कोकण मराठी साहित्य परिषद आणि मराठी स्पिकींग युनियन मॉरीशस अंतर्गत मॉरीशस मराठी मंडळी फेडरेशन, मॉरीशस मराठी कल्चर सेंट्रल ट्रस्ट यांच्या सहसंयोजनाने व महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कोमसापचे १७ वे आंतरराष्ट्रीय हृद्यंगम मराठी साहित्य संमेलन मॉरीशस येथे २ ते ३ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत कोमसापचे १०० सदस्य, पदाधिकारी मॉरिशसच्या साहित्य सहलीसाठी मॉरिशससला गेलो.
सकाळी बरोबर ९ वाजता ज्ञानोबा तुकाराच्या नामघोष करत, वाजत गाजत ग्रंथ दिंडीने सुरुवात केली. ९.३० वाजता उद्घाटन सत्राला सुरूवात झाली. जेष्ट पत्रकार विजय कुवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली मॉरिशस येथील उदयंगम साहित्य संमेलन पार पडले. संमेलनाचे उदघाटन भारतीय कला व सांस्कृतिक संचलानलयाचे अध्यक्ष माजी खासदार विनय सहस्त्रबुध्दे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मॉरीशसच्या भारतीय दुतावासाच्या हायकमिशनर नंदिनी सिंगला, मॉरीशस सरकारमधील हौसिंग तसेच लॅन्ड ट्रान्सपोर्ट व लाईट रेल्वे मंत्री ऑलन गानू, मॉरीशसचे मिनीस्टर ऑफ आर्ट एन्ड कल्चर मंत्री अविनाश तिलक, उपपंतप्रधान लीला देवी दुकून लाचूमान, कोकण मराठी साहित्य परिषद अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, मॉरीशस मराठी स्पिकींग युनियन अध्यक्ष नितीन बाप्पू, अशा दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. संमेलनाच्या स्वागताध्यक्ष मॉरीशसच्या निशी हिरू होत्या. तसेच भारतातून गेलेले आमदार संजय केळकर, जेष्ठ कवी अशोक नायगावकर, नाट्यकर्मी अशोक समेळ कोमसाप माध्यम सल्लागार जयू भाटकर, कोमसापचे विश्वस्त रमेश कीर, प्रा.दीपा ठाणेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे रोपटे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी ३० वर्षांपूर्वी लावले. कोकणातील लेखकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी ही संस्था कोकणातील सात जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून अनेक शाखांच्या मार्फत ही साहित्य चळवळ पुढे जोमाने वाटचाल करत आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेचा वटवृक्ष इतका मोठा झाला आहे, याची पोचपावती म्हणजे मॉरिशसचे साहित्य संमेलन. परदेशात पहिल्यांदाच साहित्य संमेलनाचा आस्वाद कोमसापाच्या १०० सदस्य पदाधिकाऱ्यांनी घेतला तो असा… जेव्हा आम्ही साहित्य संमेलनाच्या सभागृहात पोहोचलो त्या वेळेला ग्रंथ दिंडीमध्ये तेथील अनेक लेखक साहित्यिक पारंपारीक पध्दतीने भारतीय पोशाख परिधान करून ग्रंथदिंडीमध्ये सामिल झाले होते. ज्ञानदेव, तुकारामाचा नामघोष करत मोठ्या उत्साहात ग्रंथदिंडी सभागृहात पोहोचली. त्या वेळेला तेथील वातावरण पाहून असे क्षणभर वाटले नाही, की आपण विदेशात आहोत.
या वेळेला केशवसुतांच्या कवितेतील सुभाषित वजा ओळी आठवल्या
प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयार खोदा !
ह्या ओळी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या लोगोवर आम्ही अनेक वर्षं वाचत आलो आहोत.
याचा अनुभव तिथेही आला.
भारतातून जातांना आम्ही आमची पुस्तकं घेऊन गेलो त्या पुस्तकांच्या प्रदर्शनाचे उदघाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन सत्रामध्ये प्रमुख पाहुण्यांची भाषणे ऐकताना आम्ही भारावून गेलो. येथील साहित्यिकांनी मांडलेले विचार आणि येथील साहित्यिकांनी मांडलेले विचार ह्या हृदयाचे त्या हृदयाला पोहोचले आणि खऱ्या अर्थाने हे साहित्य संमेलन हृदयंगम झाले. मराठी भाषेला मोठ्या प्रमाणावर लागलेले अमराठी वळण थांबवण्याची गरज आहे, असे विजय कुवळेकर, यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात म्हटले.
