हायकू हा काव्यप्रकार जपानमधून भारतात आणि आता महाराष्ट्रात रुजू लागला आहे. कवयित्री शिरीष पै यांनी हा काव्यप्रकार नव्या कवींना समजावून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. अनेकांच्या हायकू संग्रहांना त्यांनी प्रस्तावना दिली आहे.
अभिनेत्री, एकपात्री कलाकार, लेखिका आणि मराठी भाषेच्या अभ्यासक असलेल्या मेघना साने यांनी हायकू हा विषय घेऊन २०१८ साली मुंबई विद्यापीठातून एम. फिल. केले. त्या हायकू या विषयावर मुंबई विद्यापीठात संशोधन करणाऱ्या या पहिल्या महिला ठरल्या आहेत. मेघना साने यांनी P.hd..करण्यासाठी विषय निवडला आहे ‘मधु मंगेश कर्णिक यांचे कथा साहित्य’.
मेघना साने या केवळ हायकू च्या अभ्यासक नसून त्या स्वतः ‘हायकू’कार आहेत. त्यांनी आता पर्यंत लिहिलेले हायकू “असा बरसला हायकू” या संग्रहात संकलित केले आहे. उद्वेली बुक्स प्रकाशित “असा बरसला हायकू” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथे नुकतेच झाले. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन कवयित्री शिरीष पै यांचे सुपुत्र ऍडव्होकेट राजेंद्र पै यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष श्री. राजन लाखे आणि आणि भाषातज्ञ डॉ. अलका मटकर तसेच अध्यक्ष राजेंद्र पै उपस्थित होते.
प्रकाशक विवेक म्हेत्रे प्रास्ताविकात म्हणाले, “या काव्यसंग्रहात मेघना साने लिखित २५० हायकू असून प्रस्तावनेमध्ये या साहित्यप्रकाराचा इतिहास दिला आहे. हायकू हा काव्यप्रकार भारतात इतका उशिरा का रुजला याचे कारण आपल्याला त्यात सापडते.”
मुंबई विद्यापीठात एम. फील. करताना, हायकू या काव्यप्रकारावर संशोधन करण्यासाठी मेघना साने यांनी ‘१९८० नंतरचा हायकू – स्वरूप आणि चिकित्सा’ हा विषय घेतला होता. त्यावेळी त्यांच्या मार्गदर्शक असलेल्या डॉ. अलका मटकर यांनी प्रकाशन प्रसंगी मेघना साने यांचे अभिनंदन केले व त्या म्हणाल्या, “एम. फील. करताना विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयाचा सखोल अभ्यास करावा लागतो. जसे जसे विषयाचे आकलन होत जाते, तसे तसे लिहिलेल्या प्रकरणांचे पुनर्लेखनही करावे लागते. हायकू या विषयावर संशोधन करताना मेघना साने यांनी शिरीष पै यांचे दहाही हायकूसंग्रह अभ्यासले. तसेच महाराष्ट्रातील पूजा मलुष्टे, ऋचा गोडबोले, राजन पोळ, तुकाराम खिल्लारे, सुरेश मथुरे, मीरा आणि इंदोरचे शाम खरे अशा अनेक उत्तम मराठी हायकूकारांचे संग्रह तसेच इंदोर, भोपाळ येथील हिंदी हायकूकारांचे संग्रह अभ्यासून त्यातील हायकूंचे सौंदर्य आपल्या शोधनिबंधात उलगडून दाखवले. त्यांच्या शोधनिबंधात त्यांनी जपानी हायकू व मराठी हायकू यांच्या अक्षरबंधनाची तुलनाही केली आहे. त्यांनी केलेलं संशोधन, त्या त्यांच्या मनोगतात स्पष्ट करतीलच. पण हायकू हा काव्यप्रकार अभ्यासला जावा म्हणून त्याचा समावेश महाविद्यालयातील अभ्यासक्रमात व्हायला हवा.”
