Tuesday, July 23, 2024
Homeलेखअसा असावा 'बाप'!

असा असावा ‘बाप’!

आई बापांनी आपल्या ईच्छा, महत्वाकांक्षा आपल्या मुलांवर न लादता, त्यांच्या आवडीचे करिअर निवडू दिल्यास ते कसे यशस्वी होतात, आनंदाने जगू शकतात, याची कल्पना आपल्याला ही यश कथा वाचून नक्कीच येईल.
– संपादक

दहावी बारावीच्या परीक्षा संपल्या की कोणते करिअर निवडावे हा प्रश्न विद्यार्थी व पालक असा दोघांमध्येही संभ्रम निर्माण करतो. यासाठी बहुतांश वेळा डॉक्टर, इंजिनियर, प्रशासकीय अधिकारी कसे घडले किंवा परदेशी शिक्षण व गले लठ्ठ पगाराची नोकरी याच्या यशोगाथा मनावर बिंबविल्या जातात आणि आपणही तसेच काहीतरी करावे, हेच सर्वोत्कृष्ट करियर आहे असा आपला समज होतो.

या संकल्पनेला छेद देणारी ही कहाणी आहे. आनंदवन येथे निर्मित वस्तूंची विक्री करणाऱ्या स्टॉलवर दहा वर्षांपूर्वी अमरला पहिल्यांदा पाहिले. वडिलांच्या कामात मदत करणारा अमर पाहून मला माझे बालपण आठवले. संस्कार हे फक्त पुस्तकातून नाहीत तर प्रत्यक्ष कृतीतून घडतात हे मी अमरच्या जडणघडणीमध्ये पाहत आलो.

अमर बारावी झाल्यानंतर इंजिनिअरिंगची फी परवडत नसल्याने त्याने बी.एस.सी आयटी ला प्रवेश घेतला. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मध्यमवर्गीय कुटुंबाच्या अपेक्षेप्रमाणे टी.सी.एस कंपनीमध्ये नोकरी सुरू केली. ट्रेनिंग म्हणूनच तीन-चार लाखाचे पॅकेज. परिवाराला अतिशय आनंद झाला. सर्व काही सुरळीत झाले म्हणून घराची डागडुजी करण्यासाठी कर्ज घेतले.

पण अचानक एक दिवस अमरने नोकरी सोडण्याचा मनोदय व्यक्त केला व साऱ्यांना धक्काच बसला. कारणही तसेच होते. अमरला संगीत महाविद्यालयात शिक्षण घ्यायचे होते. त्याच्या या निर्णयाचा परिवारावर काय परिणाम होणार याची सर्वांना कल्पना होती. परंतु आपल्या मुलाची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी अमरचे वडील, प्रकाश “बाप” म्हणून त्याच्या निर्णयामागे खंबीरपणे उभे राहिले आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने सुरू झालेल्या पहिल्या संगीत महाविद्यालयाचा अमर पहिला विद्यार्थी झाला.

महाविद्यालय शिक्षण घेणारी बहीण, घरातील आजारपण यामुळे तुटपुंज्या पगारात कर्जाचे हप्ते भरणे ही जड झाले. आईने दवाखान्यात कंपाउंडर म्हणून नोकरी स्वीकारली. अमरला ही त्याची जाणीव होती. त्यामुळे स्वतः स्वयंपाक करून अमर आपले शिक्षण घेत होता. या गणेशोत्सवात त्याने संगीतबद्ध केलेले गाणे ऐकून खूप आनंद वाटला पण फक्त संगीतावरती पोट भरत नसते म्हणून प्रभात ट्रस्ट च्या कामात मदत करून मानधन घेण्याचा प्रस्ताव कितीतरी वेळा मी यांच्या पुढे ठेवला. परंतु सेवा कार्याचा कोणताच मोबदला न घेता दुडम कुटुंबीय प्रभातच्या कामात सहकार्य करतात.

दुडम परिवाराशी सेवा कार्यातील नाते प्रकाश दुडम हे प्रभातचे सचिव होण्यापर्यंत वृद्धिंगत झाले आहे. संगीत शिक्षण पदवी झाल्यावर आता पुढे काय ? पुन्हा एखादी नोकरी शोधण्यापेक्षा संगीत क्षेत्रात काय करता येईल ? यासाठी अमर प्रयत्नशील होता आणि त्याच्या प्रयत्नांना यश आले. आयटी व संगीत या दोन्ही क्षेत्रांचे ज्ञान असणाऱ्या अमरला google कंपनीकडून म्युझिक अनालिस्ट यासाठी पूर्वी घेतलेल्या पगाराच्या “दुप्पट पगाराचे पॅकेज” कंपनीने देऊ केले.

अमर, त्याच्या नव्या कार्यालयात

आम्हा सर्वांनाच आनंदाचा धक्का बसला. बाप म्हणून प्रकाशचा आनंद तर गगनात मावत नव्हता. आमच्या परिवारात कधीच कोणी विमान प्रवास केलेला नाही आणि आज नोकरीवर रुजू होण्यासाठी गुगल कंपनीने अमरला विमानाने हैदराबादला बोलवले आहे हे सांगताना एका “बापाच्या डोळ्यातील आनंदाश्रू” मला स्पष्टपणे दिसत होते..
अमर पहिल्यांदाच नोकरीसाठी बाहेर जात आहे त्याला गायडन्स करा म्हणून प्रकाशने अमरला माझ्याकडे पाठविले होते.

आजही वेगळी वाट निवडताना मनामध्ये किंतु परंतु येणारे आपण अमरला काय मार्गदर्शन करणार ? उलट प्रभात परिवाराकडून त्याचा यथोचित सन्मान केला व त्याची यशोगाथा आमच्या टीमला अवगत करून दिली.

अमर कडून संगीत क्षेत्राची सेवा घडो हीच सदिच्छा. कठीण परिस्थितीतही पाल्याच्या मागे उभा राहून जो “बाप पाठिंबा” एका बापाने आपल्या मुलाला दिला हाच करिअरचा बाप मार्ग प्रत्येक बापाने निवडल्यास करिअर निवडताना मुलांचा होणारा संभ्रम निश्चितच दूर होईल व करिअर निवडतानाची अमरची ही कहाणी अजरामर होईल.

— लेखन : डॉ.प्रशांत भा.थोरात. नेत्ररोग तज्ञ
अध्यक्ष, प्रभात ट्रस्ट, नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. ‘बाप असा असावा’ डॉ प्रशांत थोरात यांचा लेख अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी आहे. शिल्पकला, चित्रकला, नृत्य कला, या करिअरच्या गोष्टी नव्हेत असंच पालकांना वाटत असतं. पण त्यात मुलांना किती आनंद मिळतो आणि ते किती रमतात याकडे पालकांचे लक्ष नसतं. त्या दृष्टीने इथं जो मुलाला मिळालेलं पाठबळ अतिशय दुर्मिळ आहे.म्हणूनच प्रकाश दुडूम यांचं कौतुक केलं पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८
डाॅ.सतीश शिरसाठ on कलियुगातील कर्ण
अरुण पुराणिक , पुणे on माझी जडणघडण भाग – ८
गणेश साळवी. इंदापूर रायगड on कलियुगातील कर्ण
Vilas kulkarni on व्यथा
डाॅ.सतीश शिरसाठ on तस्मै श्री गुरुवै नमः