विदर्भातील सुप्रसिद्ध कवयित्री, सामाजिक कार्यकर्त्या, प्रा. विमलताई गाडेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी ‘विमल दिवस’ आयोजित करण्यात येतो. त्यांची मुलं आणि त्यांच्यावर प्रेम करणारे राज्यातील चाहते यांच्या पुढाकाराने विमलताईंच्या आठवणी जपण्याचा आणि नवीन पिढीला प्रेरणा देण्याचा कार्यक्रम साजरा करण्यात येतो.
विमलताई यांच्या तिसऱ्या स्मृती दिनी गीतकार स्वानंद किरकिरे यांच्या सोबत झालेल्या दिलखुलास गप्पा, दिग्गज रंगकर्मी भारत गणेशपुरे आणि डॉ. मंगेश बनसोड यांचा गौरव यामुळे यंदाचा मुंबई विद्यापीठात झालेला “विमल दिवस” चांगलाच रंगतदार झाला.
कविता ही कविच्या हृदयातून कागदावर उतरते, त्याला जे सांगायचं ते तो कवितेच्या माध्यमातून सांगतो. कविता आईच्या हातच्या जेवणासारखी असते तर, गाणं लिहीतांना ते लोकांसाठी लिहीलेल असल्यानं त्याला सजवून लिहावं लागत ते एखाद्या शेफन बनवलेल्या कुझीन प्रमाणे असावं लागतं, मात्र त्यात आईच्या हाता सारखी चव देखील असावी लागते, अशा सोप्या शब्दात लोकप्रिय गीतकार स्वानंद किरकिरे यांनी कविता आणि गाणं यातील फरक समजवून सांगितला.
यावेळी लोकप्रिय अभिनेते भारत गणेशपुरे यांच्या अभिनय क्षेत्रातील योगदानाबद्दल आणि कवी, रंगकर्मी व शिक्षणतज्ज्ञ डॉ. मंगेश बनसोड यांचा ‘विमल ताईंचा अभिमान – गौरवल्लेख सन्मान’ या पुरस्काराने विशेष सत्कार करण्यात आला.
जेष्ठ संपादक शाम पेठकर यांच्यासोबत चाललेल्या या रंगतदार गप्पांमध्ये स्वानंद किरकिरे यांनी त्यांचा साहित्य प्रवास उलगडून दाखविला. ते म्हणाले, “गाणं लिहितांना ते लोकांना आवडाव यासाठी लोकांच्या भाषेत लिहावं लागतं. पद्य साहित्यामुळे रंजकता कायम राहते, जगातील धर्मग्रंथ काव्यात्मक स्वरुपात लिहीले आहेत म्हणून ते सगळ्यांना लक्षात राहतात”.
नव्या पिढीला मार्गदर्शन करतांना श्री किरकिरे यांनी दुसऱ्याची नक्कल करण्यापेक्षा तुम्ही कोण आहात हे ओळखुन स्व:ताची शैली तयार करण्याचा सल्ला दिला.
सत्काराला उत्तर देताना डॉ. मंगेश बनसोड यांनी आपल्या आतापर्यंतच्या प्रवासात लाभलेल्या विविध लोकांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख केला. राष्ट्रीय नाट्य विद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी चार वेळा प्रयत्न केले. पण, अपुऱ्या मार्गदर्शनामुळे आणि सोई सुविधांमुळे शेवटच्या फेरीत जाऊनही प्रवेश मिळवता आला नाही, याची खंत न बाळगता त्यांनी विद्यार्थ्यांना विविध दिग्दर्शकांच्या हाताखाली शिक्षण घेता यावे, यासाठी विजय केंकरे, सई परांजपे, नादीरा बब्बर, पुरुषोत्तम बेर्डे, रणजित कपूर, असील रईस यांसारख्या मराठी-हिंदी रंगभूमीवर काम करणाऱ्या, मातब्बर मंडळींना ॲक्याडमीत आणून विविध विषय आणि शैलीतील नाटकांची निर्मिती विद्यार्थ्यांसाठी केली. विमलताई गाडेकर यांचे साहित्य महाविद्यालयात असताना पासून वाचनात आले असल्याचे डॉ.बनसोड म्हणाले. आपल्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकरां मुळे शिक्षणाची संधी मिळाली असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
आपल्या खुमासदार आणि मिश्किल भाषणाने भारत गणेशपुरे यांनी उपस्थितांची मने जिंकली. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले, अभिनयाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण न घेता या क्षेत्रात आलो. समोर कितीही ताकदीचा नट असला तरी केवळ जबरदस्त आत्मविश्वास असल्याने कॅमेरा समोर बोलता येतं, आणि यातूनच एकामागून एक कामं मिळत गेली. जयंत गाडेकर यांच्यासोबत विद्यापीठात शिकत असताना पासून मैत्री आहे. विमलताई गाडेकराना आपण भेटलेलो असल्याने हा गौरव स्विकारताना आनंद होतो आहे. असे श्री. गणेशपुरे म्हणाले.
