Saturday, July 27, 2024
Homeबातम्याअसे रंगले 'टोरोंटो' साहित्य संमेलन

असे रंगले ‘टोरोंटो’ साहित्य संमेलन

महाराष्ट्रात होणारी साहित्य संमेलनं म्हणजे सांस्कृतिकतेला शिरोमाथ्यावर ठेवणारे जणू महोत्सवंच. भारताबाहेर संपन्न होणारी मराठी साहित्य संमेलनंही वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनं साकार होतात.

मराठी महामंडळातर्फे प्रतिवर्षी सातासमुद्रापार भरवलं जाणारं ‘विश्व मराठी साहित्य संमेलन’ हे सर्वांच्या परिचयाचं आहे. मराठी भाषेचा डंका विदेशात वाजतो, ही बाब कौतुकास्पद म्हणावी लागेल.

महाराष्ट्रातून देश-विदेशात नोकरी, व्यवसायानिमित्त जाऊन तिथे कायमस्वरूपी स्थायिक झालेल्या मराठी माणसानं आपल्या मायमराठीची संस्कारपरिपूर्तता जतन करण्याची परंपरा अबाधित राखली. भौगोलिक सीमोल्लंघन करून जगाच्या नकाशावरती यत्र-तत्र-सर्वत्र स्थापन झालेली ‘मराठी भाषिक मंडळं’, ‘महाराष्ट्र मंडळं’, ही साक्षात मायमराठीनं विदेशात घेतलेल्या उंच भरारीची उदाहरणे आहेत. विदेशस्थ मराठीजनांनी सुरू केलेल्या या संस्थास्वरूप चळवळींमुळे आंग्लविभूषित संस्कृतीनं नखशिखांत मढलेल्या देशांमध्येही महाराष्ट्राच्या मराठी भाषेचं तेज आजंही ध्रुव तार्‍यासम ‘अढळ’ राहिलं आहे.

कॅनडातील सगळ्यात मोठं शहर ‘टोरोंटो’ येथे स्थापन झालेलं हे असंच एक ‘मराठी भाषिक मंडळ’. महाराष्ट्रातून कॅनडामध्ये स्थलांतरित झालेल्या मराठी भाषिक मंडळींनी मराठमोळ्या संस्कृतीचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी स्थापन केलेली ही सेवाभावी संस्था. या संस्थेतर्फे सांस्कृतिक-कला महोत्सव, खाद्यजत्रा, वधु-वर मेळावा, साहित्य संमेलन, मराठी शाळा, ‘स्नेहबंध’ – दिवाळी अंक, वरिष्ठ मंच, संवाद, व्याख्यानमाला, स्पर्धा, क्रीडासत्र, मराठी व्यवसाय निर्देशिका, असे विविधांगी उपक्रम सहर्ष राबवले जातात. हे मंडळ गेल्या ५० वर्षांपासून सक्रिय असून, उत्तर अमेरिकेतील पहिले मराठी मंडळ म्हणून ते ख्यातकीर्त आहे.

‘मराठी भाषिक मंडळ, टोरोंटो’चं ३६ वं साहित्य संमेलन दिनांक २१ एप्रिल, २०२४ रोजी झोकात संपन्न झालं. या संमेलनाला ‘डिजिटल टच’ देण्यात आला होता. या संमेलनात कॅनडावासी साहित्यिकांची मांदियाळी ‘डिजिटली’ उपलब्ध करून दिलेल्या मंचावरती जमली होती. हे संमेलन थेट प्रक्षेपण लिंकद्वारे भारत, कॅनडातल्या साहित्यप्रेमींसाठी खुलं करून देण्यात आलं होतं. संमेलनाची झलक पाहण्यासाठी तब्बल २०० हून अधिक साहित्यप्रेमी, श्रोते मंडळी, नेटकरी यांनी देश-विदेशांतून हजेरी लावली होती. ‘Online’ स्वरूपात त्यांनी या संमेलनाचा मनमुराद आस्वाद घेतला.

