जगप्रसिद्ध साहित्यिक, नाटककार शेक्सपियर याचा जन्म व मृत्यूही आजच्या दिवशी म्हणजेच २३ एप्रिल रोजी झाला असल्याने हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने जाणून घेऊ या भारतातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिलार ची माहिती.
– संपादक
सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर जवळ असलेले “भिलार” हे गाव आता पुस्तकांचे गाव म्हणून ओळखल्या जाते. अशा या भिलार गावाला आम्ही (म्हणजे मी व माझी पत्नी सौ अलका भुजबळ) नुकतीच भेट दिली.
भिलार हे गाव महाबळेश्वर जवळील पाचगणीपासून सुमारे ५ कि.मी. अंतरावर आहे. आम्ही गावात पोहोचलो तेव्हा नेमकी संध्याकाळ झाली असल्याने फार घरे पाहू शकलो नाही. तसेच रविवार असल्याने या योजनेचे कार्यालय ही बंद होते. म्हणून आम्ही आधी कार्यालयात न जाता मंगलताई भिलारे यांच्या घरी (या टुमदार गावातील सर्वांचीच आडनावे भिलारे आहेत !) गेलो. त्यांचे घर दुमजली असून हॉल तर खूपच प्रशस्त आहे. त्यांनी सांगितले की, आज या गावातील ३५ घरे या योजनेत सहभागी आहेत. प्रत्येक घरी एकेका विषयाची भरपूर पुस्तके आहेत. उदा. कथा, कादंबरी, चरित्र, लोकसाहित्य अशा प्रमाणे ही पुस्तके त्या त्या घरी आहेत. तसेच ज्या घरात जी पुस्तके आहेत, त्यांच्या विषयाच्या उभ्या आकर्षक पाट्या त्या त्या घरासमोर लावलेल्या आहेत.
खुद्द मंगलताई भिलारे यांच्या घरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील आणि गड किल्ल्यांवरील असंख्य पुस्तके आहेत. ही पुस्तके एका मोठ्या पुस्तक स्टँड वर तसेच स्टील च्या काचेचे दार असलेल्या कपाटात ठेवलेली आहेत जेणेकरून इथे येणारे वाचक ही पुस्तके सहज पाहू शकतात, त्या पैकी हवे ते पुस्तक चाळू शकतात आणि ते पुस्तक आवडल्यास तिथेच बसून वाचू शकतात. या पुस्तक वाचनाच्या दरम्यान त्यांची चहा, नाश्त्याची सोय इथेच सशुल्क होऊ शकते. मात्र या घरांमध्ये राहण्याची सोय होऊ शकत नाही. आपल्याला राहायचे असेल तर गावातील हॉटेल मध्ये रहावे लागते.
या प्रकल्पाची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मराठी भाषा व सांस्कृतिक मंत्री, श्री. विनोद तावडे यांना इंग्लंडमधील ‘हे ऑन वे’ या पुस्तकाच्या गावावरून सुचली. पुढे त्यांनी शासकीय अधिकारी, साहित्यिक, प्रकाशक यांच्याशी साधकबाधक चर्चा करून निश्चयाने ती अमलात आणून दाखवली. या सर्व मंथनातून १ मे २०१७ रोजी भिलार हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून उदयाला आले. बहुधा महाबळेश्वर, पाचगणी येथे पर्यटकांचा सतत राबता असतो म्हणून हे गाव या योजनेसाठी सुयोग्य वाटले असावे. तसेच सर्व गावकऱ्यांची स्वागतशिल वृत्तीही कारणीभूत ठरली असावी. आज या ३५ घरांमध्ये सर्व विषयांची मिळून जवळपास २५ हजार पुस्तके आहेत. बहुसंख्य पुस्तके ही मराठी भाषेतील आहेत.
या अनोख्या योजनेचे स्वागत प्रसारमाध्यमे, साहित्यिक आणि सामान्य जनतेनेही केले आहे. त्यामुळे पर्यटक – वाचक, अभ्यासक इथे मोठ्या संख्येने भेट देत असतात. महाबळेश्वर ला तुम्ही कधी गेल्यास या गावाला भेट द्यायला चुकू नका.
— लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
Bhilare good initiative
छान उपक्रम.
शेजो उवाच
वाचाल तर ‘वाचाल’
जागतिक पुस्तक दिन विशेष
https://youtu.be/6GAt_3dlBmg?si=8pKa7VGffQaWznaH
लाईक, शेअर आणि सबस्क्राईब
भिलार म्हणजे पुस्तकांची पंढरी तेथे आपण संपादक ,लेखक,वाचक,लेखनाचे वारकरीच म्हणून गेला होता.
सुंदर माहिती