आपल्या मनोगतात मेघना साने म्हणाल्या, “कवयित्री शिरीष पै यांच्याकडून हायकू हा काव्यप्रकार मी समजावून घेतला होता व तोच धागा पकडून मी पुढे काम करीत राहिले. जपानी हायकूकारांप्रमाणेच महाराष्ट्रातही ५-७-५ या अक्षरबंधात हायकू लिहिणारे कवी तयार होत आहेत. तर काही कवी केवळ अक्षरबंधाला महत्त्व देऊन हायकूच्या आशयापासून भरकटत आहेत. पहिल्या दोन ओळीत समोरच्या दृश्याचे वर्णन आणि तिसरी ओळ कलाटणी देणारी, तत्त्वज्ञानाचा बोध देणारी असावी लागते. हायकू रचनेची प्रक्रिया अभ्यासताना मला असे आढळले की हायकू हा समोर दिसणाऱ्या दृश्याचाच एक उद्गार असतो. समोर दिसणारे दृश्यच प्रतिमा म्हणून वापरले जाते तसेच त्या दृश्याच्या वर्णनातूनच एक तात्त्विक विचारही मांडला जातो. हेच हायकूचे वेगळेपण आहे. या उलट इतर प्रकारच्या कविता लिहिताना भावनेचे आंदोलन होते, अन्तःस्पर्श होतो व त्यातून प्रतिमा बाहेर येतात आणि त्या प्रतिमा कवितेत वापरल्या जातात. या प्रतिमा कवीच्या मनात असतात, समोरच्या दृश्यात नसतात. तेव्हा निष्कर्ष असा निघतो की हायकू व इतर कविता यांची निर्मितीप्रक्रिया एकमेकींच्या नेमकी उलट आहे.” मेघना साने यांनी वरील निष्कर्ष, काही उदाहरणे देऊन विषद केले.
या नंतर ऍडव्होकेट राजेंद्र पै यांच्या हस्ते “असा बरसला हायकू” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. या काव्यसंग्रहाचे सुंदर मुखपृष्ठ व आतील सजावट उद्वेली बुक्स प्रकाशनाच्या वैशाली मेहेत्रे यांनी केली आहे. ते रसिकांच्या पसंतीस उतरले.
“असा बरसला हायकू” या काव्यसंग्रहात हायकूंवर प्रमुख पाहुणे श्री. राजेंद्र लाखे यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले. कविता या साहित्यप्रकाराची वैशिष्ट्ये सांगून हायकू हा एक काव्यप्रकार कसा आहे हे त्यांनी समजावून सांगितले. मेघना साने यांचे हायकू आशय व नाद या दोन्ही दृष्टींनी संपन्न आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले. आपल्या सुंदर शैलीत साहित्यावर विवेचन करणारे त्यांचे भाषण संपूच नये असे रसिक श्रोत्यांना वाटत होते.
या भाषणानंतर उद्वेली बुक्स प्रकाशनचे, विवेक मेहेत्रे अचानक माईकवर आले आणि त्यांनी घोषणा केली की मेघना साने यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांचे आणखी एक पुस्तक तयार केले आहे हे त्यांच्यासाठीसुद्धा सरप्राईज आहे. हे ईबुक असून किंडलवर उपलब्ध आहे. या पुस्तकाचे नाव आहे “इथे मराठी, तिथे मराठी !” या पुस्तकाचे प्रकाशन राजन लाखे यांनी करावे अशी विनंती त्यांनी केली. राजन लाखे यांनी लॅपटॉपजवळ जाऊन प्रकाशन केल्यानंतर सभागृहात लावलेल्या स्क्रीनवर पुस्तकाचे कव्हर आणि काही मजकूर प्रदर्शित झाला.
पुस्तकाची अनुक्रमणिका पाहिल्यावर मेघना साने म्हणाल्या, “यातील बहुतांशी लेख हे ‘न्यूज स्टोरी टुडे’ या पोर्टलवर प्रसिद्ध झालेले आहेत. महाराष्ट्रात व परदेशात मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी झटणाऱ्या संस्थांबद्दल मी लिहिले आहे. या लेखनासाठी ‘न्यूज स्टोरी टुडे’ चे संपादक देवेंद्र भुजबळ आणि निर्मात्या सौ अलका भुजबळ यांनी मला प्रोत्साहन दिले .
