आपल्या पोर्टल चे नियमित लेखक, सिने गायक श्री उदय वाईकर यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांनी केलेले हे सिंहावलोकन आपल्यालाही प्रेरणादायी ठरेल. श्री उदय वाईकर यांना न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
आज, दिनांक २६ नोव्हेंबर, माझा वाढदिवस. त्या निमित्याने मी केलेले सिंहावलोकन आपल्या पुढे सादर करीत आहे. आशा आहे की, ते आपल्याला निश्चितच आवडेल.
माझा जन्म वाशिम जिल्ह्यातील शिरपूर येथे दि. २६ नोव्हेंबर १९५६ रोजी झाला. शिरपूरला जैन धर्मियांची काशी मानतात. माझ्या मामाचे घर जैन मंदिराजवळ असल्याने तिथे धार्मिक, आध्यात्मिक वातावरण आहे.
माझे बालपण व शिक्षण, परभणी जिल्ह्यातील चारठाणा येथे झाले. वडील स्वातंत्र्य सैनिक व समाज सेवक असल्यामुळे घरी सतत सर्व मोठमोठे लोक येत असत. त्यामधे वडिलांचे मित्र दादा कोंडके, निळू फुले, राम नगरकर, शाहीर लीलाधर हेगडे, वसंत बापट, बापू काळदाते, एस एम जोशी, नानासाहेब गोरे असे दिग्गज नेते, कलाकार असत.
मी मॅट्रिकला असताना चारठाणा येथे परीक्षा केंद्र नव्हते. त्यामुळे आम्हाला परीक्षेसाठी जिंतूरला जावे लागे. तेथे आम्ही ॲड लक्ष्मीकांत देशपांडे यांच्या घरी राहून परीक्षा दिली.
पुढील शिक्षण घेण्यासाठी मी परभणी येथे बी एससी, ॲग्री साठी आलो. तिथे आम्हाला trimister सिस्टीम होती. एका वर्षात तीन trimester होत्या. शेवटच्या वर्षी माझा एक विषय राहिल्यामुळे मी मुंबईस बहिणीकडे गेलो.
मुंबईत आल्यावर माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. मला सिने सींगर्स असोसिएशनची मेंबरशिप मिळाली व मी मुंबईत हिंदी चित्रपट सृष्टीत कोरस गायक म्हणून काम करू लागलो.
या काळात सुप्रसिद्ध गायक गायिका अभिनेते यांच्यासोबत गाणे म्हणण्याची संधी मिळाली. त्यामध्ये स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले, किशोरकुमार, मोहम्मद रफी, महेंद्र कपूर अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, कुमार सानू, उदित नारायण, अलका याज्ञिक अश्या अनेक बड्या गायकांसोबत मला गाण्याची संधी मिळाली. तसेच रामायण, महाभारत, कृष्णा अश्या अनेक मालिकात गायन करण्याची तसेच देश विदेशातील अनेक स्टेज शोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यामधे महानायक अमिताभ बच्चन, लतादीदी, आशाताई, किशोरदा यांच्यासोबत देशात व परदेशात शोमध्ये मी सहभागी . याच काळात सुरेश वाडकर, भवानी शंकर, अरुण इंगळे, शिशिर सापळे, बोगम यांच्यासारखे मित्र मिळाले व त्यांच्या सहवासात काम करण्याची संधी मिळाली.
नंतर परभणी मराठवाडा कृषी विद्यापिठात संशोधन सहायक म्हणून नौकरी मिळाली. सुरूवातीस माझे मन नौकरीत रमत नव्हते. त्यामुळे मी सारखे मुंबईस जात असे. नंतर मात्र मी हळू हळू नौकरीत रमलो.