‘टोरोंटो’ येथील मराठी भाषिक मंडळाच्या अनेकविध कार्यक्रमांमध्ये व उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणारे मंडळाचे अध्यक्ष श्री. ऋषिकेश रानडे यांनी संमेलनाच्या शुभारंभप्रसंगी मंडळाकडून स्वागतपर दोन शब्द सादर करून, त्यांचं संमेलनासंदर्भातील मनोगत व्यक्त केलं.

सदर संमेलनाच्या सूत्रसंचालिका वैशाली बोडस यांनी साहित्यातील अनेक संदर्भ व दाखले देत अत्यंत खुमासदार शैलीत संमेलनाचं सूत्रसंचालन केलं. त्यांच्या निवेदनशैलीला प्रेक्षकांनी ‘दिल से’ दाद दिली.

‘मन करा रे प्रसन्न’ या व्याख्यानमालेचे सादरकर्ते, लेखक, प्रवचनकार, अभिनेते, दिग्दर्शक, गप्पाष्टककार, आध्यात्मिक गुरु, एक बहुआयामी व्यक्तिमत्व डाॅ. संजय उपाध्ये हे सदर संमेलनाचे अध्यक्ष (बाह्य) व प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. संमेलनाध्यक्ष डाॅ. उपाध्ये यांनी संमेलनात ‘मराठी भाषिक मंडळ, टोरोंटो’ च्या ‘साहित्य कट्टा’ समुह या अभिनव उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. दर्जेदार साहित्यातून समाजप्रबोधन घडतं. MBM टोरोंटो ‘साहित्य कट्टा’ या उपक्रमांतर्गत साहित्यप्रेमी आपलं स्वलिखित साहित्य मंडळाच्या संकेतस्थळावरून; तसेच युट्युब चॅनेलच्या माध्यमातून प्रसारित करू शकतील. साहित्यिक व साहित्योपासक यांच्यामध्ये सुसंवाद घडवून आणण्याचं कार्य टोरोंटोचा हा ‘साहित्य कट्टा’ निश्चितंच करेल. साहित्यप्रेमी व संमेलनाध्यक्ष यांनी या उपक्रमाचं सहर्ष स्वागत केलं.

“महाराष्ट्राबाहेर विदेशातंही मराठी भाषेचं संवर्धन करण्याची धडपड मराठी माणसं किती करतात, याचा मला व्यक्तिगत अभिमान वाटतो. त्यांचं मी जाहिर कौतुक करतो व अभिनंदनंही करतो”, असे डाॅ. संजय उपाध्ये म्हणाले.

डॉ. उपाध्ये यांचं अध्यक्षीय भाषण, हे या साहित्य संमेलनाचं प्रमुख आकर्षण ठरलं. अध्यक्षीय भाषण म्हणजे संमेलनाध्यक्षांची जणू ‘सत्वपरीक्षा’च. पण हा नियम डाॅ. उपाध्ये यांना लागू होत नाही. कारण ‘जिंकलो ऐसे म्हणा’ हे शीर्षक असलेला कार्यक्रम घेऊन ‘गप्पाष्टककार’ अशी उपाधी मिळवलेल्या डाॅ. उपाध्ये यांनी समस्त साहित्यप्रेमींसोबत हसत-खेळत गप्पा मारल्या व विषयानुषंगानं त्यांनी सादर केलेल्या ‘नका नका आठवू जुन्या त्या गतकाळातील खुणा, आजवरी जे जगलो ते मी जिंकलो ऐसे म्हणा…’ या कवितेनं श्रोतृवर्गाची मने अगदी सहज जिंकली. पुढे,

“आईची मम्मी झाली, चवीची यम्मी झाली
बदलाचे फॅड झालं, वडलांचं डॅड झालं
पतंगाचं काईट झालं, विमानाचं फ्लाईट झालं
कावळ्याचं क्रो झालं, भावाचं ब्रो झालं…”

अशी खास उपाध्येशैलीत त्यांनी हास्यलतिका फुलवली. ‘अमृताचं हास्य असावं, मिलियन डाॅलर स्माईल असावी’, असा सुखद संदेश देखील श्रोतृवर्गाला दिला.

