माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांचे आज निधन झाले. गेल्याच महिन्यात आपल्या पोर्टलवर सरांनी लिहिलेल्या “प्रशासन” या पुस्तकाचे परीक्षण निवृत्त माहिती संचालक श्री सुधाकर तोरणे यांनी ७ भागात
लिहिले होते. मुख्यमंत्री, लोकसभा अध्यक्ष राहिलेल्या सरांनी या पुस्तकात विविध व्यक्तींच्या यश कथा लिहून स्वतःच्या मनाचा मोठेपणा दाखविला आहे. असो…
ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांनी त्यांच्या विषयी सांगितलेल्या या काही आठवणी. जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.
– संपादक
राजकारण आणि व्यवसाय याची सांगड घालून आपला शिक्षकी बाणा कायम जपणारे मनोहर जोशी हे वेगळया प्रकारचे राजकारणी होते. कष्टकऱ्यांच्या भुकेची त्यांना जाण होती आणि त्यातूनच महाराष्ट्रात “एक रुपयात झुणका भाकर” सारखी महत्त्वाकांक्षी योजना जन्माला आली होती.
जोशी सर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात “सर” आणि “पंत” या नावाने ओळखले जात. ते मुख्यमंत्री असताना, त्यांनी जेवढ्या महाराष्ट्रव्यापी यात्रा काढल्या होत्या, तेवढ्या आजपर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्याला काढता आल्या नाहीत. मी या संदर्भात एकदा त्यांना विचारले असता दिलखुलासपणे हसत जोशी सर उत्तरले होते, “त्यासाठी तुम्हाला शासकीय हेडक्वार्टर म्हणजे मंत्रालय आपल्या ताब्यात ठेवावे लागते”. केवळ नोकरशाहीच नाही तर पक्षातील निर्णय प्रक्रियेवरही असलेला त्यांचा प्रभाव, हेच त्यांच्या यशाचे गमक होते.
आज राज्यातील राजकारणात सत्तेतील भाजप प्रवेशासाठी जी गर्दी झालेली दिसतेय, त्याची नांदी सर मुख्यमंत्री असतानाच सुरू झाली होती. १९९५ मध्ये आक्रमक हिंदुत्ववादी राजकारण करत सत्तेवर आलेल्या शिवसेना-भाजप युतीमध्ये काँग्रेसची संस्कृती सामावून घेण्याची सुरुवात युती सरकारच्या कार्यकाळातच सुरू झाली होती. पिढीजात काँग्रेसी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पासून, वादग्रस्त सुरेश जैन यांच्या पर्यंतचे अनेक नेते शिवसेना – भाजप युती सरकारमध्ये मध्ये मंत्री बनले होते. इतकंच नव्हे तर ते जोशी- मुंडे यांच्या मंत्रिमंडळाचा आधार बनले होते.
जोशी सरांबरोबर मी अनेक दौरे केले, बऱ्याच मुलाखती घेतल्या. त्या प्रत्येक भेटीत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळा पैलू पहायला मिळे. व्यक्तिगत जीवनात ते अत्यंत साधे होते. सकाळी दररोज ठराविक पद्धतीचा दुधाचा चहा, जगात कुठेही असोत, कांदेपोहे किंवा बटाटा वडा हा नाष्टा, साधं जेवण हा त्यांचा आहार होता. दुपारची वामकुक्षी आणि रात्री लौकर झोप, हे त्यांच्या कार्यक्षम जीवनशैलीचे सूत्र होते.
आता राजकारण खूप बदलले आहे. राजकीय नेत्यांचा प्राधान्यक्रम बदलला आहे. पण युतीच्या काळात सुरू झालेला आपल्या पक्षातील ज्येष्ठ सहकारी नेत्यांपेक्षा, अन्य राजकीय पक्षसंस्कृती मधील नव्या नेत्यांवर विश्वास ठेवणे, हा जणू पायंडा पडला आहे. त्यामूळेच असेल कदाचित, ज्या उध्दव ठाकरे यांना राजकारणात सक्रिय करण्यासाठी मनोहर पंतांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्याकडे शिवसेनेचे नेतृत्व आल्यानंतर मनोहर जोशी मात्र बाजूला पडले होते.
आपण राष्ट्रपती व्हावे, ही जोशी सरांची महत्त्वाकांक्षा होती. एका प्रदीर्घ दौऱ्या दरम्यान मी जोशी सरांची भाषणं तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या शैली सारखी होत आहेत, हे पाहिलं. आणि एके दिवशी, ते एकटे असताना, त्यांना या “नवीन स्टाइल” बद्दल विचारले. तेव्हा सरांनी मिश्किलपणे हसत “आपण हिंदी शिकण्यासाठी एक शिक्षक ठेवला असल्याचे” मला सांगितले आणि “राष्ट्रीय राजकारणात आपण का जाऊ नये” असा मलाच प्रतिप्रश्न विचारला होता.
जोशी सर लोकसभा अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रपती पदाचा टप्पा गाठण्यासाठी व्यापक जनसंपर्क निर्माण केला होता. त्यांच्या साठाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईत झालेल्या कार्यक्रमात जी राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांची मांदियाळी जमली होती, त्यावरून त्यांच्या या सर्वपक्षीय मैत्रीचे दर्शन घडले होते. पण काही राजकीय अडथळ्यांमुळे त्यांचे ते स्वप्न अपुरे राहिले. अर्थात तरीही न हरता, नेहमी low aim is crime हे बोधवाक्य जगणाऱ्या जोशी सरांनी लोकसभा अध्यक्षपदाचा मान मोठ्या कौशल्याने मिळवला होता. त्यांच्या या राजकीय चातुर्याची, मोठया कार्यक्षमतेची आणि हिमतीची बरोबरी करणारे केवळ एक- दोन नेते सध्या महाराष्ट्रात आहेत. त्यांनी जोशी सरांच्या कारकिर्दीचा नीट अभ्यास केला पाहिजे. कारण वैचारिक, अध्यात्मिक, नैतिक आणि भौतिक श्रीमंती असलेला महाराष्ट्रच देशाला प्रगतीपथावर नेणारे उच्च दर्जाचे नेतृत्व देऊ शकतो.
परिस्थिती सर्वार्थाने प्रतिकूल असताना, वार लावून जेवणारा, एक गरीब घरातील मुलगा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद या उंचीपर्यंत झालेला मनोहर जोशी सर यांचा जीवन प्रवास, नवीन पिढ्यांसाठी नेहमीच स्फूर्तीदायक ठरेल.
आदरणीय सरांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन !
— लेखन : महेश म्हात्रे. जेष्ठ पत्रकार, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800