विद्यापिठात असताना माझी बदली ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, परभणी येथे झाली. तेव्हा हे व महाराष्ट्रातील सर्वच प्रशिक्षण केंद्रे यशदाच्या अंतर्गत होती. यशदाचे प्रमुख श्री रत्नाकर गायकवाड, आय ए एस व रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करण्याची संधी मिळाली. तिथे मी पंचायत राज या विषयावर दहा खंड प्रकाशित करण्यात योगदान दिले. त्यात लेखक म्हणून माझे नाव आहे. या काळात मला मोहन धडफले, मनोज कुलकर्णी, मल्लिनाथ कलशेट्टी, जगताप, कल्याणी यादव यांच्यासारखे अनेक कर्तबगार मित्र मिळाले. या प्रशिक्षण केंद्राने मला मास्टर ट्रेनर केले.
वरिष्ठ सहायक संशोधक या पदावरून मी विद्यापीठातून निवृत्त झालो. या विद्यापिठात मला व्हीं एम भाले, अशोक धवन, पी एस चव्हाण, वाघमारे, शिरडकर,अंभुरे असे मित्र मिळाले.
निवृत्ती नंतर मला काही काळ सकाळच्या SLIC मध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळाली. या वेळी अमोल बिरारी, जयप्रकाश कुलकर्णी यांच्यासारखे मित्र मिळाले.या काळात मी पाच हजार सरपंच, तीन हजार महिला यांना प्रशिक्षण दिले.
माझे लग्न ९ मे रोजी होऊन मला अश्विनी सारखी मनमिळाऊ स्वभावाची, मला सांभाळून घेणारी पत्नी मिळाली. आम्हाला अनिकेत, मोनिका, सौरभ ही मुले झाली. त्यांना शिकवण्यात अश्विनीचा सिंहांचा वाटा आहे. अनिकेत डॉक्टर झाला. मोनिका एम ई, इलेक्ट्रिकल झाली. सौरभने अमेरिकेत जाऊन एम एस केले.
आमच्या दोन्ही सूना उच्च विद्या विभूषित आहेत. सौ. अपूर्वा एम टेक झाली. तर मृण्मयी ने अमेरिकेत दोन विषयात एम एस केले. आनंदाची बाब म्हणजे दोन्ही सूना स्वभावाने चांगल्या आहेत. तर श्रीनिवास डांगे यांच्यासारखे कर्तबगार जावई मिळाले. श्रीनिका उर्फ निक्की सारखी गोड नात झाली. मला तीन कर्तबगार व्याही मिळाले. श्री राजकुमार देशमुख माजलगाव, प्रदीप डांगे व डॉ सुधीर गवळी पुणे यांच्यासोबत नाते निर्माण झाले.
आयुष्यात अनेक सुख दुःखाचे प्रसंग आले. यातून आपल्या सर्वांच्यामुळे सहन करण्याची क्षमता आली. मी अनेक वर्षापासून 13 ऑक्टोंबरला “एक शाम किशोर के नाम” हा कार्यक्रम आयोजित करतो. यात परभणीतील सुप्रसिद्ध कलाकारांची ओळख झाली. यामध्ये डॉ चांडक, डॉ रवींद्र मानवतकर, डॉ श्रीकृष्ण कातनेश्र्वरकर, डॉ मुळे, डॉ गोपाल जवादे, डॉ धर्माधिकारी, डॉ संजय टाकळकर, डॉ मीना टाकळकर, डॉ जयश्री देशपांडे, यांच्यासारखे संगितावर निस्सीम प्रेम करणारे मित्र यांचा समावेश आहे.
आम्हीं मागील वर्षी अमेरिकेत जाऊन आलो. माझा धाकटा मुलगा सौरभ व मृण्मयी तिथे असतात.
तुमच्या सारखे मित्र, हितचिंतक, नातेवाईक यांच्यामुळे जीवनात रंगत आली. या सर्व जीवनात परमेश्वरची कृपा, आई वडील यांची पुण्याई व सर्व सहृदय मित्र यांच्या सहवासामुळे जीवन समृध्द झाले. मी या सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो. आपल्या सर्वांच्या सदिच्छा या पुढे ही कायम राहतील अशी प्रार्थना करून परमेश्वर चरणी नतमस्तक होतो.
— लेखन : सिने गायक उदय वाईकर. परभणी
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800