साधारण१८८० च्या दशकात शेतमजूर म्हणून कामाच्या गरजेपोटी महाराष्ट्रातील अनेक भागातून तसेच कोकणातून आमचे पूर्वज मॉरीशसला आले आणि त्यानंतर येथेच स्थायिक झाले. आत्ता आमची पाचवी पिढी मॉरीशसमध्ये राहत आहे. मराठी भाषा संवर्धनासाठी ही पिढी कार्यरत असून आपले पूर्वज महाराष्ट्रातील असून त्यांचा शोध घेऊन मराठी संस्कृती व भाषा जतन करण्यासाठी कार्य करीत आहोत. मराठी भाषेला मॉरीशसमधील अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळालेली असून भाषा जतन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे मॉरीशस येथील मराठी स्पिकींग युनियनचे अध्यक्ष नितीन बाप्पू यानी विचार व्यक्त केले. तेथील निशी हिरू, नितीन बापू, भालचंद्र तसेच त्यांच्या आधी मराठीचा प्रसार व प्रचार करणारे त्यांचे गुरू अशा अनेकांनी चर्चासत्र ,परिसंवादात भाग घेऊन आपले विचार मराठीतून व्यक्त केले. तेथे मराठी संस्कृतीचे आणि भाषेचे संवर्धन करण्यासाठी ते कशा प्रकारे कार्य करतात याचे उद्बोधन झाले.
संमेलनाच्या उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन अमेय रानडे यानी केले तर आभार राहूल निळे यानी मानले. यानंतर कोकण मराठी साहित्य परिषद व मॉरीशसमधील मराठी बंधू, भगिनीनी महाराष्ट्राची परंपरा अधोरेखित करणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यामध्ये गणेश स्तवन, मंगळागौर, टाळ नृत्य, कोळीनृत्य अशा कार्यक्रमांनी सभागृहातील रसिक प्रेक्षकांचे मन वेधून घेतले. दुपारच्या सत्रात “मराठी भाषेचे जतन देशात व परदेशात’ यावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादाला वक्ते म्हणून डॉ. विनय सहस्त्रबुध्दे, व़ृषाली मगदूम, उषा परब, निशी हिरू, भालचंद्र गोविंद, किरून नाओजी मोईबीर आदीनी भाग घेतला. सूत्रसंचालन जयू भाटकर यानी केले. पहिल्या दिवशी शेवटचे सत्र कवी संमेलनाचे होते. त्याच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ कवी अशोक नायगावकर होते. महाराष्ट्रातील व मॉरीशसमधील २५ हून अधिक कवीनी यावेळी त्यांच्या कविता सादर केल्या. सूत्रसंचालन कोमसाप मुंबई जिल्हाध्यक्ष लता गुठे यांनी केले.
दुसऱ्या दिवशीच्या चर्चासत्रामध्ये तरुणांचा सहभाग होता. त्या प्रत्येकाच्या मनोगतातून मराठी भाषेबद्दल त्यांना असलेला जिव्हाळा, आत्मीयता अधोरेखित होत होती. आजची मुलं काय वाचतात? मराठीची सध्याची स्थिती, मराठी भाषेमध्ये इतर भाषेमधून शब्दांची झालेली सरमिसळ, जागतीकरणाच्या रेट्यात मराठीच्या संवर्धनाचं आव्हान अशा अनेक मुद्द्यांवर विचार मांडले. मुख्य म्हणजे ग्लोबल जगात वावरणा·या आजच्या तरूण पिढीला आपल्या मराठीबद्दल काय वाटतं ? त्यांची भुमिका काय ? सहभागी तरूणांनी या संदर्भात लक्षवेधी मुद्दे मांडले.
यानंतर विशेष कार्यक्रम म्हणजे शिवाजी महाराजांवरील नाट्य प्रयोग. आमदार नितीन केळकर यांनी शिवाजीची भूमिका साकार केली तर डॉक्टर प्रदीप ढवळ यांनी संभाजीची भूमिका. याचबरोबर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी नाट्यछटा जिवंत केली. हा नाट्यप्रयोग पाहताना संपूर्ण सभागृह भारावून गेलं. त्यानंतर काही सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले.