विमल ताईंच्या आठवणींना उजाळा देताना, त्यांचे पती भगवान गाडेकर यांनी आपल्या चौपन्न वर्षांच्या यशस्वी साथी तील कडु गोड आठवणींचा खजिना उघड केला. तू नसलीस तरी तुझी प्रेरणा आहे, आणि मला तुझ्या आठवणींचा आधार अशी भावनिक साद घातली.
सुप्रसिद्ध अभिनेते सुशील बौंठीयाल यांनीही विमल ताईंच्या आठवणी सांगितल्या. इतर मित्रांकडे गेल्यावर त्यांच्या आईसोबत साधारण गप्पा होतात, मात्र जयंता ची आई ही अनेक विषयात जाणकार होती, तिच्यासोबत बोलतांना आपल्या कामाबद्दल, भविष्याबद्दल,चालू घडामोडींबद्दल चर्चा करता येत होती. हिंदी चित्रपट सृष्टीत कार्यरत असलेल्या सुशिल यांनी विमल ताईंची मराठीतील एक कविता आजही स्मरणात असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्ज्वलाने झाली. विमलताईंच्या कार्यकर्तुत्वाचा आढावा घेणारी चित्रफीत दाखविण्यात आली.
सर्व उपस्थितांना विमल गाडेकर लिखित पुस्तकं तसेच विमलताईंच्या आवाजातील ललित लेखांची लिंक असलेले स्मृतीचिन्ह यावेळी देण्यात आले.या कार्यक्रमासाठी मुंबई विद्यापीठाचे जनसंवाद विभाग प्रमुख डॉ. सुंदर राजदीप यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मृण्मयी भजक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल अंजारा, आशिष कुलकर्णी, प्रकाश शंभरकर, रिची शंभरकर व अभिनेत्री गीता अगरवाल यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला साहित्यिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, उच्चपदस्थ अधिकारी, डॉक्टर, सिनेसृष्टीतील मान्यवर यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक गण आणि विविध क्षेत्रातील नामवंत उपस्थित होते.
अल्प परिचय
प्रा. विमलताई गाडेकर या चंद्रपूर येथील जनता महाविद्यालयात समाजशास्त्र विषयाच्या प्राध्यापक होत्या. त्यांचे आतापर्यंत अनेक कविता संग्रह आणि कथा संग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या साहित्यावर गोंडवाणा विद्यापिठातील काही विद्यार्थी पी एच डी करित आहेत. आंबेडकरी साहित्यात त्यांच्या साहित्याचा आणि कार्याचा नेहमीच आदराने उल्लेख केला जातो. महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक उत्थानासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले.
प्रा. विमलताई गाडेकर यांचे ज्येष्ठ पुत्र, डॉ. हेमंत हे भोपाळ येथे वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता आहेत.कन्या अर्चना शंभरकर पालघर येथे जिल्हा माहिती अधिकारी आहे.दुसरा मुलगा जयंत गाडेकर सिने अभिनेता आहे. तर छोटी मुलगी डॉ.मोना या ‘अर्गोक्युअर’ या आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेच्या संस्थापक संचालक आहेत.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800