलेले परखडपणे लेखणीचा उपयोग करणारे ‘नमा’ तेव्हढेच नम्र सुद्धा आहेत. श्री सत्य साईबाबांवर अपार श्रद्धा व विश्वास असलेले ‘नमा’ सत्य साई सेवा समितीचे अध्यात्मिक प्रमुख आहेत.
एक उत्कृष्ट पत्रकार, साधा सरळ माणूस, जे वाटलं ते आडपडदा न ठेवता व्यक्त करणारा अशी त्यांची ओळख. बोलणं दिलखुलास! फारशी ओळख नसतांनाही त्यांच्याशी बोलतांना एखाद्या जिवलग मित्राशी आपण बोलत आहोत असं वाटावं अशी आपुलकीची भावना आजच्या दिखाऊ जगात फार कमी पाहायला मिळते.
तरुण भारत, लोकसत्ता, मतदार, हिंदुस्थान, नागपूर टाइम्स, युगधर्म, नमो महाराष्ट्र, वृत्त केसरी, जनमाध्यम, लोकसूत्र, सिंहझेप इ. प्रतिष्ठेच्या वृत्तपत्रात त्यांनी विपुल लेखन केले आहे. पत्रकारितेचा निर्भीड लढवय्या शिलेदार अशी त्यांची ओळ्ख असल्याचे दैनिक मतदार चे संपादक सिद्धहस्त निर्भीड पत्रकार एडवोकेट दिलीप एडकर यांनी ‘नमो नमा’ या लेखातून नमूद केले आहे. हे यश त्यांनी आपल्या कर्तृत्वानेच मिळवले आहे.

न मा.यांच्या यशस्वी कारकीर्दीत त्यांची सहधर्मचारिणी सौ चंदनताई जोशी यांचे योगदान दुर्लक्षित करून चालणार नाही. पतीच्या कार्यात त्यांची साथ बहुमोलाची आहे.

नमांच्या यशस्वी जीवनात डोकावताना खूप मागे जावे लागेल.
वर्ष १९६८ शिवाजी महाविद्यालय अमरावतीचा हा प्रसंग. गाव पिंपळगाव ,ता जळगाव जि बुलढाणा येथील एक गरीब होतकरू तरुण मॅट्रिक पास झाल्यावर तेथून ५८ कि मी असलेल्या खामगावच्या जी एस कॉलेजमधून बी ए पार्ट वन ची परीक्षा उत्तीर्ण करून अमरावतीच्या साबणपुऱ्यातील एका धर्मादाय सिकची वसतिगृहात प्रवेश मिळवतो व गावच्याच प्राध्यापक एस एस तानकर यांच्या शिफारशीने श्री शिवाजी महाविद्यालयात त्याला प्रवेश मिळतो.
येथून सुरवात होते ह्या संघर्षमय पण यशस्वी कारकीर्दीची! धावपळ करून कॉलेज तर गाठले; वर्ग शोधण्यात थोडा वेळ गेला, पिरेड सुरू झाला होता. घाबरतच वर्गाच्या दाराशी जाऊन ‘मे आय कम इन’ विचारले. राज्यशास्त्राचा तास सुरू होता.वर्गातील अत्यंत कडक शिस्तीचे भोक्ते प्राध्यापक बी टी देशमुख लगेच म्हणाले –नो ,’ . प्रा बी टी देशमुख एक मिनिटही उशिरा वर्गावर जात नसत ,एक मिनिटही वर्ग अगोदर सोडत नसत हा त्यांचा लौकिक! या विद्यार्थ्याला माहीत नव्हता.
म्हणून तो घाबरला! पण हटला नाही! हा मुलगा म्हणजेच आपले न. मा. वर्गात राज्यशास्त्रातील अनेक अडचणीत आणणारे त्याचे प्रश्न ऐकून बीटी सरांच्याही लक्षात आले असेल की हा मुलगा साधारण नाही. त्याच्या बुद्धिमत्तेची चुणूक सरांच्या लक्ष्यात आली.