संमेलनाध्यक्ष डाॅ. उपाध्ये यांच्या मनमोहक अध्यक्षीय भाषणानंतर सहभागी साहित्यिकजन, सादरकर्ते यांचा साहित्य अभिवाचनाचा व साहित्य प्रदर्शित करण्याचा कार्यक्रम जल्लोषात पार पडला. त्यांच्या प्रातिभ्यदर्शनानं प्रेक्षकांना ‘अथपासून इतिपर्यंत’ बांधून ठेवलं. साहित्यात झळकणारे आगळे-वेगळे विषय, मांडणी, शैली, तंत्र, वाक्यरचना, सादरीकरणाच्या पद्धती, इ. गोष्टींचा अभ्यास जवळून करण्याची सुवर्ण संधी रसिक-प्रेक्षकांना मिळाली. सर्व सहभागी साहित्यिकांना डाॅ. उपाध्ये यांनी अभिप्रायाची पोचपावती दिली.

संमेलनात पुढील सहभागी साहित्यिकांनी आपल्या साहित्याचं सादरीकरण केलं,
१. अनुप घोलप – कविता १) झेंडा मंदिराचा, २) दिवसाचा चंद्र, ३) साथ हवी
२. ⁠अजित कुकडे – लेख – ‘प्लीज, प्लीज, प्लीज’
३. ⁠अर्चना बापट – कविता १) सारं कसं गारठलेलं, २) सोनचाफा
४. ⁠गायत्री गद्रे – लेख – ‘स्वप्न’
५. ⁠मधुसूदन भिडे – कविता १) गाढवाचे लग्न, २) रणदीप हूडावरती अभिनंदनपर कविता ३) नरेंद्रजी मोदी – एक युगपुरुष
६. ⁠मिलिंद गोठुसकर – लेख – ‘मराठी भाषा – शाब्दिक व लिखित संवाद विनियोग’
७. ⁠मुकुल पांडे – कविता १) वर्षा २) अरे बाप रे!
८. ⁠प्रियांका शिंदे जगताप – विज्ञान लघुलेख – ‘बुद्धिः कर्मानुसारिणी’
९. ⁠स्वप्ना कुलकर्णी – कथा – ‘द्विधा’
१०. ⁠विवेक कुलकर्णी – लेख – ‘पुस्तक विश्व’

सरस्वतीचा वरदहस्त जसा प्रत्येकाला लाभत नाही, तसाच भाषिक शब्दसंपत्तीचा योग्य पद्धतीनं वापर करणं हे सगळ्याच कवि-लेखकांना जमत नाही. ही कला आतून स्फुरण्यासाठी अशी संमेलनं भरवणं ही आज काळाची गरज आहे. नवोदित, अनुभवी तसेच सर्वच स्तरांतील साहित्योपासकांसाठी ही संमेलनं म्हणजे आंतरिक ऊर्जा देणारी व्यासपीठं आहेत. ‘मुक्तपणे व्यक्त होणं’ ही सुद्धा एक कला आहे. या कलेची जोपासना अशा संमेलनांमधून होते. ही कला शिकण्याची इच्छा असणार्‍या सर्वच साहित्यप्रेमींना त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. ‘मराठी भाषिक मंडळ, टोरोंटो’ चं ३६ वं साहित्य संमेलन ‘Online’ माध्यमातून झोकात संपन्न झाल्याबद्दल समस्त कार्यकारिणी, सहभागी साहित्यिक व उदंड लाभलेल्या प्रेक्षकसागराचं आभाळभर कौतुक व त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

या संमेलनाचा २ भागातील दृकश्राव्य वृत्तांत आपण पुढील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

— लेखन : प्रियांका शिंदे जगताप, मिसिसागा
‘मराठी भाषिक मंडळ, टोरोंटो’ ३६ वे साहित्य संमेलन,
सहभागी साहित्यिक, साहित्यप्रेमी
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८