समारंभाच्या अध्यक्षीय भाषणात ऍडव्होकेट राजेंद्र पै यांनी कवयित्री शिरीष पै यांचे काही हायकू उद्धृत केले आणि हायकूंची वैशिष्ट्ये सांगितली. तसेच आपले आजोबा आचार्य अत्रे यांच्या काही आठवणीही सांगितल्या. हायकू हा काव्यप्रकार मराठीत रुजविण्याचा ध्यास शिरीष पै यांनी घेतला होता. त्यांचे तेच कार्य पुढील पिढीच्या कवयित्री मेघना साने करत राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय रसाळ शैलीत आणि ओघवत्या भाषेत डॉ. प्रतीक्षा बोर्डे यांनी प्रसन्नपणे केले.
कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात मेघना साने यांच्या हायकूंवर हायकुतील दृश्यांना उचित असे विडिओ वैशाली मेहेत्रे यांनी बनविले होते. त्याचे सादरीकरण रसिकांसमोर करण्यात आले. हे विडिओ स्क्रीनवर प्रदर्शित होत असताना त्यावर विवेचन करून मेघना साने यांनी हायकू कसा बांधला जातो याची प्रक्रिया स्पष्ट केली.
या समारंभाला ठाणे व मुंबई परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. अनंत देशमुख, लेखिका व पत्रकार जयश्री देसाई, ‘न्यूज स्टोरी टुडे’ चे संपादक देवेंद्र भुजबळ आणि निर्मात्या सौ अलका भुजबळ, हेडाम कादंबरीचे लेखक नागू वीरकर, सुप्रसिद्ध समीक्षक प्रदीप जाधव, आकाशवाणीचे निवृत्त सह संचालक भूपेंद्र मिस्त्री, ‘गप्पागोष्टी’कार जयंत ओक, ठाण्यातील शिरीष पै कविकट्ट्याचे समन्वयक अनंत जोशी, कवी विकास भावे, लेखक डॉ. मारुती नलावडे, पत्रकार मनीष वाघ, कोमसाप युवा शक्तीच्या दीपा ठाणेकर व ठाण्यातील अनेक कवी कवयित्री उपस्थित होते.
हायकू या विषयावर नवीन माहिती मिळावी म्हणून कविमनाच्या अनेक रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाला गर्दी केली होती. तसेच मेघना साने यांचा १२ एप्रिल हा वाढदिवस असल्यामुळे अनेक शुभेच्छुकही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
— लेखन : सिद्धी पटवर्धन. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
हार्दिक अभिनंदन मेघना ताई! दिसायला सोपा आणि लिहायला अवघड, वाचताना अतिशय अर्थपूर्ण असा हायकू, त्या विषयावरचे आपले पुस्तक नक्कीच चांगले असणार.
मनःपूर्वक अभिनंदन मेघनताई ,आपण जे जे करता ते उत्कृष्टच असते, हायकू काव्य प्रकार बद्दल छान माहिती मिळाली, बिलेटेड हॅपी बिर्थ डे ,आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ,पुन्हा एकदा अभिनंदन
मेघनाताईंनी हायकू विषयावर प्रबंध आणि हायकू लिहून मोलाचे कार्य केले आहे.
ती कवयित्री आहे, ती निवेदिका आहे, ती लेखिका आहे ती अभिनेत्री आहे अशा या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाला मनःपुर्वक अभिवादन तुमचं खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. तुम्ही जे काही करता ते अगदी मनापासून करता हे मी स्वतः अनुभवले आहे. पुनश्च अभिनंदन 🌹
– दीपक म कांबळी
अभिनंदन मेघना ताई कवितेच्या प्रातांतली वेगळी वाट चोखाळली . हायकू व सर्व सामान्य कविता नेमका तुम्ही सांगितला प्रतिमेचे उदाहरण देऊन
खूप छान ! अभिनंदन मेघना ताई ….
मॅडम, हार्दिक अभिनंदन….हायकू या जपानी काव्यप्रकाराची अभ्यासपूर्ण खूप चांगली माहीती मिळाली. पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम व्यासपीठावरील मान्यवरांच्या भाषणाने रसिकांच्या उपस्थितीत सुंदरतेने संपन्न झाला. वृत्तांकन खूप छान. वाचत राहावे असे वाटणारे…🙏🙏
कार्यक्रमाचा सुंदर आढावा घेत हायकूविषयी महत्वाचे काही उलगडून सांगितले आहे 👍👍