बी टीं ची शिस्त खूप! शिकवणे तेव्हढेच छान ! त्यांच्या शिस्तीचा जबरदस्त प्रभाव इतका की पुढे यवतमाळच्या बाबाजी दाते यांच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून१९७४ साली नोकरीला लागल्यावर आयुष्यभरात कधीही नमां नी वर्गात एक मिनिट ही उशिरा प्रवेश केला नाही. बीटीं च्या एका ‘नो’ ने त्यांचे आयुष्यच बदलून गेले! राज्यशास्त्राचा सखोल अभ्यास करून नमां नी एम ए ची पदवी मिळवली. पुढे पीएच डी करावे की नोकरी ह्या विचारात असतांना त्यांनी प्राचार्य प.सि. काणे यांचा सल्ला ऐकून आधी नोकरी असा निर्णय घेतला. त्यांच्या अथक प्रयत्नांनी नियती व भाग्यलक्ष्मी प्रसन्न झाली. यशाच्या साऱ्या दिशा मोकळ्या झाल्या.यानंतर नमा सरांना मागे वळून पाहण्याची गरजच पडली नाही.
मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये आणिबाणीच्या काळात प्रा डॉ आलू दस्तुर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात ४२ वी घटना दुरुस्ती या विषयावरील त्यांचे भाषण खूप गाजले. एकतर मुद्देसूद भाषण व तेही इंग्रजीत! प्रत्यक्ष डॉ आलू दस्तुरनी अतिशय प्रेमाने त्यांच्या भाषणाची तारीफ केली.
विदर्भातून आलेले एकमेव वक्ता म्हणून मुंबईतील तरुण भारताच्या पहिल्या पानावर ;प्रा न मा जोशींनी बाजी मारली; या मथळ्याची बातमी प्रसिद्ध झाली, इथे हे सांगण्याचा मोह मी आवरू शकत नाही की इंग्रजीवर प्रभुत्व असण्याचे सारे श्रेय अतिशय नम्रतेने ते शिवाजी कॉलेज च्या प्रा .रमण आणि प्रा. रामाराव सरांना देतात. नम्रता हा त्यांचा स्थायी भाव आहे हे त्यांच्याशी बोलणाऱ्याच्या सहज लक्षात येते.

अमरावतीला शिकत असतांनाच त्यांना पत्रमहर्षी स्वा संग्राम सैनिक पूज्य बाळासाहेब मराठेंच्या हिंदुस्थान मध्ये पत्रकारितेची संधी मिळाली. ते वर्ष होते १९६९. त्यानंतर कै डॉ अरुण मराठे, विलास मराठे या कुटूंबाशी जुळलेले भावनिक संबंध आजही पक्के टिकून आहेत कारण इथेच त्यांच्या पत्रकरितेच्या आवडीला खत पाणी मिळाले, वाचकांना समृद्ध लेखन करणारा सुजाण स्तंभ लेखक मिळाला.

यवतमाळला नोकरी निमित्त आल्यावर सुद्धा तरुण भारत, युगधर्म, नागपूर टाइम्स लोकसत्ता अशा अनेक वृत्तपत्रात काम करण्याची त्यांना संधी मिळाली. दिवसेदिवस लेखणीची धार अधिकाधिक धारदार होऊ लागली. पत्रकारिता, दैनंदिन लेखन याशिवाय व्याख्याने वैद्यकीय महाविद्यालय हे नमा आणि नरेंद्र मोर यांनी केलेल्या अभूतपूर्व आंदोलनाचे फलित आहे हे अनेकांना ठाऊक नसेल.राज्य सचिव पदाचा दर्जा असलेल्या महाराष्ट्र राज्यमागास वर्ग आयोगाचे ते तीन वर्ष सक्रिय सदस्य होते. स्वभावाचे खास वैशिष्ट्य हे आहे की, ते जे काम हातात घेतील ते वेळेच्या आत व चांगलेच करतील.
प्रतिष्ठेचा समजला जाणारा बाळशास्त्री जांभेकरांच्या नावाने असलेल्या दर्पण पुरस्काराचे ते मानकरी ठरले. इतरही अनेक पुरस्काराचे ते मानकरी आहेत. नुकत्याच मिळालेल्या जीवनगौरव पुरस्काराने त्यांच्या लौकिकात मानाचा तुरा खोचल्या गेला. त्यानिमित्त अजूनही त्यांचे ठिकठिकाणी सत्कार होत आहेत.
एका ‘नो’ने बदललेली त्यांची ही जीवन कहाणी !

पण त्याचा परिणाम म्हणून बीटीच्या एका ‘नो’ने समाजाला एक चांगला पत्रकार व विद्यार्थ्यांना एक आदर्श शिक्षक मिळाला.
नमां ची जीवनगाथा खरोखरच विलक्षण आहे. ४ फेब्रुवारी १९४८ ही त्यांची जन्मतारीख!जन्मापासून संघर्षाला सुरवात झाली जणू दैव सतत परीक्षा पाहायला टपलेले ! अनेक लहान मोठे आघात अगदी लहानपणा- पासून झेलणारे न मा यांच्या संघर्षाचे आणखी एक उदाहरण म्हणजे शिक्षणक्षेत्रात १९७४ मध्ये १०+२+३ चा पॅटर्न आला व संस्थेने त्यांना अतिरिक्त ठरवून सेवामुक्त केले. सेवामुक्ती आदशविरुद्ध नमां नी सरकारने गठित केलेल्या न्या.अभ्यंकर कमेटीसमोर अपील सादर केले. अतिरिक्त म्हणजे काय हे स्पष्ट केले. परिणाम असा की संस्थेला त्यांना पुन्हा सेवेत घेण्या व्यतिरिक्त पर्याय उरला नाही. अशा धडाडीच्या, निर्भय व अतिशय साध्या सरळ मनाच्या न मा जोशी सरांचा जीवनपट उलगडण्याचा माझा हा नम्र प्रयत्न. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या वाचकांना व न मा जोशी सरांना आवडेल अशी आशा आहे.

— लेखन : प्रतिभा पिटके. अमरावती
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८