समारोपाच्या कार्यक्रमांमध्ये काही पुस्तकं प्रकाशित झाली. यामध्ये भरारी प्रकाशाच्या चार पुस्तकांचा समावेश होता. पसायदानने दोन दिवशीय साहित्य संमेलनाची सांगता झाली.
साहित्य संमेलनानंतर तीन दिवस साईड सीन व मॉरिशस पाहण्यासाठी मिळाले. यामध्ये स्वच्छ समुद्रकिनाऱ्यावर भटकंती, तिथला निसर्ग, मंदिरं, वस्तू संग्रहालय, किल्ला अशा प्रकारे भटकंतीचा भरपूर आस्वाद घेतला
एकूणच हे साहित्य संमेलन अनेक अर्थाने मराठीचा जागर ठरला. प्रत्येकाच्या मनामध्ये मराठी भाषेबद्दल असलेली अस्था, संस्कृती बद्दलचा जिव्हाळा दिसून आला. साहित्य विचारांची देवाण घेवाण दोन्ही देशातील मराठी प्रेमीमध्ये सातत्याने सुरू राहावी हे तेथील मंडळींचा जिव्हाळा, आपलेपणा, आत्मियता या गोष्टींमुळे मॉरिशस येथील साहित्य संमेलन खऱ्या अर्थाने पूर्णत्वास गेले.
मॉरिशसमध्ये मराठी भाषा बोलणारी माणसं कमी असली तरी मराठी संस्कृती जपणारी माणसं अधिक भेटली. तिथे ज्या पद्धतीने गणेश उत्सव, महाशिवरात्री, दीपावली हे सण, उत्सव कसे साजरे करतात हेही बस मधील गाईडकडून समजले. त्यांच्या पूर्वजांच्या हिंदू संस्कृतीबद्दल त्यांना आस्था व आत्मियता आहे. तिथे हिंदू मंदिरे देवदेवतांच्या मूर्ती यामध्ये शिवालय, दुर्गा माता दत्तात्रय, साईबाबा कशा मूर्तींचा समावेश आहे ज्यांची ते पूजा करतात.
कोकणातील बाल्या नृत्य वीस पंचवीस मुलांनी जे सादर केले ते पाहून आम्ही सर्व थक्क झालो हा आगळ्या वेगळ्या लोककलेचाही आम्हांला तिथे आस्वाद घेता आला. या नृत्य प्रकाराने डोळ्यांचे पारणे फिटले. कारण एकच प्रकारचा ड्रेसकोड केलेली ही मुलं अतिशय ताल बुद्ध नृत्य सादर करत होती. त्यांचे गणपतीच्या नावाचे उच्चार, त्याचं संगित त्यांचा ताल, ठेका, त्यांचा उत्साह, ऊर्जा, आवेश आणि देवाप्रती भक्तीभाव सारंच लक्षवेधी होतं.
अतिशय साधेपणाने परंतु वेळेचं काटेकोरपणे पालन करत सुनियोजित पध्दतीने हे दोन दिवसीय साहित्य संमेलन पार पडले. या साहित्य संमेलनातून खूप काही शिकायला मिळाले. भविष्यकाळातील साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यासाठी या साहित्य संमेलनाची नक्कीच मदत होईल. हा विश्वास सोबत घेऊन आम्ही मायदेशी परतलो.
मॉरिशस हे खऱ्या अर्थाने पाचूचे बेट अनुभवायला मिळाले. तिथली माणसं, तिथला पाऊस, तिथला समुद्र, तिथली हिरवाई, उसाचे मळे तिथल्या मातीत फिरून त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मिळाली.
— लेखन : लता गुठे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869454800
कोकण मराठी साहित्य परिषद व इतर संस्था, मंडळी कडून १७ वे आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाची माहिती आपल्या *न्यूज स्टोरी टुडे* ने जेष्ठ कवी अशोक नायगावकर सरांचे विचार व संमेलनाचे वैशिष्ट्ये वाचायला, ऐकायला मिळाली ते खरे म्हणजे लेखिका लता गुठे ताई व आ.संपादक देवेंद्र भुजबळ सरांन मुळे
धन्यवाद
कवी/ लेखक गोविंद पाटील जळगाव जिल्हा जळगाव.
८७८८३३४८८२